आपला मूळ स्वभाव

02 Jan 2021 18:13:16

विविध अंगांनी जीवन जगत राहणे ही भारतीयांची खासियत आहे. ती आज निर्माण झाली असे नाही, हा आपला परंपरेने प्राप्त झालेला वारसा आहे. राजकारणदेखील करायचे आणि त्याच वेळी सांस्कृतिक, धार्मिक उत्सव तेवढ्याच उत्साहाने साजरे करायचे. या सर्वात अंतर्विरोध आहे असे आपल्याला कधी वाटत नाही. जीवन आपण कधी एकांगी मानले नाही. आपला स्वभाव शंभर टक्के राजकीय नाही आणि तसा शंभर टक्के कर्मठ धार्मिकही नाही

 525353353_1  H

भारताची फारशी माहिती नसलेला युरोपच्या देशातील एखादा पत्रकार आज जर भारतात आला तर, भारताची राजकीय परिस्थिती बघून त्याचे डोके चक्रावून जाईल. एकाच वेळी दिल्लीच्या आसपास शेतकर्यांचे आंदोलन चालू आहे, त्याच वेळी काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या, त्या शांततेत पार पडल्या आणि त्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले. तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सहकारी त्यांना सोडून चालले आहेत, पुढच्या वर्षी बंगालमध्ये निवडणुका आहेत आणि मीडियाने आतापासूनच सांगायला सुरुवात केली आहे की, ममतादीदींचे काही खरे नाही. इकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेने मतदारांचा विश्वासघात करून हे शासन अस्तित्वात आणलेले आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये रोजच शब्दयुद्ध चालू असते.

 

तिकडे तामिळनाडूत पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. तामिळनाडू काँग्रेसमधून खुशबू सुंदर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. राजकीयदृष्ट्या ही महत्त्वाची बातमी झाली. प्रख्यात सिनेनट रजनीकांत हेदेखील राजकारणात उतरलेले आहेत. तामिळनाडूच्या राजकारणात बदल होण्याची वेळ आलेली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तामिळनाडूचे राजकारण आतापर्यंत जयललिता आणि करुणानिधी या दोघांत विभागलेले होते. आता दोघेही कालवश झालेले आहेत. रजनीकांत यांना असे वाटते की, तामिळनाडूत तिसरा पर्याय उभा राहिला पाहिजे. (हा लेख लिहून होईपर्यंत त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय बदलला असल्याचे वृत्त होते.)

हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश संपादन केले, याचे सर्वांना आश्चर्य वाटले. भाजपा उत्तरेचा पक्ष आहे, हिंदी भाषिक पक्ष आहे, दक्षिणेच्या लोकांना तो स्वीकारार्ह नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे, त्याला हैदराबाद निवडणूक निकालाने धक्का दिलेला आहे.

 

केरळमध्येदेखील भाजपाने आपले राजकीय अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. केरळमध्येदेखील एलडीएफ आणि यूडीएफ या दोन आघाड्यांतच राजकारण चालते. जनतेला आता या दोन्ही आघाड्यांचा कंटाळा येत चाललेला आहे आणि त्यामुळे आदिवासी लोकांनी आपली नवीन संघटना उभी केली आहे. ‘आदिवासी गोत्रा महासभाअसे तिचे नाव आहे आणि दलितांनीदेखील आपले नवीन संघटना उभी केली आहे. स्त्रियांनी तेथेपेंगल ओट्रिमलया नावाची एक नवीन राजकीय संघटना उभे केलेली आहे.

 

केरळपासून काश्मीरपर्यंत जर नजर टाकली, तर असे लक्षात येईल की प्रत्येक राज्यात राजकीय क्षेत्रात काहीनाकाही नवीन घडताना दिसत आहे. कुठे भाजपाचा प्रभाव वाढत चालला आहे, तर कुठे प्रादेशिक राजकीय गट उभे राहत आहेत. एमआयएम या मुस्लीम संघटनेचा राजकीय प्रभाव हळूहळू वाढत जाताना दिसतो आहे. हे सर्व चित्र पाहिले की, ज्याला भारताची माहिती नाही असा विदेशी पत्रकार गोंधळून गेल्याशिवाय राहणार नाही. तो असे म्हणू शकतो की, भारत म्हणजे गोंधळ, प्रचंड गोंधळ.


