योगी अरविंद यांचे भारतीय साहित्य चिंतन

09 Nov 2021 16:47:43
योगी अरविंद यांनी भारतीय साहित्याचा प्रवाह, त्याचे टप्पे, त्याची वैशिष्ट्ये, त्यातील मध्यवर्ती विचार व भाव, आशयातील सातत्य, भारताबाहेरील साहित्याशी तुलना, भारतीय साहित्याची श्रेष्ठता आणि या साहित्यप्रवाहाचा राष्ट्रीय जीवनाशी अनुबंध यावर प्रकाश टाकलेला आहे. ‘भारतीय संस्कृतीचा पाया’ या ग्रंथात पाच स्वतंत्र प्रकरणांमधून त्यांनी हा प्रवास आणि त्यावरील त्यांचे विचार मांडले आहेत. या चिंतनाचा सारांशरूपी लेख.

book_5  H x W:


भारताला ऋग्वेदापासूनची हजारो वर्षांची साहित्यपरंपरा आहे. महायोगी श्री अरविंद यांनी या विपुल साहित्यावर भरपूर लिखाण केले आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता यांच्यावर तर स्वतंत्र ग्रंथच लिहिले आहेत. शिवाय या साहित्यातील अनेक आख्यानांवर काव्यरचनाही केलेली आहे. ‘सावित्री’ हे त्यांचे महाकाव्य तर प्रसिद्धच आहे. याबरोबरच त्यांनी या सुदीर्घ भारतीय साहित्यपरंपरेचा विस्तृत आढावाही घेतलेला आहे. भारतीय साहित्याचा प्रवाह, त्याचे टप्पे, त्याची वैशिष्ट्ये, त्यातील मध्यवर्ती विचार व भाव, आशयातील सातत्य, भारताबाहेरील साहित्याशी तुलना, भारतीय साहित्याची श्रेष्ठता आणि या साहित्यप्रवाहाचा राष्ट्रीय जीवनाशी अनुबंध यावर श्री अरविंद यांनी प्रकाश टाकलेला आहे. ‘भारतीय संस्कृतीचा पाया’ या ग्रंथात पाच स्वतंत्र प्रकरणांमधून त्यांनी हा प्रवास आणि त्यावरील त्यांचे विचार मांडले आहेत.
 
 
सुरुवातीलाच मानवी जीवनातील इतर कलांच्या तुलनेत मानवी साहित्याचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व अधोरेखित करताना ते लिहितात, ‘लोकांच्या आत्म्याची अनेकांगी आणि अतिलवचीक अभिव्यक्ती पाहावयाची असेल, तर आम्हाला त्यांच्या साहित्यातच ती शोधली पाहिजे. कारण शब्दामध्ये चित्र स्पष्ट उभे करण्याची शक्ती असते, शब्दात सूचनासूत्रे असतात, म्हणून अंतरात्म्याच्या अभिव्यक्तीत ज्या सूक्ष्म छाया, वळणे, अर्थ असतात ते सूक्ष्मपणे व्यक्त करावयास शब्दच उपयोगी पडतो.’
 
 
अभिजात भारतीय साहित्याचे मोठेपण आणि आगळेपण सांगताना ते लिहितात, ‘संस्कृत भाषेतील प्राचीन व अभिजात ग्रंथ जगाच्या महान साहित्यात अग्रभागी बसण्यासारखे आहेत. या ग्रंथांचे गुण पाहा, संख्या पाहा, त्यांची मौलिकता पाहा, सामर्थ्य आणि सौंदर्य पाहा, त्यांचे विषय पाहा, त्यांची कला व रचना पाहा, त्यांच्या भाषेचे वैभव पाहा, अर्थवाहकता पाहा, मोहकता पाहा, त्यांच्या अंतरंगाची उंची पाहा, रुंदी पाहा, त्यांची व्यापकता पाहा; सर्व दृष्टींनी हे ग्रंथ जगाच्या महान साहित्यात अग्रभागी बसण्यासारखे आहेत.’
 
 
‘संस्कृत भाषा ही मानवी मनाने निर्मिलेले अतिशय भव्य, अतिशय पूर्ण असे कार्यक्षम साहित्यसाधन आहे. असा संस्कृतचा गौरवही श्री अरविंद यांनी केला आहे. ही भाषा गोड, लवचीक, थाटाची, जोरदार, निर्मळ, भरदार, कंपनशील, सूक्ष्मग्राही आहे. ही भाषा थोर आहेच अन कवींनी आणि तत्त्वचिंतकांनी त्याचा उपयोगही थोर आणि उदात्तपणे केलेला आहे, असाही त्यांचा अभिप्राय आहे. भारतीय साहित्याचा मोठा भाग संस्कृत भाषेत असला, तरीही भारतीय साहित्य पूर्णत: समजून घ्यायचे असल्यास पाली भाषेतील बौद्ध साहित्य, तसेच बारा संस्कृतमूलक व द्रविड भाषेतील संपन्न साहित्य ध्यानात घ्यावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
  

book_4  H x W:
 
वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, कालिदास, भवभूती, भर्तृहरी, जयदेव यांचे ग्रंथ; अभिजात भारतीय नाटक, काव्य, कादंबरी; धम्मपद, जातक, पंचतंत्र; तुलसीदास, विद्यापती, चंडीदास, रामप्रसाद, रामदास, तुकाराम, तिरुवल्लुवर, कंबन, नानक, कबीर, मीराबाई, नायनमार व अलवार संत; याशिवाय अल्पप्रसिद्ध वा अप्रसिद्ध असे भारतभरचे अपार साहित्य ज्या राष्ट्राचा ठेवा आहे, ते राष्ट्र आणि ती संस्कृती थोर राष्ट्र व संस्कृती आहे हे कोणीही मान्य करील, असा त्यांचा निर्वाळा आहे. भारतीय संस्कृती स्वत:च्या ठिकाणी विशेष प्राणमय व भक्कम असे काहीतरी बाळगून आहे याचा हे साहित्य हा पुरावाच आहे, असेही श्री अरविंद म्हणतात.
भारतीय साहित्यावर होणारी टीका आणि निंदा उत्तर देण्याच्या लायकीचीसुद्धा नाही, आंधळा मत्सर आणि अनिवार्य पूर्वग्रह या टीकेच्या मुळाशी आहेत असा त्यांचा निर्वाळा आहे. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत या भारतीय प्रतिभेच्या चार सर्वोत्तम निर्मिती असून त्यात भारताचे भव्य तारुण्य, तारुण्यातले पूर्वकालीन मन प्रतिबिंबित झाले आहे. आध्यात्मिक स्फूर्ती, मानसिक, धार्मिक अनुभव यातून वेदातील रूपे निर्माण झाली आहेत. उपनिषदे असामान्य काव्यभाषेत आत्मा, ईश्वर, मानव, जग, जगाची तत्त्वे व शक्ती यासंबंधीची अंतिम सत्ये स्पष्ट करतात. महाभारत, रामायण या महाकाव्यांत बुद्धीचा व जीवनाचा सुंदर समर्थ विकास पाहायला मिळतो; तसेच नीती, कला, अंतरात्मा, भावना, ऐंद्रिय संवेदना, शरीरविषयक ज्ञानाचाही सुंदर समर्थ विकास पाहावयास मिळतो. प्रथमावस्थेतील लोकांचा इतिहास, लोककथा व लोकप्रिय धर्मकल्पना वेदात आहेत असे मानणार्‍या युरोपीय पंडितांनी त्यांच्या केवळ बहिर्मुखी अर्थपद्धतीने वेदांचे आध्यात्मिक अंतरंग, त्यांची काव्यदृष्टीने असलेली सुंदरता व थोरवी नष्ट केली आहे, हिरावून घेतली आहे, असे श्री अरविंद यांचे विश्लेषण आहे.
 
 
book_1  H x W:
 
आध्यात्मिक अनुभव काव्याद्वारे व्यक्त करण्यासाठी वेदांनी प्रथम प्रतीकांचा व प्रतिमांचा उपयोग केला आहे. तंत्र, पुराणे, वैष्णव कवींचे काव्य, टागोरांची आधुनिक कविता, काही चिनी कवी, सुफी कवी यांच्या काव्यातही हा प्रकार भेटतो. आध्यात्मिक अनुभव असणार्‍यांना तो अनुभव त्या प्रतिमेतून प्रत्ययास येतो, तर आध्यात्मिक अनुभव नसणार्‍यांना प्रतिमा केवळ बाह्य गोष्टी सांगणार्‍याच वाटतात. वेद हे आजवर कार्य करीत असलेले जगातील पहिले धर्मग्रंथ आहेत. ते भव्य काव्यग्रंथ आहेत. त्यांची भाषा तीव्रतेत भावगीतांसारखी आणि सामर्थ्यात महाकाव्यासारखी आहे. मानवी आत्म्याला शक्य असणारा खोलात खोल आंतरात्मिक व आध्यात्मिक अनुभव हा त्यांचा विषय आहे. विश्वामित्र, वामदेव, दीर्घतमस इत्यादी वैदिक द्रष्टे आणि त्यांची सूक्ते ही गूढवादी भव्य काव्याचे असामान्य थोर नमुने आहेत. वेदाच्या द्रष्ट्या कवींनी भारताला प्रथम तत्त्वज्ञान दिले, धर्म दिला, संस्कृतीच्या सारभूत गोष्टी दिल्या. भारताची आजवरची आध्यात्मिकता वेदांमध्ये बीजरूपाने सापडते, अशा शब्दात ते वेदांचा गौरव करतात.
 
