सप्तचिरंजीव महात्म्यांविषयीचे पुस्तक आपल्याला आधुनिक जगात, नीतीत आणि देशांतर्गत काही प्रश्नांकडे घेऊन जाते. स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी का होईना, आपल्या देशातील देश चालविणार्या वरच्या फळीतील कर्तबगार लोकांना आपली मुळे शोधण्याचे भान होत चालले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आपण कोण आहोत, आपला वारसा कोणता आहे, परराष्ट्र नीतीसारख्या अवघड विषयातही आपल्या पूर्वजांचे योगदान किती आहे, हे टी.पी. श्रीनिवासन यांनी मांडलेलं आहे.
बालपणी संघशाखेत प्रात:स्मरण म्हटले जाई, त्यात सात चिरंजीवांचा उल्लेख येतो. तो श्लोक असा आहे -
‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण:।
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरंजीविन:॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित॥’
या श्लोकात थोर चिरंजीव महात्म्यांची नावे आलेली आहेत, ती अशी - ‘अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि भगवान परशुराम.’ चिरंजीव याचा अर्थ ज्याला मरण नाही, तो. म्हणजे हे सातही जण, आपल्या श्रद्धेप्रमाणे आजही जीवित आहेत. ते शरीररूपाने जिवंत आहेत की त्यांच्या अलौकिक गुणसंपदेमुळे जिवंत आहेत, यावर चर्चा होऊ शकते.
हे सात चिरंजीव लहानपणी संघशाखेत माहीत झाले. प्रत्येकाचे अल्प का होईना, जीवनचरित्रदेखील तेव्हा ऐकण्यात आले. परंतु हे सात जण म्हणजे परराष्ट्र नीतीचे सात विषय आहेत असे बालपणी कुणी सांगितले असते, ते तर डोक्यावरून गेले असते; तरुणपणी जर कुणी सांगितले असते, तर ते हास्यास्पद वाटले असते आणि हे सात जण परराष्ट्र नीतीचे विषय आहेत असे जर आता प्रौढ झाल्यावर कुणी सांगितले, तर ते विचार करायला लावते.
असे सांगण्याचे काम टी.पी. श्रीनिवासन यांनी ‘Applied Diplomacy’ या पुस्तकात केले आहे. टी.पी. श्रीनिवासन हे केरळचे आहेत. शिक्षण संपल्यानंतर ते भारताच्या परराष्ट्र सेवेत रुजू झाले. त्यांनी 37 वर्षे सेवा केली. अनेक देशांत ते भारताचे राजदूत म्हणून राहिले. युनोमध्ये भारताचे कायमस्वरूपाचे प्रतिनिधी, तसेच आंतरराष्ट्रीय अॅटॉमिक एनर्जी एजन्सी व्हिएन्ना येथे ते भारताचे गव्हर्नर म्हणून राहिले. फिजी, केनिया, जपान (टोकियो), रशिया (मॉस्को), अमेरिका (न्यूयॉर्क) इत्यादी देशांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. परराष्ट्र नीतीचा त्यांचा अनुभव उदंड आहे. ‘Applied Diplomacy’ या पुस्तकात आपल्याला तो पानोपानी जाणवतो.
पुुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी या लेखाच्या प्रारंभी दिलेला संस्कृत श्लोक दिलेला आहे. डिप्लोमसी म्हणजे राजनीतिक मुत्सद्देगिरी आणि धार्मिक मिथके यांचा परस्पर संबंध असू शकत नाही, असे अनेकांचे मत आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नसून आपण अधिक खोलात गेलो, तर धार्मिक मिथके आणि परराष्ट्र नीती यांचा खोलवरचा संबंध आहे, हे आपल्या लक्षात येईल. हे श्रीनिवासन यांचे मत मी अनुवाद न करता मराठी भाषेत मांडलेले आहे. त्यांनी महाबली हनुमानापासून सुरुवात केलेली आहे आणि शेवट व्यासाने केलेला आहे. हे सात चिरंजीव परराष्ट्र नीतीचे कोणते विषय स्पष्ट करतात? हे टी.पी. श्रीनिवासन यांनी ज्या प्रकारे मांडले आहे, ते बघू.
