संकटातून संधीकडे भारताची गरुडझेप

27 Mar 2021 14:33:14

कोरोना संकटात भारतातील अनेकांनी संधी शोधण्याचा प्रयत्न केला आणि बहुतांश लोक त्यात यशस्वीही झाले. भारताच्या श्रमशक्तीचं आणिआत्मनिर्भर भारतचं एक दमदार उदाहरण अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. याच जिद्दीमुळे भारताला एका मजबूत स्थितीत उभं राहता आलं.

 modi_1  H x W:

कोरोनाच्या संकटाला संधीत बदलण्याचा हा भारताच्या इतिहासातला एक टर्निंग पॉइंट आहे. या क्षणी सारं जग भारताकडे आदराने, सन्मानाने आणि कृतज्ञतेने बघतंय. भारतीय जीवनमूल्यांची ओळख जगाला होतेय. नियती एक चांगला संकेत देतेय. समाज सक्रिय होत आहे.

 ‘फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग कॉर्पोरेशन ही कॅनडाची कंपनी सध्या चर्चेत आहे. १९८५मध्ये स्थापन झालेली ही कंपनी इन्शुरन्सच्या क्षेत्रात असून शेअरहोल्डर्सना गुंतवणुकीच्या चांगल्या संधीची माहिती देणे हेदेखील ह्या कंपनीचे काम आहे. टोरंटो, कॅनडामधील अब्जाधीश भारतीय उद्योगपती व्ही. प्रेम वत्स यांनी स्थापित केलेली ही कंपनी गुंतवणुकीच्या क्षेत्रात एक मोठी आणि विश्वसनीय कंपनी समजली जाते.


फेअरफॅक्स म्हटलं की भारतीयांना आठवतो तो बोफोर्स घोटाळा. त्या घोटाळ्यादरम्यान
फेअरफॅक्स हे नाव प्रसारमाध्यमांत सतत झळकत होतं. मात्र त्या फेअरफॅक्सचा आणि वर उल्लेख केलेल्या फेअरफॅक्सचा (प्रारंभीचे नाव सोडल्यास) अर्थाअर्थी काही संबंध नाही. बोफोर्स घोटाळ्यातील फेअरफॅक्स ही अमेरिकेतील खाजगी गुप्तहेर कंपनी (Private Detective Firm) आहे, तर फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग ही आर्थिक क्षेत्रातली कॅनडाची कंपनी आहे.


सध्या या फेअरफॅक्सचे सीईओ प्रेम वत्स ह्यांनी आपल्या शेअरहोल्डर्सना लिहिलेलं एक पत्र प्रसारमाध्यामांतून आणि सोशल मीडियावर भलतंच गाजतंय. ह्या पत्रात प्रेम वत्स यांनी भारताची आणि विशेषतः पंतप्रधान मोदींची भरपूर तारीफ केली असून आर्थिक क्षेत्रातील लोकांना भारतात गुंतवणूक करण्यास सांगितलं आहे. ह्या पत्राचा एक संपूर्ण भाग भारतात होणार्‍या विकासासंबंधी आहे. ह्यात प्रेम वत्स म्हणतात, ‘मोदी जेव्हा २०१४मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा आम्ही सर्व अत्यंत उत्साहित होतो. कारण मोदींचा गुजरातेतला मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी आणि आउटस्टँडिंग होता. तेरा वर्षांत सतत १० टक्क्यांची जीडीपीमधील वास्तविक वाढ ही कामगिरीच अद्भुत होती आणि मोदींनीही आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या. गेल्या सहा-सात वर्षांत त्यांनी भारतात एक फार मोठा बदल घडवून आणला आहे आणि आता तर मोदींनी व्यवसायाला अनुकूल आणि आर्थिक बाबतीत जबाबदार असे बजेट आणले आहे. त्यामुळे आर्थिक आघाडीवर भारताचे भविष्य फार चांगले आणि आशादायक आहे.फेअरफॅक्ससारख्या विश्वसनीय गुंतवणूक मार्गदर्शक कंपनीच्या प्रमुखाने केलेलं हे विधान फार महत्त्वपूर्ण आहे.