 
 
‘उपनिषदे ही अशा मनाची अभिव्यक्ती आहेत, ज्या मनात तत्त्वज्ञान, धर्म व काव्य या तीन वस्तू एकरूप झाल्या आहेत’ असे नमूद करून श्री अरविंद भारतीय तत्त्वज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करताना लिहितात, ‘भारतीय तत्त्वज्ञान बौद्धिक अनुमानाच्या स्वरूपाचे नाही. ते तर्कबुद्धीची इमारत नाही. ते अगदी आतील मनाने व आत्म्याने पाहिलेल्या, अनुभवलेल्या, जीवनात परिणत केलेल्या सत्याचे आनंदमय निरूपण आहे. भारतीय काव्य सामान्य क्षेत्राच्या पलीकडे उंच गेलेल्या सौंदर्यप्रिय मनाचे कार्य आहे. ते काव्य, विरळा घडणारे आध्यात्मिक आत्मदर्शन, आत्मा, ईश्वर आणि विश्व या संबंधीचे गाढ सत्य याविषयीचे आश्चर्यकारक सौंदर्य प्रकट करते.’
 
 
उपनिषदांचे परकीय अनुवादक त्याच्या या स्वरूपाकडे दुर्लक्ष करतात आणि उपनिषदांचा बुद्धीला समजणारा अर्थच फक्त दाखवतात. या अनुवादकांना उपनिषदांच्या आध्यात्मिक आनंदाची प्रतीती नसते. त्यामुळे उपनिषदांच्या या स्वरूपावर जोर देणे आवश्यक आहे, असे श्री अरविंद यांचे म्हणणे आहे. उपनिषदांचा हा अनुभव बौद्ध धर्माने नव्या रूपात सर्व आशियात आणि युरोपातही नेला. पायथागोरस व प्लेटो यांच्या बर्‍याच विचारांत उपनिषदातील कल्पना आढळतात. पाश्चिमात्यांचे बरेच तत्त्वज्ञानात्मक विचार तिकडे गेलेल्या उपनिषदांच्या कल्पनातून निघाले आहेत. सुफी तत्त्वज्ञानही उपनिषदांच्या कल्पनाच वेगळ्या भाषेत मांडते. जर्मन तत्त्वज्ञानाचा मोठा भाग उपनिषदांच्या महान सत्यांची बौद्धिक मांडणी आहे, असे ते नमूद करतात.
 
 
book_3  H x W:
 
‘उपनिषदे मानवाच्या आंतरिक दर्शनाचा विचार करतात. त्यांच्यात नीतिवचनाहून थोर असे काही आहे. तेथे परमोच्च ध्येय म्हणून एकात्मतेच्या अधिष्ठानावर आधारलेल्या आध्यात्मिक कृतीचा उपदेश आहे. यामुळेच वैदिक पंथाचे आचार काळाच्या ओघात नष्ट झाल्यानंतरही उपनिषदे जिवंत राहून निर्मिती करीत राहिली’ अशा शब्दात श्री अरविंद उपनिषदांची महती कथन करतात. साक्षात्कार, स्फूर्तिमय मन आणि त्याचे प्रकाशमय अनुभव यातून उपनिषदांची निर्मिती झालेली आहे. उपनिषदे सांत प्रतिमेच्या द्वारे अनंत उभे करतात. उपनिषदांची कविता ही आत्म्याच्या तालावरील कविता आहे. त्यापूर्वी किंवा त्यानंतर तशी कविता लिहिली गेली नाही. वेदान्ताची भाषा ना बालिश आहे, ना रानटी. ती काव्यमय स्फूर्तिभाषा आहे. आजचे मन प्रतीकांच्या जिवंत सत्यांवर विश्वास ठेवत नाही. आजची आमची कल्पनाशक्ती बुद्धीच्या धाकदपटशाने घाबरते. त्यामुळे आम्हाला उपनिषदांचे यथायोग्य आकलन होत नाही, असे त्यांचे विवेचन आहे.
 
 
वेदांच्या आणि उपनिषदांच्या साहित्याचे योगदान आणि प्रभाव सांगताना श्री अरविंद लिहितात, ‘वेद आणि उपनिषदे भारताच्या तत्त्वज्ञानाचे व धर्माचे स्वयंपूर्ण उगमस्थान तर आहेतच, त्याबरोबरच हे ग्रंथ भारतीय कला, काव्य, साहित्य यांचेही उगमस्थान आहेत. वेदात व उपनिषदात जो आत्मा, जी वृत्ती, जे ध्येयवादी मन तयार झाले व अभिव्यक्त झाले, त्यानेच पुढे महान तत्त्वज्ञाने निर्माण केली, धर्माची इमारत बांधली. महाभारत व रामायण यात आपल्या वीर्यशाली जीवनाची कहाणी सांगितली. आपल्या यौवनाच्या अभिजात कालखंडात अविश्रांतपणे बुद्धीचे पराक्रम केले. भौतिकशास्त्रात कित्येक मौलिक, स्फूर्तिमूलक कल्पना मांडल्या. कलात्मक आणि जीवनविषयक आणि संवेदनात्मक अनुभवाचे संपन्न तेज चोहीकडे पसरले. तंत्रात व पुराणात आपल्या आध्यात्मिक व आंतरात्मिक अनुभवाची पुन्हा मांडणी केली. रेखा व रंग यांचे सौंदर्य निर्माण करण्याकडे लक्ष दिले. दगडात व धातूंत खोदकाम करून आपला विचार व आपले दर्शन साकार केले. उत्तरकालीन भाषांतील आत्म अभिव्यक्तीच्या नव्या प्रकारांचा उपयोग केला. वेदात व उपनिषदात तयार होऊन अभिव्यक्त झालेल्या आत्म्याने, वृत्तीने व ध्येयवादी मनाने हे सर्व केल्यानंतर त्याला काही काळ ग्रहण लागले. आता ते मन पुन्हा उदयास येत आहे.’
 
