विनोबांचा समरसता योग

18 Sep 2020 17:02:21
आपल्या देशात अनेक महापुरुषांनी समतेकडे जाण्याचा समरसता मार्ग सांगितला आहे. प्रत्येकाची कृती आणि शब्द वेगळे असले, तरी त्यामागे असलेल्या भावनेचे अधिष्ठान एक आहे. म्हणूनच विनोबांनी केलेले लेखन, चळवळ आणि चिंतन यांत शब्द वेगळे दिसत असले, तरी त्यांनी आपल्या जीवनात प्राचीनतम काळापासून आधुनिक काळापर्यंत समरसतेचा शोध घेतला आणि तो त्यांच्या शब्दात मांडला. विनोबांचा हा समरसता योग मुळापासून समजून घेण्याचा हा कालखंड आहे.
 
bhave_1  H x W:
 
हे वर्ष आचार्य विनोबा भावे यांच्या १२५व्या जयंतीचे वर्ष आहे. 'श्वेत वस्त्रातील साधू' अशा शब्दांत विनोबांचे वर्णन करता येईल. विनोबांच्या जीवनाचा व कार्याचा अभ्यास करताना आपल्या असे लक्षात येते की पराकोटीची आत्मीयता हे त्यांचे अधिष्ठान आहे. जी जी गोष्ट विनोबांनी केली, तिला आत्मीयतेची आणि समतेची जोड होती. ज्या आत्मीयतेने त्यांनी आपल्या आईसाठी गीताई लिहिली, त्याच आत्मीयतेने त्यांनी भूदान चळवळ आरंभली आणि यशस्वी केली. आहे रे आणि नाही रे यांच्यामधील दरी दूर करण्यासाठी विनोबांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीने केवळ भूमिहीनांना भूमिधारक बनवले नाही, तर १९६०च्या काळात समाजात समतेची कृतिरूप प्रस्थापना करून समाज तोडणाऱ्या शक्तींची हवा काढून घेतली. विनोबांच्या भूदान चळवळीचा इतिहास हा समाज जोडणारा आहे. दोन वर्गांत विभागलेला समाज समान पातळीवर आणण्यासाठी विनोबांनी भूदान चळवळीचे नेतृत्व केले. तेलंगणात त्यांनी जेव्हा ही चळवळ सुरू केली, तेव्हा शेकडो एकर जमीन दान देणारे जमीनदार पुढे आले, त्याचप्रमाणे आपल्या चार बिघा जमिनीतील दोन बिघा जमीन दान देणारेही पुढे आले. विनोबांनी आत्मीयभावाने आरंभलेल्या चळवळीचा तो परिणाम होता. भूदान चळवळीला ते 'भूदान यज्ञ' म्हणत असत. तेलंगणमध्ये भूदान चळवळ सुरू केल्यानंतर विनोबा म्हणतात, "हा यज्ञ, ज्याला मी भूदान यज्ञ असे नावं दिले, हा सामान्य यज्ञ नाही. ही जी घटना या युगात घडली, ती सामान्य घटना नव्हती. कारण यात लोकांनी जे दान दिले, त्यामागे लोकांची सद्भावना आहे. तिचा मी साक्षी आहे. कम्युनिस्टांच्या कामामागे जो विचार आहे, त्याचा सारभूत अंश आपल्याला ग्रहण करावा लागेल. त्यावर अंमलही करावा लागेल. हा अंमल कसा करायचा याविषयी मी विचार करू लागलो, तर मला काही सुचले. ब्राह्मण तर मी होतोच. मी वामनावतार घेतला आणि भूदान मागणे सुरू केले. हळूहळू विचार वाढत गेला. ईश्वराने माझ्या शब्दात शक्ती भरली. हे जे का काम आहे, ते क्रांतीचे काम आहे, सरकारच्या शक्तीपलीकडचे काम आहे हे लोकांच्या लक्षात आले. कारण लोकांचे जीवन बदलण्याचे काम आहे."
विनोबांचे वरील वक्तव्य नीटपणे समजून घेतले, तर आपल्या लक्षात येईल की विनोबांनी भूदान यज्ञातून रक्तहीन क्रांती केली आहे. समानता प्रस्थापित करण्यासाठी रक्तरंजित संघर्ष करू पाहणाऱ्या कम्युनिस्टांना विनोबांनी प्रेम, अहिंसा आणि आत्मीयता या चिंरतन आणि समरसता मूल्यांच्या आधाराने उत्तर दिले आहे. विनोबांच्या भूदान यज्ञाने सामाजिक न्याय प्रत्यक्षात आणला. महाभारतातील यक्ष जेव्हा "भीम, अर्जुन, सहदेव, नकुल यापैकी कोणाला जिवंत करू?" असा प्रश्न विचारतो, तेव्हा धर्म सांगतो, "कुंतीचा एक पुत्र जिवंत असला, तर माद्रीचा एक पुत्र जिवंत असायलाच हवा." विनोबांनी भूदान यज्ञास हेच सूत्र जोडले. जे मोठमोठे जमीनदार आहेत, त्यांनी आपल्या आत्मीय बांधवास आपल्याकडील एकूण जमिनीच्या सहा टक्के जमीन दिली पाहिजे आणि त्यामागे आत्मीयतेची, आपलेपणाची भावना असायला हवी. विनोबांच्या भूदान यज्ञाने आपली प्राचीन परंपरा नव्या स्वरूपात पुढे आली, त्याचबरोबर भ्रातृभाव जागृत करून त्यांनी आपण एकाच चैतन्यशक्तीचे अंश आहोत, त्यामुळे परस्परांशी घनिष्ठ पण अदृश्य बंधांनी बांधलो आहोत, त्यामुळे परस्परांच्या सुखदुःखाची सोडवणूक केली पाहिजे ही गोष्ट आधुनिक काळात विनोबांनी वास्तवात आणली. विनोबांच्या मांडणीमुळे कदाचित समरसता या शब्दाचा वापर केला नसेल, पण समरसता या शब्दाचा आशय विनोबांनी समजून घेतला होता. अनेक सामाजिक समस्या या मानवी भावभावनांशी जोडलेल्या आहेत. मानवाच्या भावभावना जागृत केल्या, त्याला जडलेले व्यंग दूर केले, तर सामाजिक समस्या निरस्त करता येतील आणि आपण राष्ट्र म्हणून एकात्म होऊ, राष्ट्रीय ऐक्याची भावना जागृत होईल अशी त्यांची धारणा होती. सामाजिक सुधारणा दूर करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात, या संदर्भात विनोबा भावे म्हणतात, "एक राष्ट्र बनण्यासाठी सहविवाह, सहभोजन किंवा सहभाषा उपयोगाला येणार नाही, तर सहभावना उपयोगाला येईल. एकभावनेने राष्ट्र बनते." याचा अर्थ असा नाही की सहभोजन, सहविवाह, सहभाषेने ऐक्य निर्माण होणार नाही, तर या सर्वांना आत्मीय भावाचे अधिष्ठान असावे, असे विनोबांना म्हणायचे आहे.

