नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. नामदेव कांबळेंचे सा. विवेकशी खूप जुने ऋणानुबंध आहेत. आपल्या साहित्यातून सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार्या मोजक्या लेखकांपैकी एक म्हणजे नामदेव कांबळे. त्यांच्या साहित्याचा व सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा लेख.
प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आणि त्यामध्ये नामदेव कांबळे सरांचे नाव वाचले. सरांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि गिरीशकाकांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला होता. बातम्या ऐकताना या दोन्ही मान्यवरांची नावे ऐकली आणि मन भूतकाळात गेले. गिरीश प्रभुणेकाकांचा सहवास खूप लाभला. त्या तुलनेत कांबळे सरांचा सहवास खूपच कमी. सर भेटायच्या आधी त्यांच्या ‘राघववेळ’ने भुरळ घातली होती. पुण्यात प्रभा गणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्त्री साहित्य आणि समरसता’ या विषयावर संमेलन व्हायचे होते. संमेलनपूर्व कार्यशाळेत पुष्पलता राजापुरे-तापस यांनी सरांच्या राघववेळ पुस्तकाचा परिचय करून दिला होता. त्यांनी मांडलेले वालंबीचे दुःख, पोटाची आणि मनाची चिवट भूक ऐकली होती. तेव्हा नुकताच साहित्य व्यवहारात लिंबूटिंबू कार्यकर्ता म्हणून वावरू लागलो होतो. बाईंची मांडणी ऐकली आणि हे पुस्तक लयच भारी असणार, आपण वाचले पाहिजे असे वाटून गेले. पुढे पुस्तक वाचलेही. नामदेव कांबळे नावाच्या लेखकाची ही पहिली भेट. पुढे यवतमाळ येथे समरसता साहित्य संमेलन झाले, सर त्याचे अध्यक्ष होते. मग कळले-आपण एकाच कुळाचे. पण तरीही भेटीचा योग नव्हता. व्हायची ती पुस्तक भेट.
पथ्रोट परिसरात आठ दिवस राहून सरांसह मुंबईत आलो. मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात हावरे कुटुंबीयांना सरांसोबत भेटलो. एक चरित्र लिहिताना काय विचार करावा, आवश्यक ती माहिती कशी गोळा करावी या विषयावरचा तो दीर्घ प्रशिक्षण वर्ग होता. मुंबईतील घाईगर्दीची सवय नसलेले सर “राजे हो, तुम्ही खूप धावता बाबा” म्हणत आणि ठरलेल्या वेळेत पोहोचण्यासाठी मला मदत करत. पुढे ते चरित्र प्रकाशित झाले. नेटके लेखन आणि आशयाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न कसा करता येतो, हे मला या काळात शिकता आले.
मुंबई विश्व संवाद केंद्राच्या वतीने नारद जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. शरदभाऊ जोशींनी सरांसोबत राहण्याची व्यवस्था मला दिली. दादर स्टेशनवर विदर्भ एक्स्प्रेसमधून सरांना घेऊन हॉटेलला पोहोचलो. “इथे नको. संघकार्यालयात जाऊ.” सर म्हणाले आणि आम्ही यशवंत भवनात गेलो. संघाच्या कार्यक्रमातील त्यांचा वावर सहजतेचा होता. त्याच रात्री सरांसोबत सिद्धेश्वर एक्स्प्रेसने कुर्डुवाडीला गेलो आणि तेथून पुढे एस.टी.ने लातूरला. लातूरला सामाजिक समरसता मंचाचा अण्णाभाऊ साठे अभ्यासवर्ग होता. सर एका सत्राचे अध्यक्ष आणि मी त्या सत्रात वक्ता. मुंबई-लातूर प्रवासात कथालेखक या विषयावर खूप चर्चा झाली. मी नुकताच विदर्भातील शेतकरी आत्महत्या विषयावर प्रवास करून आलेलो. काही कथाबीजे मनात होती. सरांशी चर्चा करताना त्यांना आकार येत गेला. नंतर सावकाशीने त्यांना कथा लिहून पाठवली. सरांनी आवश्यक ते संस्कार केले. ती कथा ‘सातबारा’ या नावे विवेकच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली. एका सिद्धहस्त लेखकाने माझ्या पहिल्या कथेवर संस्कार केलेत, हे मी कधी विसरू शकत नाही.
नामदेव कांबळे सरांना डॉक्टर व्हायचे होते. शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला, पण ते शिक्षण पूर्ण झाले नाही. शेवटी बी.ए. करून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. 1980च्या सुमारास त्यांनी लेखनास सुरुवात केली. एकांकिका, ललित लेख, कथा असे विविधरंगी लिखाण फुलू लागले. शिक्षण आणि नोकरी यामधील फरफट आणि खडतर जगणे अनुभणार्या नामदेव कांबळेंनी आपले अनुभवविश्व शब्दात मांडले आहे. ‘अकल्पित’, ‘प्रत्यय’, ‘तोःतीःअन्वयार्थ’ हे कवितासंग्रह, ‘परतीबंद’ हा कथासंग्रह, ‘स्मरण विस्मरण’ या ललित लेखसंग्रहाबरोबरच ‘अस्पर्श’, ‘राघववेळ’, ‘ऊनसावली’, ‘मोराचे पाय’, ‘सांजरंग’, ‘सेलझाडा’ इत्यादी कादंबर्या प्रकाशित आहेत. राघववेळ या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार लाभला. राघववेळ कादंबरीतून मागासवर्गीय जातींच्या - विशेषतः मांग समाजाच्या दारुण दुःखाचे व भयानक समस्यांचे चित्रण केले आहे. नामदेव कांबळे सदैव लिहिते राहिले. ललित लिखाणाइतकेच ताकदीने ते वैचारिक लेखन करतात. अलीकडे प्रकाशित झालेले ‘गांधी आणि आंबेडकर - संघर्षाकडून समन्वयाकडे’ हे पुस्तक त्याची साक्ष देते.
सातत्याने लेखन करणार्या नामदेव कांबळे सरांना लिखाणासाठी विषय शोधावे लागत नाहीत. ललित, वैचारिक लेखनात मानाचे पान मिळवणार्या कांबळे सरांनी आता लहान मुलांना समजेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गोष्टीरूप चरित्रलेखन सुरू केले आहे. त्यासाठी संशोधन आणि संकलन करण्याच्या कामात ते गर्क आहेत.
अशा या सामाजिक भान असणार्या समाजहितैषी लेखकाचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान होणे, हा त्यांच्या साधनेचा आणि सकारात्मक विचाराचा सन्मान आहे, असे आम्हास वाटते.