 
 
उपनिषदांनंतरच्या कालखंडात भारतीय मनाने विराट बौद्धिक उद्योग केला. त्यातूनच षड्दर्शने व सामाजिक धर्मशास्त्रे आकारास आली. व्यक्तिगत व सामाजिक जीवनात नैतिक, सामाजिक, राजकीय तत्त्व व व्यवहार कसा असावा याचा ऊहापोह सामाजिक धर्मशास्त्रांनी केला, तर सांख्य, योग, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा आणि वैशेषिक या सहा दर्शनांनी अध्यात्माचा मार्ग प्रशस्त केला. मानवाच्या प्राणिक, आर्थिक, सौंदर्यविषयक, सुखविषयक, बौद्धिक वगैरे सर्व गरजा नियंत्रित करून, वासनिक व प्राणिक प्रेरणेने चालणारे जीवन क्रमश: विकसित होत आध्यात्मिक प्रेरणेने चालू लागावे, असा उद्योग सामाजिक धर्मशास्त्रांनी केला. भारतीय मनाच्या मूळ आध्यात्मिक पिंडाशी हे सुसंगतच होते.
 
 
रामायण व महाभारत हे या कालखंडातील शुद्ध साहित्य आहे. या दोन महाकाव्यांत आदिकालीन वीरकथा असल्या, तरीही विषय, दृष्टीकोन व प्रेरक हेतू लक्षात घेता पाश्चात्त्य महाकाव्यांपेक्षा ही दोन महाकाव्ये फार श्रेष्ठ आहेत. ‘ही महाकाव्ये एका राष्ट्राच्या तारुण्याचा आवाज आहेत. हे तारुण्य केवळ उत्साहाने, ताजेपणाने व सौंदर्याने भरलेले नव्हते, तर त्या गुणांबरोबरच ते थोर होते, ज्ञानसंपन्न होते, विवेकी होते, उदार होते’ असे रामायणाचे व महाभारताचे विवेचन महायोगी श्री अरविंद करतात. रामायण व महाभारत यांना इतिहास म्हणत असत, असे नमूद करीत श्री अरविंद म्हणतात, ‘प्राचीन पौराणिक किंवा ऐतिहासिक परंपरागत गोष्टींना इतिहास हे नाव देत असत. ही महाकाव्ये त्या अर्थाने मोठ्या प्रमाणात इतिहास कथन करणारी आहेत. ही काव्ये लिहिणारे आणि त्यात भर घालणारे कवी यांचा उद्देश जुनी कथा सुंदरपणे सांगण्याचा किंवा आकर्षक कविता लिहिण्याचा नव्हता. या दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या, पण तो त्यांचा उद्देश नव्हता. भारतीयांच्या जीवनाचे स्थापत्यकार व मूर्तिकार या नात्याने एक महान कर्तव्य करण्याचा त्यांचा उद्देश होता. भारताचा राष्ट्रीय विचार, धर्म, नीती, संस्कृती यांना सुंदर आकार देणे, यांचे सुंदर विवेचन करणे हा त्यांचा उद्देश होता. या महाकाव्यांमध्ये जीवनाविषयी खोल विचार आहे. धर्म व समाज याविषयी विशाल दृष्टी आहे पण तत्त्वमीमांसा फार थोडी आहे’ असेही ते म्हणतात.
 
 
या दोन महाकाव्यांच्या भारतावरील प्रभावाबद्दल श्री अरविंद लिहितात, ‘कथा करणार्‍यांनी, निरूपण करणार्‍यांनी संस्कृत व प्रांतिक भाषांत अनुवादित महाभारत व रामायण जनतेपर्यंत नेले. ते लोकशिक्षणाचे, लोकसंस्कृतीचे एक प्रमुख साधन बनले. त्याने जनतेचा विचार, जनतेचे शील, सौंदर्यदृष्टी, धार्मिक मन तयार केले. निरक्षरांनादेखील बरेचसे तत्त्वज्ञान, नीती, सामाजिक व राजकीय कल्पना, कलाभावना, कविता, कादंबरी या गोष्टी रामायण व महाभारताने दिल्या.’ रामायण व महाभारत या दोन महाकाव्यांची तुलनाही ते करतात. महाभारताच्या तुलनेत रामायणाचा आराखडा अधिक साधा आहे, त्यातील वृत्ती अधिक ध्येयवादी नाजूक आहे, त्यात काव्यतेज व काव्यरंग यांची चमक अधिक आहे. रामायणात तत्त्वज्ञानी मन फारसे नाही, शुद्ध काव्यप्रेमी मन पुष्कळ आहे. महाभारताची कला मजबूत भारतीय स्थापत्यकलेची आठवण करून देते, तर रामायणाची कला नाजूक भारतीय चित्रकलेची आठवण करून देते, असा त्यांचा अभिप्राय आहे.
 
