20 मार्च 1927 रोजी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आज हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिवस’ म्हणून देशात साजरा केला जातो. सामाजिक समतेची एक ऐतिहासिक कृती त्या दिवशी घडली. दिसायला ही कृती खूप छोटी वाटेल, परंतु परिणामांच्या दृष्टीने ती अतिशय महान ठरली.
समाज काही व्यवस्था निर्माण करून जगत असतो. या व्यवस्था पिढीमागून पिढी हस्तांतरित होत असतात. त्यांना रूढी-परंपरांचे स्वरूप प्राप्त होते. सर्वसामान्य माणसे या रूढी-परंपरांचा काहीही विचार न करता त्यांचे पालन करतात. काही परंपरांच्या मागे पाप-पुण्याच्या भावना जोडल्या जातात. सामान्य माणसे आंधळेपणाने चालत राहतात. त्यांना डोळस करण्याचे काम महापुरुष करतात. मध्ययुगात संत रामानंद, संत कबीर, गुरू नानक, रोहिदास, नामदेव यांनी हे काम केले. आधुनिक काळात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे काम केले.
महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हे अशा कामाचे ज्वलंत उदाहरण आहे. हिंदू समाजात काही जातींना अस्पृश्य ठरविण्यात आले. या अस्पृश्यतेला अद्वैत तत्त्वज्ञानाची मान्यता नाही. उपनिषदे तिला मान्यता देत नाहीत. भगवद्गीतेत तिला आधार नाही. ती रूढी-परंपरा म्हणून हिंदू समाज तिचे आंधळेपणाने पालन करतो. या आंधळेपणाला जबरदस्त धक्का देण्याचे काम 20 मार्च 1927 रोजी चवदार तळ्यावर झाले. त्याचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आज हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिवस’ म्हणून देशात साजरा केला जातो. विठ्ठल उमप यांचे या सत्याग्रहावर एक गाणे आहे - ‘भीमाने चवदार तळ्याचे पाणी पाजले’.
या सत्याग्रहाला एक पार्श्वभूमी आहे. ऑगस्ट 1923मध्ये मुंबई कायदेमंडळाचा ठराव झाला. या ठरावाप्रमाणे सरकारी सार्वजनिक, स्थानिक तळी सर्वांसाठी खुली करण्यात आली. महाड नगरपालिकेने जानेवारी 1924ला ठराव केला आणि सार्वजनिक तळी सर्वांसाठी खुली केली. रूढी-परंपरांमध्ये अडकलेल्या समाजाने या ठरावाचे पालन केले नाही. ठराव कागदावरच राहिला. त्याच्या अंमलबजावणीसाठी 20 मार्च 1927ला महाडला कुलाबा जिल्ह्यातील अस्पृश्य वर्गाची परिषद भरविण्यात आली.
या परिषदेत सवर्ण वर्गातील अनेक मोठी मंडळी सामील झाली. सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे इत्यादी मान्यवर मंडळींनी पुढाकार घेतला. प्रश्न केवळ अस्पृश्य वर्गाचा नसून समग्र हिंदू समाजाचा आहे, हे त्यांना उमगले. अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास बंदी होती, ती अन्यायकारक होती. सगळे हिंदू बांधव आहेत, या भावनेला तडा देणारी होती. म्हणून हा अन्याय दूर करणे आवश्यक होते.
त्यासाठी सवर्ण समाजातील अनेक मंडळी या सत्याग्रहात सहभागी झाली. मिरवणुकीने सर्व जण चवदार तळ्यावर पाणी पिण्यासाठी गेले. मिरवणूक शांततेत पार पडली. बाबासाहेबांनी ओंजळीत पाणी घेऊन ते प्राशन केले. त्यांच्याबरोबरच्या अन्य लोकांनीही तेच केले. सामाजिक समतेची एक ऐतिहासिक कृती त्या दिवशी घडली. दिसायला ही कृती खूप छोटी वाटेल, परंतु परिणामांच्या दृष्टीने ती अतिशय महान ठरली.
