लल्लेश्वरी यांचा जन्म श्रीनगरपासून 11 किलोमीटरवर असलेल्या दक्षिण सिमपूर गावात झाला. लल्लेश्वरी बालपणापासूनच भगवान शंकराची भक्त होती, पण त्यांच्या मनावर अद्वैत सिद्धान्ताचाच मोठा पगडा होता. त्यांचे विचार अत्यंत थोर आणि उदारमनस्क होते. त्यांनी भगवान शिव, केशव आणि जिन अथवा बुद्ध यांच्यात कधीच भिन्नत्व मानले नाही.
आज काश्मीरची वेगळी ओळख आहे. पण भारताच्या सांस्कृतिक इतिहासात काश्मीर म्हणजे संस्कृत साहित्याचा ‘बालेकिल्ला’ होता. काश्मिरात अभिनव गुप्त, क्षेमेंद्र, उत्पल देव अशा अनेक सिद्धहस्त सरस्वतीपुत्रांनी देववाणी संस्कृत भाषेत त्यांची प्रकांड विद्वता दाखविणारे साहित्य निर्माण केले आहे. त्याच काळात संत लल्लेश्वरी यांनी सर्वसाधारण जनतेची बोलीभाषा असलेल्या काश्मिरी भाषेत आपल्या काव्याची रचना केली आहे आणि संत लल्लेश्वरी आजही काश्मिरी साहित्याचा एक महान दीपस्तंभ बनून उभी आहे. प्रसिद्ध पटकथालेखक वेद राही आपल्या ‘ललद्यद’ या कादंबरीत असे सांगतात, “काश्मिरी भाषेतील आद्य कवयित्री ललद्यद यांच्या काव्यात जी खोली आणि चरमोत्कर्ष दिसून येतो, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजही मोठमोठे काश्मिरी कवी आकांक्षा बाळगतात. त्या शिखराच्या ओढीने अनेक लोक तिकडे झेपावतात, पण तेथे जाऊन पोहोचण्याचे कुणाचेच स्वप्न अद्याप साकार झालेले नाही.”
कोण आहे बरे ही ललद्यद म्हणजेच लल्लेश्वरी नावाची कवयित्री, जी काश्मिरी साहित्याचे ‘गौरीशंकर’ बनलेली आहे! महाराष्ट्राच्या जनसामान्यांच्या वाणीत संत तुकाराम सामावलेले आहेत, त्याचप्रमाणे संत लल्लेश्वरी यांनी सर्वसामान्य काश्मिरी जनतेचे भावविश्व व्यापून टाकलेले आहे. आजही जम्मू-काश्मिरातील एखाद्या घरातील मुलीवर अत्यंत चांगले संस्कार झालेले दिसत असतील, तर लोक म्हणतात, “अगदी लल्लेश्वरीप्रमाणे आहे तुमची मुलगी!” जर एखाद्या सूनबाईला खाष्ट सासू मिळाली असेल, तर लोक त्या सासूबाईला नाव ठेवत असे म्हणतात, “अगदी लल्लेश्वरीची सासूबाई आहे झालं!” एखाद्या कंजूष माणसाने तुम्हाला मेजवानीचे निमंत्रण दिले असेल आणि तेथून आपण अर्धपोटी आला असाल, तर आपण त्या मेजवानीचे वर्णन ‘लल की थाल’ म्हणजेच ‘लल्लेश्वरीची थाळी’ असे करू शकता. काश्मीरमध्ये पश्मिना शाल प्रसिद्ध आहे. ती जर अतिशय चांगल्या प्रतीची असेल, तर लोक म्हणतात, “अरे वा! ही तर ललची कताई आहे!” यावरूनच लल्लेश्वरी यांनी काश्मिरी जनतेचे भावविश्व कसे व्यापून टाकले आहे, हे आपल्या लक्षात येते.
