बाबा विश्वनाथ मुक्त झाला

15 Dec 2021 18:18:27
@डॉ. दिनेश थिटे 9822025621
शेकडो वर्षांच्या वेढ्यातून बाबा विश्वनाथ मुक्त झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथाच्या मंदिरासाठी केलेल्या कार्यामुळे हिंदू समाजासाठी नवा आदर्श निर्माण झाला आहे. आम्ही आमच्या श्रद्धेबाबत, आमच्या वारश्याबाबत, आमच्या भावनांबाबत तडजोड करणार नाही, पण त्याचबरोबर आमची मंदिरे सुंदर, प्रशस्त आणि रम्य असतील, हे त्यांनी कृतीने दाखवून दिले आहे. शेकडो वर्षांच्या आक्रमणामुळे आत्मविश्वास गमाविलेल्या हिंदू समाजाला नवी उभारी देणारे हे पाऊल आहे.

modi_1  H x W:
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काशीला गंगा नदीत डुबकी मारली, सूर्याला अर्घ्य दिले आणि गळ्यातली माळ काढून जप केला. त्यानंतर ते हातातल्या कलशातून गंगाजल घेऊन धीरोदात्तपणे पावले टाकत काशीच्या बाबा विश्वनाथाच्या मंदिरात गेले. भव्य प्रांगणातून त्यांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांनी भक्तिभावाने पूजा केली आणि अवघा हिंदू समाज रोमांचित झाला.
शेकडो वर्षे हिंदू लोक या प्रसंगाची वाट पाहत होते. काशी आमचे पवित्र तीर्थस्थान. तेथे जाऊन गंगेत स्नान करावे आणि विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा करावी, हे स्वप्न उराशी बाळगलेले. पण तेथे जाऊन पाहावे, तर हे ऐतिहासिक पवित्र मंदिर सर्व बाजूंनी घरांनी, बेबंद बांधकामांनी आणि चिंचोळ्या गल्ल्यांनी वेढलेले. मंदिराचे प्रांगण नसल्यातच जमा. बाबा विश्वनाथाला शेकडो वर्षे असा वेढा पडला होता. त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यातून आमचे हे पवित्र स्थान कोण मुक्त करेल, याची हिंदू भाविक वाट पाहत होते. अखेरीस त्यांची मन:कामना पूर्ण झाली. बाबा विश्वनाथाने नरेंद्र मोदी यांच्या हातून हे ऐतिहासिक कार्य करून घेतले.


modi_1  H x W:

 
हिंदूंचे दु:ख गांधीजींनी मांडले
 
काशीला जाणार्‍या हिंदू भाविकांचे दु:ख महात्मा गांधी यांनी मांडले होते. त्यांनी काशीला भेट दिली होती. ‘माय एक्स्पेरिमेंट्स विथ ट्रूथ’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी त्याचे वर्णन केले आहे. ते म्हणतात - मुंबईत बॅरिस्टर म्हणून काम करत असताना 1891 साली त्यांनी काशीयात्रेबद्दल एक भाषण ऐकले होते आणि त्यामुळे काहीशी निराशा होण्याची मानसिक तयारी होती. पण प्रत्यक्षात ते काशीला गेले, त्या वेळी त्यांना धक्का बसला. मंदिराकडे जाणारा रस्ता चिंचोळा होता आणि निसरडा होता. तेथे कसलीही शांतता नव्हती. माशा घोंघावत होत्या. दुकानदारांचा आणि यात्रेकरूंचा असह्य गोंगाट होता. मंदिराच्या पदाधिकार्‍यांची मंदिरात पावित्र्य आणि रम्य वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी होती. प्रत्यक्षात आपल्याला भोवती बाजारच दिसला, ज्यामध्ये लबाड व्यापारी मिठाई आणि नव्या फॅशनची खेळणी विकत होते. मंदिरात पोहोचल्यावर आपल्याला प्रवेशद्वारातच दुर्गंधी येणारा सडलेल्या फुलांचा ढिगारा दिसला.
 
