अधमपणाचा कळस

19 Mar 2021 18:29:09

सचिन वाझे नावाचा इसम राजसत्तेच्या इशार्यावर नाचतो, तर सत्तेतील एक मंत्री आपल्याकडे नसलेल्या गृह खात्यात ढवळाढवळ करतो आणि होणार्या परिणामांना आम्ही पाहून घेऊ अशी दर्पोक्ती करतो. गृहमंत्री मात्र हतबल होऊन पोलिसांचा हा नंगा नाच पाहत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून गृहमंत्र्यांचा पोलीस दलावर वचक नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्र पोलिसांचा असलेला दरारा पार धुळीस मिळाला आहे.


mumbai_1  H x W
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर आजपर्यंत या प्रकरणातील अनेक खाचाखोचा समोर आल्या आहेत. हे प्रकरण केवळ दहशत निर्माण करण्याचे नसून वर्दीच्या आत दडलेल्या दमनशाहीचे आहे. या दमनशाहीचा चेहरा म्हणजे सचिन वाझे होय. सत्ताधारी मंडळींशी हातमिळवणी करून दबंगगिरी करताना आपण कायद्याचे रक्षक आहोत याचा विसर पडला की कायद्याचे रक्षक कायदा धाब्यावर बसवून स्वतःच्या फायद्यासाठी असे काम करतात, हे सचिन वाझेच्या निमित्ताने समोर येत आहे. अर्थात सचिन वाझे ही या दमनसाखळीची एक कडी आहे. न दिसणार्या किंवा अजून उघड न झालेल्यांची खूप मोठी मालिकाच आहे. पोलीस दलातील तातडीने झालेल्या बदल्या आणि अधिकार्यांची धुसफुस त्याची साक्ष देत आहेत.

राजसत्ता कशासाठी? या प्रश्नाचे सरळ उत्तरप्रजेच्या हितासाठीअसे आहे. मात्र राजसत्ता कायद्याच्या रक्षकांना हाताशी धरून दहशत निर्माण करत असेल किंवा राजसत्तेच्या चुकांवर बोट ठेवणार्या लोकांचे दमन करण्यासाठी पोलीस यंत्रणा वापरत असेल, तर जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा? राजसत्तेचा उपयोग प्रजेच्या उन्नतीसाठी, विकासासाठी करायचा असतो, या गोष्टीपासून कोसो दूर असलेले लोक सध्या राजशकट हाकत आहेत. प्रजा कशीही जगली तरी चालेल, पण आपले कुटुंब आणि पक्ष यांचे मात्र पुरेपूर हित साधले गेले पाहिजे, अशी सत्ताधारी नेतृत्वाची मानसिकता आहे हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. सत्ताधीशाने वैयक्तिक राग-लोभापासून दूर राहिले पाहिजे आणि निरपेक्षपणे राज्यकारभार चालवला पाहिजे, अशी अपेक्षा असते. मात्र राजसत्तेचे जे नेतृत्व करत आहेत, ते खुनशी आणि स्वार्थी असल्याने आपल्या सोईची समांतर व्यवस्था निर्माण करतात किंवा सोईची मंडळी हाताशी धरून त्यांना हवे ते करतात. सचिन वाझे हे असेच सोईचे नाव आहे.


विद्यमान सरकारने सचिन वाझे याची सीआययूच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. ही घटना 2020मधली. सचिन वाझे याला 2004 साली पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो शिवसेनेचा प्रवक्ता होता. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर निलंबनानंतर तब्बल सोळा वर्षांनी पुन्हा पोलीस सेवेत घेण्याच्या निर्णयामागची कारणे काय असावीत? असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडत असला, तरी सत्ताधार्यांना सचिन वाझेचा नक्की काय उपयोग आहे हे माहीत आहे आणि ज्या ज्या प्रकरणात ठाकरे कुटुंबाचे नाव आले, तेव्हा तेव्हा सुपरमॅन सचिन वाझेने ते प्रकरण हातात घेऊन तपास केला आहे आणि सत्ताधारी मंडळींना अपेक्षित असणारे पुरावे जमा करत तपासणी केली. सचिन वाझेला एन.आय.ए. तपासासाठी ताब्यात घेतल्यानंतर, “माझी पूर्वीसारखी प्रतिमा निर्माण व्हावी, म्हणून मी हे केले” असे म्हटले असले, तरी आपला बोलविता धनी कोण आणि आपला सूत्रधार कोण? हे सचिन वाझेला माहीत आहे. पुढील तपासात ती नावे पुढे येतीलच.


सचिन वाझेने गेल्या वर्षेभरात जी जी प्रकरणे हाताळली, ती कायद्याचे पालन करण्यापेक्षा राजसत्तेला अपेक्षित तपास करणारी आहेत. एका अर्थाने ‘सद्’रक्षणाय हे पोलिसांचे ब्रीदवाक्य वाझेने सत्ताधारी मंडळींकडे बटीक ठेवले आहे. यात केवळ वाझेच नव्हे, तर अनेक पोलीस अधिकारी सामिल आहेत. पोलीस वेशातील वसुली गँग तयार करून उघडउघड खंडणी जमा केली जात आहे. सचिन वाझे हे अशा गँगमधील एक प्यादे आहे. सचिन वाझेने हाताळलेल्या अर्णव गोस्वामी प्रकरणात न्यायालयाने फटके देऊनही सत्ताधारी डोळ्यावरची पट्टी काढायला तयार नाहीत. मुख्यमंत्री अजूनही सचिन वाझेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही स्वार्थासाठी केलेल्या राजकारणाची अधम पातळी आहे. राज्याचा प्रमुख जेव्हा एका सामान्य अधिकार्यावर मेहेरबानी करू लागतो, तेव्हा त्याचे हात त्यात गुंतलेले असतात हे वेगळे सांगायला नको. निलंबनानंतर पुन्हा नियुक्ती होईपर्यंत सोळा वर्षे सचिन वाझे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी कोणते पक्षकार्य करत होते, हे जनतेला कळायला हवे.


सचिन वाझे नावाचा इसम राजसत्तेच्या इशार्यावर नाचतो, तर सत्तेतील एक मंत्री आपल्याकडे नसलेल्या गृह खात्यात ढवळाढवळ करतो आणि होणार्या परिणामांना आम्ही पाहून घेऊ अशी दर्पोक्ती करतो. गृहमंत्री मात्र हतबल होऊन पोलिसांचा हा नंगा नाच पाहत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून गृहमंत्र्यांचा पोलीस दलावर वचक नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्र पोलिसांचा असलेला दरारा पार धुळीस मिळाला आहे. कायद्याचे रक्षण आणि सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे हे पोलिसांचे काम असले, तरी त्याचा विसर पडला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तीन पायांची शर्यत खेळताना एकाची फरपट नक्की होते, तशी आज राज्याच्या गृहमंत्र्यांची स्थिती झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस यंत्रणेतील काही लोक आपले विशेष चातुर्य पणाला लावत राजसत्तेशी जवळीक करत आहेत. राजसत्तेला अपेक्षित असणारा तपास आणि पुरावा शोधणारा राजसत्तेचा प्यारा होतो, हे सचिन वाझे प्रकरणात अनेक वेळा सिद्ध झाले आहे. याआधी न्यायालयाने ताशेरे झाडूनही जेव्हा सचिन वाझेच्या पाठराखणीसाठी मोठी फौज उतरते, तेव्हा वाझेचे बोलविता धनी कोण, हे सांगताही जनतेच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

Powered By Sangraha 9.0