 
पाश्चात्त्य महाकाव्ये व भारतीय महाकाव्ये यांचे तौलनिक विश्लेषण करताना श्री अरविंद लिहितात, ‘ग्रीक महाकाव्यांहून या महाकाव्यांत विचार व विषय अधिक गंभीर व अधिक विकसित आहेत. जीवनाचा ताजेपणा दोन्ही काव्यांत सारखाच आहे. लॅटिन महाकाव्यांशी तुलना करता भारतीय महाकाव्ये संस्कृतीपक्वतेत सारखीच प्रौढ आहेत, पण सामर्थ्याने अधिक तरुण आहेत, जोरदार आहेत, प्राणमय आहेत. भारतीय महाकाव्ये लिहिली गेली ती राष्ट्रीय व सांस्कृतिक कार्य करण्याकरिता. ही काव्ये थोर आणि सामान्य, सुसंस्कृत व असंस्कृत अशा दोन्ही प्रकारच्या भारतीयांनी आदराने आत्मसात केली.’
 
 


book_2  H x W:
 
दीर्घ काळाच्या संपन्न परिपक्वतेनंतर भारतीय संस्कृती संपन्न व रंगमय अपक्षयाच्या अवस्थेतून गेली. परंतु हा अपक्षय मृत्यूकडे नेणारा नव्हता, तर पुनरुज्जीवनाकडे नेणारा होता. या काळात साहित्य आविष्काराची जागा संस्कृत भाषेऐवजी संस्कृतमूलक भाषा घेतात. संस्कृत जिवंत असली, तरीही भारताचा विचारप्रवाह व जीवनप्रवाह मोठ्या प्रमाणात पाली भाषेतून व्यक्त होऊ लागला. कालिदास हा या काळातील महत्त्वाचा साहित्यिक. कालिदासाची भाषा आणि जुन्या महाकाव्यांची भाषा यांची तुलना करताना श्री अरविंद म्हणतात, ‘महाकाव्यांची भाषा जीवनाच्या झर्‍यातून सरळ वर उफाळलेली दिसते. कालिदासाची भाषा तशी नाही. ती श्रमसिद्ध व अलंकारमय असून, मूर्तीच्या कोरीव स्वरूपासारखे तिचे स्वरूप कोरीव आहे. ती चित्रासारखी रंगवलेली आहे. ती कृत्रिम नसली, तरी बुद्धीच्या परिश्रमाने काळजीपूर्वक घडवलेली आहे.’ कालिदासानंतरच्या लेखकांनीदेखील या कृतिकुशलतेचा भरपूर उपयोग केलेला आहे. त्यांची भाषा सुंदर पण परिश्रमसिद्ध आहे आणि फक्त विद्वानांनाच आकर्षित करू शकते, असा त्यांचा अभिप्राय आहे.
 
 
या कालखंडात साहित्याची भाषा बदलू लागली, तसाच संस्कृतीच्या मानसिक केंद्रातही बदल झाला. भारतीय संस्कृती आध्यात्मिक, तत्त्वज्ञानप्रिय राहिली, तरीही तिने जीवनाच्या बाह्यांगाला अधिक वाव दिला. जिज्ञासू वृत्ती, सौंदर्यवादी, शिष्टताप्रिय, सुखवादी, ऐंद्रिय प्रवृत्ती हे या काळाचे वैशिष्ट्य होते. अर्थात भारतीय मनाने आपल्या स्वभावाप्रमाणे यातही संयम पाळला. बेलगाम स्वैरपणा केला नाही. धार्मिक व लौकिक साहित्य असा पूर्वी नसलेला भेद या काळात प्रस्थापित झाला. महान कवी व लेखक लौकिक दृष्टीने निर्मिती करू लागले. रामायण व महाभारत यांच्याप्रमाणे या लेखकांचे ग्रंथ भारतीयांच्या धार्मिक व नैतिक मनाचा आंतरिक भाग होऊ शकले नाहीत, असे श्री अरविंद यांचे विवेचन आहे.
 
 
कालिदासाची कविता पूर्ण आहे. अन्य कवींना मात्र त्याची निर्दोषता साधता आली नाही. शास्त्र, तंत्र, आशय, विषय, अभिव्यक्ती या दृष्टीने या काळातील काव्यकला असामान्य पूर्णतेला पोहोचली होती. कवितेची ही शास्त्रीय कला पुढे एक कठोर परंपरा बनली. तिच्यात कृत्रिमता वाढली. विद्वत्तेचे असामान्य प्रकार, विक्षिप्त काव्यप्रकार मान्यता पावू लागले अन भारताची कविता अवनत होऊ लागली. कालिदास हा मिल्टनपेक्षा अधिक नाजूक भावभावना व्यक्त करणारा आहे आणि व्हर्जिलपेक्षा कालिदासाच्या काव्यरचनेत अधिक सामर्थ्य आहे, असा श्री अरविंद यांचा अभिप्राय आहे. त्यांनी कालिदासावर भरभरून लिहिलेले आहे.
 
