‘शुभादित्य’च्या पर्यावरणस्नेही एअरबॅग्ज

24 Apr 2021 12:24:27

पॅकेजिंग उद्योगात उत्पादनाच्या सुरक्षेचा निकषही प्राधान्यावर असतो. वाहतुकीमध्ये अनेक उत्पादनांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. असं नुकसान टाळण्यासाठी पर्यावरणस्नेही एअरबॅग्ज निर्माण करणारी भारतातील कंपनी म्हणजे तारापूर एमआयडीसीतील शुभादित्य एंटरप्राइझेस. शुभादित्यचे संस्थापक जयेश राऊत यांची पॅकेजिंग उद्योगातील या वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारी ही मुलाखत.
 

Eco-friendly airbags_1&nb


भादित्यमध्ये
तुम्ही पॅकेजिंगसाठी जी उत्पादनं बनवता, त्यांचे नेमके ग्राहक कोण असतात? कोणत्या क्षेत्रासाठी या उत्पादनांचा उपयोग होतो?

इलेक्ट्रॉनिक्सची उत्पादनं बनवणार्या कंपन्या - उदा., एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, हायर यांच्या मोठमोठ्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचं नुकसान होऊ नये, यासाठी लागणार्या एअरबॅग्ज आम्ही तयार करतो. या एअरबॅग्ज 3 8 फूट आकाराच्या - म्हणजे साधारण आपल्या बेडच्या आकाराच्या असतात. पूर्वी दोन फ्रिज बाजूला ठेवले की त्यामध्ये जागा राहायची. मग त्या जागेमध्ये तेवढ्याच आकाराचा थर्मोकॉल ठेवावा लागायचा. त्यामुळे तो तेवढा 2 फूट रुंद आणि 8 फूट उंचीचा थर्मोकॉल साठवून ठेवावा लागायचा. त्याऐवजी आता एअरबॅग्ज वापरल्या जातात. या एअरबॅगचा फायदा असा की, सुरुवातीला ती रिकामी असते. त्यामुळे साठवून ठेवणं सोयीचं असतं आणि हवा भरली की जेवढी जागा भरून काढायची असते, त्यानुसार त्यात हवा भरून वाढवता येते. एअरबॅगमध्ये कागद किंवा एलडीपी यांचा वापर असतो. एलडीपी 90 ते 100 मायक्रॉनचा असतो. त्यामुळे त्याचा पुनर्वापर करता येतो. कागदाचाही पुनर्वापर असतो. त्यामुळे एकूणच ही बॅग पर्यावरणस्नेही असते. थर्मोकॉल हा पर्यावरणाला हानिकारक असतो.

या उद्योगात तुम्ही कशा प्रकारे आलात? आतापर्यंतचा प्रवास कसा होता?

मी 12 वर्षांपूर्वी या उद्योगाला सुरुवात केली. त्याआधी नोकरी करत होतो. मी वापीला ज्या कंपनीत नोकरी करत होतो, तिथे सिमेंटच्या बॅग्ज तयार केल्या जात असत. त्या वेळी औरंगाबादची टोयोल्युस्युड म्हणून जी कंपनी होती, त्या कंपनीने मला एअरबॅग्ज दाखवल्या होत्या आणितू हे उत्पादन तयार करू शकतोस का?” म्हणून विचारलं होतं. ती बॅग परदेशातून आयात केलेली होती. त्या वेळी आपल्याकडे कोणी त्या बॅगा तयार करत नव्हतं. त्यांनी मला सांगितलं की त्याचा वापर कसा होतो ते तू एकदा औरंगाबादला येऊन बघ. त्यानंतर मी त्यांच्या कंपनीत जाऊन त्या एअरबॅग्ज कशा असतात, त्यांचा वापर कसा केला जातो हे पाहिलं. तो अभ्यास करून मी त्या बॅग्ज बनवल्या. त्या वेळी - म्हणजे 2008मध्ये या बॅग्ज निर्माण करणारे कोणी उत्पादक नव्हते. आयात करून त्या विकल्या जात होत्या. मी ज्या कंपनीत काम करत होतो, तिथे मी या बॅग्ज तयार करून त्यांना दिल्या. आयात केलेल्या बॅगांची किंमत प्रत्येकी बाराशे रुपयांपर्यंत जात होती. आम्ही साधारण साडेतीनशे रुपये दराने त्या बॅग्ज त्यांना दिल्या होत्या. पण मी जिथे काम करत होतो, त्यांना हे फारसं पटलं नाही. ‘याला भारतात काही मागणी नाही. त्यामुळे तू यात वेळ घालवू नकोसअसं त्यांचं म्हणणं होतं. नंतर मी नोकरी सोडून याच उत्पादनाची निर्मिती सुरू केली. भारतात नंतर याचा वापर वाढेल असा माझा अंदाज होता.

