शिवलिंग शिवाचार्य महाराज
समाजभक्तीची प्रेरणा अन् राष्ट्रभक्तीचे रूप
विवेक मराठी 03-Sep-2020
Total Views |
@प्रदीप नणंदकर
शरीर, मन व बुद्धी यांचा सुंदर मिलाफ असणारे व १०४ वर्षे दीर्घ, समाजोपयोगी आयुष्य लाभणारे स्वतंत्र भारतातील डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे मंगळवार, दि. १ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री अहमदपूर येथील भक्तिस्थळात शासकीय इतमामात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आपल्या कर्तृत्वाने भक्ती, ज्ञानमार्गाची दिशा देणारे व सामाजिक प्रश्नात संवेदनशीलतेने सक्रिय योगदान देणारे संत म्हणून इतिहासात त्यांची नोंद अपरिहार्य ठरेल. मराठवाड्याला संतांची थोर परंपरा आहे. या परंपरेशी नाते सांगणारे व दिगंतात कीर्ती झालेले युगपुरुष म्हणूनही डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज ओळखले जातील. महाराष्ट्र, आंध्र, तेलंगण, कर्नाटक या प्रांतांत लाखोंचा भक्तसंप्रदाय महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानत असे.राष्ट्राला प्रथम प्राधान्य व त्यासाठी सर्वस्व अर्पण करीन अशी प्रेरणा समाजात निर्माण करण्याचे मोठे काम करणार्या या तपस्व्याचा अंत न्युमोनियामुळे झाला. आयुष्याच्या अंतापर्यंत सक्रिय राहत, सतत लोककल्याणाचाच विचार करणार्या या विरक्ताचा पिंड रा.स्व. संघाच्या विचाराच्या मुशीतून तयार झाला होता. रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघाचालक प.पू. गोळवलकर गुरुजी यांच्यासमवेत ते पंजाब प्रांतात संघाचे प्रचारक म्हणून काही वर्षे कार्यरत होते. २५ फेब्रुवारी १९१७ रोजी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यात विरक्त मठाची पूर्वापार परंपरा होती. १९३२मध्ये संन्यासदीक्षा घेऊन वीरमठ संस्थानाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आली. १९३८ साली पट्टाभिषेकाचा कार्यक्रम झाला. श्रावणमासातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे त्यांनी पहिले अनुष्ठान केले. १९३९ साली वाराणसी येथील जंगमवाडी मठाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला. १९४५ साली लाहोर विश्व विद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण केली.स्वातंत्र्यचळवळीत त्यांनी स्वत:ला झोकून दिले. यासाठी त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागला. याच कालावधीत रा.स्व. संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी पंजाब प्रांतात काम केले. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली हिमालयात जाऊन त्यांनी योगसाधना केली. जीवनाबद्दलचे सखोल चिंतन केले व १९५३ साली ते महाराष्ट्रात पुन्हा परत आले. वीरशैव लिंगायत संतसाहित्य प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.विविध मठांत व मंदिरांत प्रवास करून त्यांनी प्राचीन साहित्य उपलब्ध केले व त्यानंतर ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. श्रीपरमरहस्य, श्रीसंत शिरोमणी मन्मथस्वामी, व्यक्तिरेखा आणि ग्रंथसंपदा, शिवानंद बोध, स्वयंप्रकाश, वरदशंकर, बृहतशिवपूजा, रुद्रपुरुषसूक्त, शिवपाठ अशी सुमारे २० ग्रंथसंपदा त्यांनी निर्मिली. त्यांचा भक्तसंप्रदाय विविध ठिकाणी परमरहस्य ग्रंथाचे पारायण करतो. धार्मिक विचारातून स्वत:च्या वैयक्तिक उन्नतीबरोबरच समाज म्हणून आपण एकसंध असले पाहिजे. समाजातील अंधश्रद्धा, कुप्रथा बाजूला सारण्यासाठी त्यांनी स्वत: लक्ष घातले. सामूहिक विवाह, वृक्षारोपण, जलसंधारण, अस्पृश्यता निर्मूलन, भ्रूणहत्या, रक्तदान, व्यसनमुक्ती, स्वच्छता अशा अनेक विषयांत स्वत: पुढाकार घेत त्यांनी लाखो सांप्रदायींना याकामी सक्रिय केले. मराठी, कन्नड, संस्कृत, हिंदी, इंग्लिश, उर्दू व पंजाबी अशा सहा भाषांतून ते प्रभावीपणे आपले विचार मांडत असत.
