सरस्वती ही भारतीय संस्कृतीत विद्येची देवता मानली जाते. सरस्वतीचे पूजन ही इथली परंपरा आहे. ‘माझी माय सरसोती’ अशी बहिणाबाईंसारखी अनेकांची भावना असलेली ही पूज्य देवता आहे. तिला शोषणसत्ताकाचे प्रतीक समजणे यासारखे हास्यास्पद काही नाही. आधी हा पुरस्कार स्वीकारून आणि मग नाकारून डॉ. मनोहर यांच्या प्रसिद्धीचा परीघ वाढला असेलही, पण या सगळ्या घडामोडीतून विचारांचे खुजेपण, संकुचितता अधोरेखित झाली.
आतापर्यंत सुमारे 100 ग्रंथांचे लेखन करणारे डॉ. मनोहर हे आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे कट्टर पुरस्कर्ते समजले जातात. ते विद्रोही कवितेतले एक महत्त्वाचे नावही आहे. त्यांना डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे जे आकलन झाले आहे, तशी ते त्याची मांडणी करतात. तीच मांडणी योग्य असे समजायचे काही कारण नाही. किंवा अशा व्यक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणाने आकळले असा समज करून घेण्याचेही कारण नाही. सतत समाजात तेढ उत्पन्न करेल असे, अनेक कारणांनी जो वर्ग पिढ्यानपिढ्या दुर्लक्षित राहिला त्यांच्या मनात सुस्थापित वर्गाविषयी सातत्याने द्वेष पेरणारे साहित्य प्रसवणे आणि एक अस्वस्थता, परस्परांविषयीची तेढ कायम राहील असे पाहणे यातून समाजाला पुढे नेणारी कोणती क्रांती घडत असते?
डॉ. यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार स्वीकारायला नकार दिल्यानंतर त्यांची अलीकडची एक कविता वाचनात आली, हाथरस येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर लिहिली गेलेली. त्यातल्या काही ओळी अशा-
बंधो!
रामराज्य सुरू झाले आहे
उत्तरप्रदेश आता
प्रश्नप्रदेश झाला आहे रितसर.
सर्वच शूद्रांची आणि अतिशूद्रांची
डोकी छाटली जातील आता
समारंभपूर्वक.
सर्वच शूर्पणखांचे बेअब्रूकांड
सुरू झालेच आहे.
मनून्यायालय सुरू झालेच आहे
जातिनिहायच न्याय होईल
आता काटेकोरपणे
ज्या बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाची निर्मिती झाली, जिच्यातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे येथील राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे - मग ते कोणत्याही राजकीय विचारसरणीचे असले, तरी त्यांना ते बंधनकारक आहे ही बाब डॉ. मनोहर यांच्यासारख्या प्रज्ञावंताला, प्राध्यापकाला माहीत नसेल अशा भ्रमात आम्ही नाही. तरीही आपल्या प्रतिभेचा, प्रज्ञेचा उपयोग समाजगटांना जवळ आणण्यासाठी करण्याऐवजी हळूहळू कमी होत चाललेले सामाजिक भेद अधिक घट्ट करण्यासाठी करण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळत असावी?
त्यांची विचारधारा, त्यांचे विशिष्ट धाटणीचे साहित्यविषयक योगदान याची पूर्ण कल्पना असतानाही विदर्भ साहित्य संघासारख्या शतकमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या साहित्य संस्थेने त्यांना ‘जीवनव्रती’ पुरस्कार जाहीर केला. यातून या साहित्य संस्थेतील पदाधिकार्यांच्या मनाचा मोठेपणा आणि सर्व वैचारिक धारांतील साहित्याबद्दल त्यांच्या मनात असलेला आदरभावच दिसून येतो. हा पुरस्कार स्वीकारत असल्याचे संमतीपत्र पाठवून डॉ. मनोहर यांनीही योग्य प्रकारे प्रतिसाद दिला होता. इतकेच नव्हे, तर त्यांना हा पुरस्कार मिळाल्याप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या (व्यक्तिगत) सन्मानभोजनाचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले. तेथे झालेला सत्कारही स्वीकारला. मात्र त्याच दरम्यान, हा पुरस्कार स्वीकारण्याच्या त्यांच्या निर्णयाविरोधात त्यांना मानणार्या गटांतून बरीच टीका झाली. उर्वरित महाराष्ट्रात त्याची फारशी चर्चा झाली नसली, तरी तिथल्या वर्तुळात तिचे पडसाद उमटत होते. आपल्या बुद्धीला पटलेली, आवडलेली पण आपल्या चाहत्यांना, अनुयायांना न आवडलेली गोष्ट तशीच रेटून नेणे हे कदाचित डॉ. मनोहर यांच्या आवाक्याबाहेरचे असावे. आणि पुरस्कारासाठी दिलेली लेखी संमती, त्यानंतर केलेला स्नेहभोजनाचा स्वीकार यामुळे नकार देण्यासाठीचे ठोस कारण सापडेपर्यंत प्रत्यक्ष कार्यक्रमच येऊन ठेपला. तेव्हा सरस्वतीची प्रतिमा मंचावर ठेवण्याला त्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते, सरस्वती हे शोषणसत्ताकाचे प्रतीक आहे. अशा धर्माचे प्रतीक आहे, जो धर्म त्यांना मान्य नाही. विदर्भ साहित्य संघाच्या लोगोतही माता सरस्वतीचा उल्लेख आहे. त्यांच्या कार्यक्रमात सरस्वतीच्या प्रतिमेला हार घालून दीपप्रज्वलन होते, याचीही डॉ. मनोहर यांना संमतीपत्र देताना कल्पना असणारच. मग त्यांना अजिबात मान्य नसलेल्या या मुद्द्याकडे त्यांनी आधी का दुर्लक्ष केले असावे?
डॉ. मनोहर यांची मागणी जेवढी विपरीत, तेवढेच विदर्भ साहित्य संघाचे ठाम राहणेही कौतुकास्पद! पुरस्कारार्थीची अवाजवी इच्छा नाकारण्याचा ठामपणा त्यांनी दाखवला, ही निश्चितच नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे.
सरस्वती ही भारतीय संस्कृतीत विद्येची देवता मानली जाते. सरस्वतीचे पूजन ही इथली परंपरा आहे. ‘माझी माय सरसोती’ अशी बहिणाबाईंसारखी अनेकांची भावना असलेली ही पूज्य देवता आहे. तिला शोषणसत्ताकाचे प्रतीक समजणे यासारखे हास्यास्पद काही नाही. आधी हा पुरस्कार स्वीकारून आणि मग नाकारून डॉ. मनोहर यांच्या प्रसिद्धीचा परीघ वाढला असेलही, पण या सगळ्या घडामोडीतून विचारांचे खुजेपण, संकुचितता अधोरेखित झाली.
हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे असे म्हणून या विषयावर फुली मारावी अशीही सावध भूमिका काही जण घेतील. मात्र अशाने काळ सोकावतो, हे लक्षात घेतले पाहिजे.