 
या युगातील आणखी एका महत्त्वाच्या लेखनावरही श्री अरविंद यांनी प्रकाश टाकला आहे, ते लेखन म्हणजे सुभाषित. सुभाषित लिखाण पुष्कळ आहे व ते चांगले आहे. या युगाच्या तीक्ष्ण बुद्धीला व व्यापक अनुभवाला त्याने समाधान दिले. भर्तृहरीने प्रतिभाशाली सुभाषितलेखन केलेले आहे. भर्तृहरी विचाराबरोबर भावना व्यक्त करतो. त्याच्या युगात काम करणार्‍या तीन प्रेरणा त्याने आपल्या नीतिशतक, शृंगारशतक व वैराग्यशतक या तीन शतकांत दाखवल्या आहेत, असे निरीक्षण ते नोंदवतात.
 
 
 
या अभिजात युगातील नाटक ही कविमनाची आकर्षक निर्मिती होती. परंतु ग्रीक नाटकांची आणि शेक्सपियरच्या नाटकांची थोरवी संस्कृत नाटकात नाही, असा त्यांचा परखड अभिप्राय आहे. जीवनाचे मोठाले प्रश्न संस्कृत नाटकांनी हाताळले नाहीत हे त्याचे कारणही ते सांगतात. मोहक काव्यसौंदर्य, सूक्ष्म मोहक भावनांचे वातावरण, भावनेला व वृत्तीला दिलेले आकर्षक वळण, नाट्यवस्तूचा कुशलतेने केलेला विकास, कलेच्या नियमाला धरून केलेला पण नेत्रदीपक न होईल असा शांत विकास, मित विकास, नाजूक मनोविश्लेषण, संवादात व कृतीत पात्रांच्या स्वभावाचे सूक्ष्मसूचन हे संस्कृत नाटकांचे सामान्य गुण आहेत. भासाच्या नाटकात स्पष्टोक्ती आहे, भवभूतीच्या नाटकात विशालता व सामर्थ्य प्राणभूत आहे, कालिदास पूर्णतासंपन्न आहे, असे अभिमतही श्री अरविंद यांनी नोंदवले आहे.
 
 
या अभिजात युगातील साहित्याचा राष्ट्रीय अनुबंध उलगडून दाखवताना श्री अरविंद लिहितात, ‘नाटक, काव्य, गद्य कादंबर्‍या, बाणाच्या हर्षचरितासारखी चरित्रे, काश्मीरचा जनराजकृत इतिहास, धार्मिक कथासंग्रह, कल्पितकथासंग्रह, वास्तव कथासंग्रह, जातके, पद्यमय कथांचा कथासरित्सागर, पंचतंत्र व हितोपदेश आणि असेच दुसरे कमी प्रसिद्ध ग्रंथ हे आजपर्यंत टिकून राहिलेले महान साहित्यव्यवहाराचे अवशेष आहेत. भारतीय संस्कृती विविध पैलूंची व उच्च दर्जाची होती, हे सिद्ध करण्यास हे अवशेष पुरेसे आहेत. भारतीयांची बुद्धी संपन्न होती, भारतीय समाज मोठा व सुव्यवस्थित होता; त्याची धार्मिक, सौंदर्यविषयक, नैतिक, आर्थिक, राजकीय, प्राणिक धडपड फार मोठी होती हे दाखवून देण्यास वरील अवशेष पुरेसे आहेत. भारत अतिभौतिक व धार्मिक स्वप्नात रंगलेला होता व तो भौतिक जीवनात मोठ्या गोष्टी करण्यास असमर्थ होता ही भाकडकथा, रामायण व महाभारत या महाकाव्यांसह अन्य अमाप ग्रंथसंपत्तीही खोटी ठरवीत आहे. या अभिजात युगात तात्त्विक विचारणा तीव्रतेने चालू होती, धार्मिक अनुभूतीसुद्धा घेतली जात होती, तथापि ही प्रवृत्ती अगदी स्वतंत्रपणे काम करीत होती. बाह्य व्यवहार मोठ्या डौलाने चालला असता, त्याच्या मागे काहीही गाजावाजा न करता तात्त्विक व धार्मिक प्रवृत्ती सावकाशीने, धीमेपणाने काम करीत होती. या प्रवृत्तीने असे विचार, अशा वृत्ती, प्रवृत्ती व प्रभाव शांतपणे व सावकाश उभे करून ठेवले की, त्यांच्या शासनाखाली भारतीयांचे जीवन आणखी हजार वर्षे सुव्यवस्थित चालू राहिले.’
 