ते "Hanuman - The Mascot of Indian Foreign Service' असा महाबली हनुमानाचा उल्लेख करतात. म्हणजे हनुमान हे भारतीय परराष्ट्र नीतीचे शुभंकर आहेत. हनुमान हे जगातील पहिले राजदूत आहेत. श्रीरामाचे राजदूत म्हणून ते श्रीलंकेत गेले. राजदूत म्हणून त्यांची निवड करताना श्रीरामाने त्यांचे सर्व गुण पाहिले, ते असे - हनुमानाचे भाषेवर जबरदस्त प्रभुत्व होते. त्यांचे संवादकौशल्य अफाट होते. उच्चार स्पष्ट असत. संभाषण करताना त्यांचा चेहरा शांत असे. कपाळावर आठ्या किंवा भुवया उंच अथवा ते शरीराची अनावश्यक हालचाल करीत नसत. बोलत असताना ते एकही अवांतर शब्द उच्चारीत नसत. उगीचच चर्हाट लावून ते बोलत नसत. वाणी मृदू असे. हे सर्व वर्णन प्रभू रामाने केलेले आहे. परदेशात जाणार्या कोणत्याही राजनीतिज्ञाकडे हे सर्व गुण आवश्यक असतात. अनोळखी प्रदेशात जायचे आहे, तेथील भाषा, रितीरिवाज, याची तशी ओळख नसते. अशा वातावरणात राजनीतिज्ञाला अर्थपूर्ण संवाद करावा लागतो. आपल्या देशाचे म्हणणे दुसर्या देशाला मृदू भाषेत समजावून सांगावे लागते. महाबली हनुमानाकडे हे सर्व कौशल्य होते. टी.पी. श्रीनिवासन यांच्या पुस्तकातील पहिल्या विभागात सात प्रकरणे आहेत आणि या सात प्रकरणांतील त्यांनी आजच्या काळातील परराष्ट्र नीतीतील अतिशय महत्त्वाचे विषय हाताळलेले आहेत आणि त्यांना हनुमतांच्या गुणाने कसे सामोरे जावे लागतात, याचे स्वत:चे अनुभवकथन केलेले आहे.
हनुमंतानंतर विभीषण या दुसर्या चिरंजीवाचा उल्लेख येतो. त्याच्यावर दुसरे प्रकरण आहे, त्याचे शीर्षक आहे ‘तळलहशशीहरपर: खपवळर ळप र र्ढेीसह छशळसहर्लेीीहेेव’ - कठीण शेजार्यांच्या बाजूला भारत. विभीषण हा रावणाचा बंधू होता. असुरांतील तो देव होता. त्याने सत्यधर्म सोडला नाही आणि त्यासाठी त्याने आपल्या भावाचादेखील त्याग केला. श्रीरामविजयानंतर विभीषणाचा श्रीलंकेत राज्याभिषेक झाला. भारताच्या परराष्ट्र नीतीचे तत्त्व धर्म आणि सत्य यावर आधारित आहे. आपण अहिंसा स्वीकारलेली आहे. विभीषण ज्या तत्त्वांसाठी उभा होता, ती ही तत्त्वे आहेत. विभीषण हनुमानाशी संवाद करीत असताना म्हणतो की, “जशी जीभ तीक्ष्ण दातांनी घेरलेली असते, तशी माझी अवस्था आहे. माझ्या आसपासचे सर्व जण दुष्ट हेतूंनी प्रेरित झालेले आहेत.” टी.पी. श्रीनिवासन म्हणतात की, भारताचे भूराजनीतिक दुखणेदेखील असेच आहे. भारत जरी शांततेच्या मार्गाने जाणारा देश असला, तरी त्याचे सर्व शेजारी देश तसे नाहीत.
