मायावी राक्षसाच्या अंतरंगाची ओळख ‘अचपळ चीन’

विवेक मराठी    19-Apr-2021
Total Views |

 

अचपळ चीनहे पुस्तक वाचकांच्या ज्ञानात भर टाकणारे तर आहेच पण सर्व पुराव्यांसह केलेल्या या लिखाणामुळे समाजाच्या विचारशक्तीला एक मार्ग दाखवणारे आहे. चीन या विषयात एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ या निमित्ताने मराठी साहित्यात निर्माण झाला आहे.

china_1  H x W:

 

चीन! या एका देशामुळे आज सर्व जग संताप, दुःख, अनिश्चित भविष्य याच्या खाईत लोटले गेले आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे आज भारतभर घबराटीचे वातावरण आहे. काय आहे या चीनचे सत्य? काय उद्दिष्ट आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे? त्यासाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात? असे प्रश्न आज आंतरराष्ट्रीय राजकारणाशी काही संबंध नसणार्या सामान्य माणसालाही पडू लागले आहेत. पण ही उत्तरे मिळवायची कशी? आणि ती सहज सोप्या पद्धतीने समजून घ्यायची कशी?

याचसाठी स्वाती तोरसेकर यांनी आपल्याअचपळ चीनया पुस्तकाची संरचना केली आहे. पुस्तकाच्या नावामुळेच या पुस्तकात किती रहस्ये स्वातीताई उलगडून दाखवणार आहेत. याबाबत उत्सुकता लागून राहते. ‘अचपळया शब्दाची ओळख समर्थांचेअचपळ मन माझे नावरे आवरितापाठ करताना लहानपणी झाली होती. त्यामुळे अचपळ म्हणजे अति-चपळ, चंचल हा अर्थ मला माहीत होता. ‘अचपळ चीनचा पुस्तक परिचय लिहिणे ही माझ्यासाठी एक सुसंधीच ठरली. कारण पुस्तकातील एकेक प्रकरण म्हणजे खूप वेळ सायीचे विरजण घुसळल्यानंतर लोण्याचा गोळा निघावा तसे प्रचंड अभ्यास आणि चिंतनानंतर तयार झालेले नवनीतच आहे. हे पुस्तक वाचकांच्या ज्ञानात भर टाकणारे तर आहेच पण सर्व पुराव्यांसह केलेल्या या लिखाणामुळे समाजाच्या विचारशक्तीला एक मार्ग दाखवणारे आहे. चीन या विषयात एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ या निमित्ताने मराठी साहित्यात निर्माण झाला आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपण भाग आहोत आणि आपल्याला सोयीस्करपणे वापरून घेतले जात आहे, हे समजायलाच सामान्य नागरिकांना सहा-सात दशकं जावी लागली. त्यात सर्व प्रमुख प्रसारमाध्यमे डावे आणि काँग्रेसच्या हातात होती, अजूनही आहेत. डावे, काँग्रेसधार्जिणे थिंक टँक आणि विचारवंत जेज्ञानम्हणून वाटतात, तो एका विचारसरणीचा प्रचाराचा भाग असतो, हे आता कुठे समजू लागले आहे. चीनचे राक्षसी आव्हान भासवले जाते तितके बलवान नाही, त्यावर मात करणे शक्य आहे ही बाब वस्तुनिष्ठ प्रमाणे देऊन लेखिकेने या पुस्तकाद्वारे प्रकाशात आणली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रीय समाजात जागृती करण्याचे मोठे काम स्वातीताईंसारख्या अभ्यासू, नेटक्या लेखकांनी, विचारकांनी मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. आज जागोजागी विविध प्रकारे त्याचे सुपरिणाम आपल्याला पहायला मिळत आहेतच. ‘अचपळ चीनहे पुस्तकही याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

सुरुवातीच्या प्रकरणापासूनच आपल्याला चीनची थोडक्यात पण सखोल माहिती मिळू लागते. मग तेसुन त्सूच्या आर्ट ऑफ वॉरया पुस्तकातील तत्त्वज्ञान असो किंवा माओ झेडाँगची कारकीर्द आणि कूटनीटी असो, लेखिका वाचकांना समजेल, रस वाटेल अशा प्रकारे इतिहासातील दाखले देत चीनला मध्यवर्ती ठेवून वर्तमानातील घडामोडींचे अर्थ, त्यामागील राजकारण समजावत जातात.

एकूणात जागतिक राजकारण समजायचे तर चीन माहीत हवा आणि चीन समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक म्हणजे मुळाक्षरे गिरवणे आहे. आणि ती गिरवतानाच आपले व्याकरण म्हणजेच मनोभूमिकाही पक्की होत जाईल याची खबरदारी लेखिकेने सहजगत्या घेतलेली पानोपानी जाणवत जाते. सामाजिक, राजकीय, आतंरराष्ट्रीय अंगांतून आपल्या जाणिवा उन्नत करायच्या, तर हे पुस्तक केवळ आपल्या बुकशेल्फच्याच नव्हे, तर आपल्या मेंदूच्या संग्रही असणे आवश्यक आहे.