या
सर्व राजकीय वातावरणात धार्मिक कार्यक्रम आपल्या पूर्वीच्याच उत्साहाने साजरे केले जात आहेत. कोरोना विषाणूची भीती आहे, पण तरीदेखील मुंबईच्या बाजारपेठांत मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी जर कुणी फेरफटका मारला, तर त्याला महिलांचे महासंमेलन भरल्याचा अनुभव येईल. मंदिरे उघडी झाली आहेत, लोक देवदर्शनास जाऊ लागले आहेत. चैत्र महिन्यात यात्रा सुरू होतील आणि यात्रेमध्ये पूर्वीसारखीच गर्दी अनुभवायला मिळेल. एकाच वेळी राजकारण आणि धार्मिक रितीरिवाजही पूर्वीच्या उत्साहाने चालू आहेत. दूरदर्शन वाहिन्यांवरील मालिका पाहिल्या, तर सासू-सुनांची भांडणे, नवरा-बायकोची भांडणे, विवाहबाह्य संबंध यांची कथानके पूर्वीप्रमाणेच चालू आहेत. हे सर्व बघितल्यानंतर या देशाचा म्हणून एखादा स्वभाव आहे की नाही, असे पाहणार्या विदेशी माणसाला जरूर वाटेल.

अशा विविध अंगांनी जीवन जगत राहणे ही भारतीयांची खासियत आहे. ती आज निर्माण झाली असे नाही, हा आपला परंपरेने प्राप्त झालेला वारसा आहे. राजकारणदेखील करायचे आणि त्याच वेळी सांस्कृतिक, धार्मिक उत्सव तेवढ्याच उत्साहाने साजरे करायचे. या सर्वात अंतर्विरोध आहे असे आपल्याला कधी वाटत नाही. जीवन आपण कधी एकांगी मानले नाही. आपला स्वभाव शंभर टक्के राजकीय नाही आणि तसा शंभर टक्के कर्मठ धार्मिकही नाही.

काही वेळेला असे होते की, अनेक जण काही घटनांनी अस्वस्थ होतात. त्यांना असे वाटू लागते की, काय होणार? शेतकर्यांचे आंदोलन चालू आहे, मोदींच्या शासनाला त्यामुळे धोका निर्माण होईल का? एमआयएमची शक्ती वाढते आहे, पुन्हा फाळणीपूर्व परिस्थिती निर्माण होईल का? मुसलमान आक्रमक होतील का? मुसलमानांचा विषय असंख्य लोकांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असतो. मुसलमान किती वाईट आहेत, याचे अनेक व्हिडिओ अशी मंडळी सोशल मीडियावर टाकत असतात. कोरोना काळात मंदिरे बंद होती, तेव्हा हिंदू धर्माचे काय होणार? अशीही काळजी अनेकांना वाटू लागली. मग त्यांनीदेखील मंदिरे बंद करणार्यांविरुद्ध आपल्या बुद्धीप्रमाणे प्रचार सुरू केला.

राजकीय अंगाने विचार केला तर विविध प्रकारचे राजकीय प्रवाह निर्माण होणे, लोक राजकीयदृष्ट्या जागरूक होणे, आपल्या राजकीय अधिकारांसाठी त्यांनी संघटना बांधणे, पर्याय शोधणे या सर्व गोष्टी स्वागतार्ह मानल्या पाहिजेत. लोकशाहीचे मुळी वैशिष्ट्यच हे आहे की, राजकीय मते अनेक असतील आणि ती व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असेल. याला लोकशाहीचे स्पंदन म्हणतात. अशा स्पंदनातून समाज राजकीयदृष्ट्या प्रगल्भ होत जातो. मुख्य धारेतील राजकीय पक्षांना या सर्व विचारधारांचा विचार करावा लागतो आणि त्यांना आपल्यात सामावून घेण्याची लवचीकता ठेवावी लागते.

