हे दुष्टचक्र थांबणार कधी?

10 Dec 2021 16:48:16
प. महाराष्ट्र, कोकण, खानदेश, विदर्भ व मराठवाडा भागात डिसेेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकर्‍यांसमोर पुन्हा नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. या संकटात द्राक्ष, आंबा, केळी, काजू आदी फळबागांसह नगदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी संपत्तीची झालेली हानी भरून काढण्यासाठी राज्य सरकारला पुन्हा एकदा मदतीच्या कसोटीला उतरावे लागणार आहे.

krushi_1  H x W
 
गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातला शेतकरी विचित्र समस्यांना तोंड देत आहे. महापूर, गारपीट, ढगफुटी आदी समस्या आहेत. त्यात आणखी एक भर पडली ती कोरोनाची. यंदा सलग तीन-चार महिन्यांनंतर नैसर्गिक प्रकोप पाहायला मिळाला. महापुरात खरीपाचे पीक वाहून गेले, शेती-माती खरडून गेली, त्यामुळे खरीपातील उत्पादन अर्ध्याने घटले, त्याबाबतही पुरेशी मदत मिळाली नाही. त्यानंतर रब्बीचा मोठा आधार उरला होता. शेतकर्‍यांनी मोठ्या मेहनतीने ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, त्याचबरोबर द्राक्षे, आंबा, लिंबू, संत्री, केळी, मोसंबी अशी पिके घेतली. हातातोंडाशी आलेले पीक मॉन्सूनोत्तर पावसाने गिळंकृत केले. या पावसाच्या मार्‍यात द्राक्ष बागांतील द्राक्षाचे घड तुटून पडले, आंब्याचे मोहोर झडून गेले, ऊस भुईसपाट झाला, ज्वारी उद्ध्वस्त झाली, कांदा पिवळा पडला, स्ट्रॉबेरी कुजून गेली, केळी काळी पडली, संंत्रा, काजू व मोसंबीवर सडण्याची वेळ आली. एकूणच लाखो हेक्टरांवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
व्यथा शेतकर्‍यांच्या
भारतात द्राक्ष उत्पन्न घेणार्‍या राज्यांमध्ये आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा समावेश होतो. नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर, नगर आदी जिल्ह्यांमध्ये द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 50 टक्के उत्पादन होते. मॉन्सूनोत्तर पावसामुळे सुमारे दोन लाख हेक्टरांवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज आहे.


krushi_1  H x W
नाशिक जिल्ह्यातील पिंपळवाड येथील संदीप कृष्णा भामरे यांची वडिलोपार्जित 100 एकरांवर द्राक्ष शेती आहे. संदीप भामरे सांगतात, “संततधार पावसामुळे द्राक्ष घड कुजत आहेत. चालू वर्षी 25 एकरांवरील द्राक्ष बागेचे उत्पादन आणि उत्पन्न यांच्यात मोठ्या प्रमाणात घट होईल. त्यातच लष्करी अळीचा व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे बागेवर औषध फवारणीसाठी मोठा खर्च येणार आहे.”
दत्तात्रय पाटील (सातारा) व रमेश माळी (सांगली) या द्राक्ष बागायतदारांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसामुळे द्राक्षामध्ये घडकुजी येत असल्यामुळे या शेतकर्‍यांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.


krushi_1  H x W
स्ट्रॉबेरी पिकाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे दीड ते दोन हजार हेक्टरांवरील स्ट्रॉबेरीला पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. भिलार येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी विश्वनाथ भिलारे व गजानन पराटे म्हणाले, “पाचगणी, जावळी, भिलार व महाबळेश्वर भागात स्ट्रॉबेरीचे मोठे पीक घेतले जाते. यंदा अतिवृष्टी, ढगाळ वातावरण आणि धुक्याने स्ट्रॉबेरी पिकांवर भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगांचे निर्मूलन करेपर्यंत शेतकर्‍यांच्या स्वप्नावर पाणी फिरविले. पावसामुळे स्ट्रॉबेरीची रोपे कुजून जात आहेत. यामुळे यंदा स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात घट होऊन दर कडाडण्याची शक्यता आहे.”
आंबा, काजू, नारळ आणि मासे ही कोकणची खरी ओळख. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यात सुमारे 1 लाख 82 हजार क्षेत्र आंब्याखाली व्यापले आहे. या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. देवगड तालुक्यातील देवगड पेढरी गावातील हापूस आंबा उत्पादक शेतकरी वैभव घाटी सांगतात, “गतवर्षी तौक्ते वादळामुळे आणि महापुरामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान झाले होते. यंदा आंब्याला चांगला मोहोर आला होता. पण याच वेळी पावसाने दगा दिला आणि मोहोर गळून पडू लागला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे बागेवर बुरशीजन्य रोग पसरत आहे. आंब्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍याला दहा ते पंधरा फवारण्या कराव्या लागतात. आता या फवारण्या करूनही समाधानकारक उत्पादन निघेल अशी शक्यता नाही.”


