घराला घरपण देणारे गणोरे कुटुंब

16 Nov 2021 15:46:32
एकत्र कुटुंब पद्धती हे आपल्या कुटुंब व्यवस्थेचं एक वैशिष्ट्य. काळाच्या ओघात ते दुर्मीळ झालं असलं तरी काही घरांमध्ये ते टिकून आहे. कोणाच्याही व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच न होताही, एकत्र एकदिलाने राहता येतं याचं एक उदाहरण म्हणजे नाशिकचं गणोरे कुटुंबीय. या कुटुंबाचा करून दिलेला हा मनोवेधक परिचय.

home_5  H x W:
एकत्र कुटुंब म्हणजे ‘पिवळा पीतांबर’सारखी उघड पुनरुक्ती आहे. कुटुंब असते ते एकत्रच असते. सुटी माणसे होतात.
जगभरात मोठे कुटुंब ही संस्था, ज्यात आडव्या आणि उभ्या दोन्ही शाखांचा विस्तार नांदतो आहे अशा डेरेदार वृक्षासारखी, हळूहळू नामशेष होते आहे. माणसाला सहवासाहून एकांत अधिक आवडू लागला, ‘शेअरिंग’पेक्षा ‘प्रायव्हसी’ जास्त महत्त्वाची वाटू लागली आणि कुटुंबाचा पाया डळमळायला लागला. आधी एकाच पिढीतली, मग कालांतराने पुढच्या पिढ्यांतलीही मंडळी वेगळी निघायला लागली. झाकली मूठ उघडून सुटी बोटे चोहीकडे पांगावीत आणि सव्वा लाखाचे नुकसान झालेले कुणाच्या ध्यानात येऊ नये, असे काहीसे झाले.

या अशा वातावरणात नाशिकच्या गणोरे कुटुंबाचे एकत्र नांदणे आल्हाददायक आणि आश्वासक आहे.
 
केशवराव आणि सावित्रीबाई या दांपत्याचा वंशविस्तार आजही बव्हंशी एका घरात, एका छताखाली सुखाने नांदतो आहे. दर पिढीत नव्याने भर पडते आहे, जुने काळाच्या पडद्याआड होत आहेत. पण आणखी वेगळे ठाणे मांडावे, असे कुणालाही वाटलेले नाही. केशवराव आणि सावित्रीबाई यांना एक मुलगी आणि पाच मुले. चरितार्थासाठी केशवराव व्यापारउदीम करीत. नाशिक, भगूर या आणि आसपासच्या गावी भरणार्‍या आठवडी बाजारांना जात. अगदी खर्डीसारख्या दूरच्या गावाच्या बाजाराचा दिवसही ते चुकवत नसत. यातून जी प्राप्ती होई, त्यात सावित्रीबाई निगुतीने संसार करीत. घरच्या गायी-म्हशींचे करणे, दूध विकणे हा त्यांचाही हातभार असे. ऊठसूट आपल्या नशिबाचे खापर सरकारवर फोडण्याची वहिवाट त्या काळी नव्हती. राबणारे चार हात आणि साथ देणारा जोडीदार एवढी सिक्युरिटी पुरेशी असे. सावित्रीबाईंनी त्या अनिश्चित काळात आपल्या पतीची भक्कम साथ केली. मुलांना अन्न, कपडेलत्ते तर कधी कमी पडले नाहीतच, तसेच कोणताही पक्षपात न करता त्या माउलीने आपल्या सहाही मुलांच्या पदरात भरभरून प्रेम आणि जीवनाचे बहुमोल शिक्षण घातले. सारी मुले एका छताखाली नांदली, खेळली, मोठी झाली. त्यांनी जेवणे सोबत केली, एकत्र खेळले-बागडले आणि आईच्या हातचे धपाटेही प्रसंगी सोबतच खाल्ले. कुणालाच वेगळी खोली नव्हती, यापेक्षाही, आपल्याला वेगळी खोली गरजेची आहे असे कुणाला कधी वाटलेही नाही.