 
भारतीय आणि युरोपीय तात्त्विक लिखाणाचा फरक सांगताना ते लिहितात, ‘भारताचे तात्त्विक लिखाण व युरोपचे तात्त्विक लिखाण यात हा फरक आहे की भारताचे लिखाण बौद्धिक पद्धतीचे असले, तरीही त्यातील खरा विषय बौद्धिक नाही. सूक्ष्म बुद्धीने हाताळलेला आध्यात्मिक अनुभव हा त्यातील खरा विषय आहे. तत्त्वज्ञान, धर्म व योग यांचे ऐक्य भारतात नित्य सांभाळले गेले. त्याचा हा परिणाम आहे.’ हाच विषय अधिक स्पष्ट करताना ते लिहितात, ‘आत्मा व बुद्धी यांच्यामध्ये, आत्मा प्रकाश पुरवणारा व बुद्धी ही आत्म्याचा प्रकाश खालच्या अंगांना पुरवून त्यांच्याकडून तो आत्मसात करवणारी, असे सहकार्य चालत राहिल्याने, भारतीय आध्यात्मिकता आश्चर्यकारक रितीने आजवर टिकून राहिली आहे. दुसर्‍या कोणत्याही राष्ट्रात हे घडलेले नाही. भारतीय तत्त्वज्ञ योगी होते आणि म्हणूनच भारताच्या अवनतीच्या रात्रीतून भारताचा आत्मा ते सुरक्षित राखू शकले.’
 
 
पुराणांच्या संदर्भात आपले अभिमत व्यक्त करताना श्री अरविंद लिहितात, ‘पुराण हे खरे धार्मिक काव्य आहे. धार्मिक सत्य कलात्मक रितीने पुराणात सांगितले आहे. सर्व अठरा पुराणे चांगल्या काव्यात मोडतात असे नाही. रसहीन कथाही बर्‍याच आहे. परंतु एकंदरीने पुराणात पुष्कळच ज्ञान आहे व त्यांची काव्यपद्धती हे ज्ञान देण्यात समर्थ ठरली आहे. विष्णुपुराण हे चित्तवेधक साहित्य आहे. भागवत पुराणात लोकप्रिय साधी शैली कमी आहे, विद्वत्तामय अलंकारिक भाषा पुष्कळच आहे. या पुराणात सूक्ष्म, खोल व संपन्न विचार सुंदर भाषेत सांगितले आहेत.’
 
 
वेदान्त तत्त्वज्ञानाची उत्तरकालीन रूपे, पुराणातील कल्पना व प्रतिमा आणि भक्तिमार्गातील सौंदर्योपासक आध्यात्मिकता यातूनच प्रादेशिक साहित्याला प्रेरणा मिळाली. प्रादेशिक भाषांचा उदय आणि जीवन व साहित्य यातील त्यांचा वापर वाढल्यानंतर ब्राह्मणांपासून शूद्र चांडालांपर्यंत सर्व वर्गातील लोक लिहू लागले. त्यांची कविता जनतेच्या हृदयातून निघालेली होती. संत व भक्त यांच्या स्फूर्तिमूलक कवितांपासून प्रादेशिक साहित्याचा आरंभ झाला. काव्यगुणात व गीत कुशलतेत ही कविता श्रेष्ठ असून विपुल आहे. दुसर्‍या कुठल्याही साहित्यात या प्रकारची कविता नाही. केवळ प्रामाणिक भक्तिभावातून अशी कविता होऊ शकत नाही. ख्रिस्ती युरोपने अशी कविता केली नाही. अशी कविता निर्माण व्हायला प्रगाढ संपन्न आध्यात्मिक संस्कृती लागते. धार्मिक कथा, पौराणिक कथा, तत्त्वज्ञान इत्यादींबरोबरच राजदरबाराचे जीवन, शहरी व ग्रामीण जीवन, जमीनदाराचे जीवन, व्यापार्‍यांचे जीवन, कारागीरांचे किंवा शेतकर्‍यांचे जीवन हेदेखील या साहित्यात दिसून येते. रामदास स्वामींच्या राजकारणविषयक आणि धार्मिक नैतिक कविता, तिरुवल्लुवर यांनी लिहिलेली सुभाषिते हे साहित्य कल्पनेच्या व रचनेच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. काही प्रादेशिक भाषांत शृंगारिक कविताही आहे. ती बरीच सुंदर आणि केवळ ऐहिक प्रेरणेची आहे. भारतात सर्वत्र एकच संस्कृती आहे, पण प्रादेशिक साहित्यात तिचे विविध आविष्कार पाहायला मिळतात. प्रत्येक प्रदेशाचे शील व वृत्ती विशिष्ट प्रकारची असते. त्यामुळे तिच्या साहित्यात वैशिष्ट्य येते. हे सगळेच साहित्य सुंदर व जोरदार आहे, हा श्री अरविंद यांच्या विवेचनाचा आशय आहे.
 