आणि फक्त फेअरफॅक्सच कशाला, सध्या सर्व जागतिक रेटिंग संस्थांनी भारताचा पुढील वर्षातला विकासदर दोन आकड्यात राहण्याची ग्वाही दिलेली आहे. भारत हा दोन आकड्यातील (अर्थात दहाच्या वर) विकासदर असणारा जगातील एकमेव देश असणार आहे. हे सारंच अद्भुत आहे. जबरदस्त आहे. कोरोनाच्या संकटात डगमगून न जाता, त्याला संधी मानून एक मोठी झेप घेण्याचं हे उदाहरण आहे! चारच दिवसांपूर्वी मूडी'ज अॅनालेटिक्स ह्या जागतिक रेटिंग संस्थेने भारताचा विकासदर १२ टक्के असेल अशी बातमी दिली आहे. जगभरात मूडीजच्या अनुमानाला एक विशेष महत्त्व आहे. नोव्हेंबरमध्ये ह्याच मूडीज अॅनालेटिक्सने हा विकासदर ९ टक्के असेल असं अनुमान दर्शवलं होतं. भारताच्या डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्यामुळे भारताच्या वाढत्या विकासदराचं अनुमान काढण्यात आलेलं आहे.


modi_1  H x W:

ह्या मूडीजचीच एक वेगळी कंपनी आहे – मूडीज इन्व्हेस्टर सर्विस' नावाची. या कंपनीने भारताचा विकासदर १३.७ टक्के गतीने येत्या आर्थिक वर्षात वाढेल असं अनुमान काढलंय. गेल्याच आठवड्यात 'ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD)ने म्हटलंय की येत्या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासदर १२.६ टक्के असेल. हे सारं खूपच आशादायक आहे. कारण या सर्व अनुमानांप्रमाणे येत्या आर्थिक वर्षात विकासदराच्या बाबतीत इतर देश आपल्या जवळपासही नसणार!

हे सारं सहज आणि अचानक झालेलं नाही. कोरोनाच्या ह्या कठीण काळात, जेव्हा इतर प्रगत देशांच्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेसकट सर्वच व्यवस्था ढासळत होत्या, कोलमडत होत्या, तेव्हा भारत कणखरपणे उभा राहून ह्या संकटाशी सामना करत होता. एन-१५ मास्क, पीपीई किट्स, टेस्टिंग किट्सपासून ते व्हेंटिलेटर्स आणि अगदी व्हॅक्सिनपर्यंत स्वतः निर्माण करत होता. संपूर्ण जगात अशा पद्धतीने कोरोनाचा मुकाबला करणारा भारत हा एकमात्र देश आहे आणि म्हणूनच तो अनेकांसाठी रोल मॉडेल बनलाय.

ह्या कालखंडात भारताने अक्षरशः चमत्कार करून दाखवला. कोरोनामुळे जगभरात पीपीई किटची (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किटची) खूप जास्त मागणी होती. मार्च २०२०पर्यंत आपल्या देशात पीपीई किटचे उत्पादन होत नव्हते. किंबहुना मेडिकल टेक्स्टाइल ह्या १७ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या जागतिक व्यवसायाकडे आपलं लक्षच नव्हतं. मात्र कोरोनामुळे आपल्याला पीपीई किटची गरज भासली आणि मग केंद्र सरकारने ह्या कीट्स, सर्व मानकांना अनुसरून, भारतातच उत्पादन करण्याचा निर्णय घेतला.

भारतातील उद्योजकांच्या अथक परिश्रमांनी मेच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत आपण दीड लाख पीपीई किट्स रोज बनवायला सुरुवात केली होती. फक्त चार महिन्यात भारताचा पीपीई किट्सचा उद्योग सात हजार कोटींचा झाला, जो जगात चीननंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे.