home_4  H x W:
कुटुंब ही पहिली राजकीय संस्था आहे, असे शास्त्रात सांगितले आहे. पण जुने एकत्र कुटुंब ही राजकीय कमी आणि सामाजिक संस्था जास्त होती. राजकारण दुसर्‍याच्या ताटातला घास पळवायला शिकवते, एकत्र कुटुंब आपल्या ताटातला घास वाटून घ्यायला शिकवते. त्यामुळेच कदाचित, आई-वडिलांतील बेबनाव, एकेकटी राहणी, कुठेच ओलावा नाही, अशा वातावरणात वाढलेल्या मुलांची सामाजिक जाणीव कमी असते. याउलट एकत्र कुटुंबात वाढलेल्या, सतत इतरांचा विचार करण्याची सवय लागलेल्या मुलांना सामाजिक समरसता लवकर येते. ते जबाबदार नागरिक बनू शकतात.

कुटुंबाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी गावोगावीची फिरस्ती पुरेशी नाही, हे लवकरच केशवरावांच्या लक्षात आले. त्यात त्यांच्या एकट्याच्या श्रमांनाही मर्यादा होत्याच. या विचारातूनच स्टेशनरी, भांडी, कंदील, सायकल अशा अनेक वस्तू विक्री करण्याची किमया साधली. आणि मग पिढीजात असलेला कापड दुकानदारीचा व्यवसाय पुन्हा सुरू करावा असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांना त्याची माहिती होतीच. तेव्हा 1965 साली भगूरला ‘दत्त जनरल स्टोअर्स’ ही पहिली पेढी सुरू केली. एव्हाना मुले हाताशी आली होती. थोरल्याचे सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण चालू होते. धाकटी भावंडेही शिकत होती, दुकानी बसत होती.
 
 
 
ही पहिली पेढी उभारल्यानंतर केशवरावांनी अपार कष्टाने ती नावारूपाला आणली. अल्पावधीतच त्यांच्या सचोटीचा, मेहनती स्वभावाचा बोलबाला झाला. बाजारात त्यांच्या नावाला प्रतिष्ठा होतीच, ती आणखी वाढली. दुकान भरभराटीला आले. याच काळात केशवरावांच्या चुलत भावाच्या अडचणीच्या काळात भावाच्या दुकानात सोबत काम सुरू झाले.
 
केशवरावांनी त्यांस मदत केली. भारत वस्त्र भांडार या नावाने त्यांच्या चुलत भावानेही बाजारात प्रवेश केला. अल्पावधीतच क्षुल्लक कारणाने दुरावा येत गेला, पण दोन भावंडांतील प्रेम आणि आदर तितकाच दृढ होता.

यातूनच आपले स्वतंत्र असे कापड दुकान हवे ही भावना बळावत गेली आणि 1977 साली भगूरलाच ‘कांती वस्त्र भांडार’ हे आधुनिक कापड दुकान सुरू झाले.
 
बाहेरही स्थित्यंतरे होत होती. औद्योगिकीकरणाचे परिणाम दिसत होते. खेडी सोडून शहरात किंवा शहराच्या जवळपास राहणार्‍या लोकांची वस्ती वाढत होती. त्यांच्या खिशात चार पैसे खुळखुळत होते. क्रयशक्ती वाढली होती. या परिस्थितीत आपण आणखी एक दालन सुरू करायला हवे, असे केशवरावांना वाटले. भगूरसह नाशिक रोड या स्टेशनलगतच्या भागात 1983 साली आणखी एक आधुनिक वस्त्रदालन उभे राहिले.
 

home_1  H x W:

आता व्यवसाय जोमाने चालत होते, आवक वाढली होती. विपदेसारखीच अतिसुबत्तासुद्धा माणसांना बिघडवते. आपल्या वाट्याची दौलत घेऊन वेगळी चूल मांडण्याचा मोह होतो. गणोरे दांपत्याची पुण्याई अशी, की कुणाच्याही मनाला तसा विचार शिवला नाही. तीन-तीन पेढ्या या भावंडांनी समर्थपणे सांभाळल्या.
 
