आम्ही सन्मानित झालो

30 Jan 2021 17:47:21


RSS_1  H x W: 0

भटके विमुक्त समाजासाठी मोलाचे कार्य करणारे गिरीश प्रभुणे हे या विषयातील ज्ञानयोगी आणि कर्मयोगी दोन्ही आहेत. चिंचवड येथील गुरुकुलम पुनरुत्थान हे त्यांच्या कर्मयोगाचे दृश्य स्वरूप आहे. प्रभुणे यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान आहे. त्यांच्यासह या विषयात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे.

RSS_3  H x W: 0

गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची बातमी ऐकल्यानंतर 'आम्ही सर्व सन्मानित झालो' अशी माझी पहिली प्रतिक्रिया झाली, ती मी गिरीश प्रभुणे यांना कळवली. आम्ही सन्मानित झालो असे वाटण्याचे कारण असे की, गिरीश प्रभुणे यांना भटके आणि विमुक्त समाजातील मौलिक कामाची पावती म्हणून हा पुरस्कार प्राप्त झाला. या कामामध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणजे मी, दादा इदाते, सुखदेव नवले, मधुकर व्हटकर, चंद्रकांत गडेकर, माधवराव गायकवाड, अरूण दाते इत्यादी असंख्य कार्यकर्ते सहभागी होते. या सर्वांना मनापासून आनंद झाला.

विशेष मुलाखत : 'पद्मश्री' गिरीश प्रभुणे

 

आनंद होण्याचे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे अगदी काल- परवापर्यंत अशा पुरस्करांतून संघ विचारधारेतील कार्यकर्त्यांना खड्यासारखे वगळून बाजूला ठेवण्यात येत असे. बाजूला ठेवणारी मंडळी सार्वजनिक व्यासपीठावरून सर्वसमावेशकता, सहिष्णुता, याची वटवट करीत राहत असत, आचरण मात्र त्याच्याविरुद्ध करीत असत. ही परंपरा दिल्लीतील शासन बदलल्यामुळे मोडली गेली. संघ विचारधारेतील दिग्गज कार्यकर्त्यांना हे पुरस्कार मिळू लागले. गेल्या वर्षी काका कुकडे यांना पद्म पुरस्कार प्राप्त झाला.

गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला, याचा अर्थ असा की, शासनाने त्यांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांना सन्मानित केले आहे. आपण लोकशाही राज्यव्यवस्थेत राहतो. शासन लोकांचे प्रतिनिधित्व करते, शासनाने पुरस्कार देणे म्हणजे लोकांनी पुरस्कार देणे होय. हा जसा शासकीय सन्मान आहे तसा लोकसन्मानदेखील आहे. म्हणून या पुरस्काराचे महत्त्व फार मोठे आहे.



RSS_2  H x W: 0 

पुरस्कार मिळाल्यामुळे पुरस्कार प्राप्त व्यक्ती मोठी होते असे नाही. अशा व्यक्ती आपल्या कामामुळेच मोठ्या असतात. त्यांचे मोठेपण लोकशाही शासन व्यवस्थेने मान्य केले, असा याचा अर्थ झाला. गिरीश प्रभुणे यांच्या कामाचे मोठेपण समजून घेणे फार आवश्यक आहे. आपला समाज अतिप्राचीन आहे, वेगवेगळ्या सामाजिक व्यवस्थांत तो जगत असतो. भटके आणि विमुक्त हा समूह अतिशय वेगळा गट आहे. त्याचे वेगळेपण त्याच्या जगण्यात आहे, तसेच मुख्य समाजापासून त्याच्या तुटलेपणात आहे. हे असे का झाले, याची सामाजिक आणि ऐतिहासिक कारणे आहेत. गिरीश प्रभुणे यांनी त्याचा शोध घेतला. हे सगळे गट व्यापक हिंदू समाजाचे अविभाज्य अंग आहेत, याची मांडणी त्यांनी सातत्याने केली आहे.