भारताच्या विविधतेचा विचार करता देश नीट चालण्यासाठी या सर्व विविधतेचे जतन आणि आदर करावा लागतो. सर्वांमध्ये समन्वय साधून पुढची वाटचाल करावी लागते. समन्वय ही आपली मूळ प्रवृत्ती आहे. कोणत्याही टोकाला जाणे हा आपला स्वभाव आहे. आज दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी एका टोकाला गेल्याचे दिसते. ते कोणतीही तडजोड करायला तयार नाहीत, अशी आजची परिस्थिती आहे. सरकार वाकायला तयार आहे. त्यांनी तशी पत्रही दिली आहेत. आंदोलनकर्ते मानायला तयार नाहीत.

ही अतिरेकी भूमिका शेतकरी आंदोलन करणार्यांना महागात पडेल. त्याचे कारण असे की, अतिरेकी भूमिका घेणे हा आपला स्वभाव नाही. तडजोडी करणे आणि त्यातून मार्ग काढणे ही आपली प्रवृत्ती आहे. याला आपण समन्वय म्हणतो. ज्यांना राजकारण करायचे आहे आणि सत्तेवर यायचे आहे, त्यांना समन्वयाशिवाय दुसरा मार्ग नाही. एमआयएम केवळ मुसलमानांचेच राजकारण करीत राहिली, तर तिला विशेष यश मिळणे शक्य नाही. त्यांनादेखील भारतीय समन्वयाचा अंगीकार करावा लागेल. समन्वयाचे मूल्य स्वीकारल्याशिवाय जाणविण्याइतके यश मिळणे अशक्य आहे.

 

महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाची जनशक्ती मोठी आहे, राजकीय शक्ती नगण्य आहे. याचे कारण असे की, समन्वयाचे मूल्य त्यांना अंगीकारता आले नाही. आपआपसातील फाटाफूट करून नेत्याप्रमाणे पक्ष उभे करून राजकीय यश मिळत नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आणि सामावून घेण्याची भूमिका घेतल्याशिवाय दिसेल इतके राजकीय यश मिळणे अशक्य आहे. अतिरेकी भूमिका जे घेतात, ते राजकारणात पुढे जात नाहीत.

 

आपआपल्या विविधता जपत आपल्याला वाटचाल करायची आहे. या विविधतांचे स्वरूप प्रादेशिकच राहणार. त्या त्या प्रदेशातील त्याचा आविष्कार तिथल्या लोकसंस्कृतीप्रमाणे होत जाणार. हे सर्व स्वीकारून सर्वांना एका माळेत गुंफण्याचे काम करण्यासाठी एक देशव्यापी शक्ती लागते. ही शक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामातून देशात उभी राहिलेली आहे. सर्व जातींच्या आणि धर्मांच्या लोकांना समान मुद्द्यांवर एकत्र करण्याची शक्ती या समूहात आहे. आज या शक्तीचे वर्णन करायचे, तर ही शक्ती या देशाच्या पाठीचा कणा होत आहे. पाठीचा कणा जेवढा ताठ, तेवढे शरीर ताठ राहते. देशात कितीही प्रकारचे गोंधळ दिसत असले, तरी त्याच्याकडे आपण कसे बघतो यावरून त्याचे मूल्यमापन ठरत असते. हे विविधतेचे आविष्कार आहेत या दृष्टीने त्याच्याकडे बघितले, तर त्या सर्वांचा सन्मान करून सर्वांना एका राष्ट्रीय सूत्रात कसे आणि कोणत्या मार्गाने आणता येईल याचा विचार करावा लागतो. म्हणून, वर्तमानपत्रांतून आणि दूरदर्शन वाहिन्यांवरून सातत्याने जे गोंधळाचे चित्र आपल्यासमोर येते, ते आभासी चित्र आहे, तो आपला मूळ स्वभाव नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

 


Powered By Sangraha 9.0