 
आज 2021मध्ये या कुटुंबाचा विस्तार वाढला आहे. मागची पिढी पाया बांधून देऊन काळाच्या पडद्याआड झाली. मधल्या पिढीने - अरविंदजी, कांतीलालजी, चंद्रकांतजी, दत्तात्रेयजी आणि बाळासाहेब या भावंडांनी आयुष्यभर खपून त्या पायावर तितकीच मजबूत इमारत बांधली आहे. काळानुरूप बाजाराच्या गरजा वाढल्या. गणोरे कुटुंबानेदेखील व्यवसायाचा व्याप वाढवला. कापडाच्या दोनच्या चार पेढ्या झाल्या. नाशिक शहरातील अग्रगण्य कापड व्यावसायिकांत आवर्जून नाव घेता येईल इतकी कीर्ती या कुटुंबाने मिळवली. 2005मध्ये नाशिकला मध्यवर्ती ठिकाणी नवीन पेढी सुरू झाली.
 
2017मध्ये स्वत:च्या मालकीच्या जागेत नाशिक रोड स्टेशनच्या बाजूलाच अद्ययावत लॉज आणि विशाल मॉल हा शॉपिंग मॉलही सेवेत रुजू झाला. या एकत्र कुटुंबाच्या पेढ्यातून, दुकानातून काम करणारी आणखी कितीतरी कुटुंबे या कुटुंबाने तोलून धरली. स्वत:चा विकास तर केलाच, त्याचबरोबर शहराच्या विकासातही भरीव योगदान दिले.

आजही हे कुटुंब एकत्र राहते. या सार्‍याची मुहूर्तमेढ रोवणारे जोडपे तर आता नाही, पण आजही त्यांची स्मृती या कुटुंबात नित्य जागती आहे. सारे सण-उत्सव, मुलाबाळांचे वाढदिवस, आजही एकत्र साजरे होतात. कोरमअभावी सभा तहकूब करावी लागली, असे एकाही प्रसंगी घडलेले नाही. आज या कुटुंबातल्या नवथर वयाच्या मुलांना हे कुटुंब एक भक्कम सपोर्ट सिस्टिम आहे. एकमेकांच्या सुखदु:खाची रोज विचारपूस होते. लोकशाहीचा कोणताही आव न आणता सारे महत्त्वाचे निर्णय सर्वानुमते होतात. काही कुरबुरी, असल्याच तर, दक्ष शेतकरी जसा लक्षपूर्वक निंदणी करतो, तशा वाढण्याआधीच मिटवल्या जातात.

सोनल म्हटले तर या कुटुंबाची एक सदस्य आहे, म्हटले तर सार्‍या कुटुंबाचे प्रातिनिधिक रूप आहे. ती आज स्वत:चे कापड दुकान समर्थपणे सांभाळते. स्वत:ची चारचाकी चालवत रोज नाशिक ते भगूर जाणे-येणे करते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कपडाखरेदीसाठी दर वर्षी सुरत, अहमदाबाद अशा मोठ्या मजला मारते. पुरुषप्रधान संस्कृतीत एकत्र कुटुंबात स्त्रियांबाबत नेहमीच भेदभाव होतो, त्यांचे हक्क डावलले जातात, वगैरे कच्च्या गोष्टी आवडीने उगाळत बसणार्‍यांना सोनलचे उदाहरण म्हणजे सणसणीत उत्तर आहे.
 
सोनलला आठवते तेव्हापासून कोणतेही स्तोम न माजवता स्त्रियांची समानता या कुटुंबात नेहमीच जपली जात होती. तिच्या मनात तिच्या आजीच्या अनेक हृदयस्पर्शी आठवणी आहेत. त्यातली एक म्हणजे जेव्हा तिच्या लहानपणी कर्नाटकातून खणाचे पार्सल आले होते आणि शिंपी समाजाच्या पिढीजात चालत आलेल्या सांकेतिक भाषेतली मापे वापरून त्याची शहानिशा करायची होती, तेव्हा सोनलच्या आजीने तिला ती भाषा शिकवून ते महत्त्वाचे काम सोपवले होते. ते जिद्दीने पूर्ण केल्यानंतर आजीने कसे कौतुक केले आणि बाजारातून अस्सल सोन्याचे कानातले घेऊन दिले, ते सोनल आज गहिवरून सांगते. या संस्कारांमुळे व्यवसायाचे कौशल्य सरसकट सर्वांना दिले जात होते, त्यात भेदभाव नव्हता, हे सिद्ध होते. आजीने मुलींची असोत की सुनांची, सारी बाळंतपणे स्वत:च्याच देखरेखीखाली करवली. कुटुंबात येणार्‍या प्रत्येक नवीन सदस्याचे स्वागत तिने केले. कुटुंबात जितक्या सुना आल्या, एकही बाळंतपणासाठी कधी माहेरी गेली नाही. या एकत्र कुटुंबाने सासर-माहेरातला गुणात्मक फरकच मिटवला.