आपल्या समाजरचनेत गावात राहणारा समाज, गावकूसाबाहेर राहणारा समाज आणि भटकंती करणारा समाज असे मुख्य तीन गट तयार होतात. उपजिविकेसाठी भटकंती करणाऱ्या समाजाकडे जमीन नसते. एका गावात स्थिरपणे राहणे त्यांच्या नशिबी नसते. सतत फिरत राहिल्यामुळे शिक्षण घेता येत नाही. त्यांचे वर्णन अकिंचन, अनिकेत, असाहाय्य असे केले जाते. त्यांच्या जगण्याचे प्रश्न अतिशय जीवघेणे आहेत. १९९० सालापासून संघ योजनेतून गिरीश प्रभुणे यांच्याकडे भटके आणि विमुक्तांचे काम देण्यात आले. आज २०२१ साल उजाडले आहे, तरीही त्यांचे हे काम अविरत चालू आहे. एवढी वर्षे गिरीश प्रभुणे हे काम शब्दशः जीव ओतून करीत आहेत.

संघाने एखादे काम सांगितले की, ते काम कसे करायचे याचा जिवंत आदर्श त्यांच्या रूपात पाहता येतो. पारधी समाजाच्या समस्यांपासून या कामाची सुरुवात झाली. यमगरवाडी येथे प्रथम भटके-विमुक्त मुलांसाठी वसतिगृह सुरू झाले. काही वर्षांनंतर मुलींचे वसतिगृह सुरू झाले. पहिली काही वर्षे पत्र्यांचे शेड आणि झोपड्या यात मुले, शिक्षक, कर्मचारी यांचा निवास राहिला आणि जवळजवळ पंधरा वर्षे प्रभुणे यमगरवाडीला या मुलांबरोबरच राहिले.

हे काम अतिशय अवघड काम आहे. आपल्या कष्टाने, स्नेह भावनेने आणि समर्पण वृत्तीने त्यांनी वेगवेगळ्या जमातींचा विश्वास संपादन केला. गिरीश प्रभुणेंचे ते 'काका प्रभुणे' कधी झाले हे आम्हाला कळलेच नाही. वस्त्या,पाड्यांतून त्यांनी केलेली भ्रमंती किती लाख किलोमीटरची झाली असेल हे सांगणेदेखील अवघड आहे. त्यांच्याबरोबर मी थोडा प्रवास केला. वसतीत गिरीशने पाऊल ठेवल्याबरोबर वसतीत एक चैतन्य निर्माण होत असे. 'काका आले, काका आले' असे म्हणत मुलामुलींचा घोळका त्याच्याभोवती होई. सगळ्यांची नावे त्याला माहीत असत, आपुलकीने विचारपूस होई.

RSS_1  H x W: 0 

पारधी समाज आणि पोलिसी अत्याचार यांचे घनिष्ठ नाते आहे. पोलीस अधिकारी आणि पारधी समाज यांच्या अनेक बैठका गिरीशने आयोजित केल्या होत्या. अशा बैठकांना एसपी आणि कलेक्टर उपस्थित राहत. पारधी समाज आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडीत असत. पारधी महिलादेखील न घाबरता बोलू लागल्या. त्यांचे प्रतिनिधित्व देवकाबाई शिंदे यांनी त्या काळात केले. गिरीश प्रभुणे यांनी मुक्या माणसांना वाचा दिली. पोलिसांना बघून डोंगर-दऱ्यात पळून जाणाऱ्या पारध्यांमध्ये आत्मबल निर्माण केले. त्यांचे पारधी पुस्तक मराठी साहित्यातील अक्षरलेणे आहे.

हे पुस्तक वाचून तेव्हाचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील खूप प्रभावित झाले. विचारांची झापडे बाजूला ठेवून, असहिष्णुतेला तिलांजली देऊन त्यांनी गिरीश प्रभुणेंशी संवाद साधला. पारधी समाजाच्या विकासासाठी काय केले पाहिजे, याविषयी चर्चा केली, काही योजना केल्या. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने हा विषय मागे पडला. कार्याचे यश तत्वगुणामुळे होते याचे प्रत्यंतर आले. नंतर श्री. गोपीनाथराव मुंडे यांनी पारधी आणि अन्य भटके विमुक्तांसाठी खूप भरीव काम केले. गिरीश प्रभुणे आणि दादा इदाते यांनी जे जे विषय सुचविले, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भटके विमुक्तांच्या समस्या जाणून घेतल्या. यमगरवाडी प्रकल्पातील शाळांना मान्यता दिली. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम शाळेलादेखील मान्यता दिली. राजदरबारी भटके आणि विमुक्तांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचे काम गिरीश प्रभुणे यांनी केले.

