आकाशकन्या एअर मार्शल पद्मावती

19 Oct 2021 15:25:23
एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला एअर मार्शल आहेत. निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळखही निर्माण केली.

air india_1  H

नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम्।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥
भारतीय हवाई दलेचे आदर्श वाक्य आहे ‘नभ: स्पृशं दीप्तम।’
(श्रीमद्भगवद्गीतेतील 11/24वा श्लोक.)
 
महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धभूमीवरून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना आपल्या विराट रूपाचे दर्शन दिले, जे पाहून अर्जुनाच्या मनात भय आणि अशांती निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होऊ लागला. याप्रमाणे भारतीय हवाई दलाचे विराट रूप शत्रूच्या मनात भय आणि अशांती निर्माण करीत आहे. असे हे विराट सामर्थ्य असणार्‍या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय आहेत. खरे तर कुठलाही सैनिक आपल्या असाधारण शौर्य-पराक्रमाने प्रत्येक युद्धात शत्रूंचे निर्दालन करून या देशाचे संरक्षण करत कर्तव्य बजावत असतो. हवाई दलाचे प्रतिनिधित्व करणार्‍या एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय त्यातीलच एक आहेत. संरक्षण दलातील त्या पहिल्या महिला आहेत, ज्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मेडिसिन क्षेत्रात अद्वितीय कार्य केल्याने त्यांना 2020 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच 8 ऑक्टोबर - म्हणजे भारतीय हवाई दलाचा स्थापना दिन साजरा झाला.
 
 
तिरुपती येथील एका मध्यमवर्गीय तामिळ कुटुंबातील असल्याने, चाकोरीबद्ध आयुष्यात त्यांचे बालपण गेले. घरचे वातावरण बरेच धार्मिक होते. पुढे संपूर्ण कुटुंब दिल्लीला आल्याने वातावरणात थोडाफार बदल झाला. पण लहानपणापासून तामिळ आणि संस्कृत या भाषांवर प्रभुत्व असल्याने त्यांना हिंदी आणि इंग्लिश भाषा आत्मसात करायला थोडा वेळ लागला. अभ्यास करून आपल्या पायावर उभे राहावे यासाठी कुटुंबाचा आग्रह होता. पण हवाई दलाचे स्वप्न त्यांना खुणावत होते आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत, बिकट परिस्थितीत त्यांनी एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय ही ओळख सार्थ ठरवली.
 
 
एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला एअर मार्शल आहेत व त्रितारांकित अधिकार्‍यांची बढती मिळालेल्या भारतीय सशस्त्र दलातील त्या दुसर्‍या महिला आहेत. त्यांनी 1968मध्ये भारतीय हवाई दलात प्रवेश घेतला. पुढे 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना 1976 साली विशिष्ट सेवा पदक, 2002 साली अतिविशिष्ट सेवा पदक व 2006 साली परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले आहे. विंग कमांडर सती नाथ बंडोपाध्याय आणि एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय हे एकाच वेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय हवाई दलातील पहिले दांपत्य आहे.
 
 
पद्मावती बंडोपाध्याय यांची कारकिर्द यशस्वी आणि प्रेरणादायक आहे. एरोस्पेस मेडिकल सोसायटी ऑफ इंडियाची फेलो म्हणून पहिली महिला आणि उत्तर ध्रुवावर वैज्ञानिक संशोधन करणार्‍या पहिली भारतीय महिला हे विक्रम त्यांच्या नावाने आहेत. 1978मध्ये डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी त्या पहिल्या महिला सशस्त्र सेना अधिकारी आहेत. हवाई मुख्यालयात महासंचालक वैद्यकीय सेवा म्हणूनही काही काळ कार्य केले आहे. 2002मध्ये एअर व्हाइस मार्शल म्हणून पदोन्नती मिळणारी पहिली महिला म्हणून त्यांना मान मिळाला आहे.
 
 
एव्हिएशन मेडिसिन तज्ज्ञ म्हणून पद्मावती बंडोपाध्याय यांनी त्यांच्या 37 वर्षांच्या सेवेत सशस्त्र दलांच्या सुधारणेसाठी काम केले, वैद्यकीय संशोधन केले, जे प्रतिकूल परिस्थितीत सैनिकांसाठी मार्गदर्शक आहे आणि त्या कार्यात पूर्ण समाधानी आहे. त्या म्हणतात, “मी सेवेत जे काही केले, ते माझ्या सहकारी अधिकार्‍यांच्या प्रतिबंध आणि सुधारणेसाठी होते. माझ्या संशोधनामुळे, मला वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करायची होती जेणेकरून सशस्त्र दलांची कार्यक्षमता वाढेल.”
 
 
एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय न्यूयॉर्क अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सदस्य आहेत. निवृत्तीनंतरही त्यांनी स्वत:ला अनेक सामाजिक कार्यांत वाहून घेतले आहे. निवृत्ती स्वीकारल्यानंतर पूर्व उत्तर प्रदेशातील वंचित मुलांना वैद्यकीय आणि शिक्षण सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या करत आहेत. याच वैद्यकीय सेवेसाठी 2020 साली भारत सरकारने त्यांना भारताचा नागरी सन्मान ‘पद्मश्री’ प्रदान केला. एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय या भारतातील नागरी पुरस्कार प्राप्त करणार्‍या पहिल्या संरक्षण अधिकारी आहेत, कारण सशस्त्र दल नागरी सन्मानासाठी पात्र नाहीत.
 
 
त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया गौरवपूर्ण होती. त्या म्हणतात, “हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी नम्र आहे. हे अत्यंत दुर्मीळ आहे की एका संरक्षण अधिकार्‍याला सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळतो, परंतु मला वाटते की हे एक किंवा दोन दिवसांच्या कामासाठी नाही, तर आयुष्यभरासाठी आहे.”
 
 
एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला एअर मार्शल आहेत. निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळखही निर्माण केली. ढहश ङरवू ळप इर्श्रीश - ढहश चशोळीी ेष षळीीीं ङरवू अळी चरीीहरश्र या आत्मचरित्रपर पुस्तकांत त्यांचे अनेक पैलू वाचायला मिळतात. देशभक्ती कशी असायला हवी, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे एअर मार्शल पद्मश्री पद्मावती बंडोपाध्याय. त्यांच्या भावी कार्यास मनापासून सदिच्छा आहे.
 
Powered By Sangraha 9.0