समाज आता परिवर्तनासाठी आतुर झालेला आहे, अशा वेळी लोकमनाची हाक लक्षात घेऊन त्याला दिशा दिली पाहिजे आणि त्याचे नेतृत्व केले पाहिजे. 1993च्या बाँबस्फोटानंतर गोपीनाथराव मुंडे यांनी हे काम समर्थपणे केले, हेच काम आता सक्षम नेतृत्वाने करायला पाहिजे. महाराष्ट्र ढवळून काढण्याची वेळ आता आलेली आहे.
गोपीनाथराव मुंडे यांनी मुंबईतील बाँबस्फोटानंतर (1993) महाराष्ट्र ढवळून काढणारी परिवर्तन यात्रा काढली होती. तेव्हा मुख्यमंत्री होते शरदराव पवार. दाऊद इब्राहीम आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईतील बाँबस्फोट केले. त्यांच्या आणि शरद पवारांच्या हितसंबंधाचे वाभाडे गोपीनाथराव मुंडे यांनी विधानसभेत काढले. यामुळे सर्व महाराष्ट्र हादरून गेला होता. परविर्तनासाठी जनता आतुर झाली होती. गोपीनाथरावांनी परिवर्तन यात्रा काढली आणि 1995 साली सत्ताबदल झाला. हा इतिहास अतिशय मोजक्या शब्दात दिला आहे.
दुसर्या परिवर्तन यात्रेची वेळ आता आली आहे. सचिन वाझे प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला आहे. परमबीर सिंग यांच्या पत्राने राजकीय भूकंप झालेला आहे. महाविकास आघाडी ‘महावसूल आघाडी’ झालेली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यावर पोलीस महानिरीक्षक आरोप ठेवतो की, दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल केले जावेत. सचिन वाझे याची नियुक्ती त्यासाठी करण्यात आली. हे सर्व प्रकरण राज्याच्या सदसद्विवेकबुद्धीला जबरदस्त हादरा देणारे आहे.
‘चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये,
सावन जो अगन लगाये, उसे कौन बुझाये।
पतझड जो बाग उजाडे, वो बाग बहार खिलाये
जो बाग बहार में उजडे, उसे कौन खिलाये।’
याचा अर्थ सोपा आहे - आगीचे शमन पाण्याच्या धारा करतात; पण त्या धारांनीच जर आग लावली, तर विझविणार कोण? वसंत ऋतूत बाग-बगिचे फुलतात; पण वसंत ऋतूनेच बाग उजाड केली, तर बाग फुलणार कशी? ज्यांनी रक्षण करायचे, तेच भक्षण करू लागले तर रक्षण कोणी करायचे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी दल या सरकारच्या त्रुटी दाखविण्याचे काम करीत राहते. संसदीय लोकशाहीतील तो एक अपरिहार्य भाग असतो. काही धोरणे चुकली तर टीका होते, एखाद्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला तर त्यावरदेखील टीका होते, जनहिताची कामे रखडली की त्यावर टीका होते. जर एखादा नेता चारित्र्यभ्रष्ट झाला, तर तोदेखील टीकेचे लक्ष्य होतो. या गोष्टी तशा सामान्य आहेत. प्रत्येक सरकारात कमी-अधिक प्रमाणात या गोष्टी होत असतात. धोरणे आखताना चुका होतात, काही वेळा चुकीचे सल्ले ऐकले जातात, तसेच मनुष्य म्हणून ज्या कमतरता आहेत, त्या कमतरता कधीकधी चारित्र्याच्या व्यवहारातून प्रकट होतात. अशा गोष्टी जरी क्षम्य नसल्या, तरी काही प्रमाणात त्या सहन केल्या जातात. राजकारण म्हटले की असेच चालायचे, म्हणून लोक स्वस्थ बसतात.
परंतु राज्यसत्ता ही काही विश्वासावर चालत असते. त्यातील पहिला भाग असतो, तो म्हणजे राज्यकर्ते नैतिकतेचे पालन करतील. ही नैतिकता राजधर्माशी निगडित आहे. राजधर्म हे सांगतो की, शासकाने प्रजापालन केले पाहिजे, प्रजेचे रक्षण केले पाहिजे. यामध्ये जर काही गडबड झाली तर लोकांच्या विश्वासाला प्रचंड धक्के बसतात. 1993च्या बाँबस्फोटाने त्या वेळेला जनतेला हे धक्के बसले. जे गुन्हेगार आहेत, बाँबस्फोटात या ना त्या प्रकारे सहभागी आहेत, ते राज्यकर्त्यांशी कोणते आणि कशा प्रकारे संबंधित होते, याचे पुरावे लोकांसमोर आले. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला जबरदस्त तडा गेला.
सामान्य जनता कितीही भोळी असली, आपल्या नेत्याच्या मागे अनेक वेळा आंधळेपणाने जाणारी असली, तरी या जनतेची म्हणून एक सदसद्विवेकबुद्धी असते. ही सदसद्विवेकबुद्धी कायम स्वरूपाची असते. कधी ती सुप्त असते आणि कधी ती जागृत असते. सुप्त सदसद्विवेकबुद्धीला जागे करावे लागते.
प्रश्न राष्ट्रपती राजवटीचा नाही, प्रश्न सुशासनाचा आणि नैतिक शासनाचा आहे. तो राष्ट्रपती शासनाने पूर्ण होत नाही. त्याची जबाबदारी समाजाचे नैतिक नेतृत्व करणार्यांची आहे. हे नैतिक नेतृत्व म्हणजे समाजाची सज्जनशक्ती असते. सज्जनशक्तीचे वैशिष्ट्य असे की, ती विखुरलेली असते आणि अनेक वेळा निष्क्रिय असते. या विखुरलेल्या शक्तीला संघटित करून सक्रिय करायला पाहिजे. ते करण्याचे काम समाजाचे नेतृत्व करणार्या नेत्यांना करावे लागते.
आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे, हे अशा नेत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. समाजातील सज्जनशक्तीला साकडे घातले पाहिजे, आवाहन केले पाहिजे, तिला जागे केले पाहिजे. राजधर्म आणि राजकीय नैतिकता याचे पालन करणारे शासनकर्ते आणणे, हे या सज्जनशक्तीचे काम आहे. असे म्हटले जाते की, समाजात दुष्ट शक्ती प्रबळ होतात, कारण त्याचा प्रतिकार करण्यासाठी सज्जनशक्ती उभी राहत नाही. सज्जनशक्तीची निष्क्रियता दुष्ट शक्तींना बळ देते. दुष्ट शक्ती वाढत जातात, याला जबाबदार निष्क्रिय सज्जनशक्ती असते. तिला जागृत करणे हे या वेळेचे सर्वात मोठे काम झाले पाहिजे.