परमभाग्य

08 Jan 2021 16:18:58

jay shree ram_1 &nbs

मंदिर हे अत्यंत पवित्र स्थान असते, म्हणून पादत्राणे मंदिराबाहेर काढून मंदिरात जायचे असते. मंदिरात देवापुढे ताजी, सुंदर, सुवासिक फुले वाहायची असतात. मंदिराचे पावित्र्य राखायचे असते. कारण मंदिरात देव असतो.

आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे देव तर दिसत नाही, तो निर्गुण, निराकार, अव्यक्त, असतो. पण आपले मन निर्गुणाची आणि अव्यक्ताची कल्पना करू शकत नाही. आपल्याला समोर एखादी प्रतिमा लागते.

देव हा नित्य आनंद देणारा, सुखाची सावली धरणारा, सर्व गुणांची खाण असतो. ही त्याची सर्व गुणसंपदा एखाद्या व्यक्तीमध्ये आपण पाहू लागतो आणि अशी व्यक्ती म्हटली की राम आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो.

राम म्हणजे निर्गुणाचे सगुण रूप, नित्यानंदाचे साक्षात दर्शन, सर्व दैवी गुणांचे आगर. मनुष्यरूपाने तो जन्माला आला आणि बरोबर येतानाच ही सर्व संपत्ती घेऊन आला.
 
म्हणून राजा राम श्रीराम झाला. मानवी जीवन जगताना आपण अधिकारांचा विचार करीत नाही, कर्तव्यांचा विचार करतो. मुलगा, पती, भाऊ, राजा, मित्र, पती, मार्गदर्शक अशा अनेक भूमिकांत देहधारी राम वावरला. त्याने या सर्व भूमिकांचे आदर्श उभे केले.

 
रामाची पूजा या आदर्शांची पूजा आहे, धनुर्धारी रामाची पूजा आहे. हे आदर्श आपण हजारो वर्षे जतन करून ठेवले. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे दिले. या आदर्शांतून चंद्रगुप्त, विक्रमादित्य, शिवाजी यांच्यासारखे महान राजे उभे राहिले. वाल्मिकी, विवेकानंद यांसारखे महान कवी आणि तत्त्वज्ञ उभे राहिले. आधुनिक काळात टिळक-गांधी उभे राहिले. रामआदर्श कसा जगायचा, ते त्यांनी जगून दाखविले.
 
अशा रामाचा जन्म अयोध्येत झाला. त्याचे जन्मस्थान पवित्र. तो ज्या भूमीत बागडला ती भूमी पवित्र, ज्या धुळीत तो खेळला, ती धूळही अत्यंत पवित्र, ज्या शरयूत त्याने स्नान केले, तिचे जल तीर्थ झाले.
 
अशा अयोध्येत आपल्या आदर्शांचे प्रतीक निर्गुण, निराकाराचे साकार रूप श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहतच आहे. प्रत्येकाच्या हृदयातील राम, होणार्‍या अयोध्येच्या मंदिरात विराजमान होणार आहे. युगानुयुगातून येणारा हा क्षण आहे. रामजन्मोत्सवाइतकाच हा आनंदाचा, मांगल्याचा, पावित्र्याचा सोहळा आहे.
 
प्रत्यक्ष राम जेव्हा आपण जगत होतो, तेव्हा आपण भारताला सुवर्णभूमी केले आणि जेव्हा रामाचा विसर पडत चालला, तेव्हा ही सुवर्णभूमी दारिद्य्रभूमी झाली. रामजन्मस्थानावरील राममंदिर हा सुवर्णयुगाकडे जाण्याचा प्रवास आहे. आपल्या हृदयातील रामाला बरोबर घेऊन जायचे आहे. जीवनात प्रत्यक्ष राम आणून जायचे आहे.
 
जन्मस्थानवर मंदिर उभे करण्याचा संकल्प यासाठी सोडण्यात आलेला आहे. हा दैवी संकल्प आहे. या दैवी संकल्पाचे आपण भागीदार होत आहोत. हे आपल्या सर्वांचे परमभाग्य आहे, युगायुगातून अत्यंत कष्टाने येणारे!
 
 
- रमेश पतंगे
Powered By Sangraha 9.0