आणि आज? आज आपण रोज आठ लाखांपेक्षा जास्त पीपीई किट्स तयार करतो आहोत. सोळाशे उत्पादक HLLने (हिंदुस्तान लाइफकेयर लिमिटेडने) तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पीपीई किट्सचं उत्पादन करताहेत. दहापेक्षा जास्त देशांना आज भारत ही पीपीई किट्स निर्यात करतोय. यात अमेरिका, ब्रिटन यासारखे मोठे, संपन्न देश आहेत, तर सेनेगलसारखे लहानसे देशही आहेत.

 

असंच एक उदाहरण व्हेंटिलेटर्सचं. कोरोनाच्या संक्रमण स्थितीत व्हेंटिलेटर्सचं महत्त्व फार आहे. विशेषतः ज्या व्यक्तींवर संक्रमणाचा प्रभाव जास्त आहे, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून बरं करता येतं. त्यामुळे कोरोना उपचारप्रणालीत व्हेंटिलेटर हा आवश्यक घटक आहे. जेव्हा भारतात ह्या संक्रमणाची सुरुवात झाली, तेव्हा आपल्याजवळ फक्त १६,००० व्हेंटिलेटर्स होते, ज्यातील ८,४३२ व्हेंटिलेटर्स सरकारी इस्पितळात होते. म्हणजे गेल्या ७० वर्षांत आपल्या देशाने जमवले १६,००० व्हेंटिलेटर्स आणि तेही सर्वच्या सर्व आयात केलेले!

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पंतप्रधान मोदींनी Empowered Group of Secretaries (EGoS)ची एक समिती बनवली होती. या समितीचा अंदाज होता, भारताला साधारण ७५,००० व्हेंटिलेटर्सची गरज भासेल. त्यातील १६,००० भारताजवळ होतेच. उरले साधारण साठ हजार. आणि मग शासकीय यंत्रणा कामाला लागली. एकदा राजकीय इच्छाशक्ती जागृत झाली की काय चमत्कार घडू शकतात, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे व्हेंटिलेटर्स!

modi_1  H x W:  

MSME मंत्रालयाने ताबडतोब व्हेंटिलेटर्सचे तपशील (specifications) तयार करवले आणि मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादकांशी संपर्क साधला. त्या उत्पादकांना कामाला लावलं आणि अक्षरशः इतिहास घडवून आणला! फक्त चार महिन्यात भारताच्या उत्पादकांनी तब्बल साठ हजार व्हेंटिलेटर्स, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार केले. लक्षात घ्या - सत्तर वर्षांत फक्त सोळा हजार व्हेंटिलेटर्स, आणि तेही सगळे आयात केलेले. इकडे फक्त चार महिन्यात साठ हजार व्हेंटिलेटर्स, आणि तेही आयातीत उपकरणाच्या फक्त एक तृतीयांश किमतीत. हे सर्व व्हेंटिलेटर्स वेगवेगळ्या इस्पितळात लागून काम देताहेत आणि आता ह्या व्हेंटिलेटर्सचे उत्पादक पाच–सहा देशांना ही उपकरणं निर्यात करताहेत.

आम्ही करू शकतो. आम्ही करून दाखवलं..!