गिरीश प्रभुणे यांच्या भटकंतीमुळे नंदीबैलवाले, मरीआईवाले, गोंधळी, टकारी, मसणजोगी, बहुरूपी अशा सुमारे ४८ जमातींपर्यंत काम गेले. हिंदू समाजाच्या रचनेत ज्ञान होत गेले. डोकं सुन्न करणारे आणि मती गुंग करणारे प्रश्न समोर येऊ लागले. डॉ. हेडगेवारांचे एक वाक्य आहे 'समग्र हिंदू समाज आपला आहे, त्याची सुखदुःखे माझी आहेत' डॉक्टरांचे हे वाक्य जगावं लागत, गिरीश प्रभुणे यांनी हे वाक्य जगून दाखवलं. हे फार अवघड काम आहे. वस्त्या, पाड्यातून जाणे, तेथील अस्वच्छतेचा विचार न करता आनंदाने जेवणे, शाकाहाराच्या व्रताचे पालन करणे, असंख्य स्त्रियांशी संपर्क येऊनही आई, मुलगी, बहिण याप्रमाणे व्यवहार करणे, हे लिहायला खूप सोपे, पण आचरणात आणणे तेवढेच कठीण, त्याला योग्याची मानसिकता पाहिजे. गिरीश प्रभुणे भटके विमुक्त विषयातील ज्ञानयोगी तर आहेतच, तेवढेच ते कर्मयोगी आहेत.

त्यांचा ज्ञानयोग आणि कर्मयोग बघायचा असेल तर पुनरूत्थान समरसता गुरूकुलम, चिंचवड, येथे जाऊन यायला पाहिजे. तीनशे मुलामुलींचे वसतिगृह आणि शाळा तेथे आहे. सगळे भटके विमुक्त हे ज्ञानकार्मिक आहेत, परंपरेने त्यांना वेगवेगळी कौशल्य प्राप्त झालेली असतात. विविध औषधी वनस्पतींचे ज्ञान, दगडांच्या वेगवेगळ्या प्रकाराचे ज्ञान, प्राणी आणि पक्षी जीवनाचे ज्ञान, प्राण्यांच्या ठशांचे ज्ञान, लाकडांच्या विविध प्रकारांचे ज्ञान अशा अनेक ज्ञानशाखांचे ज्ञान आणि कौशल्य त्यांच्याकडे असते. इंग्रजांनी निर्माण केलेल्या शिक्षण पद्धतीचे सर्टिफिकेटस त्यांच्याकडे नसते, त्यामुळे आपण त्यांना मूर्खपणाने अज्ञानी समजतो. खरं म्हणजे ते ज्ञानी असतात आणि आपण अज्ञानी असतो. विवेकच्या एका कार्यक्रमात वैदू समाजातील काही जणांचा सत्कार केला होता. तेव्हा एका वैदूने श्रोत्यांमधील काहीजणांच्या नाड्या बघून त्यांना कोणता विकार आहे हे अचूक सांगितले होते, तेव्हा ऐकणारे थक्क झाले होते.

पुनुरूत्थान समरसता गुरुकुलम येथे पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे शिक्षण चालू आहे. भटके-विमुक्त समाजातील मुले आणि मुली ईशावास्योपनिषद तोंडपाठ म्हणून दाखवतात, आणि त्या संस्कृत श्लोकाचा अर्थही सांगतात. वाचून कुणाला खरे वाटणार नाही, पण तेथे जाऊन त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. हा लेख मी ३० जानेवारीला लिहीत आहे. महात्मा गांधी म्हणत असत की,

'ईशावास्यम इदं सर्वं यद्किंचित जगत्याम जगत|

तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृध कस्यविद्धनम||'

हा ईशावास्योपनिषदातील एक श्लोक राहिला तरी भारत जिवंत राहील. भारत जिवंत राहण्याचे, भारत घडविण्याच्या कार्य संघाच्या ज्या अनेक उपक्रमातून चालू आहे, त्यातील हा एक उपक्रम आहे. या साऱ्या प्रकल्पासाठी स्वतःचे जीवन पणाला लावणाऱ्या गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आणि पद्मश्री सन्मानित झाली.

- *रमेश पतंगे*

Powered By Sangraha 9.0