बाबासाहेब! तुम्ही परत या...

16 Nov 2021 15:56:51

babasaheb_1  H
बाबासाहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत, शब्दश: शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य घरोघर घेऊन जाण्याचे काम केले. भव्य शिवसृष्टीचे स्वप्न पाहिले. पुण्याजवळ ते आकार घेत आहे. ते पूर्ण झालेले पाहणे त्यांच्या भाग्यात नसावे. परंतु त्यांचे हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नक्कीच पूर्ण करतील. बाबासाहेब स्वर्गवासी झाले. महाराज साडेतीनशे वर्षांपूर्वीच स्वर्गवासी झाले. त्यांनी बाबासाहेबांचे कसे स्वागत केले असेल? ते नक्कीच म्हणाले असतील, “बळवंतराव, तुम्ही लाख मोलाचे नाही, तर कोटीमोलाचे कार्य केले आहे. माझ्या चरित्र गायनात मला गोडी नाही, पण माझ्या ध्येयस्वप्नात मला गोडी आहे. हे स्वप्न तुम्ही घरोघर पोहोचविले. अलौकिक काम केले. आम्ही कृतार्थ झालो.”
नोव्हेंबर 14ला शिवशाहिरी अबोल झाली. पद्मविभूषणाला ज्यांच्या ध्येयमय, तपस्वी जीवनाने विभूषित केले, असे बाबासाहेब पुरंदरे आपल्या सर्वांना सोडून गेले. वयोमानाप्रमाणे त्यांचे जाणे स्वाभाविक असले, तरी मनाला चटका लावून गेले. जाताना मनाला चटका लावण्याची जाणीव निर्माण करणारी जीवने फारच थोडी असतात. आपल्यासारखी सामान्य माणसे जन्माला आलो म्हणून जगत असतात.. त्या जगण्याला काही हेतू असतो, हे मरेपर्यंत असंख्यांच्या लक्षातच येत नाही. आपण आलो कशासाठी, जगतो कशासाठी आणि मरताना काय सोडून जाणार आहोत, याचा क्षणभरदेखील विचार बहुसंख्य माणसे करीत नाहीत.
 
 
बाबासाहेब त्याला अपवाद होते. महापुरुष डॉ. हेडगेवार यांच्याशी बालवयातच त्यांचा संपर्क आला. ते संघस्वयंसेवक झाले.
 
परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, तसे बाबासाहेबांचे झाले. त्यांना आपल्या जीवनहेतूची अनुभूती झाली आणि पुरंदरे परिवारात जन्मलेला हा बळवंत नावाचा तरुण ध्येयवेडाने बलवंत होऊन शिवचरित्राने झपाटला गेला. भूतबाधा झालेली माणसे आपण पाहतो, ती वेड्यासारखा व्यवहार करीत असतात. वाटेल ते बडबडत असतात. याला भूतबाधा झाली आहे, असे म्हणून त्याकडे कोणी लक्ष देत नाहीत. बाबासाहेबांना शिवकालाच्या भुताने पछाडले. ते शरीराने विसाव्या-एकविसाव्या शतकात वावरत राहिले, परंतु मन-बुद्धी-चित्ताने ते शिवकाळातच वावरत राहिले.
 
 
शिवाजी हे त्यांचे आराध्य झाले. शिवचरित्राचा धांडोळा घेत घेत त्यांनी सगळा महाराष्ट्र पालथा घातला. महाराजांचे गड-कोट-किल्ले हिंडले. महाराजांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग त्या काळात जाऊन त्यांनी अनुभवला. शिवनेरीवरील शिवरायांचा जन्मसोहळा असेल, राजगडावरील त्यांचे वास्तव्य असेल, प्रतापगडचा अफजलखान वधाचा प्रसंग असेल, लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग असेल, आग्य्राची कैद असेल आणि कैदेतून संन्याशाच्या वेशात राजगडावर आईच्या पायाला येऊन मारलेली मिठी असेल, हे सर्व प्रसंग बळवंत मोरेश्वर पुरंदरे नावाचा युवक साक्षात अनुभव करता झाला.
 