अशी अनेक उदाहरणं आहेत. गेल्या काही वर्षात भारतातला सिरॅमिक टाइल्सचा व्यवसाय चीनवर आश्रित होता. अधिकांश टाइल्स चीनहून आयात व्हायच्या. मात्र ह्या कोरोना महामारीने आणि ह्या दरम्यान चीनने गलवान खोर्‍यात केलेल्या घुसखोरीने चीनबद्दलचा भारतीय नागरिकांचा दृष्टीकोन बदलला. चिनी सामानाच्या बहिष्काराची तीव्र भावना जनतेत उफाळून आली. आता चीनहून ह्या टाइल्स येणार नाहीत हे नक्की झालं. मग भारतीय उद्योजक पुढे आले. मोरबी, राजकोट ही शहरं भारतातल्या सिरॅमिक उद्योगाची केंद्र आहेत. ह्या कोरोना काळात ह्या शहरांमध्ये सिरॅमिकचे शंभर–सव्वाशे नवीन कारखाने उघडले. ह्या क्षेत्रात कोरोनाच्या पाच–सहा महिन्यात जवळपास अकराशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. आधीपासून स्थापित असलेल्या कारखान्यांनी आपली क्षमता वाढवली. कोरोना काळापूर्वी ह्या कंपन्या आपल्या उत्पादनाच्या १८% माल परदेशात निर्यात करत होत्या. आता देशातली गरज भागवून त्यांच्या वाढीव उत्पादनाच्या २७% माल विदेशात निर्यात होतोय. ह्या सिरॅमिक टाइल्स बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल - अर्थात सिरॅमिक पावडर राजस्थानात तयार होते. मोरबी–राजकोटचा व्यवसाय वाढला, तशी ह्या राजस्थानच्या व्यापार्‍यांच्या सिरॅमिक पावडरलाही उठाव आला. या उत्पादकांनी आपलं उत्पादन वाढवलं. फक्त नोव्हेंबर २०२० ह्या एका महिन्यात राजस्थानच्या सिरॅमिक पावडर बनवणार्‍या उद्योगांनी सातशे कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय!

अगदी ग्रामीण भागातलं उदाहरण घेऊ. मेपासून वेगवेगळ्या शहरात राहणार्‍या श्रमिकांचा, आपापल्या गावात जाण्याचं ओघ सुरू झाला. बिहारमधील अनेक मजूर बाहेर होते, ते परत यायला लागले. यात पश्चिमी चंपारण जिल्ह्यात असणारे अधिकांश श्रमिक लुधियाना, जालंधर, सुरत, जयपूर, भिलवाडा अशा ठिकाणी रेडिमेड कपडे बनवण्याच्या उद्योगात काम करणारे होते. शिवाय साडी, एम्ब्रॉयडरी वगैरेंमध्ये हे सर्व निपुण होते. बिहार शासनाने या परतलेल्या श्रमिकांसाठी स्किल मॅपिंगचा कार्यक्रम चालवला होता. त्या कार्यक्रमाअंतर्गत प्रशासनाच्या लक्षात आलं की पश्चिमी चंपारण जिल्ह्यातल्या बेतिया तालुकातल्या चनपटियाह्या गावातल्या ७६ श्रमिकांकडे तयार कपडे उद्योगासाठी लागणारं कौशल्य आणि उद्यमशीलता अशा दोन्ही गोष्टी आहेत. मग त्यांनी ह्या श्रमिकांना चनपटिया गावात ओसाड पडलेलं भारतीय खाद्य निगम(FCI)चं गोदाम दिलं, काही रक्कम कर्जाऊ मिळवून दिली आणि अक्षरशः इतिहास घडला!

ह्या श्रमिकांनी त्यांच्या, आधी ते काम करत असलेल्या कंपन्यांशी संवाद साधला. ह्या कंपन्या / कारखाने कोरोनामुळे बंद पडले होते. त्यांना त्यांच्या ग्राहकांसाठी कमिट केलेला माल देण्याची गरज होती. त्यामुळे ते सप्लायर शोधत होतेच. अर्थात व्यवहार जमला. तो पुढे गेला. एकापेक्षा एक, चांगली उत्पादनं तयार होऊ लागली. या श्रमिकांनी आपलं सारं कौशल्य पणाला लावलं आणि स्वतःच्या हिमतीवर आपला माल बाहेरच्या राज्यात पाठवणं सुरू केलं. त्यांनी लदाखमध्ये भारतीय सैन्यासाठी लागणारी कांबळ्यांची (ब्लँकेट्सची) आणि टोप्यांची ऑर्डर मिळवली. त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि आता तर त्यांचे तयार कपडे बांगला देश, कतार, स्पेन वगैरे देशांतही निर्यात होत आहेत. असे साठपेक्षा जास्त लहान-मोठे कारखाने चनपटियात काम करताहेत.