आता माझे बहुतांश ग्राहक परदेशी कंपन्या आहेत. तसंच भारतातील काही कंपन्याही आहेत. मात्र भारतातील कंपन्यांना जेव्हा त्यांचे परदेशातील ग्राहक त्यांची उत्पादनं पाठवताना एअरबॅग्ज वापरण्याचा आग्रह धरतात, तेव्हाच त्या एअरबॅग्ज वापरतात. भारतीय कंपन्या त्यांच्या उत्पादनांचं मूल्य ठरवताना 0.5 टक्के नुकसान पकडूनच हिशेब करतात. त्यामुळे ते एअरबॅग्ज वापरण्याचा विचार सहसा करत नाहीत. खरं तर ते चुकीचं आहे. कारण एखादी वस्तू बनवताना त्यात 0.5 टक्के जरी नुकसान झालं, तरी ते नुकसान राष्ट्रीय असतं. कारण त्याच्या निर्मितीत अनेकांचे हात लागलेले असतात. आपल्या देशात या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं.

 इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं असतील किंवा दुधाचे कंटेनर असतील किंवा अन्य खाद्य उत्पादनं असतील, ज्यांच्या वाहतुकीतही नुकसानीचा धोका असतो, त्यासाठीही या एअरबॅग्ज वापरणं उपयोगाचं ठरतं. अर्थात आपल्याकडे अजून तितका वापर केला जात नाही.

 

मलाही सुरुवातीची दोन वर्षं लोकांना समजावून सांगण्यात गेली. बाहेरून आयात केलेल्या बॅग्ज आणि एका भारतीय व्यावसायिकाने तयार केलेल्या बॅग्ज यांच्या गुणवत्तेत फरक असणार, अशी लोकांना शंका होती. त्यांच्यात विश्वास निर्माण करावा लागला. मी ग्राहकांना दोन्ही बॅग्जची गुणवत्ता आणि किंमत यांची तुलना करून दाखवली. तेव्हा त्यांना पटलं की या बॅग्ज किमतीने कमी असल्या, तरी गुणवत्ता तेवढीच चांगली आहे. पहिल्या वर्षी तर मी फक्त 200 बॅग्ज विकल्या होत्या. केवळ 80 हजार रुपये एवढी वार्षिक उलाढाल होती. आता मात्र 6-8 कोटींपर्यंत या व्यवसायाची उलाढाल आहे.


Eco-friendly airbags_2&nb

 

तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? ती या व्यवसायाला अनुकूल होती का?

बोईसरमध्ये चिंचणी गावात माझं शिक्षण झालं. वडील वन विभागात नोकरीला, तर आई गृहिणी. आम्ही चौघं भाऊ. माझं बारावीपर्यंतच शिक्षण मराठी माध्यमातून झालं. आर्ट्समधून ग्रॅज्युएशन केलं होतं. ग्रॅज्युएशननंतर घरच्यांनी सांगितलं की बोईसर एमआयडीसीमध्ये नोकरी कर. तिथे एका पॅकेजिंगच्या कंपनीत चेकिंगचं काम करायला लागलो. मी क्वालिटी कंट्रोलमध्ये असलो, तरी सगळ्या विभागांच्या कामात रस घ्यायचो. त्यामुळे सगळ्यातलं ज्ञान मिळवत गेलो. स्वत:ची कंपनी सुरू केली, तेव्हा त्याला लागणार्या मशीनरी मी स्वत: तयार केल्या. माझ्याकडे तांत्रिक शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. मात्र इच्छाशक्तीच्या बळावर आणि नवीन काही तरी शिकण्याच्या स्वभावाने मी ते करू शकलो नाही. या वेळी शाळेतलं बेसिक गणित मला उपयोगी पडलं.