home_3  H x W:
 
 केशवराव गणोरे यांचे अभिष्टचिंतन करताना
या एकत्र कुटुंबाचे कोणतेही लिखित-अलिखित कायदे नाहीत. प्रत्येकाने कापड व्यवसायच केला पाहिजे, असा आग्रह नाही. एक भाऊ औषधी व्यवसायात आहे, तर एक वहिनी बँकेत अधिकारी आहे. थोरले काका तर सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेऊन त्या काळी अनेक शासकीय कामांतील आपले कौशल्य आणि दर्जा यामुळे वैजापूर परिसरात सन्माननीय आहेत. निवृत्तीनंतर वैजापूरला याच व्यवसायाकरिता आवश्यक असणारी मशीन्सचा आणि इतर वस्तूंचा उत्पादन व्यवसाय सुरू केला गेला. अंतरावर राहत असूनही आजही आजोबांनंतर घरातील मोठी व्यक्ती म्हणून काकांना मान आहे.

आजही कोणत्याही वयस्कर माणसाला कोणताही प्रकृतीचा त्रास जाणवायला लागला, तर सारी नवीन पिढी हातातली कामे सोडून धावते. सोनल स्वत:च्या आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी तर घेतेच, तसेच इतर सर्वांच्याच मेडिकल इमर्जन्सीसाठी ती फर्स्ट एड किट आहे.


home_2  H x W:
 
व्यवसाय आणि कुटुंब यांची एकत्र मोट बांधणारी भावंडं
कोरोनाच्या कठीण काळात चौकोनी कुटुंबांची वाताहत झाली. आर्थिक गणिते कोलमडली, चहू बाजूंनी निराशा घेरून आली. पण एकमेकांच्या आधाराने उभ्या असलेल्या एकत्र कुटुंबांना हा काळ कठीण असूनही आणखी जवळ आणणारा ठरला. नाशिक रोडच्या मध्यवर्ती भागात आज हे एकत्र कुटुंब सुखाने नांदते आहे.
 
हे घर 2007 साली बांधले. त्याआधी संपूर्ण कुटुंब भगूरला छोट्या घरात रहायचे. विस्तार वाढू लागला, तशी जागा बदलण्याची गरज भासली म्हणून नवे घर बांधले. नवे घर मोठे तर आहेच, पण हे घर नुसती हवाच खेळती ठेवत नाही, तर कुटुंबातल्या सर्वांची मनेही खेळकर, आनंदी ठेवते. या घरातल्या लेकी-सुनांचे चेहरे कधी ओढलेले दिसत नाहीत. कुणा लेकराच्या गालावर सुकलेले अश्रू दिसत नाहीत. श्रीगोंदा, शिराळा, पंढरपूर, सोलापूर, नाशिक अशा विविध भागांतील लेकी या घरच्या सुना झाल्या. घेतला वसा सार्‍या जणी समर्थपणे वाहताहेत.

म्हटले तर हे घर आहे, म्हटले तर एक ‘मिनिएचर कॉलनी’ आहे. नवीन लग्न झालेली जोडपी असोत की वयात येऊ लागलेली मुले असोत, सर्वांना स्वतंत्र खोल्या आहेत. फार काय, दाराशीदेखील प्रत्येक सदस्याच्या आवडीची अशी दोन-तीन खानदानी कुत्री आहेत. या सार्‍यांना हे घर निवारा पुरवते, त्यांच्या गरजा भागवते, त्यांना सुरक्षा देते. आणि या भल्यामोठ्या कुटुंबापैकी प्रत्येकाला हे घर आपले वाटते. घर दगडाविटांनी मिळून नाही, तर माणसांनी मिळून बनते, हे इथे आल्यावर प्रकर्षाने कळते.
 