krushi_1  H x W
काजू हे कोकणातील मुख्य पीक. सरकारच्या फळबाग लागवड योजनेमुळे काजू पीक क्षेत्रात वाढ झाली आहे. पावसाच्या रिपरिपीचा काजूलाही फटका बसला आहे. संगमेश्वर तालुक्यातील काजू उत्पादक शेतकरी मिलिंद चाळके सांगतात, “यंदा सततच्या पावसामुळे थंडी गायब झाली आहे. या महिन्यात आंबा, काजू झाडांना पालवी फुटून त्यानंतर मोहोर व फळधारणा होते. त्यानंतर जानेवारी व फेबु्रवारी महिन्यापासून फळे बाजारात येतात. मोहोर व फळधारणा होत असताना जोराचा पाऊस सुरू झाला. यामुळे काजू काळपट पडत आहे, परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.”



krushi_1  H x W
नैसर्गिक संकटामुळे कोकणातील आंबा व काजूवर जसा परिणाम झाला आहे, तसाच नारळ शेतीवर व मत्स्यव्यवसायावरही झाला आहे. मालवण येथील नारळ बागायतदार आनंद हुले म्हणाले, “तौक्ते वादळात कोकणातील नारळ व सुपारी उत्पादक शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. वादळी वार्‍यात नारळाची फळगळती झाली. त्यानंतर ऐन सणासुदीत नारळाचा तुटवडा निर्माण झाला. कोकणातील वालुकामय जमीन नारळ शेतीला पोषक असते. आणि याच किनारपट्टीत वादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. त्यानंतर सरकारकडून पंचनामा झाला, पण सात महिन्यांनंतरही शेतकर्‍यांना एक पैसाही मिळाला नाही. या संकटानंतर पुन्हा पावसाने मोठे आव्हाने उभे केले आहे.” अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ निर्माण झाले होते. याचा मासेमारीवरही परिणाम झाला असल्याचे आनंद हुले यांनी सांगितले.


krushi_2  H x W
महाराष्ट्रात केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसला आहे. राज्यात सर्वाधिक केळी निर्यातदार गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या जळगाव जिल्ह्यातील तांदुळवाडी गावातील केळी उत्पादक शेतकरी प्रेमानंद महाजन सांगतात, “जळगाव जिल्ह्यात केळीची 45 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे, तर तांदुळवाडीत जवळपास 600 एकरांवर केळीची शेती आहे. एकीकडे केळीचे दर प्रचंड घसरले आहेत, तर दुसरीकडे पावसामुळे केळी बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. वादळी वार्‍यांमुळे, संततधार पावसामुळे केळीचे घड जमीनदोस्त झाले आहेत. बागांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.”
विदर्भाची संत्री त्यांच्या आंबट-गोड चवीमुळे जगप्रसिद्ध आहेत. अमरावती जिल्ह्यात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. अमरावती येथील संत्री उत्पादक शेतकरी डॉ. राजकुमार ईश्वरकर सांगतात, “विदर्भातील संत्री उत्पादक सलग चार वर्षांपासून संकटात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे संत्री बागांना लागलेली गळती. ऑक्टोबर 2021 या महिन्यात परतीचा प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे बागांना मोठी गळती लागली. काही प्रमाणात संत्रा झाडांवर होता. आता पुन्हा पावसाने कहर केल्याने संत्र्याला गळती लागली आहे.”


