सोलापूर गणेशोत्सवास वास्तवाचे भान

25 Aug 2020 12:53:53

solapur ganpati_1 &n

दर वर्षी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने सोलापुरात गणेशोत्सव साजरा होत असतो. कोरोना रोगाचे भीषण वास्तव लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव सामाजिक, समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय सोलापूरकरांनी घेतला आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीत गणपतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणपती हे अतिप्राचीन दैवत असून हे अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे, तर साऱ्या विश्वाचे आराध्य दैवत आहे. श्रीगणेश हा सुखकर्ता, दुःखहर्ता आणि भक्तांना आनंद देणारा आहे. म्हणूनच समाजाला एकत्रित बांधून ठेवण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव रस्त्यावर आणला. त्यामुळे विविध जाती-धर्मांच्या लोकांचा सहभाग हेच या उत्सवाचे वैशिष्ट्ये राहिले.

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या महासंकटामुळे सारे विश्वच भयग्रस्त झाले आहे. त्यामुळे एक प्रकारची सामाजिक हतबलता आणि अगतिकता घट्ट होताना दिसत आहे. या राष्ट्रीय आपत्तीत सण-समारंभ कसे साजरे करावेत? असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. आपत्तिकाळात काळाप्रमाणे बदलणे यात खरा शहाणपणा आहे. म्हणजेच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा करण्यामागचा असाच उदात्त हेतू साध्य करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे.


solapur ganpati_1 &n
सोलापूरची ऐतिहासिकता

बहुभाषिक, बहुधर्मी आणि अठरापगड जातींचे शहर म्हणून सोलापूरची खास ओळख आहे. या शहराला धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे. महाराष्ट्रात १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली, पण त्याआधी १८८५ साली सोलापुरातील शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आजोबा गणपतीची स्थापना केली होती, असा सोलापूरचा इतिहास सांगतो. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांना सोलापुरातील आजोबा गणपतीकडून मिळाली, असे मानले जाते.

सोलापूरच्या गणेशोत्सवात आजही भक्तीबरोबर सेवा पाहावयास मिळते. देशात कुठेही नैसर्गिक संकट आले की संकटमोचन म्हणून मदतीला धावून जाण्याची एक संस्कृती आजोबा गणपती ट्रस्टने टिकवून ठेवली आहे. ट्रस्टची सामाजिक कार्याची उंची दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेला आजोबा गणपती हा सोलापूरच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मानबिंदू ठरला आहे.
 
आजोबा गणपतीप्रमाणे मानाचा देशमुख गणपती, मंगल गणपती, जय माता तरुण मंडळ, कसबा गणपती, पाणीवेस गणपती, पत्रा तालीम गणपती, थोरला मंगळवेढा गणेशोत्सव मंडळ, पूर्व विभागातील ताता गणपती मंडळ हे सोलापूर शहरातील प्रमुख गणेश मंडळ आहेत. या मंडळांनी स्थापनेपासून अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन समाजहितासाठी योगदान दिले आहे.
 
समाजहितासाठी खास पर्याय

गणेशोत्सवाने उदात्त परंपरा जपताना समाजाला आणि राष्ट्राला उपयुक्त ठरतील असे अनेक बदल वेळोवेळी स्वीकारले आहेत. अनेक गणेश मंडळांनी सेवेचा, सामाजिक जागृतीचा आणि एकतेचा संदेश देत गणेशोत्सवाची उपयुक्तता सिद्ध करून दाखविली आहे. आज संपूर्ण विश्व कोरोनाग्रस्त झाले आहे, याचा परिणाम अर्थकारणावर होतोय. समाजाची, राष्ट्राची घडी विस्कटलेली आहे. या भीषण वास्तवाचे भान ठेवून आणि समाजाबद्दलची आपुलकी आणि सहानुभूतिपूर्ण दृष्टीकोन ठेवून सर्वशक्तीनिशी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सोलापुरातील गणेश मंडळांनी सहभाग घेतला आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विविध मंडळांनी सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव काळात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे रक्तदान शिबिरांचे, प्लाझ्मा दान शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे बोलले जात आहे. एकूणच शहरात अकरा दिवस आरोग्योत्सव सुरू राहणार आहे. शिवाय ही मंडळे कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणार आहेत. जमा झालेल्या वर्गणीतून आरास-देखावे सादर न करता गरजवंतांना धान्यवाटप करणे असे स्तुत्य आणि अनुकरणीय निर्णय घेण्यात आले आहेत.
 
 
सोलापूर शहरातील पूर्व भाग व विडी घरकूल परिसर हा तेलुगू भाषिक म्हणून ओळखला जातो. तसा हा वर्ग कामगार, कष्टकरी आहे. विविधता जपणारा हा वर्ग लोकवर्गणीतून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असतो. लॉकडाउनमुळे या भागातील विडी व यंत्रमाग कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे या भागात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय पूर्व विभाग व विडी घरकूल मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. जमा झालेल्या पैशातून गरजवंतांना अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे.


solapur ganpati_1 &n
 
यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबतचे आवाहन सोलापूर शहर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. उत्सवावर होणारा खर्च टाळून गरिबांना अन्नदान करणे, शासनाला मदत करणे, कोरोनाच्या विरोधात मैदानात उतरलेल्यांचा सन्मान करणे आदी उपक्रम नियोजित असल्याची माहिती सोलापूर शहर मुख्य मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी दिली.
 
"कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन वर्गणी/ देणगी गोळा न करता छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मिरवणूक न काढता अत्यंत साधेपणाने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे" अशी माहिती सोलापूर सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी दिली. नीलमनगर, लष्कर, विजापूर रस्ता आदी गणेशोत्सव मंडळाने समाजाभिमुख गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
"सध्या कोरोनाचे संकट आहेच, त्यात ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गचक्र बदलत आहे हे आपण अनुभवत आहोतच. अशा वातावरणात 'इको फ्रेंडली' म्हणजे पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आहे. सोलापूरकरांना पर्यावरणस्नेही इको फ्रेंडली गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी इको फ्रेंडली क्लब गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्नशील आहे. आजवर या उपक्रमाला सोलापूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यंदा कोरोनामुळे इको फ्रेंडली गणेशमूर्ती मर्यादित बनविण्यात आल्या असल्या, तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. ज्येष्ठ नागरिकांसाठी व पर्यावरणप्रेमी कुटुंबासाठी आम्ही घरपोच इको फ्रेंडली गणेशमूर्ती पोहोचवणार आहोत" असे इको फ्रेंडली क्लबचे अध्यक्ष परशुराम कोकणे यांनी सांगितले.

जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर किंवा देशावर संकट आले, त्या त्या वेळी सार्वजनिक गणेशमंडळे मदतीला धावून आली आहेत. देशावर आलेल्या या कोरोनाच्या संकटकाळीही ही गणेशोत्सव मंडळे मदतीला समोर आली आहेत. यंदाचा गणेशोत्सव सामाजिक, समाजोपयोगी कार्यक्रम राबवून अवघ्या विश्वासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करेल, अशी आशा आहे.


९९७०४५२७६७
Powered By Sangraha 9.0