home_1  H x W:
 युवा पिढी 
आजकालच्या युगात चिकित्सा तेवढी वाढत चालली आहे, पण अपेक्षित परिणाम साधला जाताना कोणत्याही क्षेत्रात दिसत नाही. वैद्यकीय क्षेत्रात आज ढीगभर टेस्ट्स होतात, भलीमोठी फाइल तयार होते; पण ज्या अधिकाराने जुने-जाणते डॉक्टर नुसत्या नजरेने निदान करायचे आणि अल्पावधीत रोग्याला बरे करायचे, तो अधिकार कुठेच दिसत नाही. शाळातून मूल्यसंस्कार हा विषय शिकायला ठेवावा लागावा इतपत आपल्या समाजाचे पतन झाले. अशा अवस्थेत कोणताही तोरा न मिरवता हे घर आपल्या कुटुंबाचे, त्यातल्या प्रत्येक सदस्याचे आणि त्यांच्या संबंधात आलेल्या समाजातील इतरेजनांचे मूल्यशिक्षण पिढ्यानपिढ्या विनामूल्य करते आहे. काय करावे आणि काय करू नये, याची अलिखित आचारसंहिता या विशाल कुटुंबातील प्रत्येकाला माहीत आहे. आपले अधिकार गाजवण्याच्या घोळात कुणी पडत नाही. थोरली मंडळी ते जिवापाड सांभाळेल, हा प्रत्येकाला विश्वास आहे. आपले अधिकार नेमके कोणते ते कदाचित या कुटुंबात माहितीही नसावेत, कर्तव्याला मात्र कुणी चुकत नाही. इथे ‘आजी’ नसते, ‘मोठी आई’ असते. इरावती कर्व्यांनी सांगितलेली ‘चुलता’ म्हणजे ‘धाकटा बाबा (क्षुल्ल-तात)’ ही उपपत्ती इथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. कुणाचेही सुख असो, सर्वांना सामील करून घेतल्याशिवाय सुफळ संपूर्ण होत नाही, आणि कुणाचेही दु:ख असो, अहमहमिकेने वाटून घेऊन ते हलके केले जाते.
 
हे घर नुसते नावाला पितृसत्ताक आहे खरे, पण खरे म्हटले तर ती एक निकटवर्ती लोकशाही आहे. या कुटुंबात कोणी कोणावर आपले म्हणणे लादत नाही. या घराचा पाहुणचार ज्याला मिळाला, त्याला मग चौकोनी, सुखलोलुप, पळपुट्या कुटुंबाला ‘न्यूक्लिअर’ का म्हणतात, हा प्रश्न पडतो आणि ‘वसुधैव कुटुंबकम्!’मधील ताकदही लक्षात येते. नुसते दांपत्य म्हणजे कुटुंब नव्हे. त्यात ती दोघेही नुसती घेऊ पाहणारी, स्वामित्व गाजवणारी, अधिकारजाग्रत अशी असतील तर पुढचा प्रवास कलह, काउन्सेलिंग आणि कसलीतरी तडजोड असा होतो. ही कुटुंबे, कुटुंबे कमी आणि काउन्सेलर्स आणि कोर्टकचेर्‍यांची नंदनवने असतात. सतत प्रश्न उपस्थित करणार्‍यांचा समाज कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही, तर उत्तरे शोधणार्‍यांचा, समाधान करणार्‍यांचा समाज बनतो. तसेच कुटुंबाचे आहे. सतत असमाधानी असणार्‍यांचे, ‘व्यष्टि’प्रधान मानसिकता असणार्‍यांचे कुटुंब होऊ शकत नाही. ‘समष्टी’त सुख शोधणार्‍या, इतरांशी समरस होणार्‍या माणसांचे सुंदर, सशक्त कुटुंब बनते. गणोरे कुटुंब हे असे सुंदर कुटुंब आहे.
म्हणून, सुरुवातीला म्हटले तसे, एकत्र कुटुंब ही पुनरुक्ती आहे. कुटुंब तेच, जे एकत्र असते. तसे पाहू जाता गणोरे कुटुंब हे एकत्र कुटुंब नाही. तेच खरे विशाल कुटुंब आहे. बाकी सारी सुटी झालेली, विभक्त कुटुंबे आहेत. पंचतंत्रातील म्हातार्‍या कपोताचा उपदेश कायम ध्यानात ठेवणार्‍या या आगळ्यावेगळ्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा!
डॉ. रेणूकादास देशपांडे 7588155601
Powered By Sangraha 9.0