 

तुमच्या ग्राहकांमध्ये अनेक अग्रनामांकित कंपन्या आहेत. असे अग्रनामांकित ग्राहक मिळवायला काही त्रास झाला की बॅगेची गुणवत्ताच अशी होती की ग्राहक आपणहून त्याकडे वळले?

गुणवत्ता सुरुवातीपासूनच होती. त्याबाबत मी कधी तडजोड केली नाही. ग्राहकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. त्यात वेळ गेला. पण दोन वर्षांनंतर ते स्वत:होऊनच संपर्क करू लागले. आजच्या घडीला जर तुम्ही कागदाची एअरबॅग मागितली, तर भारतात फक्त शुभादित्यचीच पेपरबॅग दिसते. त्यामुळे आमच्या ग्राहकांनी आता परदेशातून एअरबॅग्ज मागवणं कमी केलं आहे. कागदी बॅगांप्रमाणे पॉलिवोव्हनही एअरबॅग्ज असतात. त्या वजनाने थोड्या हलक्या असतात आणि किमतीतही स्वस्त असतात. या पॉलिवोव्हन पेपर बॅग्जच्या निर्मितीत आता अनेक लोक आले आहेत.


Eco-friendly airbags_3&nb 

पर्यावरणपूरक एअरबॅग्ज बनवता ते पर्यावरणाची जाणीव म्हणून बनवता की ग्राहकांच्या मागणीनुसार बनवता?

कागदी एअरबॅग्ज बनवताना पर्यावरणाचा विचार असतो. उलट ग्राहकांच्या मागणीनुसार मला पॉलिवोव्हन एअरबॅग्जही बनवाव्या लागतात. पण त्या पर्यावरणपूरक नाहीत. चीनवरूनही त्या प्रकारच्या बॅगा येतात. त्यांच्याशीही स्पर्धा असते. मात्र मी ग्राहकांना आपणहोऊन पर्यावरणपूरक बॅगा वापरण्याचा आग्रह करतो.

साधारण युरोपीय देशांत पर्यावरणपूरक एअरबॅगच लागतात. आखाती देशांत किंवा आफ्रिकी देशांत पॉलिवोव्हनसारखी पर्यावरणपूरक नसलेली उत्पादनं वापरतात. भारतात शक्यतो उत्पादनं निर्यात करताना कागदी एअरबॅग्ज वापरतात. इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या देशांतर्गत किंवा स्थानिक वाहतुकीसाठीही कागदी एअरबॅग्ज वापरतात. कारण आपल्याकडचे रस्ते अजूनही तितके चांगले नाहीत.

तुमच्या ग्राहकांच्या काही वेगळ्या प्रतिक्रिया, अनुभव सांगू शकाल का?

आमच्या मालाची गुणवत्ता आणि सर्व्हिस दोन्ही चांगले असल्याने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आमचे ग्राहक कधीही मालाची मागणी करतात. अगदी संध्याकाळी चारला ऑर्डर देऊन रात्री 11 वाजता त्यांना माल हवा असेल, तरी मी त्यांना त्या वेळेत माल पोहोचवतो. याबाबतचा एक अनुभव म्हणजे पुण्याला सेंटर फार्मा म्हणून एक कंपनी आहे. ते कागदी एअरबॅग्ज वापरतात. एकदा ते ज्यांच्याकडून पेपरबॅग्ज घेत, त्यांना ऑर्डर द्यायची राहून गेली होती. त्यांच्याकडे त्यांच्या मालाचे कंटेनर आलेले होते. त्यांनी मला फोन केला होता. त्यांना अगदी 20-25 एवढ्या कमी संख्येत बॅग्ज हव्या होत्या. तेवढ्यासाठी टेम्पो पाठवणं परवडणारं नव्हतं. पण मी तातडीने माझ्याकडे उपलब्ध असलेल्या बॅग्ज पुण्याला त्यांच्याकडे पोहोचवल्या. त्या वेळी मी फायदा-नुकसानीचा विचार केला नाही. ग्राहकांशी रिलेशन टिकवणं हे महत्त्वाचं मानलं. पण नंतर हे नुकसान भरून निघालं.

