परराष्ट्र विभागातील रंजक कथांनी भरलेले पुस्तक

20 Dec 2021 13:01:42
'Walking With Lions' हे पुस्तक जगातील पहिल्या श्रेणीच्या राजप्रमुखांच्या अशा थोड्या वेगळ्या किश्श्यांनी भरलेले आहे. एका अर्थाने त्या छोट्या छोट्या कथाच आहेत. आणि कथावाचन सर्वांच्या आवडीचा विषय असल्याने त्या वाचताना आनंद होतो.

'Walking With Lions'_2&nb
कुंवर नटवर सिंग हे परराष्ट्र विभागात अनेक महत्त्वांच्या पदावर होते. अनेक देशांमध्ये ते भारताचे राजदूत म्हणून राहिले. परराष्ट्र नीतीचा आणि परराष्ट्र व्यवहाराचा त्यांचा अनुभव अतिशय दांडगा आहे. नेहरू घराण्याशी एकनिष्ठा हे त्यांचे सर्वात मोठे ठळक वैशिष्ट्य आहे. परंतु एवढ्या एका निष्ठेमुळे त्यांना महत्त्वाची पदे मिळाली, असे नाही. त्यांचे शिक्षण आणि त्यांची अंगभूत गुणवत्ता हीदेखील त्यांच्या मोठेपणास कारणीभूत झालेली आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द बोफोर्स संदर्भातील एका पत्राने गाजली. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आत्मकथन लिहिले. पुस्तकाचे शीर्षक आहे ‘"One Life is Not Enough'.’. हे पुस्तक तेव्हा गाजले.
त्यांचे आणखी एक पुस्तक आहे, त्याचे नाव आहे "Walking With Lions' या पुस्तकात नटवर सिंग यांनी परराष्ट्र विभागात सेवारत असताना त्यांना जे ‘आउट ऑफ बॉक्स’ - म्हणजे दैनंदिन कामाच्या बाहेरील पण परराष्ट्र विभागाशी संबंधित असे जे अनुभव आलेत, ते लिहिलेले आहेत. ते अतिशय रंजक आहेत. परराष्ट्र विभागात आणि परराष्ट्रात काम करीत असताना किती प्रकारचे विलक्षण अनुभव येतात हे, हे पुस्तक वाचल्यानंतर समजते. त्यातील एक-दोन रंजक अनुभवांचा आपण आस्वाद घेऊ या.
 
नटवर सिंग यांचा हा 1975चा किस्सा आहे. लंडनमध्ये ते भारताचे उच्चायुक्त होते. आणीबाणी-प्रसिद्ध यशपाल कपूर यांनी चंद्रास्वामी यांना त्यांना भेटण्यास सांगितले. 70-80च्या दशकात चंद्रास्वामी हे भारताच्या राजकारणात प्रसिद्धीच्या झोतात होते. ते तांत्रिक स्वामी होते. त्यांना काही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे अनेक राजकारणी त्यांचे शिष्य झाले होते. चंद्रास्वामींचा नटवर सिंग यांना फोन आला आणि इंडिया हाउसमध्ये ते नटवर सिंग यांना भेटण्यास आले. साधू पोशाखात होते. त्यांना इंग्लिश येत नव्हते.

 
नटवर सिंग आणि चंद्रास्वामी यांचे संबंध वाढत गेले. नटवर सिंग यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वामी मंडळींवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. एकदा चंद्रास्वामी यांनी नटवर सिंग दांपत्याला भोजनास बोलावले. चंद्रास्वामी यांनी भोजन झाल्यानंतर मोठा सफेद कागद काढला आणि त्यावर उजव्या व डाव्या बाजूने रेषा मारल्या, त्याचे चौकोन झाले. त्यांनी तीन कोरे कागद माझ्या पत्नीला दिले, त्यावर आपल्या मनातील प्रश्न लिहायला सांगितले. कागदाचा चेंडू करून सफेद कागदावरील रेषांनी झालेल्या चौकोनात ते त्यांनी ठेवायला सांगितले. चंद्रास्वामींनी डोळे मिटले आणि ते ध्यानमग्न झाले.

चंद्रास्वामींनी माझ्या पत्नीला प्रश्नाच्या कागदाची एक वळकुटी उचलायला सांगितली. कागद उघडायला सांगितला. आणि चंद्रास्वामीने कागदावर लिहिलेला प्रश्न जसाच्या तसा सांगितला. असे तिन्ही प्रश्नांबाबतीत झाले. नटवर सिंग म्हणतात की, मीदेखील चक्रावून गेलो. चंद्रास्वामी फालतू मांत्रिक आहेत असे मला वाटले नाही.

नटवर सिंग नंतर लिहितात की यशवंतराव चव्हाण लंडनला आले असता चंद्रास्वामींचा हा अनुभव मी त्यांना सांगितला. चव्हाण म्हणाले की, “त्यांना काही सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत.” “चंद्रास्वामी माउंटबॅटन आणि श्रीमती थॅचर यांना भेटू इच्छितात.” चव्हाण म्हणाले, “काही हरकत नाही.” आश्चर्याची गोष्ट म्हणजे चंद्रास्वामींनी रात्री मला फोन करून विचारले, “आज्ञा मिळाली ना?” मी माउंटबॅटन यांना फोन केला. ते म्हणाले की, ते इंग्लंडबाहेर असल्यामुळे भेटू शकत नाहीत. मार्गारेट थॅचर तेव्हा हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेता म्हणून निवडल्या गेल्या होत्या. श्रीमती थॅचर यांना चंद्रास्वामींच्या भेटीविषयी विचारले. त्यांनी परवानगी दिली.

नटवर सिंग चंद्रास्वामींना श्रीमती थॅचर यांच्या कार्यालयात घेऊन गेले. थॅचर यांनी केवळ दहा मिनिटे दिली होती. चंद्रास्वामींना थॅचर यांनी प्रश्न केला, “तुम्ही मला का भेटू इच्छिता?” चंद्रास्वामींनी मोठा सफेद कागद मागून घेतला. डाव्या-उजव्या बाजूने रेषा मारल्या. कागदावर चौकोन तयार केले आणि थॅचर यांना पाच कागद देऊन पाच प्रश्न लिहायला सांगितले. ते कागदावरील चौकोनात टाकून प्रत्येक प्रश्न त्यांनी अचूक सांगितला. थॅचरबाई आदराने चंद्रास्वामी यांच्याकडे बघू लागल्या. जाण्याची वेळ झाल्यानंतर थॅचरबाईंनी चंद्रास्वामी यांना पुन्हा भेटण्याची इच्छा सांगितली. चंद्रास्वामी यांनी मंगळवारी दुपारी अडीच वाजता नटवर सिंग यांच्या घरी भेटीला यायला सांगितले. थॅचरबाईंनी ते मान्य केले. नटवर सिंग यांना खूप आश्चर्य वाटले.

 
पुढचा किस्सा वाचण्यासारखा आहे. चंद्रास्वामींनी थॅचरबाईंना एक ताईत काढून दिला, तो डाव्या मनगटाला बांधायला सांगितला. नटवर सिंग यांना चंद्रास्वामींचे हिंदी बोलणे इंग्लिशमध्ये सांगावे लागत होते. परराष्ट्र व्यवहाराचे काही नीतिनियम असतात, संकेत असतात, शिष्टाचार असतात, त्यात हा विषय बसत नव्हता, म्हणून त्यांनी ही गोष्ट थॅचर यांना सांगण्यास नकार दिला. थॅचरबाईंनीच त्यांना विचारले, “स्वामी काय म्हणतात?” नटवर सिंग यांना नाइलाजाने सांगावे लागले. नटवर सिंग यांना स्वामीचा पुढचा विषय बाँबगोळ्यासारखा वाटला. चंद्रास्वामी म्हणाले, “मंगळवारी थॅचरबाईंनी लाल पोशाखात यावे.” विरोधी पक्षनेत्याला आणि तेही इंग्लंडच्या, पोशाख कोणता घालावा हे सांगणे अवघडच, पण नटवर सिंगांनी याचेदेखील भाषांतर करून सांगितले.

मंगळवारी ठरलेल्या वेळी थॅचरबाई लाल पोशाखात आल्या. या दोघांचे बोलणे झाले. थॅचरबाईंनी चंद्रास्वामी यांना विचारले की, त्या पंतप्रधान बनण्याची शक्यता किती आहे? चंद्रास्वामी म्हणाले की, त्या नऊ किंवा अकरा किंवा तेरा वर्षे पंतप्रधान राहतील. त्या पंतप्रधान होणार हे निश्चित आहे. पुढील तीन-चार वर्षांतच त्या पंतप्रधान होतील. चंद्रास्वामी यांचे बोलणे खरे ठरले. मार्गारेट थॅचर अकरा वर्षे पंतप्रधान होत्या. या किश्श्याचा शेवट नटवर सिंग असा करतात, “लुसाका येथे राष्ट्रकुल परिषदेसाठी मार्गारेट थॅचर आल्या होत्या. माझी नियुक्ती झांबियाला झाली होती. मार्गारेट थॅचर यांचे स्वागत करण्यासाठी मी विमानतळावर गेलो. तेव्हा मी मार्गारेट थॅचर यांना म्हणालो, ‘आमच्या स्वामीची भविष्यवाणी खरी ठरली.’ थॅचरबाई त्यावर म्हणाल्या, ‘मि. नटवर, अशा गोष्टी आपण सार्वजनिक ठिकाणी बोलत नसतो.”

हा दुसरा किस्सा भारताचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि चेअरमन माओ यांच्या भेटीसंदर्भातील आहे. ही भेट 1957मध्ये झाली. चीनच्या भेटीसाठी डॉ. राधाकृष्णन तेव्हाच्या पेकिंग येथे आले होते. विमानतळावर चीनच्या वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यात पंतप्रधान चाऊ एन लाय हेदेखील होते. देशाच्या महत्त्वाच्या नेत्याला परदेशात विमानतळावर स्वागतासाठी कोण कोण आले यावरून त्या देशाने या भेटीला किती महत्त्व दिले हे अधोरेखित होते. आंतरराष्ट्रीय राजकारणाची ती भाषा आहे. 1949 ते 1952 या काळात डॉ. राधाकृष्णन मॉस्कोमध्ये भारताचे राजदूत होते. त्यापूर्वी श्रीमती विजयालक्ष्मी पंडित होत्या. विजयालक्ष्मी पंडित यांना स्टॅलिनने भेट दिली नाही, परंतु राधाकृष्णन यांना मात्र त्यांनी भेट दिली. स्टॅलिन परदेशी राजदूतांना मध्यरात्री भेटायला बोलवत असे. राधाकृष्णन यांना मात्र रात्री नऊला भेटायला बोलावले.

राधाकृष्णन यांचा निवास माओच्या निवासस्थानाजवळच ठेवण्यात आला होता. मीदेखील एक रात्र त्यांच्याबरोबर होतो, असे नटवर सिंग लिहितात. माओ तेव्हा मॉस्कोला रशियन राज्यक्रांतीच्या चाळिसाव्या वर्धापन दिनानिमित्त गेले होते. राधाकृष्णन यांच्या स्वागतासाठी ते येतील की नाही याची शंका होती, परंतु चेअरमन माओ एक दिवस अगोदरच परत आले.

चाऊ एन लाय यांच्याबरोबर माओ आणि राधाकृष्णन यांची भेट झाली. माओ हे जबरदस्त इच्छाशक्ती असलेले नेते होते, असे नटवर सिंग नमूद करतात. हस्तांदोलन झाल्यानंतर राधाकृष्णन यांनी माओंच्या डाव्या गालावर हलकाच हात लावला. माओला याची सवय नव्हती. त्यामुळे ते थोडे अचंबित झाले. राधाकृष्णन यांच्या लक्षात आले आणि ते म्हणाले, “मिस्टर चेअरमन, गोंधळण्याचे कारण नाही. मी स्टॅलिन आणि पोपच्या बाबतीत हेच केले होते.” नटवर सिंग लिहितात, "What an exit line! (याचे भाषांतर करता येणार नाही, पण त्याचा अर्थ असा होतो की, नाजूक परिस्थितीतून बाहेर पडण्याचा अप्रतिम मार्ग.) आंतरराष्ट्रीय भेटीगाठीत प्रत्येक गोष्टीचे अर्थ काढले जातात. हसणे, न हसणे, नजर खाली करणे, नजर वर करणे, दुसरीकडे पाहणे याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. गालावर चापट मारणे याचा नको तो अर्थ काढू नये, याची खबरदारी राधाकृष्णन यांनी घेतली.

नंतर राधाकृष्णन आणि चेअरमन माओ यांचे तैवानविषयी बोलणे झाले. भारत आणि चीन यांच्या शांततामय सहजीवनाचे बोलणे झाले. माओ म्हणाले, “भारत आणि चीन एकत्र आले, तर जगातील कोणतीच शक्ती आम्हाला वेगळी करू शकत नाही. वीस वर्षे तरी आपण एकत्र राहू शकतो.”

नटवर सिंगांचे यावरील भाष्य एका वाक्याचे आहे - ‘वीस वर्षांची पाचच वर्षे झाली.’ 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले. तो एक वेगळा विषय आहे.

 
Powered By Sangraha 9.0