 

पुस्तकात चीनच्या केवळ राजकीय, सामरिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला आहे असे नाही, तर चीनचे भौगोलिक सत्यही लेखिकेने या पुस्तकाद्वारे स्पष्टपणे जगासमोर आणले आहे.

जागतिक शक्तींचे केंद्रबिंदू कसे विविध काळात बदलत गेले आहेत आणि आजची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेताना लेखिका भविष्याविषयीही काही आराखडे वाचकांच्या मनात तयार होतील अशा खुबीने माहिती आणि स्वतःचे चिंतन यांचे सिंचन पानापानांवर करताना आपल्याला जाणवते.

 

चीनी अजगराने माओच्या अधिपत्याखाली तिबेट कसा गिळला आणि आता यापुढे भारतासमोर कोणती आव्हाने आहेत याची सुस्पष्ट जाणीव वाचकांना होत जाते. तिबेटचे चीनच्या भूत-वर्तमान-भविष्यातील महत्त्व प्रकर्षाने जाणवत राहते. पुस्तकाच्या विविध प्रकरणांत भारताने आजवर केलेल्या चुका मांडतानाही लेखिका अजिबात कचरत नाहीत. माओचा आणि त्या पुढचा चीनी इतिहास काही प्रमाणात तरी लोकांना माहीत आहे. पण या पुस्तकाची खासियत अशी की शी जिन पिंग यांच्या कार्यकालाविषयीही साद्यंत हकिकत वाचकांना अवगत होत जाते. माओपासून शी जिनपिंगपर्यंत औद्योगिक क्षेत्र, युद्ध क्षेत्र, चिनी जनतेला भरवले गेलेले तत्त्वज्ञान यात कसकसे बदल होत गेले आणि त्याचे काय काय परिणाम कुठे कुठे झाले याविषयीचे लिखाण तर लाजवाब आहे.

 

चिनी सरकारच्या मग ते कोणत्याही काळातले असो, क्रौर्याच्या भयकथा वाचताना चीनचे खरे स्वरूप अधिकाधिक स्पष्ट होत जाते. चिनी कम्युनिस्ट पार्टीने कसलेही रूप धारण केले तरी ती एक रक्तपिपासू, राक्षसी महत्त्वाकांक्षा असणारी, येनकेनप्रकारेण विस्तारवादी धोरणाचा अवलंब करणारी, फॅसिस्ट, निर्घृण यंत्रणा आहे याविषयी आपल्याला शंका रहात नाही. जगभरातील विविध प्रकारची प्रसारमाध्यमे प्रचंड पैसा खर्चून चीनने आपल्या अंकीत करून घेतली आहेत. जगातील देशांत आपली ठाणी बसवली आहेत. हे लोक त्या त्या देशांतील लोकांचा मतप्रवाह चीनधार्जिणा होत जाईल या कामासाठी अविरत मेहनत करत असतात. चीन हा अतिबलाढ्य, अजेय, अविश्वसनीय प्रगती केलेला देश आहे असे मत भारतीय समाजाचे होईल यासाठी डावे, सेक्युलर, पुरोगामीविचारवंतकिती मेहनत करतात हे आपण रोजच्या रोज अनुभवतो आहोतच. अशाभोळ्याभाबड्यासंकल्पनांना सुरुंग लावण्याचे काम या पुस्तकाद्वारे होते आहे.

 

चीन विविध स्वरूपात स्वतःची मालमत्ता जगाच्या विविध कानाकोपर्यांत गेली पाच दशके निर्माण करत आहे. सगळं जग आपल्या व्हीप्स आणि व्हिम्स वर चालवण्याची त्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी हे डीप असेट्स आणि बाकी यंत्रणा कशा स्वरूपात कामे करतात याविषयी सखोल अशी समज पुस्तक वाचताना येत जाते. या महाराक्षसाची शक्तिस्थाने आणि हळवे कोपरे या दोहोंविषयी सामान्य माणसालाही माहिती असणे फार आवश्यक आहे. चीनमधली विदारक सत्य परिस्थिती, मूल्यहीन सरकार हे भ्रष्टाचाराचे खरे कारण आहे. परिणामी मूल्यबांधिलकीशी दुरान्वयानेही संबंध नसणार्या देशांशी चीनने अत्यंत सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. याचा वापर तो कशाप्रकारे करून घेतो हे समजून घ्यायचे असेल तर पाकिस्तान-चीन संबंध, बीआरआय-सीपेकचे रहस्य ही प्रकरणे वाचायलाच हवीत. विद्यमान भारत सरकारने चीनला शह देण्यास प्रभावी सुरुवात केली आहे. या संदर्भात भारत-चीन संबंधांवरची टिप्पणीही अशीच लक्षवेधी आहे.

जगालाच गिळंकृत करायला निघालेल्या कोरोनाविषयी तर पुस्तकातच वाचणे लाभदायक आहे. यावर काही बोलण्याचे मी टाळते.

सारांशात अतिशय समृद्ध असा हा ग्रंथ सर्व वाचनप्रेमी सुजाण नागरिकांनी आपल्या संग्रही ठेवावा असा आहे.


पुस्तक - अचपळ चीन

लेखक
- स्वाती तोरसेकर

प्रकाशक - दीनदयाळ प्रेरणा केंद्र, ठाणे

पृष्ठे - 170

मूल्य - 200/- रु.