असाच आणखी एक अनुभव. अंबरनाथच्या एका कंपनीने मला बोलावून एअरबॅग्जची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 बॅग्ज हव्या होत्या. इतर वितरकांनी एवढी कमी मागणी पूर्ण करण्याचं नाकारलं होतं. मी माझी दोन माणसं गाडी करून तिथे माल घेऊन पाठवली. खरं तर यात माझं नुकसानच जास्त झालं होतं. मात्र नंतरच्या काळात त्याचा वेगळ्या प्रकारे फायदा झाला. ती कंपनी काही वर्षांनी बंद झाली. तिथला एक माणूस महाडला दुसर्या एका कंपनीत गेला. तेव्हा त्याने तिथे शुभादित्यच्या सर्व्हिस आणि गुणवत्तेविषयी सांगितलं. त्यानंतर त्या कंपनीने दर महिन्याला 200 बॅग्ज घ्यायला सुरुवात केली. गेली 8 वर्षं मी त्यांना माल पुरवतोय. या प्रसंगातून मी शिकलो की सर्व्हिस देताना ऑर्डर लहान-मोठी आहे का, हा विचार करायचा नाही. त्याचा दीर्घ काळात उपयोगच होतो.

पॅकेजिंग क्षेत्राच्या रोजगारनिर्मितीच्या क्षमतेविषयी काय सांगाल?

पॅकेजिंगमध्ये रोजगारनिर्मितीची क्षमता जास्त आहे. यात मनुष्यबळ मोठ्या संख्येने लागतं. कारण अद्याप आपल्याकडे पॅकेजिंगमध्ये ऑटोमेशन फारसं शक्य नाही. माझ्या छोट्याशा युनिटमध्येही पन्नास माणसं काम करतात.

आपल्या देशातील पॅकेजिंगचं तंत्रज्ञान पुरेसं अद्ययावत आहे का?

आपल्याकडे पॅकेजिंगबाबत ऑटोमेशन कमी आहे. जास्तीत जास्त प्रक्रिया मनुष्यबळाचा वापर करून केल्या जातात. अलीकडे फ्लेक्झिबल पॅकेजिंगसारख्या प्रकारात तंत्रज्ञानावर जास्त खर्च केला जातो. तसंच पूर्वी प्रिंटिंगमध्ये केवळ दोन कलर असायचे. आता सेव्हन प्लस प्रिंटिंग मशीन्स, प्रोटो ग्रेड प्रिंटिंग मशीन्स आली आहेत.

बहुतेक सगळ्याच उद्योग क्षेत्रांना कोरोना महामारीचा फटका बसला आहे. तुमचा याबाबतचा अनुभव कसा होता?

खरं तर मला या महामारीच्या संकटाचा फायदा झाला. माझा व्यवसाय 15-16 टक्क्यांनी वाढला. आपल्याकडच्या ज्या कंपन्या परदेशातून एअरबॅग्ज आयात करत होत्या, त्या या काळात आयात करू शकल्या नाहीत. त्यांनी स्थानिक उद्योजकांकडे त्या घ्यायला सुरुवात केली. तसंच माझी सर्व्हिस चांगली असल्याने माझ्याकडे कधीही मागणी केली तरी मी ती पूर्ण करत होतो. त्यामुळे अनेक नवीन ग्राहक मिळाले. जे ग्राहक माझ्याबरोबरच अन्य पुरवठादारांंकडून माल घेत होते, ते फक्त माझ्याकडूनच घेऊ लागले. मात्र या काळात उद्योग चालू ठेवण्यासाठी माझ्याकडच्या कर्मचार्यांची जाण्या-येण्याची, जेवणा-खाण्याची, सर्व व्यवस्था मी केली. त्यांच्या सुरक्षेबाबतही काळजी घ्यावी लागली. सगळे कर्मचारी स्थानिक असल्याने फारशी अडचण आली नाही.

