नरेंद्र मोदी - लोकनेता ते विश्वनेता

06 Dec 2021 15:54:42
नरेंद्र मोदी जसे लोकनेता आहेत, तसे ते विश्वनेताही झालेले आहेत. त्यांचे लोकनेतृत्व लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मिळणार्‍या भरभरून मतांतून व्यक्त होते. आंतरराष्ट्र्रीय व्यासपीठावरून मोदींविषयी वेगवेगळे राष्ट्रप्रमुख गौरवोद्गार काढतात, त्यांचा सन्मान करतात, महासत्तांचे प्रमुख त्यांना बरोबरीचा दर्जा देतात, लोकप्रिय नेत्यांचे रेटिंग करणार्‍या आंतरराष्ट्रीय संस्था मोदी यांच्या नावावर आपली मोहोर उमटवितात. विश्वमान्यता हे मोदींचे खास वैशिष्ट्य आहे.

bjp_1  H x W: 0

जनतेच्या सर्वात आवडीचा विषय कोणता? असा जर प्रश्न कुणी विचारला, तर त्याचे उत्तर असेल ‘राजकारण’. घरोघरी, चौकाचौकात, बस-रेल्वेगाडीत, चहाचे घोट घेत असताना हॉटेलमध्ये, राजकारण या विषयावर काही ना काही चर्चा चालूच असते. उत्तर प्रदेशच्या आणि बिहारच्या व्यक्तीविषयी असे म्हटले जाते की, तो जन्मत:च राजकारणाचे सहावे अंग घेऊन आलेला असतो. परंतु आपल्याला या लेखात या रोजच्या राजकारणाची चर्चा करायची नाही.

 
राजकारणाचा विचार करता त्याचे तीन प्रकार होतात - 1. आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण, जे रोजच्या वर्तमानपत्रातून आपण वाचतो. 2. राजकारणाचा दुसरा प्रकार राज्यबांधणीच्या राजकारणाचा असतो. यात राज्याचे राजकीय वातावरण खेळीमेळीचे राहील, अनावश्यक संघर्षाचे होणार नाही आणि लोकशाही राजवटीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य आणि चळवळ करण्याचे स्वातंत्र्य असेल. 3. राजकारणाचा तिसरा प्रकार राष्ट्रबांधणीच्या राजकारणाचा आहे. राष्ट्राची अस्मिता असते, राष्ट्राची जीवनमूल्ये असतात. राष्ट्राची प्राचीन संस्कृती असते आणि राष्ट्राची प्राचीन विचार परंपरा असते. यांचे संवर्धन करणे याला राष्ट्रीय राजकारण म्हणतात.

राष्ट्रीय राजकारणाचे हे दोन प्रकार होतात - 1. देशांतर्गत राष्ट्रीय राजकारण आणि 2. आंतरराष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय राजकारण. देशांतर्गत राजकारणात राष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रीय मूल्ये, राष्ट्रीय संस्कृती, राष्ट्रीय विचार यांचे संवर्धन करावे लागते. या लेखात नरेंद्र मोदी देशांतर्गत राष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय राजकारण कसे करतात, हे अगदी थोडक्यात बघायचे आहे.
देशांतर्गत राष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात राष्ट्रीय अस्मितांच्या विषयाला नरेंद्र मोदी यांनी अग्रक्रम दिला आहे. राष्ट्रीय एकतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल आहेत. यांचा अतिभव्य पुतळा बडोद्याजवळ उभा आहे. गंगा ही आपली माता आहे आणि आपली संस्कृती गंगा संस्कृती आहे. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी वाराणसीत गंगेची भक्तिभावे आरती केली. केदारनाथ हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून ते भारताला जोडणारे केंद्र आहे. पंतप्रधान केदारनाथला आवर्जून जातात. पंढरपूरचा विठ्ठल ही केवळ देवता नसून महाराष्ट्रातील सर्वांना जोडणारे ते एक प्रतीक आहे. विठ्ठल हे समरसतेचे प्रतीक आहे, असे त्यांनी वारी महामार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात (आभासी माध्यमातून) मार्गदर्शन केले. योगविद्या ही प्राचीन विद्या आहे, तिचा ते प्रचार करतात. भगवद्गीता हा आमचा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो समन्वयवादी तत्त्वज्ञानाचा आणि कर्मयोगाची शिकवण देणारा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. नरेंद्र मोदी गीतेवर प्रवचने देत नाहीत, पण गीता जगतात.