आपल्याला या सर्व वाक्प्रचारांचा अर्थ जाणून घ्यायचा असेल, तर संत लल्लेश्वरींच्या जीवनचरित्राकडे दृष्टिक्षेप टाकावा लागतो. भारतातील अन्य संतांप्रमाणे लल्लेश्वरींचे जीवनही बर्याचशा चमत्कारिक आख्यायिकांनी व्यापून टाकले आहे. पण लल्लेश्वरींना या आख्यायिका महान बनवत नसून त्यांचे कार्यकर्तृत्वच महान बनविते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
लल्लेश्वरी यांचा जन्म श्रीनगरपासून 11 किलोमीटरवर असलेल्या दक्षिण सिमपूर गावात झाला. लल्लेश्वरी बालपणापासूनच भगवान शंकराची भक्त होती. त्या काळात बालविवाहाची प्रथा असल्यामुळे, पद्मापूर (पाम्पोर) गावातील एका तरुणाशी वयाच्या बाराव्या वर्षीच लल्लेश्वरीचे लग्न लावून देण्यात आले. लल्लेश्वरीची सासूबाई म्हणजे खाष्टपणाचे दिव्य रसायन होते. लल्लेश्वरी स्वभावाने अगदी गरीब गाईप्रमाणे वागत असली आणि सासूच्या व नवर्याच्या अर्ध्या वचनात राहत असली, तरीही तिचा छळ केल्यावाचून सासूबाईला अन्न गोड लागत नसे. सुनेचा छळ करण्याबाबत तिची सासू अत्यंत कल्पक होती. घरात पंचपक्वान्नाचे भोजन असले, तरीसुद्धा ती लल्लेश्वरीला एक मोठा कटोरा भरून भात देत असे. तो मोठा कटोरा पाहून एखादा माणूस असा विचार करील की दिसायला एवढी सडपातळ असलेली लल्ला एवढा भात कसा फस्त करते बुवा! पण अंदर की बात वेगळीच असे. त्या कटोर्यात एक मोठा दगड ठेवून त्याला केवळ वरवरूनच भात फासलेला असे. त्यामुळे वास्तवात लल्लेश्वरीला अर्धपोटीच राहावे लागत
असे. याचे वर्णन करताना लल्ला सांगते -
होंड मारन या कठ ललि नीलवठ चलि न जांह॥
म्हणजे, घरात बोकड कापून जरी शिजवला, तरी लल्लाच्या कटोर्यात भाताने माखलेला दगडच ठेवला जाणार!
डॉ. कृष्णगोपाल आपल्या ‘भारत की संत परंपरा और सामाजिक समरसता’ या पुस्तकात असे लिहितात - ‘संत लल्लेश्वरी काश्मीरमधील ढेढवा जातीची मेहतर (भंगी) महिला होती. त्यांनी शैव मताची दीक्षा घेतली होती. त्या काळात काश्मिरातील बहुतेक शैव आचार्य हे ब्राह्मण समाजाचेच होते... भारताच्या पश्चिम भागातील चर्मकार समाजाची लोकसंख्या कैक लाखांत आहे आणि हे सर्व संत लल्ला यांच्याच पदांचे गायन करतात.’
संत लल्लेश्वरी यांच्या कार्यकर्तृत्वावर भाष्य करताना पं. परशुराम चतुर्वेदी असे म्हणतात - ‘काश्मिरातील एक स्त्री जिचे नाव लालदे अथवा लल्ला असे होते, ती उच्च कोटीची शैव संत म्हणून प्रसिद्ध आहे. ती ढेढवा मेहतर जातीची स्त्री होती. सामाजिक दृष्टीने निम्न वर्गातील मानले जाणार्या परिवारातील असूनही तिचे विचार मात्र अत्यंत उच्च दर्जाचे होते. ती शैव संप्रदायाचे अनुसरण करणारी एक भ्रमणशील भंगीण होती, मात्र धार्मिक मतभेदांपासून कटाक्षाने दूर राहात होती व तिने मांडलेले सिद्धान्त अत्यंत साधे, सोपे आणि समन्वयात्मक होते.’
लल्लेश्वरी यांचे महत्त्व आणखी एका दृष्टीने खूप मोठे आहे. लल्लेश्वरी यांचा अशा निवडक महान संतांत समावेश होतो, ज्या संतांना परंपरेनुसार हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही धर्मांच्या लोकांनी पूज्य मानले आहे. त्यांचे समकालीन सूफी संत नुरुद्दिन (वली) लल्लेश्वरी यांचा महिमा वर्णन करताना असे सांगतात -
लस पद्मानपोराची लल्ले तमिगले अमृत पिवा।
सोह सानी अवतार लेले त्युथ्य में वर दितो दिवा॥
म्हणजे, ‘पद्मापूरच्या लल्ला यांनी अमृतपान करून भगवान शिवाचे आपल्या चोहीकडे दर्शन केले आहे. हे प्रभो! ज्या सिद्धी त्यांना आपण सुलभपणे दिलेल्या आहेत, त्या मलासुद्धा द्याव्यात!’