तुम्ही नोकरी सोडून या उद्योगाकडे आलात. व्यवसायासाठी कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना उद्योगासाठी लागणारं भांडवल उभारणं हे आव्हान असतं. अशा वेळी बँकांकडून कर्जही सहजासहजी मिळत नाही. तुमचा याविषयीचा अनुभव कसा होता?

मी सुरुवातीला नोकरी सोडून जेव्हा उद्योग सुरू केला, तेव्हा मी आधीच हा विचार केला होता की या उद्योगात स्थिरस्थावर व्हायला आपल्याला किमान दोन-तीन वर्षांचा काळ लागणार आहे. लगेच काही आपल्याला नफा होणार नाही. घरच्यांनीही यात पाठिंबा दिला. माझ्या मेहुण्याने आर्थिक सहकार्य केलं. तरी पहिल्याच वर्षी माझी उलाढाल 80 हजारांची होती. दुसर्या वर्षी 8 लाखांची उलाढाल होती. म्हणजे ती दहा पटींनी वाढली होती. तिसर्या वर्षी 55 लाखांपर्यंत गेली होती.

बँकेतून कर्ज घ्यायचं, तर पहिल्या तीन वर्षांची बॅलन्सशीट दाखवावी लागते. त्यामुळे पहिल्या तीन वर्षांत बँकांचं सहकार्य नीट मिळत नव्हतं. त्यानंतर मात्र माझी वार्षिक उलाढाल वाढल्यामुळे सगळ्या बँका माझ्याकडे येऊ लागल्या. 2015पर्यंत मी भाड्याच्या जागेत उद्योग चालवत होतो. 2015मध्ये आडीबीआय बँकेने मला कर्ज दिल्यानंतर मी जागा विकत घेतली. त्या वेळी अनेक बँकांनी माझी बॅलन्सशीट आणि आयटी रिटर्न बघून माझं कर्ज आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आयडीबीआयने मला पडत्या काळात साथ दिल्याने मी तसं केलं नाही.

 

या उद्योगात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो?

पेपर एअरबॅग्ज बनवण्यासाठी मी ज्या प्रकारचा कागद वापरतो, तो मला 100 टक्के आयात करावा लागतो. कारण त्या दर्जाचा कागद भारतात बनतच नाही. अशा कागदाची आपल्याकडे निर्मिती वाढायला हवी, त्यासाठी बांबू शेती वाढवण्यासारख्या पर्यायांचा विचार व्हायला हवा. तसं झालं, तर आपण या उद्योगात पूर्णपणेआत्मनिर्भरहोऊ शकू.

तुमच्या भविष्यातील उद्योग विस्ताराच्या काही योजना आहेत का?

बाहेरच्या देशात या पेपर एअरबॅग्ज मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. युरोपमध्ये किंवा अमेरिकेत यांना चांगली मागणी आहे. काही वर्षांपूवी याच उत्पादनांची निर्मिती करणार्या परदेशातील एका कंपनीने एक प्रस्ताव ठेवला होता. त्या कंपनीकडे महिन्याला 3 लाख बॅगांची आर्डर असे. मात्र त्यांची क्षमता 2 लाख बॅगांच्या निर्मितीची होती. त्यांनी मला एक लाख बॅग्ज बनवून देण्याविषयी सांगितलं होतं. त्या वेळी माझी तेवढी क्षमता नसल्याने मी नकार दिला होता. मात्र आता मी तेवढ्या बॅग्ज बनवून देऊ शकतो. त्यामुळे भविष्यात फक्त भारतापुरतं मर्यादित राहता परदेशातील कंपन्यांना माल निर्यात करण्याचा माझा प्रयत्न असेल. माझी सध्याची 8 कोटींची उलाढाल 25 कोटींपर्यंत नेण्याचं माझं उद्दिष्ट आहे.

मुलाखत : सपना कदम-आचरेकर

Powered By Sangraha 9.0