पंतप्रधान मोदी यांनी काशीविश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणजे काय केले? मोदींनी या परिसरात केवळ भौतिक विकास केला नाही, तर हिंदू अस्मितेवर शतकानुशतके साचून राहिलेली अपमान, अतिक्रमण, परदास्य यांची धूळ झटकून आपण कोण आहोत, आपला वारसा काय, आपला संस्कार, संस्कृती काय यांचे पुन:स्मरण करून देण्याचे काम केले आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी जो ऐतिहासिक वारसा मांडला, तो आम्ही कोण आहोत याचे स्मरण देणारा आहे. “बाहेरून औरंगजेब येणार असेल तर येथे शिवाजी उभे राहणार” हे वाक्य उच्चारताना पंतप्रधानांनी आपल्या शौर्याची परंपरा लक्षात आणून दिली आणि स्वाध्वी अहिल्याबाई होळकर यांचा गौरव करताना आपली धार्मिक, सेवाभावी वृत्ती अधोरेखित केली.
देश स्वतंत्र झाला, त्याचबरोबर देशाची अस्मिता, मानबिंदू असलेल्या श्रद्धास्थानांच्या मुक्तीचा, जीर्णोद्धाराचा आरंभ सोमनाथापासून झाला. सोमनाथापाठोपाठ काशी, मथुरा, अयोध्या या श्रद्धास्थानांवर परकीय आक्रमकांनी केलेले अतिक्रमण हटवून या देशाची अस्मिता आणि गौरवशाली इतिहास पुन्हा जागृत करायला हवा होता. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार होत असतानाच धर्मनिरपेक्षतेची आणि सर्वधर्मसमभावाची इंगळी डसली व तिचा प्रसार-प्रचार अगदी 2014पर्यंत कायम राहिला. सोमनाथापाठोपाठ जर काशी, अयोध्या, मथुरेचा विषय तत्कालीन नेतृत्वाने आपला मानला असता, तर कदाचित अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन करायला 2020 साल उजाडले नसते आणि काल-परवा झालेला काशीविश्वनाथ मंदिर विकास प्रकल्पही सत्तर वर्षांपूर्वी पूर्णत्वास गेला असता. हिंदू, हिंदुत्व आणि इथली संस्कृती याविषयी पराकोटीची अनास्था असणारे नेतृत्व दीर्घकाळ देशात सत्तास्थानी असल्यामुळे ही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली.
सोमवार, दि. 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काशीविश्वनाथ मंदिर व परिसर विकासाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा झाला. या सोहळ्यासंबंधी प्रसारमाध्यमांतून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी काशीविश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणजे काय केले? मोदींनी या परिसरात केवळ भौतिक विकास केला नाही, तर हिंदू अस्मितेवर शतकानुशतके साचून राहिलेली अपमान, अतिक्रमण, परदास्य यांची धूळ झटकून आपण कोण आहोत, आपला वारसा काय, आपला संस्कार, संस्कृती काय यांचे पुन:स्मरण करून देण्याचे काम केले आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी जो ऐतिहासिक वारसा मांडला, तो आम्ही कोण आहोत याचे स्मरण देणारा आहे. “बाहेरून औरंगजेब येणार असेल तर येथे शिवाजी उभे राहणार” हे वाक्य उच्चारताना पंतप्रधानांनी आपल्या शौर्याची परंपरा लक्षात आणून दिली आणि स्वाध्वी अहिल्याबाई होळकर यांचा गौरव करताना आपली धार्मिक, सेवाभावी वृत्ती अधोरेखित केली. अहिल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा या परिसरात उभारून आम्ही त्यांच्याच वाटेवरचे वाटसरू असल्याचा संदेश या निमित्ताने दिला गेला आहे. चोरीला गेलेली आणि भारताच्या परराष्ट्र नीतीची फलश्रुती म्हणून परत आलेली माता अन्नपूर्णाही याच परिसरात स्थापित केली आहे.
असंख्य वेळा परचक्र आले, तरीही आपण टिकून राहिलो, ते याच संस्कृतीमुळे व संस्कारामुळे. या अक्षय संस्कृतीचा जयजयकार करत काशी तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा सर्वसामान्य हिंदूंसाठी खुला झाला. अतिक्रमणामुळे विस्मृतीत गेलेली सुमारे चाळीस मंदिरे या विकास प्रकल्पामुळे पुन्हा दर्शनासाठी खुली झाली. काशी हे तीर्थक्षेत्र हिंदू, बौद्ध, जैन यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक पंथ, संप्रदाय यांच्यासाठी प्रेरणास्थान असणार्या काशीचा विकास करताना ‘भव्य काशी, दिव्य काशी’ अशी घोषणा दिली, ती आपल्या संस्कृतीचे व परंपरेचे स्मरण करून देण्यासाठीच.
परकीय आक्रमणामुळे झालेली हानी आणि अवनती दूर करणारा विकासाचा पहिला टप्पा लोकार्पण करताना तो केवळ काशी तीर्थक्षेत्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशभर उत्साह वाढवणारा ठरला आहे. भारताच्या हृदयस्थानी काशी आहे, काशीची हृदयस्पदने देशाची स्पंदने असतात, अशीच आपली प्राचीन काळापासून परंपरा आहे. आता नव्या संदर्भासह नवी स्पंदने काशीतून प्रसारित होतील आणि नजीकच्या काळात त्याचा अनुभव येईल. काशीचा संदेश देशभर स्वीकारला जातो. या वेळी आत्मजागृतीचा व स्वधर्म सन्मानाचा संदेश काशीने दिला आहे, तोही देशभर पोहोचेल. हिंदू समाज कूस बदलतो आहे, हा संदेश जगभर गेला.
मा. पंतप्रधान हे लोकसभेवर काशी (वाराणसी) मतदान संघातून दोन वेळा निवडून गेले आहेत. एका अर्थाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील हा विकास प्रकल्प होता आणि त्यांनी तो ड्रीम प्रोजेक्ट म्हणून युद्धपातळीवर राबवला आहे. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, तो प्रेरणादायक आहे. काशीविश्वनाथ जीर्णोद्धारानिमित्त विविध उपक्रमांत पंतप्रधान सहभागी झाले. या प्रकल्पासाठी काम करणार्या कामगारांसमवेत भोजन केले, त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, यातूनही हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवले. मात्र काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की, धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमात पंतप्रधानांनी सहभागी व्हावे का? या प्रश्नाचे उत्तर काळच देईल. काशी हे क्षेत्र काळभैरवाच्या आधिपत्याखाली आहे. कालभैरव शक्ती देतो, दैन्य-दु:ख हरतो, रक्षण करतो. काशीचा हा काळभैरव देशाला सक्षम आणि संस्कृतिप्रिय बनण्याची प्रेरणा देत असून आपल्या मुळाकडे जाण्याचा संदेश देत आहे.