समतायुक्त समाज निर्माण करण्यासाठी केवळ कायदे नाही, तर भ्रातृभावाने भारावलेल्या व्यवहारातून तो निर्माण झाला पाहिजे, असे त्यांचे मत होते. भ्रातृभाव आला की वैर, द्वेष, असूया यांना मनात स्थान राहत नाही. विनोबांनी तथागतांची धम्मपदे मराठी भाषेत उपलब्ध करून दिली आहेत. तथागतांच्या एका धम्मपदाचा अनुवाद त्यांनी पुढीलप्रमाणे केला आहे - 'या जगात वैराने वैर कधीच शमत नाही. अवैरानेच वैर शमते. हा सनातन धर्म आहे.'

हाच भाव ते 'मधुकर' या पुस्तकातील 'जशास तसे' या लेखात विस्तार करून मांडतात. ते म्हणतात, 'विस्तव विझवायचा तर पाणी ओतावे, अंधार पडला म्हणजे दिवा लावावा, या गोष्टी कोणाला समजत नाहीत? आणि जर या गोष्टी समजतात, तर क्रोधाला प्रेमाने जिंकावे, बुराईला भलाईने जिंकावे, कंजूषपणाला दिलदारपणाने जिंकावे, खोट्याला खऱ्याने जिंकावे हे संतांचे म्हणणे का समजू नये? याही गोष्टी व्यवहाराच्याच आहेत. पण आपण विचार करीत नाही, म्हणून आपल्याला त्या समजत नाहीत. आपल्याच मनात जरा तपास घ्यावा, म्हणजे सगळ्या गोष्टी निवळू लागतील."

आपल्या देशात समता प्रस्थापित करण्यासाठी प्रदीर्घ काळ प्रयत्न चालू आहेत. ही समता कशी असावी? विनोबांच्या साम्ययोगात याविषयी स्पष्टपणे मांडले आहे. विनोबा म्हणतात, "सर्वोच्च ध्येय काय आहे? तर परमसाम्य. पूर्णपणे एकरूपता. मी आणि तू समान, तर एकच आहे. समता तर हवीच, पण ते अपुरे ध्येय आहे." आणि म्हणून विनोबा म्हणतात, "राजकीय, सामाजिक, आर्थिक समता हवीच आहे. पण या तिन्ही समता जगात तेव्हाच प्रस्थापित होऊ शकतात, स्थिर होऊ शकतात, जेव्हा ह्रदयात मानसिक समता असेल आणि त्याला आधार आध्यात्मिक साम्य हाच असू शकेल."

विनोबांच्या या मांडणीचा एवढाच अर्थ आहे की, आपण सर्व जण एक आहोत, समान आहोत, आपल्या सर्वांच्या मनात एकच ईश्वरी तत्त्व जागले पाहिजे, तरच व्यवहारात समता दिसेल. समरसता या तत्त्वाचा विचार करता समरसतायुक्त व्यवहार म्हणजे समतेकडे जाण्याचा राजमार्ग आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या देशात अनेक महापुरुषांनी समतेकडे जाण्याचा समरसता मार्ग सांगितला आहे. प्रत्येकाची कृती आणि शब्द वेगळे असले, तरी त्यामागे असलेल्या भावनेचे अधिष्ठान एक आहे. म्हणूनच विनोबांनी केलेले लेखन, चळवळ आणि चिंतन यांत शब्द वेगळे दिसत असले, तरी त्यांनी आपल्या जीवनात प्राचीनतम काळापासून आधुनिक काळापर्यंत समरसतेचा शोध घेतला आणि तो त्यांच्या शब्दात मांडला. विनोबांचा हा समरसता योग मुळापासून समजून घेण्याचा हा कालखंड आहे.
Powered By Sangraha 9.0