हनुमानाने विभीषणाला उत्तर दिले की, “प्रथम जिभेचा उद्गम होतो, नंतर दात येतात. जीभ शेवटपर्यंत राहते, काळाच्या ओघात सर्व दात पडून जातात.” म्हणजे सत्यधर्माने जगणारा हा कायम राहतो आणि दुष्टपणा करणारे काळाच्या ओघात निघून जातात, असा याचा अर्थ झाला. विभीषण हा जसा एकटाच आहे, तसा भारताशी शत्रुत्व करणार्या देशांत भारतही एकटाच आहे. चीन, पाकिस्तान हे दोन शत्रुदेश निरंतर कटकटी निर्माण करीत राहतात आणि भारताच्या उद्दाम शेजार्यांशी भारत कशा प्रकारे व्यवहार करतो आहे, हे या प्रकरणात विशद केलेले आहे. बहुधु्रवीय देश, एशिया-पॅसिफिक राजनीती असे अनेक विषय श्रीनिवासन यांनी हाताळलेले आहेत. या विभागातदेखील सात प्रकरणे आहेत. विभीषणाचा एक अनुभव येथे सांगण्यासारखा आहे. अशोक वाटिकेचा विध्वंस केल्यानंतर हनुमंताला कैद करण्यात येते आणि रावणाच्या मनात हनुमंताला ठार करण्याचे असते. तेव्हा विभीषण त्याला सांगतो की, असे करणे राजधर्माच्या विरोधी आहे, राजदूताला अभय असते. त्याला कैद करता येत नाही आणि ठार करता येत नाही. राजदूतांविषयीचा हा नियम आज जगात तंतोतंत पाळला जातो. रामायणाचा कालखंड अनेक हजार वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा आपली परराष्ट्र नीती किती परिपक्व होती, याचे हे उदाहरण आहे.
चिरंजीवांतील तिसरे चिरंजीव आहेत अश्वत्थामा. अश्वत्थामा म्हणजे आजची अमेरिका आहे, असे टी.पी. श्रीनिवासन यांचे मत आहे. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा. त्याला चिरंजीवित्वाचे वरदान लाभले होते. तो ब्रह्मास्त्र विद्या जाणणारा होता. सर्व कौरव सेनापती आणि कौरव ठार झाल्यानंतर तो पांडवांच्या छावणीत रात्री शिरला आणि त्याने द्रौपदीच्या पाचही मुलांना ठार केले. अन्य सर्व योद्ध्यांना ठार करून टाकले, शेवटी त्याने ब्रह्मास्त्र सोडले. ते जगाचा विनाश करील, म्हणून सर्व देवांनी ते मागे घेण्याची विनंती केली. मागे घेण्याची विद्या त्याच्याकडे नव्हती, म्हणून पांडवांचा एकमेव वारस जो उत्तरेच्या गर्भात होता, त्यावर त्याने हे ब्रह्मास्त्र वळविले, अशी ही कथा आहे.
श्रीकृष्णाने त्याची निर्भर्त्सना केली. त्याच्या कपाळावरील मणी काढून घेतला, भळभळ वाहणारी जखम तयार झाली. कृष्णाने त्याला शाप दिला की, याच अवस्थेत तू जगात फिरत राहशील. टी.पी. श्रीनिवासन अश्वत्थाम्याची तुलना आज सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेशी करतात. जगातील बहुतेक युद्धात ती असते. अमेरिकेला शस्त्रसामर्थ्याचा प्रचंड माज आहे. अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर आजच्या काळातील ब्रह्मास्त्र म्हणजे अणुबाँब टाकले. मानवी संहाराची ही जखम अश्वत्थाम्याची जखम झालेली आहे.
टी.पी. श्रीनिवासन हे केरळचे आहेत. शिक्षण संपल्यानंतर ते भारताच्या परराष्ट्र सेवेत रुजू झाले. त्यांनी 37 वर्षे सेवा केली. अनेक देशांत ते भारताचे राजदूत म्हणून राहिले. युनोमध्ये भारताचे कायमस्वरूपाचे प्रतिनिधी, तसेच आंतरराष्ट्रीय अॅटॉमिक एनर्जी एजन्सी व्हिएन्ना येथे ते भारताचे गव्हर्नर म्हणून राहिले. फिजी, केनिया, जपान (टोकियो), रशिया (मॉस्को), अमेरिका (न्यूयॉर्क) इत्यादी देशांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. परराष्ट्र नीतीचा त्यांचा अनुभव उदंड आहे.
