आपल्या संस्कृतीत ऋतुचक्रातील प्रत्येक बदलाला उत्सवाचे दिलेले रूप हे निसर्गाशी असलेले आपले नाते दृढ करणारे आहे. अगदी सूर्याचे मकर राशीतील संक्रमण आणि त्या अनुषंगाने वातावरणात होणारे बदलही आपण साजरे करतो. हे जगण्याच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे असतेच, मग तो वैशिष्ट्यपूर्ण आहार असो की त्या वातावरणाला साजेशी वेशभूषा. मकरसंक्रांतीला काळ्या साड्या, कपडे परिधान करून त्यावर हलव्याच्या शुभ्र दागिन्यांनी नटलेले नवपरिणित दांपत्य वा घरातले तान्हे बाळ हे या साजरे करण्याचेच एक उदाहरण.
हलव्याचे नाजूक आणि देखणे दागिने तयार करणे हे अतिशय कौशल्याचे काम. अतिशय हळुवारपणे एकेका हलव्याला दागिन्यात योग्य जागी गुंफून वा चिकटवून आकर्षक दागिने तयार करणार्या या कलाकारांचेच कौतुक करावे, असा विचार आला आणि त्यातूनच या वर्षी मकरसंक्रांतीनिमित्त हलव्याच्या दागिन्यांची स्पर्धा घेण्याचे ठरले. वास्तविक ‘वैचारिक साप्ताहिक’ ही विवेक साप्ताहिकाची जनमानसात रुजलेली ओळख. मात्र वाचकांना विचारप्रवृत्त, कार्यप्रवृत्त करताना आणि राष्ट्रीय विचारांचा प्रचार-प्रसार करतानाच, सांस्कृतिक धारणांशी वाचकांना जोडून ठेवणारे अनेक उपक्रम विवेक आयोजित असते. ही स्पर्धा अशांपैकी एक.
स्पर्धेचे परीक्षक भक्ती भागवत व श्रुती नाख्ये, मध्ये मंगला जोगळेकर
या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या या विषयातील अपुर्या ज्ञानाची आम्हाला जाणीव झाली. सुरुवातीला आम्ही 3 जानेवारीपर्यंत दागिने मागवण्याची मुदत ठेवली होती. मात्र दागिने करणे हे त्याला लागणार्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. एरव्हीही दागिन्यांसाठी लागणारा हलवा बाजारात यायला उशीर लागतो आणि यंदा कोरोना संकटामुळे तो अधिकच उशिरा येणार होता, ही बाब काही महिलांनी लक्षात आणून दिल्यावर स्पर्धेतील सहभागाची तारीख 30 जानेवारीपर्यंत वाढवली. किमान 3 व जास्तीत जास्त कितीही तयार हलव्याचे दागिने (फोटो नाही!) विवेकच्या कार्यालयात पोहोचवणे ही अट होती. फोटो न पाठवता प्रत्यक्ष दागिने पाठवायची अट असल्याने असेल, पण प्रचंड प्रतिसाद मिळाला असे झाले नाही. शेवटच्या 4-5 दिवसांत मात्र प्रत्यक्ष कार्यालयात येऊन किंवा कुरिअरने दागिने येण्याचा वेग वाढला. हलवा हा पदार्थ अतिशय नाजूक असल्याने सर्वांनीच दागिन्यांचे पॅकिंग करताना आणि पाठवताना कमालीची काळजी घेतली होती. ते दागिने पाहून विवेकच्या महिला कर्मचारिवर्गात तर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होतेे. दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत एकूण 14 स्पर्धकांनी आपली कला बंद खोक्यात आमच्याजवळ विश्वासाने सुपुर्द केली. स्पर्धेत सहभागी होण्यातल्या अडचणी लक्षात घेता स्पर्धक संख्या बेताचीच असली, तरी आम्ही स्पर्धा रद्द न करण्याचा निर्णय घेतला.
स्पर्धेसाठी आलेले सर्वच दागिने सुरेख आणि वैविध्यपूर्ण होते. काहींनी तर दागिन्यांचे इतके प्रकार तयार करून पाठवले होते की त्यांच्या या उत्साहाने, दागिन्यांमधल्या वैविध्याने आम्हीच थक्क झालो. त्यामुळे खरी परीक्षा होती ती परीक्षकांची. डोंबिवलीच्या श्रुती नाख्ये आणि भक्ती भागवत या जोडगोळीने या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या दोघीही हलव्याचे दागिने बनवण्यात पारंगत. या विषयात भक्ती भागवत यांची आई मंगला जोगळेकर (नाशिक) या दोघींचे प्रेरणास्थान. त्या स्वतः उत्तम हलवा तयार करतात. त्यांच्या बोलण्यातून हलवा बनवण्याची ‘चटके’दार कला आणि हलव्यांचेे प्रकार याविषयीची बरीच माहिती मिळाली. परीक्षकांनी दागिन्यातील वैविध्य, वापरलेल्या हलव्यांचे व अन्य साहित्याचे वेगळेपण, पारंपरिकता व आधुनिकता यांचे फ्यूजन, नक्षीकामातील बारकावे, दागिने बनवताना घेतलेली काळजी आदी निकषांचा विचार करून विजेत्यांची निवड केली. त्यांना बक्षिसेही मिळतील. पण सर्वच सहभागींची मेहनत आणि कौशल्य कौतुकास्पद आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने या स्पर्धेत स्वत:ची कला आजमावून पाहण्याचे धाडस करणारे सर्वच कलाकार विजेते आहेत आणि त्या सर्वांचे अभिनंदन! तसेच आमचे सहप्रायोजक आणि परीक्षक यांचेही मन:पूर्वक आभार!
या स्पर्धेने आमच्यासाठी अनुभवाचे नवे दालन खुले केले. शिवाय येणार्या काळात असे वेगळे प्रयोग करण्याचा आत्मविश्वासही दिला. आमच्या सर्व वाचक, लेखक, जाहिरातदार, हितचिंतक यांच्या सहकार्याच्या आणि शुभेच्छांच्या जोरावर असे प्रयोग पुढेही चालू राहतील.
सपना कदम-आचरेकर