सरकारी पातळीवर कोणताही निर्णय घेतला जात नाही किंवा नागरिकांना दिलासा मिळेल अशी कृती केली जात नाही. जे निर्णय घेतले जातात, ते केंद्र सरकारने सुचवलेले असतात. राज्याचा म्हणून स्वत:चा निर्णय अभावाने घेतला जात आहे. या आपत्तीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. राज्य सरकार सुस्त झाले आहे, मंत्रीमंडळातील सदस्यही निष्क्रिय झाले आहेत असा अनुभव येतो आहे. या वास्तवाला छेदून पुढे जावे लागेल, कारण हा कसोटीचा कालखंड सुरू झाला आहे.
कोरोना थांबता थांबत नाही. आटोक्यात आला म्हणता म्हणता चौथ्या अनलॉकनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून देशातील एकूण संख्येच्या ३५ टक्के रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, मुंबई, रायगड इत्यादी भागांतील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. कोरोना आपत्ती आटोक्यात आली म्हणून बरेच निर्बंध शिथिल करण्यात येत असताना, पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने समस्या गंभीर होत आहे हे लक्षात येते आहे. पुण्यात उपचाराअभावी एका पत्रकाराचा मृत्यू झाला. पत्रकार असल्यामुळे त्याची चर्चा खूप झाली. पण आजही असे अनेक रुग्ण मृत्यूच्या दारात उभे आहेत. त्यांना आवश्यक ते उपचार उपलब्ध झाले नाहीत. अशा अस्वस्थ काळात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे पवार कुटुंबाने 'कोरोना देवी'ची स्थापना करून तिचे गुणगान गायला सुरुवात केली आहे. 'कोरोना देवीच्या कृपेने आम्ही मुखपट्टी न वापरता, कोणतीही विशेष काळजी न घेता सुरक्षित राहिलो' असा त्यांनी दावा केला आहे. जेव्हा माणूस सर्व बाजूंनी हतबल होतो, तेव्हा अशा प्रकारे अंधश्रद्धांचा स्वीकार करू लागतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रश्न हा आहे की ही हतबलता का आली? याला कोण जबाबदार आहे?
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोरोना आपत्तीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काय करावे, याचे खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन केले आहे आणि ते आपल्या अंगवळणी पडले आहे, तरीही रुग्णांची संख्या वाढत आहे, याची कारणे काय आहेत? स्वत:बद्दलची बेफिकिरी यामागे आहे का? खाजगी रुग्णालयात होणारी लूट आणि सरकारी रुग्णालयातील अव्यवस्था यांच्या अडकित्त्यात अडकून बळींची संख्या वाढत आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाला स्वत:च स्वत:ची काळजी घ्यायला पाहिजे. या गोष्टीत हेळसांड सुरू झाली आहे. दोन व्यक्तींतील अंतर या गोष्टीला सुरुवातीपासून सामाजिक हळताळ फासला गेला, जोपर्यंत पोलीस प्रशासन दंडात्मक कारवाई करत होते तोपर्यंत पालन झाले. हा विषय स्वसंरक्षणाचा आहे हेच आपण विसरून गेलो आहोत. या कारणामुळेही रुग्णांची संख्या वाढत आहे.
एका बाजूला ही रुग्णांची संख्या वाढत आहे आणि महाराष्ट्र सरकार व्यवस्था करण्यात अयशस्वी ठरत आहे, हे लक्षात येऊ लागले आहे. कोणताही ठोस निर्णय घेण्यात या सरकारला यश आलेले नाही. जिल्ह्याजिल्ह्यात जी कोविड केअर्स सेंटर उभी केली आहेत, ती अवस्थेच्या चिखलात रुतून बसली आहेत. त्याबाबत प्रशासनाने काय भूमिका घेतली? कोविड काळात केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचा पुरवठा केला होता. गहू, तांदूळ, डाळ यांचे रेशनिंग दुकानांच्या माध्यमातून विनामूल्य वितरण व्हावे असे प्रयत्न झाले. या योजनेतही काळाबाजार सुरू झाला असून खूप मोठ्या प्रमाणात तांदूळ जप्त करण्यात आला. तांदळाचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकार अयशस्वी ठरले आहे. राष्ट्रीय आपत्ती असताना काळाबाजार सुरू राहतो आणि जोमाने चालतो, याच्यामागे कोण आहे? कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे? हे महाराष्ट्रातील तमाम जनतेला कळायला हवे.
सरकारी पातळीवर कोणताही निर्णय घेतला जात नाही किंवा नागरिकांना दिलासा मिळेल अशी कृती केली जात नाही. जे निर्णय घेतले जातात, ते केंद्र सरकारने सुचवलेले असतात. राज्याचा म्हणून स्वत:चा निर्णय अभावाने घेतला जात आहे. या आपत्तीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. राज्य सरकार सुस्त झाले आहे, मंत्रीमंडळातील सदस्यही निष्क्रिय झाले आहेत असा अनुभव येतो आहे. या वास्तवाला छेदून पुढे जावे लागेल, कारण हा कसोटीचा कालखंड सुरू झाला आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोरोना आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी जे प्रयत्न झाले, ते आता शिथिल होताना दिसत आहेत आणि त्याच वेळी पुन्हा वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभर ही संख्या वाढत असली, तरी महाराष्ट्रात ती खूप मोठी आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाला सजग व्हावे लागेल. आता सरकारवर अवलंबून न राहता स्वत:च स्वत:साठी संसक्षक ढाल निर्माण करायला हवी. हा काळ कसोटीचा आहे, हे लक्षात घेऊन आपण आपली स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. सरकार अयशस्वी ठरत आहे, म्हणून आपण शांत बसता कामा नये. या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी आपली मानसिकता आणि शारीरिक तयारी करून आपण ही लढाई जिंकायची आहे, हा आत्मविश्वास जागृत व्हायला हवा.