अशा अश्वत्थामारूपी अमेरिकेकडे भारताला कसे बघावे लागते, कसे संबंध ठेवावे लागतात, या विभागातील सात लेखांतून टी.पी. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले आहे.
अश्वत्थाम्यानंतरचे चिरंजीव परशुराम आहेत. प्रकरणाचे शीर्षक आहे "Parasurama: Weapons Of War and Peace'.. परशुराम यांना श्रीविष्णूचे सहावे अवतार मानण्यात येते. त्यांनी जुलूम करणार्या क्षत्रिय राजांचा सहा वेळा नि:पात केला. ते जन्माने ब्राह्मण होते, पण वृत्तीने क्षात्रधर्मी होते, म्हणून त्यांना ब्रह्मक्षत्रिय म्हणतात. टी.पी. श्रीनिवासन त्यांची तुलना भारताशी करत, भारत हा शांतता आणि अहिंसा यावर विश्वास ठेवणारा देश आहे. भारताने अणुबाँब तयार केलेले आहेत, प्रतिकार एवढाच त्याचा उपयोग आहे. दुसर्याने अणुबाँब वापरू नये, याचा धाक निर्माण करण्यासाठी भारताने अणुबाँब तयार केले आहेत. दुसर्याने शस्त्र उचलण्यास बाध्य केल्याशिवाय परशुरामाने शस्त्र उचलले नाही, तसे भारताचे आहे. सर्व प्रकारची शस्त्रे धारण करूनही जगात शांतता आणि अहिंसक वृत्ती निर्माण व्हावी, यासाठी परशुरामाचे अवतारकार्य होते.
टी.पी. श्रीनिवासन यांनी या विभागातील सात प्रकरणांतून भारताच्या अणुधोरणाचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये शांततेसाठी आणि प्रतिकारासाठी अणुबाँब आणि अणुबाँबचा प्रथम वापर न करण्याची हमी इत्यादी विषयांना स्पर्श केलेला आहे. अणुवीज स्वस्त असली, तरी पर्यावरणाच्या दृष्टीने अणुभट्ट्या अत्यंत धोकादायक असतात. फुकोशिमा आणि चेर्नोबिल येथील अणुदुर्घटनेचा हवाला देऊन अणुभट्ट्या कशा धोकादायक असतात हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
कृपाचार्य हे नंतरचे चिरंजीव आहेत. ते पांडव आणि कौरव यांचे कुलगुरू होते. ते सत्यवादी होते. कर्तव्याचरणावर ते ठाम होते. कौरव-पांडवांच्या कलहात खूप हिंसा होईल आणि त्यात कुणाचेच कल्याण नाही, म्हणून सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत राहिले. कुरुक्षेत्राचे युद्ध समाप्त झाल्यानंतर युधिष्ठाराने कृपाचार्यांना सन्मानाचे स्थान दिले.
टी.पी. श्रीनिवासन आजचे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र याची तुलना कृपाचार्यांशी करतात. आजची युनो जगात युद्धसमाप्तीसाठी प्रयत्नरत असते. न्यायाच्या रक्षणाची भूमिका घेते. युनोची स्थापना झाल्यानंतर युद्धसमाप्ती झाली नसली तरी आणि अनेक युद्धे लढली गेली, तरी युनो नसती तर जगाला तिसर्या महायुद्धाचा सामना करावा लागला असता. कृपाचार्यांचे शहाणपण आणि बुद्धिमत्ता युनोच्या रूपातून प्रकट होते. संवाद आणि विवेकवाद हे युनोचे वैशिष्ट्य आहे. कृपाचार्यांची ती खासियत होती. युनोच्या निर्मितीत भारताचा मुख्य सहभाग आहे. युनोचे काम कसे चालते, तिचे यशापयश कोणते आहे, भारताच्या संदर्भात युनोचा विचार कसा केला जातो, इत्यादी विषय या विभागात सात प्रकरणांतून मांडलेले आहेत. Kripacharya: The United Nation या प्रकरणातून त्यांनी या सर्व विषयाची मांडणी केली आहे.