एक हिंदू म्हणून गांधीजी दुखावले. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात भाषण करताना 4 फेब्रुवारी 1916 रोजी सांगितले, “काल सायंकाळी मी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. गल्ल्यांमधून चालत असताना माझ्या मनात विचार आला. एखादा परका माणूस या मंदिरात वरून आला. त्याला आपण हिंदू कसे आहोत याविषयी मत बनवायचे असेल आणि त्याने आपला धिक्कार केला तर तो योग्य ठरणार नाही का? मी एक हिंदू म्हणून बोलतोय. आपल्या पवित्र मंदिराकडे जाणार्‍या गल्ल्या इतक्या गलिच्छ असाव्यात का? आपली मंदिरेसुद्धा जर स्वच्छतेचा आणि प्रशस्तपणाची मॉडेल नसतील, तर आपले स्वत:चे सरकार तरी काय असणार?”

गांधीजींनी 1916 साली ही वेदना बोलून दाखविली. त्यानंतर ते विश्वनाथाच्या मंदिरात जात होते, त्या वेळीही त्यांना स्वच्छतेची समस्या दिसली. त्याबद्दल त्यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे. त्यानंतर शंभर वर्षे झाली, तरी समस्या कायमच राहिली. वाढत्या लोकसंख्येबरोबर आणि भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबर समस्या आणखी तीव्र होत गेली. गंगेत स्नान करून विश्वनाथाच्या मंदिराकडे जावे, तर नीलकंठ गल्ली असो किंवा दुसरी गल्ली असो, सर्वत्र एकच समस्या - चिंचोळी गल्ली, भाविकांची गर्दी, दुकानदारांचा कलकलाट, जनावरांचा वावर, उघडी गटारे, पसरलेले शेण आणि कचरा, विजेचे खांब असे चित्र अनुभवाला यायचे. या सगळ्यातून लांबच लांब रांगेतून वाट पाहत कधीतरी देवाचे दर्शन व्हायचे. गंगेच्या काठावर मणिकर्णिका घाटावर दिवसाचे चोवीस तास प्रेतांचे दहन चालू आहे. गंगेत गटाराचे पाणी सोडल्यामुळे प्रदूषण झाले आहे, नदीकिनारी आणि मंदिराच्या जवळ असलेल्या पुरातन मंदिरांवर आणि सुंदर इमारतींवर स्थानिकांनी अतिक्रमण करून बेबंद आणि ओंगळवाणे बांधकाम केले आहे असे सारे चित्र. हिंदू समाजाचे सर्वात महत्त्वाचे तीर्थस्थान म्हणून भक्तिभावाने जावे, तर मन दुखावेल अशी स्थिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी कॉरिडॉर तयार करून हिंदू समाजासाठी किती मोलाचे कार्य केले आहे, याची कल्पना येण्यासाठी मूळ समस्या ध्यानात घ्यायला हवी.
 
modi_1  H x W:
 
बाबा विश्वनाथाच्या मंदिरावर पुन:पुन्हा हल्ले 

काशी हे खूप प्राचीन तीर्थस्थान आहे. उपलब्ध माहितीनुसार अकराव्या शतकात हरीचंद्र यांनी विश्वेश्वराचे मंदिर बांधले. त्यानंतर 1194 साली मुहंमद घोरीच्या राजवटीत कुतुबुद्दीन ऐबकने हे मंदिर उद्ध्वस्त केले. तेराव्या शतकात एका गुजराती व्यापार्‍याने हे मंदिर पुन्हा बांधले. 1351 साली फिरोजशाह तुघलकने मंदिर उद्ध्वस्त केले. तोडरमलने 1585 साली पुन्हा मंदिर बांधले. 1669 साली औरंगजेबाने मंदिर उद्ध्वस्त केले आणि त्याच्या चौथर्‍यावर ग्यानव्यापी मशीद बांधली. आजही मशिदीच्या मागच्या बाजूला जुन्या मंदिराचे भाग दिसतात. अखेरीस 1780 साली अहल्याबाई होळकर यांनी ग्यानव्यापी मशिदीजवळ विश्वेश्वराचे मंदिर बांधले, जे सध्याचे मंदिर आहे. 1836 साली महाराजा रणजितसिंह यांनी मंदिराच्या कळसासाठी सोने दिले. 1992 साली बाबरी मशीद पाडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ग्यानवापी मशिदीच्या रक्षणाचा आदेश दिला व त्यामुळे त्याभोवती कुंपण बांधण्यात आले.
 
