@माया देशपांडे
परदेशात राहणं ही आता साधारणशी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधी म्हणून लोक तुमच्याकडे बघत असतात. त्या वेळी तुम्ही तिथं तुमच्या संस्कृतीचे प्रचारक म्हणून नव्हे, तर दूत म्हणून गेलेला असता, हे लक्षात ठेवावं लागतं. प्रचारकी वागण्याने कदाचित चार लोक प्रभावित होतील, अनुयायी जमतील, स्वत:चं श्रेष्ठत्व पटवून देण्यात यश मिळेल, पण आपला स्वत:चा विकास होणारच नाही. त्यात तुमची संस्कृती जगाला दिसणं जसं अपेक्षित असतं, तसं तिथल्या संस्कृतीशी नातं जोडून त्यातला चांगला अंश स्वत:मध्ये रुजवणं हेही तितकंच महत्त्वाचं. ते जमणं हे चांगली देवाणघेवाण करणार्या दूताचं लक्षण आहे.
बेल्जियममध्ये जायच्या आधी विदेशी माणसं फक्त सिनेमातच बघितलेली होती. फार तर मराठी साहित्यात काही निवडक लेखनात. अपवाद वगळता सगळी फार दूरची वाटणारी. मुळात आमच्या भवतालात तरी परदेशात राहायलाच जाणं वगैरे याची फार नवलाई असणारा तो काळ होता. त्यात तिथलं जीवन कसं असेल, असा विचार करताना आधी अन्न-वस्त्र-निवार्याचाच विचार. परदेशी लोकांच्या राहणीमानाबद्दल वरवर समजलेल्या गोष्टी मनात ठाम रुजलेल्या! आपण जातोय त्या गावात नवर्याच्या कंपनीत काम करणारे दहा भारतीय लोक आहेत, याचाच खूप आधार वाटला होता.
तिथे पाहुण्यासारखं जायचं, दोन वर्षं राहायचं आणि परत यायचं, हे ठरलं असल्याने विदेशी लोकांशी मैत्री होईल वगैरे विचारही डोक्यात आले नव्हते. लातूर, औरंगाबाद, पुणे अशा मुख्यत: मराठी वातावरणात वाढल्यामुळे तिथे असणार्या भारतीय लोकांमध्ये तामिळ, कानडी, पंजाबी, गुजराती लोक आहेत याचंच अप्रूप होतं. साधारण सारख्याच वयाचे आम्ही सगळे युरोपातल्या चिमुकल्या देशातल्या लहानशा गावात एकत्र आलो होतो.
आम्ही दोघेही भल्यामोठ्या वर्तुळात वाढल्यामुळे खूप माणसांची सवय आणि आवड होतीच. गावात दर शनिवारी बाजार भरायचा. माणसांची भूकच एवढी होती की तिथे कुणी वेगळी भारतीय व्यक्ती दिसली की आपणहोऊन जवळ जाऊन ओळख करून घेऊन जेवणाचं आमंत्रण देऊन मोकळे व्हायचो! आपल्याच देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या लोकांच्या ओळखी होऊ लागल्या.
खूप सुरक्षित आणि मोठ्या असल्या, तरी मर्यादित वर्तुळात तयार झालेले आमचे वेगवेगळ्या प्रांतिक लोकांबद्दलचे समज तर बदलत होते, त्याचबरोबर विचारसरणी, राहणीमान, संस्कृती यांचा फार विचार न करता सगळ्या प्रकारच्या लोकांशी मैत्री करण्याएवढा मोकळेपणाही येत होता.
अर्थात पहिल्यांदा देशाबाहेर राहत असल्याने जिथे-तिथे भारताशी जोडल्या जाणार्या ओळखीच्या खुणा सतत शोधत असायचो. एखादा वास, एखादा संगीताचा तुकडा, एखादी चव भारताशी साम्य दाखवणारी सापडली, तरी हुरळून जायचं मन. दोनेक महिन्यांत गावातल्या गल्लीबोळात रस्ता न चुकता फिरता येऊ लागलं.