भगवान शिव हेच लल्लेश्वरी यांचे आराध्य दैवत होते, पण त्यांच्या मनावर अद्वैत सिद्धान्ताचाच मोठा पगडा होता. त्यांची भूमिका सदैव समन्वयात्मक असल्यामुळे लल्लेश्वरी यांच्या साहित्याने हिंदू आणि मुसलमान यांना समानपणे आकर्षित केले आहे. त्यांचे विचार अत्यंत थोर आणि उदारमनस्क होते. त्यांनी भगवान शिव, केशव आणि जिन अथवा बुद्ध यांच्यात कधीच भिन्नत्व मानले नाही. आपल्या पदावलीतून लल्लेश्वरी सांगतात -
शिव वा कीशव वा जिन वा कमलजनाथ नाम दारिन युह
म अबलि कास्यतन बवरुज सु वा, सुवा, सुवा, सु॥
(ललद्यद ः पद - संख्या 61)
म्हणजे, शिव अथवा केशव अथवा बुद्ध (जिन) अशा कोणत्याही नावाने तुम्ही भगवंताला हाक मारू शकता. तो भगवंत मला अबलेला या भवरोगातून मुक्त करो!
लल्लेश्वरी यांनी सामान्यजनांना असा उपदेश केला, “सर्वव्यापी भगवान शंकरांचा जटासंभार एखाद्या जाळ्याप्रमाणे संपूर्ण विश्वाला आच्छादून टाकत आहे. तो शिवच प्रत्येक प्राणिमात्रामध्ये विद्यमान आहे. जरी तुम्ही या प्राणिमात्रांत भगवान शिवाचे दर्शन केले नाही, तर मरण पावल्यानंतर तुम्ही काय कराल?” आत्मा आणि हे नश्वर शरीर यातील भेद प्रत्येकांनी जाणून घेतला पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्या सांगतात -
शिव छुय ज्यावुल जाल वाहराविथ,
क्रंजन मंज छुय तरिथ क्यथ।
जिन्द नय वुछहन अद कति मरिथ,
पान मंज पान कड व्यचारिथ कथ।
(ललद्यद ः पद - संख्या 147)
ज्याप्रमाणे मराठीत अभंग आहेत, त्याप्रमाणे काश्मिरी भाषेत ‘वाख’ या नावाची छंदोबद्ध रचना असते. या रचनेच्या माध्यमातून केवळ चार पंक्तीत कवी आपला विचार मांडत असतो. लल्लेश्वरी आपल्या एका ‘वाख’ रचनेत सांगतात - ‘मी आपल्या गुरूंकडून केवळ एकच धडा शिकले आहे, तो म्हणजे बाहेरून आत पाहायला शिका. हाच तो आत्मसाक्षात्काराचा धडा आहे.’ काश्मिरी साहित्यात रूपा भवानी, हब्बा खातून, अरण्यमाल अशा अनेक कवयित्री आपल्याला आढळतात, पण यांपैकी कोणालाही लल्लेश्वरी यांच्याइतकी साहित्यिक उंची अथवा खोली गाठता आलेली नाही.
लल्लेश्वरींचा काळ म्हणजे काश्मीरचे शेवटचे हिंदू सम्राट राजा उदयन देव यांचा काळ होय. आपण हे सर्व विसरलो आहोत आणि आजकाल ‘कश्मीरियत’चा मंत्र जपत आहोत. खरी ‘कश्मीरियत’ म्हणजे म्हणजे संस्कृत आणि काश्मिरी भाषेतून व्यक्त झालेले अद्वैत तत्त्वज्ञानाचे वैचारिक धन आणि वारसा आहे, याचाच विसर पडणे खेदजनक बाब आहे. आता काश्मीरमधील वातावरण पालटले आहे. तेव्हा हा प्राचीन वारसा आणि संस्कार पुन्हा जागृत करण्याचे कार्य व्हायला पाहिजे. या काश्मिरी ‘महदंबे’ची धवल कीर्ती जागवून आपल्या सांस्कृतिक मुळांचा परिचय काश्मिरी जनतेला करून द्यायला हवा. सूफी विचारधारासुद्धा याच काश्मिरी महदंबेचे दुग्धपान करून परिपुष्ट झालेली आहे, याला तर इतिहास साक्ष आहे. ज्यांचा आधी उल्लेख आला आहे, ते शेख नुरुद्दिन यांच्याबाबत काश्मिरातील हिंदू आणि मुसलमान समाजाला भरपूर आदर वाटत आला आहे. त्यांना हिंदू समाज ‘नंदॠषी’ या नावाने संबोधतो. यांच्याबाबतची आख्यायिका अशी आहे की, त्यांचा जेव्हा जन्म झाला होता, तेव्हा कित्येक दिवस त्यांनी आपल्या आईचे दूधसुद्धा प्यायले नव्हते. एके दिवशी संत लल्लेश्वरी भ्रमण करीत त्यांच्या घरी गेली आणि त्या नवजात शिशूला आपल्या मांडीवर घेऊन म्हणाली, “अरे बाबा, तुला आईच्या पोटी जन्म घेताना संकोच वाटला नाही, तर तिचे दूध पिताना काय लाज बाळगतोस!” असे म्हणून लल्लेश्वरी यांनी नुरुद्दिनला स्तनपान करविले. त्यामुळे आज आपल्याला ‘असली’ काश्मिरी मुसलमान म्हणवून घेणार्यांनी त्यांच्या वाडवडिलांचे पालनपोषण कुणाच्या दुधावर झालेले आहे याचा शोध घ्यावा, म्हणजे त्यांना आपली हिंदू मुळे उत्तम प्रकारे लक्षात येतील.
