आर्थिक गुंतवणुकीचे अनेक पयार्य आहेत. त्यातीलच एक म्हणजे पोस्टाच्या विविध योजना. मोठ्या शहरात आथर्क गुंतवणुकीचे विविध पयार्य उपलब्ध असले तरी ग्रामीण विभागातील नागरिक अजूनही पोस्टांच्या योजनांमध्ये आपली बचत ठेवत असतात. पोस्टाची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांचा भारतातील कानाकोपऱ्यात झालेला विस्तार.
बचतीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील आयुर्विमा, म्युच्युअल फंड, शेअर बाजार याबद्दल मागील काही लेखांत आपण माहिती करून घेतली. असाच एक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासाचा बचतीचा मार्ग आहे पोस्टाच्या विविध योजनांमधील बचत. मोठ्या शहरातील मंडळी जरी याकडे दुर्लक्ष करीत असली, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पोस्ट ऑफिसेसचे जाळे विणले असल्याने ग्रामीण विभागातील नागरिक अजूनही या योजनांमध्ये आपली बचत ठेवत असतात.
पोस्ट ऑफिसेसची वैशिष्ट्ये
प्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी, तसेच इतरही अनेक लेखकांनी आपल्या लेखनातून पोस्टात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यथेच्छ टिंगलटवाळी केली असली, तरी देशाच्या अर्थव्यवस्थेत पोस्टाचे योगदान विसरून चालणार नाही. पोस्टाची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांचा भारतातील कानाकोपऱ्यात झालेला विस्तार. भारतात जवळपास ६ लाख खेडी आहेत आणि पोस्टाच्या शाखा आहेत १,५५,६१८ - म्हणजे जवळपास दर ४-५ खेड्यांत मिळून एक पोस्ट ऑफिस आहे. स्टेट बँकेच्या जवळपास २४,००० शाखा आहेत, तर रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार भारतातील सर्व बँकांच्या एकूण शाखा आहेत १,५६,३४१ - म्हणजे पोस्टाच्या जेवढ्या शाखा आहेत, तेवढ्या सर्व बँकांच्या शाखा आहेत, यावरून पोस्टाच्या कार्याची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना येईल. जगातील दुसऱ्या कुठल्याही देशात पोस्टाच्या इतक्या शाखा नाहीत, तसेच जगातील सर्वात जास्त उंचीवरील (१५,५०० फूट) पोस्ट ऑफिसचा मान हिमाचल प्रदेशातील हिक्कीम पोस्ट ऑफिसला जातो. पोस्टाचे वैशिष्ट्य हे आहे की पोस्टाच्या सर्व सेवा सर्वांना सर्व ठिकाणी एकाच दरात मिळतात. ५० पैशाचे पोस्टकार्ड भारतात कुठेही पाठवायचे असेल, तरी सर्वांना तेवढीच रक्कम द्यावी लागते.
पोस्टाच्या विविध सेवा
पोस्टात कार्ड, पाकिटे, अंतर्देशीय पत्र, स्टॅम्प्स तर मिळतातच, तसेच पोस्टातून बचतीच्या विविध योजना, विम्याच्या योजना, म्युच्युअल फंड यांत गुंतवणूक करता येते, तसेच नवीन पेन्शन स्कीमचे (NPSचे) खातेही उघडता येते. शिवाय परदेशात पैसे पाठवणे, पार्सल पाठवणे, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा योजना, (PMSBY), अटल पेन्शन योजना या योजनांमध्ये सहभागीसुद्धा होता येते. पोस्टाच्या बचतीच्या काही लोकप्रिय योजनांची आपण माहिती करून घेऊ या.
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
आई-वडिलांना आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेअंतर्गत ही योजना सुरू केली. पालकांनी अल्पवयीन मुलींसाठी (कमाल २) बचत करावी, असे या योजनेचे लक्ष्य आहे. मुलीच्या जन्मापासून ते मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत केव्हाही सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येते. या योजनेमधे किमान गुंतवणुकीची रक्कम दर वर्षी २५० रुपये आणि कमाल १.५० लाख रुपये इतकी आहे. या खात्यात किमान १५ वर्षे रक्कम जमा केल्यावर मुदत संपेपर्यंत दर वर्षी किमान रक्कम जमा करण्याचे बंधन नाही. दर वर्षी जमा करण्याची किमान रक्कम जमा न केल्यास ५० रुपये दंड भरावा लागतो. कन्येचे वय २१ झाले की याची मुदत संपते. कन्येचे वय १८ झाल्यावर जमा रकमेतून (व्याजासकट) ५०% रक्कम काढता येते. कन्येच्या वयाच्या १८नंतर तिचा विवाह ठरल्यास, त्यासंबंधी दस्तऐवज दाखवल्यानंतर, मुदतीपूर्वी खाते बंद करून सर्व रक्कम मिळू शकते. हे खाते पोस्टात किंवा कुठल्याही अधिकृत वाणिज्य बँकेत उघडता येते. व्याजाच्या दराबद्दलची घोषणा वित्त मंत्रालय करीत असते. त्यानुसार खात्यावर व्याज जमा होते. खात्यात रक्कम जमा करतेवेळी किंवा खाते उघडतेवेळी जो व्याजदर असेल, तो व्याजदर खाते बंद होईपर्यंत मिळेल अशा गैरसमजुतीत कृपया राहू नये. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६मध्ये ९.२०% व्याजदर होता, जो १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी ७.६०% आहे. बदललेले व्याजाचे दर खालीलप्रमाणे