कोरोनापूर्वी दुसर्‍या कंपन्यांमध्ये काम करणार्‍या ह्या श्रमिकांनी एकूण मिळून २० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. आज हे श्रमिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत कारखान्यांचे मालक झाले आहेत. ५००पेक्षा जास्त श्रमिकांना त्यांच्या गावातच रोजगार मिळाला आहे. यशाचं हे मॉडेल बघून सुरत आणि लुधियानाच्या काही कंपन्या आपल्या कारखान्यांचे युनिट्स बिहारला आणण्याच्या तयारीत आहेत. येथे तयार कपडा स्वस्त आणि चांगल्या गुणवत्तेचा आहे, शिवाय कुशल कामगारही उपलब्ध आहेत. मुंबई आणि सुरतहून चनपटियाला कच्चा माल पाठवला जातोय. बेतिया ह्या तालुका स्थानी, जिल्हा उद्योग केंद्राद्वारे एक डाइंग युनिट लावण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. बेतिया लवकरच एक मोठं औद्योगिक केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे.

चनपटियामध्ये एका छताखाली चंपारण ब्रॅंडचे लहंगा, चुनरी, भरतकाम केलेल्या साड्या वगैरे तयार होतात. आता तर ह्या कारखान्यांनी अत्याधुनिक मशीन्सद्वारे काम करायला सुरुवात केली आहे, ज्याद्वारे कॉम्प्युटर एडेड डिझाइन(CAD)च्या माध्यमातून टेक्स्टाइलमधील आधुनिक डिझाइन्सचे कपडे तयार होतील. येथे आता ट्रॅक सूट, जॅकेट, सॅनिटरी नॅपकीन्स, एम्ब्रॉयडरी, फूट वेयर इत्यादींची निर्मिती होते. हे चनपटिया मॉडेल म्हणजे भारताच्या श्रमशक्तीचं आणि आत्मनिर्भर भारतचं एक दमदार उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्यांनी भारताला एका मजबूत स्थितीत आणून ठेवलंय. हे सारं अद्भुत आहे. कल्पनेच्या बाहेरचं आहे. भारत अक्षरशः कात टाकतोय. कोरोनाच्या संकटाला संधीत बदलण्याचा हा भारताच्या इतिहासातला एक टर्निंग पॉइंट आहे.

या क्षणी सारं जग भारताकडे आदराने, सन्मानाने आणि कृतज्ञतेने बघतंय. भारतीय जीवनमूल्यांची ओळख जगाला होतेय. ह्या चिनी महामारीने आपलं जास्त नुकसान केलं नाही, याचं कारण आपली जीवनशैली, आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी, आपला योग’, आपला आयुर्वेद, आपली जीवनमूल्यं असं जग म्हणतंय. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही कोरोनाच्या व्हॅक्सिनवर काम करतोयअसं भारताने जाहीर केलं, तेव्हा अनेकांनी भारताची थट्टा केली. व्हॅक्सिन बनवायचं ते अमेरिका, ब्रिटन, जर्मनी ह्यासारख्या प्रगत देशांनी. भारताचं हे काम नाहीअसा सूर प्रसारमाध्यमांनी लावला. आणि आज? आज अनेक देश आपल्याला आर्जवं करताहेत व्हॅक्सिन लवकर देण्यासाठी. लहान-मोठ्या अशा ७१ देशांना आपण कोरोनाचं व्हॅक्सिन देतोय. त्यात आपला शत्रुराष्ट्रम्हणवणारा पाकिस्तानही आहे आणि प्रगत असा कॅनडासुद्धा आहे. होंडुरास ह्या दक्षिण अमेरिकेतील देशाचे राष्ट्रपती आपली तुलना हनुमंताने आणलेल्या द्रोणागिरी पर्वताशी करताहेत, तर व्हॅक्सिन दिल्याबद्दल लंडन आणि टोरांटोमध्ये भारतीय पंतप्रधानांचे मोठमोठे होर्डिंग्ज लागताहेत.

नियती एक चांगला संकेत देतेय. समाज सक्रिय आहे. केंद्रात संवेदनशील सरकार आहे. एकशे तीस कोटींचा हा राष्ट्रपुरुष जागा होतोय!

telemat@airtelmail.in

Powered By Sangraha 9.0