त्यांनी स्वत:चे जीवन स्वावलंबी बनवले. दिवसभरात फक्त स्वत:ने तयार केलेले १६ घास अन्नच ते ग्रहण करत असत. त्यानंतर ते काहीही घेत नसत. आपल्या उभ्या आयुष्यात त्यांनी कोणाकडूनही एकही रुपयाचा आहेर अथवा भेट स्वीकारली नाही. एखाद्या भक्ताने पुष्पहार जरी आणला, तरी तो हार ते त्याच्याच गळ्यात घालत असत. खर्या अर्थाने विरक्त मठाचे आपण मठाधिपती आहोत याचे भान त्यांना सतत असे. ते स्वत: एमबीबीएसची पदवी उत्तीर्ण केलेले होते. आलेल्या भक्तांच्या शारीरिक आजाराकडेही ते लक्ष देत असत व कोणाकडूनही एक पै न घेता औषधोपचार करत. त्यांचे कीर्तन, प्रवचन, निरूपण ऐकणे यात एक वेगळाच आनंद होता. भक्तिरसाने रसरसलेले त्यांचे बोल ऐकतानाच त्यात कठोर विज्ञाननिष्ठता असे. त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक उद्धाराबरोबरच समूह म्हणून प्रत्येकाने कुटुंबाचा, समाजाचा विचार केला पाहिजे. आपल्या सुखाबरोबर इतरांच्या सुखाचा विचार करा. आपल्याला समाजाने काय दिले यापेक्षा मी समाजाला काय दिले? ही मनोभूमिका त्यांनी तयार केली.त्यांच्या वाणीतून प्रखर राष्ट्रभक्ती सतत व्यक्त होत असे. मात्र त्यांनी कधीही, कोणाचाही द्वेष केला नाही. प्रेमातून जग जिंकता येते हे ते आवर्जून सांगत. कपिलधार येथील त्यांनी सुरू केलेल्या पायी दिंडीला भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत गेला. पंढरपूरच्या वारीला ज्या भक्तिभावाने लोक जातात, तोच भक्तिभाव त्यांनी आपल्या संप्रदायात निर्माण केला. ते रा.स्व. संघाशी आपली असलेली नाळ कधीही नाकारत नसत. पूजनीय गोळवलकर गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी देवगिरी प्रांतात प्रवास करून जिल्ह्याजिल्ह्यातील संत संमेलनात मार्गदर्शन केले होते. २०१७ साली त्यांनी वयाची १०० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त अहमदपूर येथे आयोजित शताब्दीपूर्ती कार्यक्रमास रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत हे स्वत: उपस्थित होते. ते मठाधिपती होते, तरीदेखील सरसंघचालकांची प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे, याची जाणीव त्यांच्या कृतीतून कार्यक्रमप्रसंगी दिसून आली.आपल्या १०४ वर्षांच्या आयुष्यात ते ताठ कण्याने जगले. त्यासाठीची योगसाधना ते नित्यनियमित करत. त्यांच्या चेहर्यावरील तेज थक्क करणारे होते व वाणीची स्पष्टता, भाषेवरील प्रभुत्व कोणालाही अचंबित करणारे होते. कोणत्याही भक्ताचे निमंत्रण ते कधीही नाकारत नसत. तेवढ्याच आत्मीयतेने ते आपल्या सर्व भक्तांकडे जात. २०१६मध्ये कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रात लिंगायत स्वतंत्र धर्ममान्यतेसाठी जे आंदोलन पेटले, त्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले. लाखोंचे मोर्चे निघाले. त्या आंदोलनात त्यांना यश आले नाही, मात्र त्याबद्दलची कटुता त्यांनी कोणाशीही ठेवली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे अतिशय सौहार्दाचे संबंध होते.‘समाजभक्ती हीच प्रेरणा, राष्ट्रभक्ती हे रूप तिचे’ या काव्यपंक्ती सार्थ करणारे यशस्वी जीवन ते जगले. या कर्मयोग्याला सादर प्रणाम.