डॉ. बाबासाहेबांनी या प्रसंगी जी तात्त्विक भूमिका मांडली, ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे -
श्र आम्ही हिंदू आहोत, म्हणून जे अधिकार सर्व हिंदूंना आहेत, ते आम्हालाही मिळाले पाहिजेत.
श्र चवदार तळ्याचे पाणी पायल्यामुळे आमचा भौतिक लाभ कोणताच होणार नाही. परंतु आम्हाला मानवी अधिकार मिळवायचे आहेत.
श्र परंपरेने एखादी रूढी चालत आलेली आहे, म्हणून ती योग्यच आहे, असे होत नाही.
श्र रूढी-परंपरा बुद्धीच्या कसोटीवर आणि न्यायाच्या तत्त्वावर घासून बघितल्या पाहिजेत.
श्र समाजाच्या रूढी आणि परंपरांना जबरदस्त धक्के दिल्याशिवाय समाज जागा होत नाही आणि विचार करायला लागत नाही.
या सत्याग्रहाचा पुढचा भाग म्हणून डिसेंबरमध्ये जी दुसरी परिषद झाली, त्या परिषदेत 25 डिसेंबर रोजी मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. मनुस्मृतीतील अनेक कायदे सामाजिक विषमता कायदेशीर करणारे आहेत. काही जातींना भरपूर अधिकार आणि काही जातींना काहीच अधिकार नाहीत, अशी विषम रचना मनुस्मृतीने सांगितली. डॉ. बाबासाहेबांनी ती नाकारली.
सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी आणि समाजाचे मानसिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी इतिहासकाळात आणि नंतरही अशा घटना होतात. अमेरिकेत रोझा पार्क्सने 1 डिसेंबर 1955ला सामाजिक विभक्तीकरणाच्या कायद्याविरुद्ध बंड केले. बसमधील आपली सीट तिने रिकामी केली नाही. हा तिचा एकटीचा सत्याग्रह होता. तिला अटक झाली आणि सर्व अमेरिकेत नंतर निग्रोंच्या सामाजिक अधिकारांचे तीव्र आंदोलन झाले, ते यशस्वी झाले.
महाड चवदार तळ्याचे आंदोलनदेखील नंतरच्या काळात पूर्णपणे यशस्वी झाले. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणि कलम 17प्रमाणे अस्पृश्यतेचे पालन करणे हा गुन्हा ठरविण्यात आला. घटनेच्या समतेच्या अधिकारात मंदिर, सार्वजनिक पाणवठे, उपाहारगृहे सर्वांसाठी मुक्त करण्यात आली. जातीवरून कुणाला अडविल्यास तो गुन्हा ठरविण्यात आला. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी होता. तो हिंदू समाजाच्या रूढी-परंपरांच्या विरोधी होता. तो एकाच वेळी सामाजिक सुधारणेचा लढा होता, धर्मसुधारणेचा लढा होता आणि हिंदू संघटनेचादेखील लढा होता, याचे विस्तृत विवरण डॉ. बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत भारत’मधील लेखांतून केलेले आहे.
आज या लढ्याचे स्मरण करीत असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी आपण नतमस्तक झाले पाहिजे. त्यांनी हा लढा पूर्णपणे अहिंसक ठेवला. सत्याग्रहाची तात्त्विक भूमिका मांडली. हिंदू धर्मसुधारणेचे विषय मांडले. हिंदू संघटनेची आवश्यकता प्रतिपादन केली. त्यांच्या या सर्व संघर्षामुळे अस्पृश्यतेचे पालन करणे हिंदू समाजातील फार मोठ्या वर्गाने सोडून दिलेले आहे. सर्व समाजाने ते सोडले आहे असे विधान करणे सत्याला धरून होणार नाही. रूढी-परंपरेत जगणारा फार मोठा वर्ग आजही समाजात आहे. त्यांच्या मनातील अस्पृश्यतेची भावना समाप्त करणे हे आजच्या पिढीपुढील फार मोठे आव्हान आहे. ते स्वीकारणे म्हणजेच बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे होय.