 
बंगालमधील विद्यापती व चंडीदास, तसेच राजस्थानची मीराबाई आदींची चर्चा करून श्री अरविंद निष्कर्ष मांडतात की, ‘वैष्णव धर्माचे व कवितेचे वैशिष्ट्य हे आहे की, हा धर्म व ही कविता सर्वच्या सर्व मानवी भावना ईश्वरोन्मुख करते. प्रेमभावना सर्व भावनांमध्ये तीव्रतर असल्याने ती भावना या धर्माने पसंत केली आहे. अन्यत्रही जेथे भक्तिधर्म चांगला विकसित झाला, तेथे प्रेमभावनेचे भक्तिगीत निर्माण झाले. पण भारतीय भक्त कवीचे सामर्थ्य त्या अन्य भक्तिगीतात दिसून येत नाही.’ महाराष्ट्रासह भारतातील अन्यत्रच्या भक्तिकाव्याचा आढावा घेताना ते लिहितात, ‘तुकाराम या वैष्णव कवीची गीते ‘अभंग’ या प्रकारच्या वैष्णव कवितेत सुप्रसिद्ध आहेत. बंगाली वैष्णव कविता बुद्धिप्रधान विचार टाळते, केवळ भावनांचे वर्णन करते. उलटपक्षी मराठी वैष्णव कवितेत आरंभापासून बुद्धिप्रधान विचार मोठ्या प्रमाणात आहे. रामदास हे भक्त, योगी व तत्त्वज्ञ होते. रामदासांची कविता मराठी राष्ट्राच्या जन्माशी, जागृतीशी जोडलेली आहे. या कवितेत धार्मिक नैतिक विचारांचा प्रवाह सारखा वाहत आहे. तुकारामाची कविता भक्तीने भरलेल्या हृदयातून निघालेली आहे. तुकारामाच्या भक्तिमय हृदयातून निघालेला विचार मर्मज्ञ सत्याने भरलेला आहे. अनेक भक्त कवी तुकारामांप्रमाणेच विचार व्यक्त करतात. मराठी कविता बरीचशी या प्रकारची आहे. कबीराची कविता याच प्रकारची पण तीव्रतर भावना व्यक्त करणारी आहे. मुसलमानी कालखंडाच्या शेवटी बंगालमध्ये गाढ भक्तीबरोबर अनेक प्रकारचे कमीअधिक धार्मिक खोल विचार रामप्रसाद या भक्तकवीने आपल्या दिव्य मातेला उद्देशून केलेल्या गीतात व्यक्त केले आहेत. दक्षिणेमध्ये शैव कवींच्या कवितेत भक्तीबरोबर गाढ तात्त्विक विचार मांडलेले आहेत. उत्तरेमध्ये सूरदास, नानक व शीख गुरू यांच्या हिंदी कवितेत उच्च वेदान्ती आध्यात्मिकता पुन्हा प्रकट झाली आहे. प्राचीन संस्कृतीच्या दोन हजार वर्षांत जी आध्यात्मिक संस्कृती निर्माण होऊन पूर्णतासंपन्न झाली होती, तिने भारताच्या सर्व प्रदेशांतील लोकांचे मन भरून टाकून नव्या महान साहित्याला जन्मास घातले. या सर्व साहित्यात, त्याच्या सर्व पसार्‍यात या संस्कृतीचाच आवाज सारखा ऐकू येतो.’ रामायण व महाभारताप्रमाणेच कालिदास, भारवी, माघ यांच्या अभिजात काव्यापासूनही प्रादेशिक भाषात कथाकाव्य निर्माण झाले आहे, असे निरीक्षणही महायोगी नोंदवतात.
 
 
 
आपल्या साहित्यविषयक चर्चेचा समारोप करताना श्री अरविंद लिहितात, ‘जनतेची संस्कृती साहित्यात विविध प्रकारे व विपुलतेने नोंदली जाते, हे साहित्याविषयी इतके लिहिण्याचे कारण आहे. कमीत कमी तीन हजार वर्षे अशा प्रकारचे महान साहित्य ज्या संस्कृतीत निर्मिले जाते, ती संस्कृती खरीखुरी व आश्चर्यकारक संस्कृती आहे; याला वेगळ्या पुराव्याची आवश्यकताच नाही. शेवटला कालखंड नि:संशय अवनतीचा कालखंड आहे. तथापि या कालखंडातही भव्य गोष्टी झाल्या. विशेषत: धार्मिक, साहित्यिक व कलात्मक निर्मिती अखंड होत राहिली, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ही संस्कृती आता संपणार असा क्षण आला, त्या क्षणीच ही संस्कृती पुन्हा जीव धरू लागली. आता हिने आपल्या नव्या युगाला प्रारंभ केला आहे. आध्यात्मिक व धार्मिक उद्योग, साहित्य आणि चित्रकला या तीन वस्तू ज्या सर्वात अधिक टिकल्या, त्या वस्तूंच्या क्षेत्रात भारतीय संस्कृतीने आपल्या नव्या युगाला प्रारंभ केला आहे. हे पुनरुज्जीवन जीवनाच्या व संस्कृतीच्या सर्वच उद्योगात, ज्यात भारत एकेकाळी अग्रेसर होता व नावाजला होता अशा सर्व उद्योगात पोहोचेल, अशी आशा व अपेक्षा उत्पन्न झाली आहे.’
श्रीपाद कोठे
7588043403
Powered By Sangraha 9.0