एक दिवस गावातल्या मुख्य चौकाभोवती फिरत असताना चक्क चंदन उदबत्तीचा दरवळ आला! दुकानाचं नाव दमयंती! कुणा भारतीय माणसाचं दुकान असेल, असं वाटून आत गेलो. दुकानाच्या शो केसमध्ये पुतळ्याला सुंदर भारतीय कपडे घालून आजूबाजूला सुरेख हस्तकारागिरीच्या लाकडी वस्तू मांडलेल्या! तरंगतच आत गेलो. आत चौरसियांची बासरी लावलेली, राजस्थानी कारागिरीच्या तर्हेतर्हेच्या वस्तू मांडलेल्या. उदबत्ती, अत्तरं, बांगड्या, टिकल्या, मेंदी अशा वस्तू छोट्या कपाटात सुबक शिस्तीत मांडलेल्या. ते बघण्यात आणि कौतुकात आश्चर्यात बुडालेली असताना मागून आवाज आला, “नमस्ते! आप कैसे है?” डच उच्चारातलं हिंदी ऐकून ताडकन उडालेच.
इथल्या मानाने फार वयस्क नसलेली, किरकोळ बांध्याची एक डच स्त्री मागे उभी होती. आम्हाला तिच्या तोंडून हिंदी ऐकून बसलेला धक्का खट्याळ हसत बघत होती.
मेंदीने रंगवलेले खांद्यावर आलेले कुरळे केस, कपाळाला बारीक हिरवी की निळी टिकली, थंडीचे दिवस म्हणून अंगात काश्मिरी पद्धतीचा मोठा अंगरखा, हातात विविधरंगी अंगठ्या, दोन बांगड्या, गळ्यात टेराकोटाचं पेंडंट आणि प्रसन्न हास्य! मी तर घडाघडा हिंदीत सुरू झाले, तेव्हा हसत हसत मला थांबवलं आणि “अजून मी हिंदी शिकते आहे” असं म्हणत इंग्लिशमध्ये गप्पा सुरू झाल्या.
मेकलीनमध्ये तेव्हा इंग्लिश बोलणारी डच व्यक्ती सहजी सापडत नसे. माझी डच शाळा अजून सुरू व्हायची होती. त्यामुळे डच कळत नसेच. आल्यापासून कोणत्याही स्थानिक व्यक्तीशी संवादच झाला नव्हता. टीना सापडली आणि खर्या अर्थाने बेल्जियम कळायला सुरुवात झाली. स्थानिक लोकांशी अनौपचारिक मैत्री आणि स्थानिक भाषा जोवर येत नाही, तोवर त्या देशाचं अंतरंग खरंच कळत नाहीत. टीनासारख्या आणखी काही डच मित्रमंडळींमुळे आणि भाषा शिकल्यामुळे जे बेल्जियम समजलं, ते खूप रोचक होतं.
सवयीने टीनालाही जेवणाचं आमंत्रण देऊन आलो. तीही तेवढ्याच अनौपचारिक स्नेहाने घरी आली. हळूहळू मैत्री घट्ट झाली. घरी येणं जाणं, एकत्रित सहली वगैरे सुरू झाल्या. मला सुट्टी असेल तेव्हा तिच्या दुकानात जाऊन मी तासनतास गप्पा मारत असे. तिच्या दुकानाजवळच माझी लायब्ररी होती. तिथे आम्ही सोबत जात असू. कधी ब्रुसेल्सला सहज म्हणून फिरायला जात असू. तिच्यामुळे आणखी काही लोकांशी ओळखी, गप्पा होऊ लागल्या. डच शिकायला लागले, त्यात या गप्पांची खूप मदत व्हायची.
एकदा तिच्या दुकानात डचमधलं हनुमान चालिसा दिसलं. सहज बघितलं, तर अनुवाद म्हणून टीनाचं नाव! खरं तर ही एवढी मिरवायची गोष्ट, पण तिने स्वत:होऊन तोपर्यंत सांगितली नव्हती. मग त्याच्यामागची कथा समजली. नव्वदच्या दशकात ती भारत बघायला आली होती. तिथे एका गुजराती उद्योगपतीची ओळख झाली. पुढे संपर्क राहिला. ते उद्योजक अँटवर्पच्या काच/हिरे उद्योगाशी संबंधित होते, त्यामुळे सहकुटुंब येणं-जाणं असायचं. त्यांच्या पूर्ण कुटुंबाशी टिनाची मैत्री झाली. ती त्याच्या कुटुंबात जाऊन काही आठवडे राहिलीसुद्धा. हाडाची शिक्षिका हाडाची विद्यार्थिनी असल्याने आपली कुटुंबपद्धती, सणवार, तत्त्वज्ञान अशा शेकडो गोष्टी समजून घेताना भारावून गेली. परत आल्यावर जमेल तिथून जमेल तसा अभ्यास करत राहिली. एकदा त्या भारतीय मित्राने बेल्जियममधल्या सेकंड/थर्ड जनरेशन भारतीय मुलांना हनुमान चालिसा समजत नाही अशी खंत व्यक्त केली. तू डच भाषेत याचा अनुवाद करशील का? असं विचारलं. त्यासाठी लागणारी सगळी मदत मी करेन, असं त्या उद्योजकांनी सांगितल्यावर ही आनंदाने तयार झाली. त्यासाठी पुन्हा भारतात जाऊन काही महिने राहिली. अँटवर्पच्या विद्यापीठात हिंदी शिकायला सुरुवात केली. मद्य आणि मांसाहार सोडला. आणि अर्थात हनुमान चालिसाचा अनुवादही उत्कृष्ट केला!
टीना म्हणते त्या गोष्टी माझ्या आयुष्याला कलाटणी देणार्या होत्या. तोपर्यंत दोन मुलं, संगीतकार प्रोफेसर नवरा, शाळेतली नोकरी आणि आईवडील एवढंच जग होतं. पुढे दुर्दैवाने नवर्याला कॅन्सर झाला आणि तो त्यात गेला. हिच्या मते हनुमान चालिसा हा त्या काळातला माझा सर्वात मोठा आधार होता! त्यामुळे तिला आशावादी राहता आलं आणि परिस्थितीशी लढता आलं.
हनुमान चालिसाच्या निमित्ताने ती बेल्जियममध्ये असलेल्या अनेक भारतीय लोकांशी जोडली गेली. तिला भारतीय स्वयंपाक खूप आवडतो, म्हणून काहीबाही करायला शिकत असते. बॉलिवूड आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचं तिला वेड आहे. वेद, पुराण, उपनिषदे, रामायण, महाभारत यावर प्रेम आहे. भारतीय लोकांनी जगाला खूप काही दिलं आहे, याबद्दल तिची कृतज्ञता ती वारंवार बोलून दाखवत असते.
पण तिच्याशी बोलताना फार सावध राहावं लागतं. आपण एखादी गोष्ट भारतात कशी वाईट असं सांगायला गेलो की ती भारताची बाजू घेऊन आपल्याशी भांडायला लागते!
एकदा ती आणि मी तीन-चार तास अंतरावर असलेल्या समुद्रकिनारी जात होतो. ती गाडी चालवत होती. म्हणाली, “गाणी लाव.” मी तेव्हा नुकतंच आलेलं ‘कल हो ना हो’ लावलं, तर हिला ते गाणं ऑलरेडी पाठ झालं होतं! सगळी गाणी आम्ही मोठ्या आवाजात लावून बरोबरीने म्हणत तो प्रवास केला. मधेच ती म्हणाली, “मला ती गोष्ट सांग ना, तो देव राक्षसाला मारतो, घराच्या आत नाही आणि बाहेर नाही, दिवसा नाही आणि रात्री नाही!” त्यात काय एवढं.. म्हणून गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि सांगता सांगता भक्त प्रल्हाद आणि ध्रुव बाळ एकत्र कसे आले मला कळलंच नाही! तिने शांतपणे मला थांबवलं. “तू दोन गोष्टी एकत्र केल्या आहेस. ध्रुव बाळाची गोष्ट मला माहीत आहे” असं म्हणून ती पूर्ण गोष्ट सांगितली. वर मी कसा पुढच्या पिढीसाठी भारतीय कथांचा अभ्यास केला पाहिजे, अशी शिकवणीसुद्धा घेतली!
आपण भारतीय लोक आपल्या भाषा, साहित्य याबद्दल योग्य तो अभिमान बाळगत नाही, असं तिचं मत आहे. ती गमतीत म्हणायची की तिला सगळ्या भारतीय भाषा समजतात, कारण त्यात पन्नास टक्के शब्द आपण इंग्लिश वापरत असतो! कधीतरी तिचा पंचांग, महाभारत किंवा अशाच कुठल्यातरी विषयावर प्रश्न पडला म्हणून फोन यायचा. अनेकदा आम्हाला उत्तर माहीत नसायचं. ते शोधून सांगावं लागायचं, तेही संदर्भ पुस्तकाच्या नावासह. मगच तिचं समाधान व्हायचं.
एकदा ब्रुसेल्समध्ये भल्या मोठ्या चौकात कसली तरी निदर्शनं चालली होती. त्यावरून कसा कोण जाणे, काश्मीरचा विषय निघाला. टीना अत्यंत सहज “भारताला कटकट होतेय, तर भारत काश्मीर पाकिस्तानला का देऊन टाकत नाही?” असं बोलून गेली. मला काय झालं माहीत नाही, पण माझा आवाज चढला, तिला माहीत असलेली काश्मीर समस्या आणि मला समजलेली काश्मीर समस्या यातले फरक तिला मी सांगितले. यावर तिच्या पाकिस्तानी मित्राकडून समजलेली माहिती खूप वेगळी होती, असं कबूल करत माझ्या भावना दुखावल्या म्हणून सॉरी म्हणाली! असे वादाचे प्रसंग आमच्यात क्वचितच आले, पण माझे मुद्दे बरोबर असतील, तर ती सहज मान्य करायची.
टीना उत्कृष्ट चित्रकार आहे. जलरंगातली चित्रं तिला विशेष आवडतात. त्यामुळे भारतीय राजस्थानी कपडे, राजस्थानी कलाकुसरीच्या वस्तू यांच्या आकंठ प्रेमात बुडालेली आहे. त्या आवडीपोटी तिने शिक्षिका म्हणून निवृत्ती घेऊन राजस्थानी वस्तूंचं दुकान उघडायचं ठरवलं. त्यासाठी खूप कष्ट घेतले. त्या काळात मेकलीनसारख्या छोट्या गावात हिचं भारतीय दुकान असं किती चालणार! तरीही चिकाटीने सात-आठ वर्षं दुकान चालवत राहिली. पुढे तिच्या राजस्थानातल्या एजंटने तिला आर्थिक बाबतीत फसवलं आणि दुकान बंद करावं लागलं. हे सगळं तिने सांगितलं, तेव्हा तिच्या शब्दात कुठेही राग नव्हता. फसवलं गेल्याचं दु:ख मात्र होतं.
भारतावर तिचं फार प्रेम आहे. जर्मन, फ्रेंच, डच भाषेतले संस्कृतशी साम्य सांगणारे शब्द शोधून आम्हाला सांगणं हा तिचा छंद आहे.
आपले सणवार आणि रूढी-परंपरा या भारतीय लोकांपेक्षा फार वेगळ्या नाहीत, हे वारंवार सिद्ध करत राहायला तिला आवडतं. आपल्याकडे पितृपक्ष असतो, त्याच दरम्यान बेल्जियमचा ऑल सेंट्स डे असतो. हे लोक त्या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात, कुटुंब-मित्रमंडळी एकत्र जमा होतात आणि सगळे मिळून वाफल्स खातात. हे सगळं एक प्रकारचं श्राद्धच आहे, हे ती सांगते. पौर्णिमेला रात्री पाऊस असेल, तर पुढचा महिनाभर पाऊस असणार अशा अनेक लोकसमजुती तिच्याकडून कळतात. हे लोक एरवी अपल्यासारखं काका-मामा नातं जोडायला जात नाहीत, पण “मला टीनामासी म्हटलेलं आवडेल” असं तिने आम्हाला आवर्जून सांगितलं. आमच्या लेकीची तर ती टीनाआज्जी आहे. तिला स्वत:ला दोन मुलं आहेत. मुलगा घर आणि स्वत:ची पाच मुलं सांभाळतो आणि सून नोकरी करून घरात पैसा आणते, हे तिच्याकडून ऐकताना आपल्याच कुणी सुभद्राकाकू बोलताहेत असं वाटतं. मुलगी तिच्यापेक्षा खूप कमी शिकलेल्या जोडीदाराबरोबर राहते, यांचं तिला भयंकर दु:ख होतं. मुलीचं ते नातं तुटलं आणि ती युनिव्हर्सिटीत संशोधन करणार्या मुलाबरोबर स्थिर झाली, हे तिने मी भारतात होते तेव्हा मुद्दाम फोन करून सांगितलं. दर उन्हाळ्यात शंभरेक बाटल्या जॅम करणं आणि तो सगळ्यांना वाटत फिरणं तिचा आवडता उद्योग असतो. ‘टीना, मी इडली करतेय’ असा मेसेज केला की संध्याकाळी बाई जेवायला हजर असतात.
असं असलं, तरी ती पक्की बेल्जियन आहे. स्वत:ची स्पेस अत्यंत प्रिय असलेली. भल्यामोठ्या घरात ती एकटीच राहते. त्याच गावात तिची आई आणि मुलगीसुद्धा अशाच एकेकट्या राहतात. कोणालाही एकत्र राहण्याची सोय वाटत नाही. बेल्जियन लोक कोणत्याही बाबतीत अतिसावध आणि अतिचौकस असतात, तशी तीही आहे. ती फारशी धार्मिक नाही, पण गायला आवडतं म्हणून क्वायरमध्ये जाते. तिथल्या स्थानिक राजकारणात हिला खूप रस आहे. त्याबद्दल गॉसिप फार मनोरंजक असतं. आमच्या गप्पांमध्ये बेल्जियन राजाची सून किती पोरकट वागते इथपासून देशाच्या अमुक कोपर्यातल्या जंगलात तमुक फुलांचा बहर आलाय, तो बघायला जाऊ या इथपर्यंत आणि नातवंडं कशी संस्कारी नाहीत इथपासून आशा भोसलेच्या लाइव्ह कॉन्सर्टला तिने किती साड्या बदलल्या, इथपर्यंत वाट्टेल ते विषय असतात. तिने मोत्झार्ट, विवाल्दी, बाख अशा संगीतकरांचं संगीत ऐकायला शिकवलं. डचमध्ये असलेल्या उत्कृष्ट साहित्याची ओळख करून दिली. अशा अनेक गोष्टी आम्ही शिकत गेलो, तरी त्यात खाद्यसंस्कृती मात्र एकतर्फीच राहिली. एकदा तिच्याकडे तिने भारतीय जेवण करू या, म्हणून गेलो. मला म्हणे, “तू नुसती शेजारी उभी राहा.” मग बटरवर पाच-सहा भाज्या मोठे तुकडे करून घातल्या. पाणी घातलं. मीठ-मिरे घातले आणि मग वरून चांगली दोन चमचे मोहरी, जिरे, दालचिनी, वेलदोडे आणि हळद घातली. तो पदार्थ खाल्ल्यावर प्रत्येक वेळी जेवणाची जबाबदारी मी घेतली!
दोन वर्षं बेल्जियम, दोन वर्षं भारत असं आमचं चालूच होतं. त्या काळात तिचा संपर्क अजून टिकून आहे. ती घरातलीच असल्यासारखी हक्काने बोलते, तेव्हा परदेशात कोणी वडीलधारी व्यक्ती जवळ असल्यासारखं वाटतं. या वेळी बेल्जियम सोडताना तिने घट्ट मिठी मारली, त्यात भविष्यात होणार्या भेटीबद्दल कातर अनिश्चितता होती. तरीही आम्ही अजून युरोपातच आहोत हा दिलासाही तिने बोलून दाखवला.
तिच्या दृष्टीने आम्ही भारतीय म्हणून वेगळा आदर आहे. ती आणि तिच्यासारखे अनेक लोक आमच्याकडे भारताचे नागरिक म्हणून बघतात. त्यांच्या आमच्याकडून सांस्कृतिक सामाजिक अपेक्षा असतात, हे खरंच अनेकदा जाणवतं. एकदा एका दुकानात एका बाईचं तान्ह बाळ भयंकर रडत होतं, रांगतं बाळ जमिनीवर लोळत काहीतरी खोड्या करत होतं, तिला चार वस्तू घेऊन कधी एकदा दुकानाबाहेर जाईन असं झालं होतं. माझ्याकडे फार सामान नव्हतं, म्हणून मी तिला आवश्यक ती मदत केली. बाळाला उचलून घेतलं, सामान एकत्र करायला, बिलिंगला ठेवायला मदत केलं.. एवढी क्षुल्लक मदत. बाहेर आल्यावर ती बाई एकदम म्हणाली, “तू भारतीय आहेस का?” मी हो म्हणताच “हां, मला वाटलंच!” एवढंच म्हणाली. तिच्या नजरेत कृतज्ञता तर होतीच, तसाच भारतीय बाईकडून अशी मदत होणं स्वाभाविकच आहे असा दृष्टीकोनही होता.
खरं तर कोणत्याही देशात कोणाही परदेशी व्यक्तीबद्दल काही किमान अपेक्षा असतात. त्या व्यक्तीच्या देशाची जगात काय ओळख आहे यावरून त्या अपेक्षा ठरत असतात. त्या समजणं हा सांस्कृतिक देणावघेवाणीतला अत्यंत महत्त्वाचा बिंदू असतो.
आमच्यासारख्या कमी काळासाठी परदेशी राहणार्या लोकांच्या बाबतीत अनेकदा असं होतं की तिथेही फक्त भारतीय, त्यातही आपल्या राज्यातले लोक अशी वर्तुळं तयार होतात. त्यातच आपण इतके अडकून पडतो की ज्या देशात राहतोय, त्या ठिकाणची फक्त तांत्रिक माहिती आपल्याला होते. वर्ष-दोन वर्षं त्या ठिकाणी राहून अगदी बेसिक भाषा न येणं, रस्त्यांची नावं माहीत नसणं, सोबत काम करणार्या लोकांच्या नावाचा नेमका उच्चार समजून घेण्याचीही तसदी न घेणं, मुख्य सण माहीत नसणं, स्थानिक राजकीय पक्ष - अगदी मेयरसुद्धा माहीत नसणं, स्थानिक फळं, भाज्या, अन्नपदार्थ यांची ओळखही करून घ्यायची इच्छा नसणं अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. इतकं अलिप्त राहून काहीच साधत नाही. आर्थिक उन्नती फार तर होत असेल, पण अनुभवविश्व वाढण्याची एक संधी तिथं संपून जाते. शिवाय स्थानिक लोकांच्या नजरेत हे अमुक देशातले लोक इथं फक्त पैसे कमवायला येतात असा विचित्र दृष्टीकोन तयार होतो, ते वेगळंच.
एकदा टीनाने मला सांगितलं होतं, “तू जर सरकारी कामासाठी जात असशील, तर सगळी डच नावं नीट उच्चार करायला शीक. आपल्या नावाचा चुकीचा उच्चार हा इथल्या लोकांना अपमान वाटतो.” मला वाटलं, किती छोटी गोष्ट आहे ही.. पण मग लक्षात आलं की आपली भारतीय नावं अचूक उच्चारायला जमावेत, म्हणून ही मंडळीसुद्धा तेवढेच प्रयत्न करतात. ज्ञानेशला ध्यानेश, दानेश म्हणणारे भारतीय लोक आहेत, पण डच लोक नीट ज्ञ शिकून ज्ञानेशच म्हणणार. आपण तिथे परदेशी म्हणून वावरत असल्याने आपल्या वागण्या-बोलण्याकडे लोकांचं जरा विशेष लक्ष असतं. आपल्या स्वभावात थोडा मोकळेपणा, विश्वास, मैत्री आणि त्यांच्या देशाबद्दल आदर या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या की ते लोकही आपल्याला खुल्या मनाने स्वीकारतात.
भारतीय लोकांबद्दल डच लोकांना असलेल्या कुतूहलाचे खूप अनुभव गाठीशी आहेत. आमचे मैत्रीच्या प्रयत्नांना सुरुवातीला अजिबात दाद न देणारे शेजारी हळूहळू आमचे खूप जवळचे मित्र झाले. त्यात त्यांच्या भारताविषयीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येणे हा महत्त्वाचा धागा होता. हिंदू म्हणजे काय? लग्नविधीचे अर्थ, वेगवेगळे सण, निसर्गपूजा, भारतातली मीडिया दाखवत असलेली भीषण चित्रं, आदिवासी जीवन इथपासून ते दाहसंस्कार, मरणोत्तर जीवनाबद्दलचं तत्त्वज्ञान, धार्मिक ग्रंथ, आयुर्वेद, योग इथपर्यंत हजारो प्रश्न त्यांना असायचे. आम्ही उत्तरं दिल्यावर आमच्याबद्दल कौतुक असायचं. आमच्याकडे इतके लोक नेहमी येतात राहतात, जेवतात याचं नवल असायचं. आम्ही एवढे प्रवास करतो, घर इथून तिथे, तिथून तिथे नेतो याबद्दल भयंकर आश्चर्य असायचं. एकदा त्या मित्राला म्हटलं, “आम्ही जरा अमुक शहरात एका मित्राला भेटून येतोय.” त्यावर तो म्हणाला, “किती फिरता! कंटाळा येत नाही का? मला गाव सोडून किमान 15 वर्षं झालीत!”
एवढं नेमस्त जगणं बघायचं असेल, तर ते इकडेच बघायला मिळू शकतं. मी त्यांच्या घरी पहिल्यांदा गेले, तेव्हा त्यांच्या अपरिग्रही जगण्याच्या पद्धतीने भारावून गेले होते. चार खोल्यांच्या मोठ्या घरात एवढ्या कमी वस्तू. निवडक चित्रं, निवडक पुस्तकं. दिवसांत दोनच वेळा खाणं, इतर कोणतंही व्यसन नाही, मोबाइल आणि केबल टीव्हीची गरज नाही म्हणून तेही नाही. रोज पाच-सात किलोमीटर धावायला जाणार, मग कामाला जाणार. रोज संध्याकाळी टेबलवर मेणबत्ती लावून छान तयार होऊन जेवणार, स्वत:होऊन सोसायटीची चार कामं करणार, निवडक मित्र चिडून फार कुणी येणार-जाणार नाही, दर शनिवारी ठरावीक बेकरीतून ठरावीक ब्रेड, केक आणणार. दर वर्षी ठरावीक समुद्रकिनारी ठरावीक हॉटेलमध्ये सुट्टी म्हणून दोन आठवडे राहणार. त्यातच समाधानी. एवढं आनंदी पण अलिप्त जोडपं आमच्या लेकीत मात्र खूप गुंतलं होतं. आपण त्यांच्या वयाचे होऊ तेव्हा इतकं समाधानी असायला हवं, असं वाटत रहायचं.
या जोडप्यामुळे आम्ही वेगळ्या दृष्टीने जगाकडे बघायला शिकलो.
परदेशात कुटुंबसंस्था कमकुवत असते वगैरे आमचे समज बदलले. अशा चाळीस-पन्नास वर्षं संसार केलेल्या लोकांकडे बघून सरसकटीकरण करायचं नाही, हे समजलं.
आणखी एका मैत्रिणीबद्दल सांगावच लागेल. माझ्याच वयाची ही माझी मैत्रीण, पण किती भिन्न असावं तिचं जग! फिल्म इंडस्ट्रीत काम करून पैसे कमावून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. जोडीदार म्हणून आधी एक तरुण सहकारी होता, मग त्याच्याशी जुळलं नाही, म्हणून एका तरुण मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काही काळ राहिली. तेही तुटलं, म्हणून एकटीच राहायचं ठरवलं. पण स्वत:चं मूल हवं हा हट्ट मनातून जात नव्हता. मग कृत्रिम उपाय, त्यासाठी डोनर शोधणं, त्या सगळ्या प्रक्रियेतून एकटीने जाणं ही तिची धडपड गेलं वर्षभर बघते आहे. वरकरणी अतिशय स्ट्राँग वाटणारी ही माझी मैत्रीण मनातून खूप गोंधळलेली असते. अत्यंत असुरक्षित असते. तिच्यासाठी मी म्हणजे आदर्श जीवन असलेली मुलगी आहे. चांगला जोडीदार, चांगलं कुटुंब याबद्दल तिला फार कौतुक आहे. ज्या साध्या गोष्टी आपण गृहीत धरतो, त्यासाठी तिला करावा लागणारा संघर्ष बघताना वाईट वाटतं. तर ती जेव्हा मला भारतीय स्त्री जीवनाविषयी प्रश्न विचारते तेव्हा मी खूप अंतर्मुख होते. तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतात. आर्थिक स्वावलंबन, मुलींचं शिक्षण, अजूनही आपल्याकडे असणारा युरोपच्या तुलनेत खूप जास्त असणारा भेदभाव या गोष्टी आतून मान्य करताना मन अस्वस्थ होतं.
पण मला वाटतं, हे होणं योग्यच आहे. देवाणघेवाण म्हणताना दहा चांगल्या गोष्टी येणार, तशा चार वाईट गोष्टीही येणारच. डोळसपणे त्या मान्य करण्यात काहीही चूक नाही. ही वर दिलेली मित्रांची उदाहरणे प्रातिनिधिक म्हणता येतील. मुळात देशात काय किंवा परदेशात काय, असे अनेक चिकित्सक मित्रमैत्रिणी मिळणं ही फार भाग्याची गोष्ट असते. त्यातही परदेशी मित्रांमुळे तुम्हाला वेगवेगळे दृष्टीकोन कळतात, इतरांच्या चश्म्यातून स्वत:कडे बघता येऊ लागतं.
पंधरा वर्षांपूर्वी माझ्या देशातल्या उणिवा मी कुणा परदेशी व्यक्तीसमोर कधीच मान्य केल्या नसत्या. हा खिलाडूपणा या बाहेरच्या जगाने शिकवला. आपलं जग असं आपण ज्याला म्हणतो, ते किती मोठं असावं हे आपणच ठरवत असतो. त्यासाठी प्रयत्नही आपल्यालाच करावे लागतात. वरकरणी अशा अनुभवांच्या गाठोड्याचं फार मोल दिसत नसलं, तरी त्याचं प्रतिबिंब व्यक्ती म्हणून आपल्यालाच आपल्यात दिसत असतं.
परदेशात राहणं ही आता साधारणशी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधी म्हणून लोक तुमच्याकडे बघत असतात. त्या वेळी तुम्ही तिथं तुमच्या संस्कृतीचे प्रचारक म्हणून नव्हे, तर दूत म्हणून गेलेला असता, हे लक्षात ठेवावं लागतं. प्रचारकी वागण्याने कदाचित चार लोक प्रभावित होतील, अनुयायी जमतील, स्वत:चं श्रेष्ठत्व पटवून देण्यात यश मिळेल, पण आपला स्वत:चा विकास होणारच नाही. त्यात तुमची संस्कृती जगाला दिसणं जसं अपेक्षित असतं, तसं तिथल्या संस्कृतीशी नातं जोडून त्यातला चांगला अंश स्वत:मध्ये रुजवणं हेही तितकंच महत्त्वाचं. ते जमणं हे चांगली देवाणघेवाण करणार्या दूताचं लक्षण आहे. आपल्या संस्कृतीची माहिती, सार्थ अभिमान आणि दुसर्या संस्कृतीबद्दल तितकाच आदर आणि कुतूहल या दोन गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वर म्हटल्याप्रमाणे चांगला दूत होण्यासाठी आपल्या संस्कृतीचा किमान अभ्यास किती आवश्यक आहे, हे परवा धक्कादायक रितीने पुन्हा एकदा पटलं. नवीन ओळख झालेली माझीच देशभगिनी “मी माझ्या मुलांना रामायण, महाभारत दाखवणार नाही, कारण त्यात भयंकर हिंसा आहे” असं म्हणाली तेव्हा मी थक्क होऊन निरुत्तर झाले! एकीकडे मानसिक शांतीसाठी योग-प्राणायामाच्या आणि भारतीय अध्यात्माच्या वाटेवर चालणारे अनेक विदेशी लोक दिसत असताना दुसरीकडे आपलेच असे दुसरे टोक गाठलेले अनेक लोक भवताली दिसतात, तेव्हा कुठेतरी दुखतं. आपण कमी पडतोय असं वाटतं.
बेल्जियमचा चारापाणी संपून आता आम्ही स्वित्झर्लंडमध्ये आलोय. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीने स्वित्झर्लंड भारताला दाखवलं. तेव्हापासून इथे येऊन स्थायिक होणार्या भारतीयांचा ओघ वाढला आहे. झुरीकसारख्या शहरात अनेक वसाहती भारतीय म्हणव्यात एवढे भारतीय इथे आहेत. एवढ्या लोकांना सामावून घेतलं, तरीही टुरिस्ट कंट्री अशी ओळख असणारा हा देश तितकाच कर्मठ कॅथोलिक म्हणून जगात ओळखला जातो. स्वर्गीय निसर्ग, बँकिंगसारख्या भरभक्कम व्यवसायाची साथ या जोरावर आपल्याच मस्तीत जगणारा हा देश आता समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी स्विस जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली आहे. शेजार्यांशी अंगणात उभं राहून थोडा वेळ गप्पा मारण्याएवढी मैत्री झाली आहे. हळूहळू इथेही नवं काही गवसत जाईल. हा प्रवासही शिदोरीत भर पाडणारा असेल. चांगली देवाणघेवाण होणारा असेल.