बळीराजा हे सहावे चिरंजीव आहेत. टी.पी. श्रीनिवासन हे केरळचे असल्यामुळे बळीराजा आणि केरळ, हा त्यांचा भावनिक विषय झालेला दिसतो. गुणांचा सागर, सत्यवाद आणि दानशूरता या बाबतीत बळीराजाची ख्याती आहे आणि ते या बाबतीत अतुलनीय आहेत. वामनाने फसवून त्यांचे राज्य समाप्त केले अशी पौराणिक कथा आहे. बळीचे राज्य म्हणजे देवाचे राज्य. जेथे अनाचार, भ्रष्टाचार, दु:ख, दैन्य, दारिद्य्र काहीही नव्हते, त्यांच्या स्मरणासाठी केरळमध्ये ओनम उत्सव साजरा केला जातो.
त्यांच्या काळातील केरळ आज राहिलेला नाही. जातीयता, अस्पृश्यता एकेकाळी मोठ्या प्रमाणात होती, आज ती कमी झाली असली, तरी मद्यपान, सांप्रदायिकता, वाढत्या आत्महत्या याने केरळ ग्रस्त आहे. या विभागात टी.पी. श्रीनिवासन यांनी सात लेखांतून केरळच्या स्थितीविषयी लिहिलेले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात केरळने केलेल्या प्रगतीची माहिती यात दिसते. ’"Mahabali: The Kerala Landscape' या प्रकणातून या विषयाचा त्यांनी आढावा घेतला आहे.
सप्तचिरंजीवांमध्ये व्यासांचा क्रमांक सातवा येतो. या प्रकरणाचे शीर्षक आहे ‘"Vyasa: The Master Storyteller' (कथाकथन करणारे निष्णात व्यास.) व्यास ऋषी विख्यात कथाकथनकार आहेत. त्यांनी हिंदू धर्मतत्त्वज्ञानाचे ग्रंथ लिहिले. त्यात ब्रह्मसूत्र, श्रीमद्भागवत, अठरा पुराणे आणि महाभारत यांचा समावेश होतो. जे महाभारतात नाही ते जगात नाही, असे म्हटले जाते. ते सनातन धर्माचे संरक्षक आणि प्रचारक होते. जागतिक भ्रातृभावनेची संकल्पना ही त्यांनीच सांगितलेल्या सनातन धर्माचा भाग आहे. सामान्य माणसाला सुखी आणि ज्ञानी करण्यासाठी त्यांनी सर्व ग्रंथांची रचना केली. वयाची बंधने मोडून सर्वांना त्यांचे ग्रंथ भावतात.
संभाषणकौशल्य, आपला संदेश वेगवेगळ्या माध्यमांतून प्रभावीपणे पोहोचविण्याची कला व्यासांकडून सर्व लेखक, वक्ते, राजनीतिज्ञ आणि पत्रकार यांनी शिकून घ्यायला पाहिजे. ज्ञान आणि नैतिकता ही एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित करावी लागते, ती कशी करायची हे व्यासांनी दाखवून दिलेले आहे. या विभागात टी.पी. श्रीनिवासन यांनी राजदूत म्हणून त्यांचे अनुभव वेगवेगळ्या लेखांतून वाचकांना सहभागी करून सांगितलेले आहे. तसेच वेगवेगळ्या व्यासपीठांवरून जे वेगवेगळे विषय मांडले आहेत, तेही या विभागात आलेले आहेत.
असे हे सप्तचिरंजीव महात्म्यांविषयीचे पुस्तक आपल्याला आधुनिक जगात, नीतीत आणि देशांतर्गत काही प्रश्नांकडे घेऊन जाते. स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी का होईना, आपल्या देशातील देश चालविणार्या वरच्या फळीतील कर्तबगार लोकांना आपली मुळे शोधण्याचे भान होत चालले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आपण कोण आहोत, आपला वारसा कोणता आहे, परराष्ट्र नीतीसारख्या अवघड विषयातही आपल्या पूर्वजांचे योगदान किती आहे, हे टी.पी. श्रीनिवासन यांनी मांडले आहे. आपल्या अस्मितेचा शोध घेण्याचा हा प्रवास अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहे.