शिवसृष्टी साकारताना..

23 Oct 2021 15:16:17
पुण्याजवळील नर्‍हे आंबेगाव (बुद्रुक) या ठिकाणी 21 एकर जागेत शिवसृष्टी उभी राहत आहे. पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या श्वास आणि ध्यास असणारी ही शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठे ऐतिहासिक थीम पार्क असणार आहे. ‘शिवचरित्राचा प्रसार आणि प्रचार’ या उद्देशाने सुरू झालेले शिवसृष्टी निर्मितीचे काम आधुनिक तंत्रज्ञानाने आणि वास्तुरूपाने साकार होत आहे. विश्वकल्याणाचा मंत्र जागवणार्‍या प्रेरणापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनप्रसंग या शिवसृष्टीत साकार होत आहेत. शिवसृष्टीची आजची स्थिती आणि भविष्यातील स्वरूप याविषयी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांच्याशी केलेला संवाद...

babasaheb_11  H
आपण ही शिवसृष्टी पाहतो आहोत, त्याची मूळ संकल्पना कुणाची आहे?
 
 
ज्यांचा श्वास आणि ध्यास फक्त छत्रपती शिवराय आहेत, अशा पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून ही शिवसृष्टी साकार होत आहे. हे एका रात्रीत पाहिलेले स्वप्न नाही. सुमारे पन्नास वर्षांची अखंड साधना या प्रकल्पाचे अधिष्ठान आहे. 1967 साली एप्रिल महिन्यात बाबासाहेब पुरंदरे, राजमाता सुमित्राराजे भोसले, श्रीमंत प्रतापसिंहराजे भोसले, मुकुंदराव दाबके व इतर मंडळींनी एकत्र येऊन शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’ची स्थापना केली. उद्देश एकच होता - देशाच्या कानाकोपर्‍यात छत्रपतींचा इतिहास पोहोचवणे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून 1967नंतर अनेक उपक्रम झाले. त्यातील महत्त्वाचे उपक्रम सांगायचे, तर शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षे झाली, त्या निमित्ताने 1974 साली मुंबईच्या शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) बाबासाहेब पुरंदरे यांनी अस्थायी स्वरूपाची शिवसृष्टी साकार केली होती. अनेक उद्योजकांनी, कलावंतांनी, राजकारणी मंडळींनी या शिवसृष्टीला भेट दिली. महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकाच जागी शिवकार्य आणि शिवकाळ अनुभवता आला. यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा सूचना केली होती की, महाराष्ट्रात स्थायी स्वरूपाची शिवसृष्टी उभारली जावी. यशवंतरावांनी सूचना केली आणि बाबासाहेबांच्या मना-मेंदूत ती घट्ट रुजली. शिवसृष्टी हाच बाबासाहेबांचा ध्यास झाला. राज्यात आणि देशात विविध ठिकाणी शिवव्याख्याने देऊन त्यांनी निधीसंकलनास सुरुवात केली. 1985च्या 14 एप्रिलला - म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्ताने बाबासाहेबांनी ‘जाणता राजा’ हे महानाट्य साकार केले. आतापर्यंत त्यांचे बाराशेपेक्षा जास्त प्रयोग झाले. त्यातून येणारा सर्व निधी शिवसृष्टीसाठी जमा होऊ लागला. ‘जाणता राजा’ या महानाट्याचा पहिला प्रयोग पुण्यात झाला होता. एका बाजूला अशा प्रकारे निधीसंकलन सुरू असताना दुसर्‍या बाजूला जागेचा शोध चालू होता. 1995 साली महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार आले. या सरकारने प्रतिष्ठानला नर्‍हे आंबेगाव (बु.) येथे 21 एकर जमीन शुल्क आकारून खरेदीने दिली. खरे तर शिवरायांचा संपूर्ण इतिहास साकार करायचा, तर शेकडो एकर जमीन कमी पडेल. परंतु उपलब्ध 21 एकर जागेत जास्तीत जास्त शिवचरित्र आणि शिवकाळ साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
  
babasaheb_7  H
 
सन्माननीय बाबासाहेबांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वयातही ते शिवध्यासाने भारावलेले आहेत. शिवसृष्टी साकार करण्यासाठी बाबासाहेबांनी काही पूर्वतयारी केली आहे का?
 
हो. बाबासाहेबांनी खूप मोठी पूर्वतयारी केली आहे. ही शिवसृष्टी आधुनिक परिभाषेत केवळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित न होता प्रेरणा केंद्र, संस्कार केंद्र म्हणून विकसित व्हावे अशी संकल्पना बाबासाहेबांनी मांडली. छत्रपतींच्या दौलतीतील सर्व गड-किल्ले बाबासाहेबांनी पायाखाली घातले आहेत. प्रतिष्ठानने राहुल चेंबूरकर यांना बाबासाहेबांसोबत अनेक प्रवासांत पाठवले. बाबासाहेबांनी वर्णन केलेल्या वास्तू, ठिकाणे यांची राहुल चेंबूरकर यांनी रेखाटने काढली. 21 एकरांच्या मर्यादित क्षेत्रात शिवसृष्टी उभी करताना पुराव्याच्या आधारे शिवसृष्टी साकार व्हावी, अशा पहिल्यापासूनच आग्रह राहिला आहे. राहुल चेंबूरकरांनी रेखाटलेली चित्रे तपासण्यासाठी प्रतिष्ठानने इतिहास संशोधकांची एक समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये स्वत: बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह निनाद बेडेकर, सदाशिव शिवदे, सदाशिवराव गोरक्षकर, रमा लोहकरे, प्र.के. घाणेकर, पांडुरंग बलकवडे, डॉ. सचिन जोशी, डॉ. अजित आपटे इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्या मदतीने रेखाटने नक्की केली आणि वास्तुरचनाकार केदार कुलकर्णी यांनी एकूणच प्रकल्पाचा आराखडा तयार केला. 21 एकर जागेचा पुरेपूर वापर करून साडेतीनशे वर्षांपूर्वीचा शिवकाल पुराव्यासहित साकार करण्याचा प्रयत्न येथे होतो आहे.
 
शिवसृष्टी प्रकल्पासाठी निधी

शिवसृष्टी प्रकल्पासाठी निधी देऊ इच्छिणार्‍यांसाठी बँकेचे तपशील
Maharaja Shivchatrapati Pratisthan Trust
State Bank Of India
Branch :- Ambegaon
A/C. No: 40355723518
IFSC Code: SBIN0011648
   
तुम्ही या प्रतिष्ठान आणि प्रकल्पाशी कसे जोडले गेलात? तुमचे सहकारी कोण कोण आहेत?
 
मी 1999 साली प्रतिष्ठानचा विश्वस्त झालो. राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या निधनानंतर एक जागा रिकामी होती. भविष्याचा विचार करता बांधकाम क्षेत्रातील ज्ञान असणारा विश्वस्त घ्यावा, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. त्यांनी शोध सुरू केला होता. अनेक नावे त्यांच्यासमोर होती. त्यामध्ये माझेही नाव होते. एक दिवस प्रतिष्ठानच्या कार्यालयात, विश्रामबाग वाड्याच्या पहिल्या मजल्यावरच्या कार्यालयात मला अरविंदराव खळदकर घेऊन गेले. मी अरविंदरावांसह पुणे जनता सहकारी बँकेत संचालक म्हणून काम करत होेतो. अरविंदरावांनी बाबासाहेबांना माझा परिचय करून दिला. बाबासाहेब दोन्ही हात उंचावून म्हणाले, “यावे, यावे, जगदीशराजे यावे.” तो माझ्यासाठी मंत्रक्षण होता. मी त्याक्षणी बाबासाहेबांचा झालो. माझ्या हेही लक्षात आले की, बाबासाहेब आजही 1630 ते 1680 याच कालखंडात जगत आहेत. तेव्हापासून मी प्रतिष्ठानच्या कामात आहे. सुरुवातीपासून या प्रतिष्ठानमध्ये मुकुंदराव दाबके, अण्णा कंग्रळकर, श्रीनिवास वीरकर, अमृतराव पुरंदरे, अरविंद खळदकर इत्यादी विश्वस्त होते. ही सर्वच मंडळी आपआपल्या क्षेत्रातील बाप माणसे होती. प्रत्येकाने आपले ज्ञान आणि सामाजिक प्रतिष्ठा शिवसृष्टीसाठी वापरली. याबरोबर मला आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीचा उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे स्व. अनिल माधव दवे. राज्यसभेचे ते खासदार होते. काही काळ मंत्री होते. ते आमच्या प्रतिष्ठानचे विश्वस्त होते. त्यांनी ‘जाणता राजा’ या महानाट्याचेे हिंदी प्रयोग संपूर्ण भारतात घडवून आणले. इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेत त्यांच्यामुळेच जाणता राजाचे प्रयोग झाले. त्याचप्रमाणे सुनील मुतालिक हे अभियंता आहेत. तेही आमच्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन तंत्र’ या विषयावर पीएच.डी. करणारे डॉ. अजित आपटे प्रतिष्ठानचे महासचिव आहेत. अनिल पवार व्यवस्थाप्रमुख आहेत. अशा अनेक सहकार्‍यांना सोबत घेऊन शिवसृष्टीची उभारणी होत आहे.
  
babasaheb_4  H
इथे 21 एकर परिसरात भव्य शिवसृष्टी साकार होते आहे, अशा प्रकारची स्मारके, प्रकल्प आपल्या देशात, परदेशात आहेत का? आपण त्याचा अभ्यास केला आहे का?
आपण साकारत असलेल्या शिवसृष्टीसारखी अनेक ऐतिहासिक स्मारके आपल्या देशात आहेत. उदयपूरजवळ 40 एकर जागेत राणा प्रतापांचा इतिहास साकारणारे भव्य स्मारक आहे. आपल्या देशाच्या तुलनेने आपल्याला परदेशात खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक स्मारके पाहायला मिळतात. बाबासाहेबांनी त्याचाही अभ्यास केला. युरोपात भव्य स्मारके आहेत, त्याचे कारण त्यांनी त्यांच्या पूर्वजांचा इतिहास, कागदपत्रे जतन केली. आपल्याला इथे पुराव्याशिवाय काहीही करता येत नाही. ब्रिटिशांनी रायगड जिंकला, त्यात सर्व कागदपत्रे जळून खाक झाली. आज आपल्याला छत्रपती कळतात ते मोघल, राजपूत, आदिलशहा, कुतुबशहा, इंग्रज यांच्याकडील पत्रव्यवहारातूनच. अंदाजे 350 कोटींचा हा प्रकल्प असून गेल्या एक हजार वर्षांतील एकमेवाद्वितीय राजाचे जीवन, कार्य आणि संदेश या शिवसृष्टीतून साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 
 
babasaheb_5  H
छत्रपतींच्या जीवनातील कोणते प्रसंग आणि दालने या शिवसृष्टीत असतील?
 
या प्रकल्पातून शिवचरित्र साकारताना ते जागतिक कीर्तीचे असणार, हे नक्की. महाराजांच्या जीवनातील असंख्य प्रसंग आहेत, ज्यातून कायम प्रेरणा मिळत राहते. असे अनेक प्रसंग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकार केले जातील. आम्ही महाराजांची रायगडावरील राजसभेची प्रतिकृती (65 हजार चौरस फूट) साकारत आहोत. प्रतापगडावरील भवानी मंदिराची प्रतिकृती उभारत असून तेथेच महाराष्ट्रातील प्रमुख देवतांच्या मंदिराच्या प्रतिकृती असतील. शिवसृष्टीमध्ये एक रंगमंच निर्माण करत असून त्यात महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून (व्हर्च्युअल रियालिटी) साकार होणार आहेत - उदा., आग्य्राहून सुटका, पावनखिंडीतील लढाई, महाराजांचे आरमार इत्यादी गोष्टींबरोबरच राजमाचीवरील तोफेचा अनुभव शिवभक्तांना घेता येईल. महाराजांची दूरदृष्टी आणि नीती यांचे दर्शन घडवणारे अनेक प्रसंग, घटना शिवसृष्टीमध्ये समाविष्ट असणार आहेत.
 
 
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 350 वर्षांपूर्वीचा कालखंड कशा प्रकारे साकार होणार आहे?
 
babasaheb_9  H
 
शिवसृष्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात तुम्ही 350 वर्षे मागे जाल. शिवसृष्टी 21 एकर जागेत विस्तारलेली आहे. या परिसराची दगडी तटबंदी, बुरुज आणि सरकारवाडा पाहिले की हे लक्षात येते. हे बांधकाम करताना पुढील कमीत कमी शंभर वर्षे ते टिकून राहील, याचा विचार केला आहे. हा परिसर लक्षात घेता आम्ही भूकंपरोधक बांधकाम करत आहोत. इथे प्रवेश केल्यानंतर 17व्या शतकात गेल्याचा भास होईल, अशा प्रकारची रचना आपण निर्माण करतो आहोत. शिवसृष्टीच्या रंगमंडलात विविध प्रसंग साकार होणार आहेत. विविध प्रकारची आधुनिक तंत्रज्ञाने वापरून हे आपण साकार करत आहोत. संजय दाबके यांनी अशा प्रकारचे तंत्रज्ञान पुण्यात आणले आहे. त्यांनी आधी डिस्ने वर्ल्डमध्ये काम केले आहे. शिवसृष्टी उभारताना आपल्याला त्यांच्या अनुभवाचा उपयोग होतो आहे. इथे साकार होणार्‍या पावनखिंडीच्या लढाईत पर्यटक/शिवभक्त सहभागी होणार आहे. अडीच मजले उंचीवरून पर्यटक हा प्रसंग पाहू लागतील, तेव्हा त्यांना फाइव्ह-डी तंत्रज्ञानामुळे महाराजांचा पन्हाळा ते विशालगड प्रवास दिसेल. सिद्दी जोहरने केलेला पाठलाग दिसेल आणि पावनखिंडीत प्रत्यक्ष तुंबळ युद्ध सुरू होईल, तेव्हा अडीच मजले उंचीवर असणारे पर्यटक खाली येतील, त्यांच्यासमोर अगदी पाच-सहा फुटावर युद्ध सुरू असेल. अशा वेळी एक मावळा येईल आणि पर्यटकाला स्पर्श करून म्हणेल, “तुम्ही इथे काय करताय? निघा.” आधुनिक तंत्रज्ञानामुळे पर्यटकांना, शिवभक्तांना 350 वर्षे मागे घेऊन जाणे शक्य होणार आहे. आपण 65 हजार चौरस फुटाची राजसभा तयार करतो आहोत. त्या वास्तूच्या तळघरात डार्क राइड उभे करतो आहोत. आपण आशिया खंडातील सर्वात मोठे थीम पार्क निर्माण करतो आहोत. ‘डार्क राइड’च्या माध्यमातून शिवछत्रपतींची आग्य्राहून सुटका प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. त्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. शेती, पर्यावरण, राजभाषा, राजकोश, समाजकारण, न्याय, रस्ते इत्यादीसंबंधीची छत्रपतींची आदर्श तत्त्वे आणि नीती स्पष्ट करणार्‍या कलाकृती इथे पाहायला मिळतील. पुरंदरचा तह ते आग्रा भेट आणि आग्रा ते राजगड या प्रवासावर तेरा प्रसंग साकारणार आहोत. मुळात शिवसृष्टी उभारताना आमचा उद्देश हाच आहे की, छत्रपती काय होते? त्यांनी काय आदर्श कार्य केले? हेच आम्हाला पुढच्या पिढ्यांना दाखवायचे आहे.
 
 
babasaheb_6  H
शिवसृष्टीला आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी भेटी द्याव्यात यासाठी काय प्रयत्न करणार?
 
 
काही गोष्टी आम्ही ठरवून ठेवल्या आहेत. 350 कोटींचा हा प्रकल्प असून तो चार टप्प्यांत विभागला आहे. पहिला टप्पा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात पूर्ण करून लोकार्पण करण्याचा मानस आहे. आम्ही शिवसृष्टीची माहिती देण्यासाठी 2018 साली भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना भेटलो. त्यांनी आम्हाला सुचवले की, प्रकल्प पूर्ण करुन त्याचे लोकार्पण करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने काम पूर्ण होईल तसे प्रत्येक टप्प्याचे लोकार्पण करा. लोक पाहायला येतील. काही चांगल्या सूचना करतील. त्यांचा पुढील कामात उपयोग होईल. आम्ही तसाच विचार केला आहे. पुणे हे राज्याचे सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक व आयटी केंद्र आहे. त्यामुळे पुण्यात आंतरराष्ट्रीय व्यक्ती येतात. आज पुण्यात येणार्‍या व्यक्तीला शनिवारवाडा, केळकर वस्तुसंग्रहालय, सिंहगड इत्यादी पर्यटन केंद्रे उपलब्ध आहेत. त्यात आता शिवसृष्टीची भर पडेल. आम्ही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी जोडून घेतले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सचिव पातळीवरच्या अधिकार्‍यांसमोर आम्ही प्रकल्पाचे सादरीकरण केले आणि ‘मेगा टूरिझम प्रोजेक्ट’ म्हणून मान्यता मिळवली. ही मान्यता मिळाल्यामुळे शासनाच्या वतीनेही वेळोवेळी, देश-विदेशात प्रकल्पाची माहिती प्रसिद्ध होईल. जेव्हा जेव्हा पर्यटन महामंडळाचा पर्यटन महोत्सव होईल, तेव्हा तेव्हा त्यांच्या वतीने शिवसृष्टीचा प्रचार आणि प्रसार होईल. आम्हीही ‘जाणता राजा’या महानाट्याचे प्रयोग करतो, तेव्हा तेव्हा मध्यंतरात शिवसृष्टीची माहिती देत असतो. त्यामुळे शिवसृष्टीचा विषय देश-विदेशात पोहोचतो आहे. आम्ही जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत.
 
 
babasaheb_3  H
चार टप्प्यांपैकी आज कोणता टप्पा पूर्ण झाला आहे?
 
 
शिवसृष्टीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सरकारवाडा बांधून पूर्ण झाला आहे. भवानी मंदिराचे आणि राजसभेचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. लवकरच ते पूर्ण होईल. भविष्यात येथे दररोज 15 हजार लोक येतील, हे लक्षात घेऊन वाहनतळाची व इतर गोष्टींची उभारणी सुरू आहे. गेली बारा वर्षे आम्ही येथे घोडेस्वारी शिकवतो आहे. येथे जे वाहनतळ उभारले जात आहे, त्याच्या छतावर पुढे घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले जाईल. आगामी पाच-सहा वर्षांत पूर्ण प्रकल्पाचे लोकार्पण व्हावे, या दिशेने आमचे प्रयत्न चालू आहेत.
 
 
भव्य शिवसृष्टीतून छत्रपतींचा इतिहास साकारून तुम्ही समाजासमोर कोणता संदेश ठेवणार आहात?
 
 
गेल्या एक हजार वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा झालेला नाही. आपण जेव्हा छत्रपतींच्या स्वराज्याचा अभ्यास करतो, तेव्हा हे आपल्या लक्षात येते. अठरापगड जातींच्या लोकांनी महाराजांसाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली आहे. इथे निर्माण होणारी ही शिवसृष्टी ही एका जातीची, समाजाची न होता अखिल विश्वाला कल्याणाचा मार्ग सांगणारी व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. ही शिवसृष्टी केवळ पर्यटन स्थळ न होता प्रेरणाकेंद्र, संस्कारकेंद्र व्हावे अशी आमची इच्छा आहे. ‘भ्रातृभाव’ हा छत्रपतींच्या कार्याचा आत्मा आहे. तो पुन्हा नव्याने अधोरेखित करून देशाच्या विकासात प्रत्येकाचा सहभाग कसा राहील याचा संदेश या शिवसृष्टीतून मिळावा, अशी अपेक्षा आहे.
 
babasaheb_8  H
 
21 एकर परिसरात विस्तारलेल्या या शिवसृष्टीला पुढील काळात खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता राहणार आहे. एका अर्थाने शिवसृष्टीतून काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहे, त्याविषयी काय सांगाल?
 
 
शिवसृष्टीतून खूप मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होणार, हे नक्कीच आहे. आम्ही जेव्हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे ‘मेगा टूरिझम प्रोजेक्ट’ सादर केला, तेव्हा किमान 300 लोकांना रोजगार उपलब्ध होईल का? हा एक निकष होता. तो पूर्ण होईल. त्याचप्रमाणे आसपासच्या परिसरात हॉटेल्स, लॉज, रिक्षा, टॅक्सी इत्यादींनाही व्यवसाय उपलब्ध होईल. शिवसृष्टी पूर्णपणे आकाराला येईल, तेव्हा प्रत्येक दालनाला स्वतंत्र व्यवस्थापन, तंत्रज्ञ असेल. ती गरज लक्षात घेऊन पुढील काळात आम्ही प्रशिक्षित व्यक्तींचा शोध घेऊ. 2006च्या विजयादशमीला या शिवसृष्टीचे भूमिपूजन झाले आणि 2007च्या वर्षप्रतिपदेला प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. सध्या अनिल पवार हे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात, तर विलास कोळी, श्रीकांत देशपांडे, अंबादास सामलेटी हे त्यांना मदत करतात. प्रतिष्ठानचे महासचिव डॉ. अजित आपटे हे शिवव्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. त्यांची याच विषयावर पीएच.डी. आहे. त्याचबरोबर केदार कुलकर्णी, राहुल चेंबूरकर इत्यादी तंत्रज्ञ मंडळीही सध्या काम करत आहेत. 1985पासून आम्ही सुमारे अडीचशे कलावंत आणि प्राणी सोबत घेऊन जाणता राजाचे प्रयोग करतो. त्यामुळे व्यवस्थापन क्षेत्रात आम्हाला काही अडचण येण्याची शक्यता वाटत नाही.
 
 
babasaheb_1  H
या महाप्रकल्पाला लागणारा निधी कशा प्रकारे गोळा करत आहात?
 
 
या महाप्रकल्पाला अंदाजे 350 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी निधीसंकलन करणे हे एक शिवधनुष्यच आहे आणि समाजबांधवांच्या, शिवप्रेमींच्या मदतीने आम्ही ते उचलणार आहोत. आता पहिला टप्पा पूर्णत्वाकडे जात असून त्याला पन्नास कोटी रुपये खर्च आला आहे. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र व्याख्याने दिली, जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग केले, त्यातून जो निधी जमा झाला त्यावर हे बांधकाम झाले आहे. पण एवढ्याने हे काम पूर्ण होणार नाही. पुढील टप्पे उभे करण्यासाठी खूप मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही विविध पर्यायांवर काम करतो आहोत. 2014 साली वांद्रे-कुर्ला संकुल (इरपवीर-र्घीीश्रर उेाश्रिशु) मुंबई येथे निवडक 400 लोकांसाठी आम्ही ‘जाणता राजा’चा प्रयोग केला. त्या प्रयोगाला उद्योजक, कलावंत, पत्रकार, राजकीय नेते यांना बोलावले होते. त्यांच्यासमोर आम्ही शिवसृष्टीची संकल्पना मांडली. त्यांना प्रकल्पासाठी निधी देण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे जाणता राजाचा 1000वा प्रयोग सरसंघचालक मोहनजी भागवत, मा. देवेंद्र फडणवीस, मा. चंद्रकांतदादा पाटील व अन्य मंत्रिगणाच्या उपस्थितीत झाला होता. 1001वा प्रयोग पुण्यात शिवसृष्टीच्या प्रांगणात केला. त्याला तत्कालीन सरकार्यवाह भय्याजी जोशी प्रमुख पाहुणे होते. 1002वा प्रयोग लंडनमध्ये झाला. या सर्वाचा परिणाम होतो आहे. अनेकांच्या सहकार्यातून शिवसृष्टीसाठी निधी मिळत आहे. काही उद्योजक शंभर एकर जागेत शिवसृष्टी साकार करून देण्यास तयार झाले होते. पण आम्ही त्यांना नम्रपणे नकार दिला आहे. कोण्या एका उद्योजकाची शिवसृष्टी न होता, सर्वसामान्य माणसांच्या सहकार्यातून, निधीतून ही शिवसृष्टी साकार करण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला नुकतेच सीएसआरचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे अनेक औद्योगिक संस्थांशी आम्ही निधीसाठी संवाद साधत आहोत. लाल किल्ल्यावर 2018 साली ‘जाणता राजा’चा प्रयोग हिंदीतून केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. तातडीने 25 कोटी रुपये मिळाले की प्रकल्पााचा पहिला टप्पा पूर्ण होईल. सरकारवाडा, भवानीमाता मंदिर हा पहिला टप्पा आहे. या पहिल्या टप्प्यात छत्रपतींचे एक भाषणही व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. उर्वरित निधी जमा करण्यासाठी आम्ही काही पर्याय शोधले आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण एक गौरव समिती स्थापन केली आहे. श्रीमती सुमित्रा महाजन त्या समितीच्या अध्यक्ष आहेत. मा. ज्योतिरादित्य शिंदे, विनय सहस्रबुद्धे, प्रमोद चौधरी, प्रतापराव पवार इत्यादी मान्यवर या समितीचे सदस्य आहेत. या मंडळींच्या मदतीने काही उपक्रम करून निधी उभा करणार आहोत. त्याचप्रमाणे समाजमाध्यमांचा उपयोग करून आम्ही ‘समूहनिधी’ उभा करणार आहोत. त्यासाठी 2.5 मिनिटांची एक चित्रफीत आम्ही तयार केली असून त्या माध्यमातून आम्ही समाजबांधवांना आवाहन करत आहोत. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. दर वर्षी आठ ते दहा लाख विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. अनेक नामवंत शिक्षण संस्था पुण्यात आहेत. त्यांच्याशी संपर्क करून आम्ही विद्यार्थ्यांसमोर आणि शिक्षकांसमोर विषय मांडणार आहोत. ‘ऑनलाइन’ पद्धतीने हे निधीसंकलन होणार आहे. त्याचप्रमाणे 1, 2, 3, 5 लाख रुपये निधी देणार्‍यांसाठी आम्ही शिवसृष्टी क्लब तयार करत आहोत. त्या क्लबच्या सदस्यांना वेळोवेळी विविध कार्यक्रमांत सहभागी करून घेण्यात येईल. शिवछत्रपती माझे आहेत आणि या शिवसृष्टीच्या उभारणीत माझाही खारीचा वाटा आहे, ही भावना समाजात जागवत आम्ही निधीसंकलन करू. मला खात्री आहे की, समाज शिवसृष्टीच्या उभारणीमध्ये भरभरून मदत करेल.
  
शिवसृष्टी पूर्ण झाल्यावर येथील व्यवस्था, अन्य गरजा यांचा कसा विचार केला आहे आणि शिवसृष्टीमध्ये खानपान व्यवस्था कशा प्रकारे असेल?
 
 
शिवसृष्टीच्या निर्मितीच्या संकल्पनेपासूनच हे नक्की होते की, शिवसृष्टीचे स्थान मोठ्या शहरालगत असावे. आता ज्या ठिकाणी शिवसृष्टी साकार होते आहे, ती जागा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4लगत असून पुणे शहराच्या जवळ आहे. पुणे येथे येण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाचे पर्याय उपलब्ध आहेत. संपर्काची चांगली व्यवस्था आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, त्याचबरोबर शिक्षण, उद्योग, आय.टी. इत्यादी क्षेत्रांतही पुण्याचा नावलौकिक आहे. त्यामुळे आवश्यक असणार्‍या सर्व सेवासुविधा सहजतेने उपलब्ध होतील. शिवसृष्टी पूर्णत्वाला जाता जाता आसपासच्या परिसरात हॉटेल्सची आणि निवासाची सोय निर्माण होईल. शिवसृष्टीसमोरून जाणारा कात्रज बायपास सहा पदरी करण्याचे मा. नितीन गडकरी यांनी मान्य केले. त्यांच्या स्वभावानुसार ते काम सुरू केले असून लवकरच पूर्णत्वाला जाईल. पीएमआरडीएने शिवसृष्टीच्या आसपासच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करून दिले आहे. जगभरातून शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी येणार्‍या मंडळींना आवश्यक असणार्‍या सर्व प्रकारच्या सेवासुविधा येथे उपलब्ध होतील. आपल्या शिवसृष्टीतून आपण साडेतीनशे वर्षांपूर्वीचा कालखंड साकारत आहोत. त्यामुळे स्वाभाविकपणे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे खाद्यपदार्थ, बाजार इत्यादींची निर्मिती करत आहोत. ‘कोकण कॅफे’ नावाने हे दालन असून महाराष्ट्रातील सर्व पारंपरिक पदार्थ येथे उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे शेतीचा, उंटस्वारीचा, घोडेस्वारीचाही अनुभव येथे घेता येईल.


babasaheb_3  H
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मानून महाराष्ट्रात आणि देशात अनेक मंडळी काम करतात, त्यांना शिवसृष्टीशी कसे जोडत आहात?
छत्रपतींना प्रेरणा मानून अनेक व्यक्ती, संस्था, संघटना काम करत आहेत. ही सर्वच मंडळी वेगवेगळ्या प्रकारे शिवचरित्राचा प्रसार आणि प्रचार करण्याचे शिवकार्य करत असतात. अशा संस्था-संघटनांपैकी अनेकांनी शिवसृष्टीशी जोडून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी शिवसृष्टीची संकल्पना समजून घेतली आहे. शिवाजीमहाराज हाच श्वास व ध्यास असणारे कोट्यवधी शिवभक्त गावापासून शहरापर्यंत सर्वत्र पाहायला मिळतात. अशा सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठी शिवप्रेमी संस्थांच्या, संघटनांचा नोंदणीकृत महासंघ स्थापन करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी विभागवार संपर्क सुरू केला आहे. महाराजांचा विचार जगणार्‍या मंडळींना एकत्र आणून त्यातून सामाजिक एकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल.


babasaheb_2  H
या निमित्ताने सा. विवेकचे वाचक आणि शिवप्रेमी, राष्ट्रप्रेमी मंडळींना आपण काय आवाहन कराल?
शिवसृष्टीचा पहिला टप्पा बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षातच लोकार्पण करण्याचा आमचा मानस आहे. केवळ बाबासाहेबांची जन्मशताब्दी आहे म्हणून नाही, तर आणखीही एक योग जुळून आला आहे - महाराष्ट्राला साठ वर्षे पूर्ण झालीत आणि देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शौर्याची, त्यागाची, संस्कारांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राकडून भारतमातेच्या चरणी एका राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी राजाचे चरित्र सांगणारा हा महाप्रकल्प अर्पण करण्याचा आम्हाला आनंद वाटेल. शिवसृष्टीच्या उभारणीसाठी लोक भरभरून देतील, देत आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणार्‍या विविध शक्यता आणि संसाधने आम्ही तपासून पाहात आहोत. ‘शिवसृष्टी निर्माण होणे ही तो श्रींची इच्छा’ असे आम्ही मानतो. स्वराज्याकडून सुराज्याकडे जाण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन शिवसृष्टीतून नक्की मिळेल, नजीकच्या काळात ही शिवसृष्टी पूर्णत्वास जाण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी, राष्ट्रभक्तांनी आणि समाजबांधवांनी शिवसृष्टीच्या पाठीशी उभे राहावे आणि प्रकल्प उभारणीतील आपला खारीचा वाटा उचलावा, असे मी या निमित्ताने विवेकच्या वाचकांना व शिवभक्तांना नम्र आवाहन करतो.
 

babasaheb_1  H
शिवसृष्टीच्या माध्यमातून आपण शिवशक्ती आणि शिवभक्ती साकारत आहात. त्याचा समाजावर, पर्यटकांवर, शिवभक्तांवर काय परिणाम होईल असे आपणास वाटते?
 
छत्रपती शिवाजी महाराज हे असे व्यक्तिमत्त्व आहे की, त्यांच्या जीवनाचा आजही देश-विदेशात अभ्यास होताना दिसतो. मात्र सर्वसामान्य माणसाला छत्रपतींच्या जीवनातील तीन-चार प्रसंगांपलीकडे ज्ञान नसते. शेती, अर्थकारण, पर्यावरण, राजकोष समाजकारण, भाषा इत्यादी विषयांतील महाराजांचे काम सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचले नाही. त्यांच्या निधनानंतर कोट्यवधी रुपयांची गंगाजळी स्वराज्यात होती. त्यांच्या व्यवस्थापन तंत्राचा आजही अभ्यास होतो. बीकेसीला जेव्हा आम्ही ‘जाणता राजा’चा प्रयोग केला, तेव्हा मुकेश अंबानी उपस्थित होते. प्रयोगानंतर ते म्हणाले की, “या प्रयोगातून मी तीन व्यवस्थापन सूत्रे शिकलो आहे.” अमेरिकेशी पंधरा वर्षे व्हिएतनामने झुंज दिली. त्यापाठीमागे महाराजांचा आदर्श आहे. महाराजांचा गनिमी कावा व्हिएतनामला उपयोगी ठरला. अशी अनेक उदाहरणे देता येतील. मीही माझ्या जीवनात शिवव्यवस्थापनाचा अनुभव घेतला आहे. 2020-2021 ही वर्षे कोरोनामुळे नकारात्मक मानसिकतेने ग्रासलेली होती. मी सप्टेंबर 2020मध्ये कोरोनाबाधित झालो आणि दीनानाथ हॉस्पिटलमध्ये सहा दिवस अ‍ॅडमिट झालो. या सहा दिवसांत मी बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेले ‘राजा शिवछत्रपती’ हे दोन खंडांतील चरित्र वाचून काढले. त्यातून माझी उर्जा पुन:प्रज्वलित झाली. आपल्या व्यवसायात, आपल्या सहकार्‍यांमध्ये हीच ऊर्जा कशी रुजवता येईल, याचा मी विचार करू लागलो. सातत्याने सहकार्‍यांशी चर्चा करू लागलो आणि त्याचा परिणाम म्हणून मी माझ्या राज पथ इन्फ्राकॉन प्रा.लि. या पायाभूत सुविधा उभारणीच्या क्षेत्रात काम करणार्‍या कंपनीच्या माध्यमातून कंपनीतील सहकार्‍यांना बरोबर घेऊन 30 व 31 मे 2021 या काळात एक जागतिक विक्रम केला. चोवीस तासांत आम्ही 39 किलोमीटर रस्ता बांधला. याआधीचा विक्रम केवळ 26 किलोमीटर्सचा होता. शिवरायांचा आदर्श, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि सर्व सहकार्‍यांच्या मनात जागवलेली भावना या गोष्टी मला शिवचरित्रातून मिळाल्या. त्यामुळे हा विक्रम मी करू शकलो. आपल्या भारताला रामायण-महाभारतासारखी आदर्शवत महाकाव्ये मिळाली. त्याचा समाजमनावर परिणाम होत असतोच. त्याला जोडून शिवचरित्र आणि शिवइतिहास संपूर्ण देशभर पोहोचला, त्याचा प्रसार झाला, तर प्रत्येक भारतीय ताठ मानेने जगेल आणि आपोआपच भारतमाताही वैभवाला जाईल.
 
मुलाखत - रवींद्र गोळे
9594961860
 
Powered By Sangraha 9.0