bjp_6  H x W: 0
 
त्यांच्या या प्रयत्नांमुळे आम्ही कोण आहोत, आमची मुळे कुठे आहेत, आमची अस्मिता कशात आहे, याचा बोध अनेकांना होऊ लागला आहे. आपल्या देशातील सामान्य माणूस आपल्या अस्मितेने जगत असतो. परंतु मार्क्सपुत्र, मेकॉले पुत्र, व्हॅटिकन पुत्र, मक्का-मदिना पुत्र आपली अस्मिता गमावून बसलेले आहेत. दीर्घकाळ त्यांनी आपल्या अस्मितेवर वाटेल ते प्रहार करण्याचे प्रयत्न केले. आज यातील अनेकांना उपरती होऊन आपण कोण आहोत, आपली ओळख कोणती, याचा शोध ते घेऊ लागले आहेत. ‘मोदी है तो मुमकीन है’ हे अमित शहा यांचे आवडते वाक्य आहे आणि ते खरेही आहे. ज्याला ‘मोदी इफेक्ट’ म्हणतात, तो हा आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय राजकारणाचे महत्त्व देशांतर्गत राजकारणाइतकेच, किंबहुना त्याहून अधिक आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे महत्त्वाचे विषय असे असतात - 1. सीमा सुरक्षा 2. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण 3. देशाची आर्थिक उन्नती 4. देशाचे मित्र जोडणे. हे चारही विषय घेऊन नरेंद्र मोदी यांनी साडेसात वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काम केले आहे, ते ऐतिहासिक आहे. त्यांच्या अगोदरच्या पंतप्रधानांनी आपापल्या परीने, आपापल्या विचारधारेनुसार आणि आपापल्या क्षमतेनुसार भारताला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात स्थान मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याचा नकारात्मक विचार करणे हे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल.

मोदींचे वेगळेपण दोन गोष्टींत आहे - 1. मोदींची विचारधारा ही अन्य पंतप्रधानांच्या विचारधारेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या विचारधारेचा केंद्रबिंदू आहे राष्ट्र प्रथम, सर्व काही राष्ट्रासाठी. 2. नरेंद्र मोदी या विचारधारेला समर्पित आहेत. राजकीय सोयीसाठी त्यांनी स्वीकारलेली ही विचारधारा नाही. या विचारधारेसाठी त्यांनी आपले सर्व जीवन अर्पण केले आहे. अहोरात्र केवळ देशाचाच विचार हा त्यांचा जीवन जगण्याचा धर्म आहे. ही त्यांची केवळ स्तुती नाही. ती करण्याचे मला काही कारणही नाही, ती वस्तुस्थिती आहे.



bjp_3  H x W: 0
 
आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जे चार विषय वर दिले आहेत, ते साध्य करण्यासाठी लक्ष्य स्पष्ट असावे लागते. विचार स्पष्ट असावे लागतात. मोदींची दृष्टी (व्हिजन) गेल्या साडेसात वर्षांत वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झाली आहे. तिला ‘मोदी डॉक्ट्रीन’ असे म्हणतात. या अगोदरच्या पंतप्रधानांपेक्षा ही व्हिजन फार वेगळी आणि स्पष्ट आहे. विदेशी राष्ट्रप्रमुखांशी बोलणी करताना ती समानतेच्या भूमिकेवरून आम्ही करू. काही मागण्याच्या भूमिकेत आम्ही असणार नाही. देवाणघेवाणीचा व्यवहार करू. हा व्यवहार करताना मूल्यांचा आग्रह धरू. ही मूल्ये आहेत, सर्व विश्व एक आहे, मानवजात एक आहे, मानवजातीच्या म्हणून समस्या आहेत. त्यातील महत्त्वाच्या समस्यांना नरेंद्र मोदी संबोधित करतात. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून या समस्येसंबंधीचा भारतीय दृष्टीकोन मांडतात, पक्षीय दृष्टीकोन मांडत नाहीत. समाजवादी, साम्यवादी, सेक्युलर, गांधीवादी, कम्युनिस्टवादी अशी त्यांची दृष्टी नाही.
 
 
विश्वमानवजातीपुढे तीन प्रमुख संकटे आहेत. 1. पर्यावरण र्‍हास 2. दहशतवाद 3. आरोग्य ही तिन्ही संकटे विचारधारा आणि राज्यव्यवस्था निरपेक्ष आहेत. ज्या देशाची रचना भांडवलशाही आहे, शासन लोकशाहीवादी आहे, म्हणून त्या देशात ही संकटे नाहीत असे होणार नाही. ज्या देशाची रचना एकपक्षीय राजवटीची आहे, भांडवलशाहीला थारा नाही म्हणून त्या देशात वरील तीन संकटे निर्माण झालेली नाहीत, असेही नाही. ही संकटे सार्वत्रिक, सर्वग्राही, सर्वसमावेशक आहेत. त्यांच्याशी लढायचे असेल तर सर्वांनी मिळूनच लढावे लागेल. नरेंद्र मोदी ही भारतीय भूमिका जागतिक व्यासपीठावरून अत्यंत प्रभावीपणे मांडतात. दहशतवादाचे संकट धर्मनिरपेक्ष आणि शासनव्यवस्था निरपेक्ष आहे. त्याचा सामना सर्वांना मिळून करावा लागेल.
 
 
पर्यावरणाचे संकटदेखील असेच आहे. नद्या प्रदूषित होत चालल्या आहेत. औद्योगिक विकासामुळे आणि लोकसंख्यावाढीमुळे जंगले नामशेष होऊ लागली आहेत. कार्बनचे उत्सर्जन खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळत चालला आहे, त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढते आहे. चक्रीवादळाची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्राने त्याचा अनुभव घेतलेला आहे. अशा वादळात मानवी जीवनाची, शेतीची आणि पशुधनाची प्रचंड हानी होते. ही वादळे कुठलाही देश निर्माण करीत नाही. मानवजातीने निर्माण केलेली ही वादळे आहेत. हे संतुलन जर कायम राखायचे असेल, तर कार्बनचे उत्सर्जन कमी करायला पाहिजे. उत्पादन शैली बदलायला पाहिजे आणि सर्वात शेवटी जीवनशैली बदलायला पाहिजे.



bjp_2  H x W: 0
 
उपभोगाची जीवनशैली सृष्टीचा विनाश घडवून आणील आणि संयमित उपभोगाची जीवनशैली पर्यावरणाचे संवर्धन करील. संयमित उपभोगाची जीवनशैली ही भारतीय जीवनशैली आहे. कुटुंबव्यवस्था हा तिचा आधार आहे. भारतातील सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळे पर्यावरणाशी संबंधित असतात. नागापासून ते झाडापर्यंत आणि दगडापासून डोंगरापर्यंत सगळ्यांची पूजा केली जाते. या सगळ्या पूजा प्रतीकात्मक असतात. ज्यांना त्याचा आशय समजत नाही, ते त्याची टिंगल करतात. आणि ज्यांना त्यातून आपले पोट भरायचे आहे, ते अंधश्रद्धा फैलावतात. हे दोन्ही प्रकार निंदनीय आहेत.

 
नरेंद्र मोदी संयमित जीवनशैलीचा विचार जागतिक व्यासपीठावर मांडतात. पर्यावरणपूरक वीजनिर्मितीच्या क्षेत्रात कोणते लक्ष्य समोर ठेवून भारत काम करतो आहे, हे ते सांगतात. भारत हा सर्वात कमी कार्बन हवेत सोडणारा देश आहे, हे अभिमानाने सांगतात. जगा आणि जगू द्या, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. किडा-मुंगीपासून ते हत्तीपर्यंत प्रत्येकाला पर्यावरणात स्थान आहे. त्या सर्वांचे रक्षण झाले पाहिजे. हा भारतीय विचार आहे. नरेंद्र मोदी तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडतात. या जीवनशैलीची ओळख व्हावी, म्हणून 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळण्यात येतो. भगवान गौतम बुद्धांची शिकवण, श्रीकृष्णाची गीता आणि महात्मा गांधीजींचा सार्वत्रिक अहिंसेेचा विचार जगापुढे मांडायला ते कचरत नाहीत.
 

bjp_5  H x W: 0

यामुळे नरेंद्र मोदी जसे लोकनेता आहेत, तसे ते विश्वनेताही झालेले आहेत. त्यांचे लोकनेतृत्व लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मिळणार्‍या भरभरून मतांतून व्यक्त होते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात असे सार्वत्रिक मतदान होत नाही. आंतरराष्ट्र्रीय व्यासपीठावरून मोदींविषयी वेगवेगळे राष्ट्रप्रमुख गौरवोद्गार काढतात, त्यांचा सन्मान करतात, महासत्तांचे प्रमुख त्यांना बरोबरीचा दर्जा देतात, लोकप्रिय नेत्यांचे रेटिंग करणार्‍या आंतरराष्ट्रीय संस्था मोदी यांच्या नावावर आपली मोहोर उमटवितात. विश्वमान्यता हे मोदींचे खास वैशिष्ट्य आहे. दुसर्‍या भाषेत सांगायचे तर ती त्यांची णडझ आहे. णडझ याचा अर्थ इतर सर्वांपेक्षा ठळकपणे प्रकट होणारे व्यक्तिवैशिष्ट्य.

 
या सर्व विषयाचा समग्र आढावा सा. विवेकच्या प्रकाशित होणार्‍या ‘नरेंद्र मोदी : लोेकनेता ते विश्वनेता’ या आगामी ग्रंथात वाचायला मिळेल. लेखाच्या शब्दसंख्येच्या मर्यादेत लोकनेता ते विश्वनेता असा जो मोदींचा प्रवास आहे, त्याची अल्पशी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा सांगायचे तर हे मोदींचे स्तुतिगान नव्हे, तर त्यांच्या प्रामाणिक कार्यकर्तृत्वाची ओळख आहे. लेखाची सुरुवात आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाने केलेली आहे. या राजकारणातील एकतर्फी वार मोदी झेलत असतात. ते अभावानेच प्रतिवार करतात. आणि जेव्हा करतात, तेव्हा हिंदीच्या एका म्हणीत सांगायचे तर ‘सौ सुनार की एक लुहार की’ असा तो वार असतो. असे हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपली लोकप्रियता टिकवून ठेवून पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत. कारण यातच राष्ट्राचे आणि अखिल विश्वाचे कल्याण आहे.
Powered By Sangraha 9.0