संत लल्लेश्वरी या महिला संत असल्या, तरी संत कबीरांच्या जीवनचरित्राशी साम्य सांगणार्या काही घटना त्यांच्या चरित्रांतही आपल्याला आढळतात. संत कबीर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे हिंदू आणि मुसलमान शिष्य आपापल्या प्रथेप्रमाणे अंतिम संस्कार करू इच्छित होते. जेव्हा कबिरांच्या पार्थिवावरून चादर हटविली गेली, तेव्हा तेथे मृतदेह नसून केवळ फुलेच आढळून आली होती, अशी आख्यायिका आहे. त्याप्रमाणे लल्लेश्वरीसुद्धा आपले 93 वर्षांचे दीर्घायुष्य जगून अदृश्य झाल्या असे मानले जाते. आपली इहलीला समाप्त करताना त्यांनी दोन तगारी मागविल्या होत्या. तगारी म्हणजे कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारी मोठी मातीची भांडी. एक भांडे लल्लेश्वरी यांनी आपल्या पायांखाली घेतले आणि दुसरे भांडे डोक्यावर घेतले. त्यानंतर बोलता बोलता लल्लेश्वरी अदृश्य झाल्या आणि दोन्ही भांडी एकमेकांजवळ आली. दुसर्या आख्यायिकेनुसार आपण लल्लेश्वरी यांचा संबंध थेट संत मुक्ताबाई यांच्या अवतारसमाप्तीशी जोडू शकतो. ज्याप्रमाणे संत मुक्ताबाई आकाशातील विजेच्या लोळात अंतर्धान पावल्या, अगदी त्याचप्रमाणे लल्लेश्वरी यांनी समाधी लावल्यानंतर त्यांच्या शरीरातून एक ज्योतिपुंज निघून आकाशात विलीन झाला आणि लल्लेश्वरी तेथेच अंतर्धान पावल्या. संतचरित्रांत अशा घटना सांगितल्या जातात. आपल्याकडेही ‘कुडीसहित झाला गुप्त तुका।’ अशी सर्वांची श्रद्धा आहे.
संतचरित्रांतील असल्या चमत्कारांच्या घटनांवर वाद घालण्यापेक्षा संतांनी जो विचार सांगितला, जे काही आचरण करून दाखविले त्याबाबत अधिकाधिक संवाद झाला पाहिजे. तरच या माध्यमातून समाजाचा खरा लाभ होईल असे वाटते. ‘उत्तम विचार खरोखर आचरण करून दाखवितो तोच खरा संत’ असे आपल्या हिंदूंचा धर्मग्रंथ श्रीमद्भगवद्गीता सांगते. माउली ज्ञानेश्वर महाराजांनीसुद्धा तीच उक्ती सांगितली आहे. याचा अनुनय करण्याऐवजी समाज केवळ चमत्कारशरण होतो. संतविचार पुन्हा पुन्हा अधोरेखित करून सांगणे यालाच खरे समाजप्रबोधन म्हणतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संत लल्लेश्वरी यांच्यासारख्या समाजप्रबोधकांनी आपल्या जीवनात हेच कार्य केले आहे आणि त्या संत पदवीला पोहोचल्या आहेत.
लल्लेश्वरी गर्जून सांगतात - ‘अर्थ समजून घेतल्यावाचून शास्त्रांचे पारायण करणे म्हणजे पिंजर्यात बसलेल्या पोपटाने ‘राम, राम’ अशी पोपटपंची करणे होय. अशा लोकांचे गीतापारायण म्हणजे खरोखर ढोंग आहे. मी तर खरोखर गीता वाचली आहे आणि ती आचरणात आणून दाखविली आहे.’ (ललद्यद ः पदसंख्या 126)
अन्य संताप्रमाणेच सत्य, अहिंसा आणि सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व मानून वागणे असाच उपदेश संत लल्लेश्वरी यांनीही केला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर हा एकच उपदेश सर्व शैव-वैष्णव संतांनी केला आहे, हीच गोष्ट संत लल्लेश्वरी यांच्या जीवनचरित्रातून अधोरेखित होते.