 
त्यांनी शिवचरित्राचे गायन सुरू केले. हे गायन पद्यरूप होते. त्यात रूढार्थाने गीत किंवा कविता नव्हती. पण ‘राजा शिवछत्रपती’ हे दहा खंडांतील त्यांचे शिवचरित्र मराठी भाषेतील अतुलनीय गद्यकाव्य आहे. आता ते दोन खंडांत उपलब्ध आहे. त्यांच्या शिवचरित्राला त्यांच्या शिवचरित्राचीच उपमा द्यावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व लहान-मोठे प्रसंग, त्याची पार्श्वभूमी, त्याचे परिणाम बाबासाहेबांनीच सांगावे. इतिहास जिवंत करण्याचेच नव्हे, तर इतिहास घडविणार्‍या सर्व व्यक्तींना शब्दरूपाने जिवंत करण्याचे त्यांचे सामर्थ्य हे केवळ त्यांचेच होते. म्हणून असा शिवशाहीर होणे नाही, असेच म्हणावे लागेल. महाराजांच्या चरित्रातील बारीकसारीक घटना, त्यांच्या शब्दाखातर प्राणाचीदेखील पर्वा न करणारे त्यांचे सवंगडी आणि त्यांनी केलेले अचाट आणि अफाट पराक्रम बाबासाहेबांच्या मुखातून ऐकत असताना अंगावर रोमांच उभे राहातात आणि ऐकणारा त्याच्या नकळत बाबासाहेबांबरोबर कधी त्या भूतकाळात जाई, हे कळत नसे. वीणावरदायिनीचे असे वाणीवरदान दहा लाखातील एकालाच लाभते. तिने बाबासाहेबांना मुक्त हस्ताने शब्दसामर्थ्य, भाषासामर्थ्य, वक्तृत्वसामर्थ्य दिले.. छे, छे, ती स्वत:च त्यांच्या जिभेवर येऊन बसली, असेच म्हणावे लागेल.
 
 
बाबासाहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत, शब्दश: शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य घरोघर घेऊन जाण्याचे काम केले. भव्य शिवसृष्टीचे स्वप्न पाहिले. पुण्याजवळ ते आकार घेत आहे. ते पूर्ण झालेले पाहणे त्यांच्या भाग्यात नसावे. परंतु त्यांचे हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नक्कीच पूर्ण करतील. बाबासाहेब स्वर्गवासी झाले. महाराज साडेतीनशे वर्षांपूर्वीच स्वर्गवासी झाले. त्यांनी बाबासाहेबांचे कसे स्वागत केले असेल? ते नक्कीच म्हणाले असतील, “बळवंतराव, तुम्ही लाख मोलाचे नाही, तर कोटीमोलाचे कार्य केले आहे. माझ्या चरित्र गायनात मला गोडी नाही, पण माझ्या ध्येयस्वप्नात मला गोडी आहे. हे स्वप्न तुम्ही घरोघर पोहोचविले. अलौकिक काम केले. आम्ही कृतार्थ झालो.”
 
 
बाबासाहेब, महाराष्ट्राला आज तुमची नितांत गरज आहे. एका शब्दप्रभूने दुसर्‍या शब्दप्रभूची स्तुती करावी, असे शब्दप्रभू पु.ल. देशपांडे तुमच्याविषयी म्हणतात, “माणसे इतिहासापासून खरोखरच घेतात का स्फूर्ती, असे पुन:पुन्हा शिवचरित्र वाचताना वाटते. महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्रही असाच मेल्या मनाचा नव्हता का? कसलेही भव्य स्वप्न नसलेले आमचे नेते, न शिवशिवणारी आमची मनगटे, शिवीगाळीला संग्राम समजणारी आणि बुद्धीच सांगणारी विद्वान मंडळी, मुजोरीला स्वाभिमान आणि सौजन्याला भेकडपणा मानणारी, खाजगी वैरांना तत्त्वाच्या चौकटी शोधायची आमची वळवळ!’ असा आहे आजचा महाराष्ट्र. मराठी मनाला शिवरायांची स्फूर्ती तुमच्याशिवाय कोण देणार? म्हणून बाबासाहेब, तुम्ही परत या.
 
 
Powered By Sangraha 9.0