krushi_1  H x W
मोसंबी पिकांसाठी प्रसिद्ध असलेला जालना जिल्हाही पावसाच्या तडाख्यातून वाचला नाही. यामुळे जिल्ह्यातील 10 हजार एकरांवरील मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती जालना जिल्हा मोसंबी उत्पादक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तावरे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात राज्यात डाळिंबाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यात डाळिंबाचे मोठे क्षेत्र आहे. सततच्या पावसाचा डाळिंब पिकाला मोठा फटका बसला आहे. दौंड तालुक्यातील मळद येथे 130 एकरावर सामूहिक पद्धतीने डाळिंब शेती करणारे शेतकरी अंकुश पडवळे म्हणाले, “सततच्या पावसामुळे व हवामान बदलांमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आमच्या 130 एकरांवरील डाळिंब शेतीपैकी अंदाजे 5 टक्के बागेवर तेलकट रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. आम्ही सामूहिक पद्धतीने शेती करतो, त्यामुळे रोगांचे निर्मूलन करू, पण सामान्य शेतकर्‍यांना ते परवडणारे नाही. सरकारने तातडीने आर्थिक मदत करण्याची गरज आहे.”

सोलापूर, नगर, नाशिक, सातारा, उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांतील ज्वारी, तूर, हरभरा, गहू, कांदा यासह अन्य नगदी पिकांना पावसाचा फटका बसला आहे. करमाळा तालुक्यातील जातेगाव येथील ज्वारी व कांदा उत्पादक शेतकरी जगन्नाथ घुमरे म्हणाले, “यंदा आमच्या जातेगावात 300 एकरांवर कांद्याची लागवड केली गेली आहे. माझी तीन एकर शेती आहे. दोन एकरांवर कांदा, तर 1 एकरावर ज्वारीचे पीक आहे. कांदा पिकातून चांगले उत्पन्न निघेल अशी अपेक्षा केली होती. पण सलग चार दिवस पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण शेत पाण्याखाली गेले. पाणी लागल्याने कांदा करपून गेला आहे. जो कांदा उरला आहे, तो नासून गेला आहे. ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. या संकटातून कसे सावरायचे? असा प्रश्न उभा राहिला आहे.”


krushi_1  H x W
करमाळा तालुक्यातील बिटरगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी प्रवीण मुरूमकर यांचा सहा एकर ऊस आडवा पडला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचे मुरूमकर यांनी सांगितले.
शेतकरी महागडी बियाणे घेतो, खत घेतो, त्यातून तो पीक काढतो, पीक काढणीला आल्यानंतर ऐन वेळी नैसर्गिक संकट आले तर त्याला असलेला आधारच शिल्लक राहत नाही. त्याचे पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहतो.


महाविकास आघाडी सरकारचे दुर्लक्ष
 
राज्यातील शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटाशी सामना करत आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. फळबागा नष्ट झाल्या. ज्या ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन पंचनामे करून, अशा शेतकर्‍यांना तातडीने पीक विम्याची मदत कशी मिळवून देता येईल, या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने पाऊल उचलणे आवश्यक होते. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त झालेल्या भागाचे तत्काळ सर्वेक्षण करणे आवश्यक होते. पण अशा प्रकारची कार्यवाही होताना दिसली नाही. मंत्रीमहोदयांचा दौरा तर दूरच. एकूणच महाविकास आघाडी सरकारची यंंत्रणा धिम्या गतीने काम करताना दिसत आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या कृषी पंपाच्या वीजवसुलीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कृषी पंप वीजतोडणी करण्यात धन्यता मानत असलेले सरकार हे शेतकरीविरोधी आहे, असा सूर उमटत आहे. एकूणच शेतकर्‍यांमध्ये सरकारविरोधी असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे.
शेतकर्‍यांनी आता सजग झाले पाहिजे. हवामान बदलाविषयी धोके काय असतील यांचा जाणीवपूर्वक विचार करायला हवा. त्यासाठी कृषी विभाग, स्वयंसेवी संस्था, हवामानतज्ज्ञ यांनी शेतकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे, तरच निसर्गाच्या दुष्टचक्रातून शेतकर्‍यांची सुटका होऊ शकेल.
Powered By Sangraha 9.0