अखेर मोदींनीच प्रश्न सोडविला
 
काळ पुढे सरकत राहिला, पण मंदिराच्या आणि परिसराच्या विकासासाठी कोण्या सरकारने काही ठोस पावले उचलली नाहीत. गांधीजींचे शिष्य म्हणविणारे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भक्कम सरकार हाती लाभले होते, ते स्वत: उत्तर प्रदेशातून निवडून गेले होते, पण त्यांनी गांधीजींनी मांडलेली मंदिराबाबतची समस्या दूर केली नाही. इंदिरा गांधीही मूळच्या उत्तर प्रदेशातील नेत्या आणि त्यांनाही पूर्ण बहुमताचे सरकार मिळाले होते, पण त्यांनी या पवित्र तीर्थस्थानाच्या बाबतीत गांधीजींनी दाखविलेली त्रुटी दूर केली नाही. राजीव गांधी लोकसभेच्या चारशेपेक्षा अधिक जागा जिंकून 1984 साली पंतप्रधान झाले होते. त्यांनी गंगा शुद्धीकरणाची घोषणा केली होती. पण त्यांनीही काशीच्या विश्वनाथ मंदिराला पडलेला घरांचा आणि बेबंद बांधकामांचा वेढा काही सोडविला नाही. अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान म्हणून बहुमताची मर्यादा होती. हिंदू समाजाबद्दलच्या त्यांच्या बांधिलकीची खात्री होती, पण हिंदूंच्या पवित्र स्थानासाठी असे काही ठोस करण्यासाठी त्यांना बहुमताची साथ नव्हती. अटलजींना आघाडीच्या राजकारणासाठी नरमाईने वागावे लागले होते. अशा परिस्थितीत अखेर मोदींनीच हा प्रश्न सोडविला.


modi_1  H x W:
 
काशी या हिंदूंच्या पवित्र स्थानाची तुलना करायची, तर ती मुस्लिमांच्या मक्केशी किंवा ख्रिश्चनांच्या व्हॅटिकनशी करावी लागेल. व्हॅटिकन सिटीत सेंट पीटर्स चौकात तीन लाख लोक एकत्र जमू शकतात. नव्या पोपची घोषणा होणार असेल तर ही संख्या चार लाखांवर जाऊ शकते. मक्का येथे पवित्र यात्रेसाठी लाखो मुस्लीम भाविक कसे सहजतेने एकत्र येतात, हे आपण छायाचित्रांमध्ये पाहिले आहे. मग हिंदूचे तसे का नाही? असा प्रश्न कोणत्याही भाविकाला पडतो. आमच्या पवित्र मंदिराचे क्षेत्रफळ अवघे तीन हजार चौरस फूट असावे आणि सगळा परिसर बेबंद बांधकामांनी वेढलेला असावा, असे का?
सर्वसामान्य हिंदूंची ही वेदना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जाणवत होती. त्यांनी आधी काशीयात्रा केली, त्या वेळी त्यांनाही वाटले होते की, या मंदिराच्या परिसरासाठी काही केले पाहिजे. पंतप्रधान म्हणून मोदीजींना अधिकार मिळाले, पाठोपाठ 2017 साली भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळाले आणि तेथे योगी आदित्यनाथ यांचे सरकार आले. योग जुळून आला आणि 2018 साली ‘श्री काशी विश्वनाथ स्पेशल एरिया डेव्हलपमेंट बोर्डा’ची स्थापना करण्यात आली. बाबा विश्वनाथाच्या मंदिराच्या परिसरात 8.2 हेक्टर क्षेत्राच्या विकासाचा मास्टर प्लॅन बनवून त्याची अंमलबजावणी करणे व त्यातून यात्रेकरूंसाठी सुविधा निर्माण करणे हे काम या बोर्डाकडे देण्यात आले. त्यातूनच काशी कॉरिडॉरचे काम झाले आहे.
 

modi_1  H x W:  
 
मंदिराच्या पावित्र्याची अनुभूती देणारे काम
 
विश्वनाथाच्या मंदिरापासून गंगा नदीपर्यंत थेट मार्ग अर्थात कॉरिडॉर निर्माण करण्याचा हा प्रकल्प पूर्ण झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्याचे लोकार्पण केले. आता त्यांच्याप्रमाणेच भाविक गंगा नदीत स्नान करून प्रशस्त आणि सुंदर मार्गाने मंदिरात जाऊ शकतात आणि मंदिराच्या भव्य प्रांगणात जाऊन तेथील वातावरणातील पावित्र्याची अनुभूती घेऊ शकतात. या कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसराचा विकास करण्याबरोबरच यात्री सुविधा केंद्र, स्वच्छतागृहे, अतिथी निवास, वाराणसी शहराचे संग्रहालय, सांस्कृतिक केंद्र, सुरक्षा विभाग, धार्मिक पुस्तक विक्री केंद्र, प्रसाद केंद्र अशा अनेक सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना गंगा नदीपासून मंदिरापर्यंतच्या पायर्‍या चढून जाणे अवघड ठरेल, तर त्यांच्यासाठी एलिव्हेटरची सुविधा निर्माण करण्यात आली. या प्रकल्पासाठी मंदिराच्या परिसरात गंगा नदीपर्यंतची घरे आणि दुकाने मोबदला देऊन ताब्यात घेतली आणि ती हटवून जागा मोकळी केली. घरे पाडत असताना त्या घरांमध्ये दडलेली काही जुनी आणि सुंदर मंदिरे उघड झाली. त्या मंदिरांचे जतन करण्यात आले. मूर्ती आदरपूर्वक सुरक्षित हलविण्यात आल्या. हा एकूण प्रकल्प खूप मोठा आहे. अधिकची कामे पूर्ण होतील, तसा हा परिसर अधिकाधिक सुंदर आणि रम्य होत जाईल. कॉरिडॉरच्या सर्व कामात स्थानिकांचे सहकार्य मिळविण्यात आले. त्यासाठी कायद्याचा दंडुका नव्हे, तर मन वळविण्याचा उपाय अवलंबण्यात आला. त्यामुळेच सुरुवातीला काशी कॉरिडॉरला विरोध करणारेही नंतर समर्थक झाले. या प्रकल्पामुळे जुन्या घरांमधील काहींचे विस्थापन झाले खरे, पण आता भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून संपूर्ण शहराचे भाग्य उजळेल, हे नक्की.

हिंदू समाजाला अभिमान वाटेल असा भव्य, सुंदर, कमालीचा स्वच्छ आणि आधुनिक परिसर मंदिराच्या भोवती निर्माण करण्यात आला आहे. 2019 साली मोदी यांनी स्वत: कामाला सुरुवात केली आणि आता त्याचे उद्घाटन केले. काशीचे बाबा विश्वनाथाचे मंदिर म्हणजे जणू एक हिराच. पण तो ढिगार्‍यात अडकला होता. त्या हिर्‍याभोवती साजेसे कोंदण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केले आहे. महात्मा गांधींपासून असंख्य हिंदू भाविकांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. शेकडो वर्षांच्या वेढ्यातून बाबा विश्वनाथ मुक्त झाला आहे. हे काम मोदींच्या हातून व्हावे अशी त्याचीच इच्छा असेल, नाही तर इतकी वर्षे न झालेले हे काम आताच झटपट दोन वर्षांत का व्हावे?
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथाच्या मंदिरासाठी केलेल्या कार्यामुळे हिंदू समाजासाठी नवा आदर्श निर्माण झाला आहे. आम्ही आमच्या श्रद्धेबाबत, आमच्या वारश्याबाबत, आमच्या भावनांबाबत तडजोड करणार नाही, पण त्याचबरोबर आमची मंदिरे सुंदर, प्रशस्त आणि रम्य असतील, हे त्यांनी कृतीने दाखवून दिले आहे. शेकडो वर्षांच्या आक्रमणामुळे आत्मविश्वास गमाविलेल्या हिंदू समाजाला नवी उभारी देणारे हे पाऊल आहे.
(कृतज्ञता - या लेखासाठी काशी कॉरिडॉरचे आर्किटेक्ट डॉ. बिमल पटेल यांचे सादरीकरण उपयुक्त ठरले.)
Powered By Sangraha 9.0