कोरोनाच्या निमित्ताने यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावरही परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वच गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहराला सांस्कृतिक परंपरा आहे आणि ती परंपरा ठाणेकर उत्साहाने व शिस्तबद्ध रितीने पार पाडत असतात. अशाच पारंपरिक मंडळांची आणि ठाण्यातील गणेशोत्सव कसा साजरा होणार आहे, याचा थोडक्यात आढावा आपण या लेखात घेणार आहोत. दर वर्षी महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या जल्लोशात साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीतील देवतांमधील गणपती ही सर्वांची लाडकी देवता आहे. यामागे कारणही तसेच विशेष आहे - सणसमारंभाच्या प्रसंगी आपण मंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेत असतो, परंतु गणेशोत्सव हा एकमेव असा उत्सव आहे, या उत्सवात बाप्पाच आपल्या घरी विराजमान होणार असतात. समाजप्रबोधन आणि राष्ट्रभक्ती प्रज्वलित करण्याच्या हेतूने, प्रत्येकाचे स्नेहबंध असणाऱ्या गणेशाची स्थापना सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात करून लोकमान्य टिळकांनी त्याची व्यापकता वाढविली.
मार्च महिन्यापासून कोरोना महामारीने आपले विकराळ रूप धारण करून सामाजिक, आर्थिक, मानसिक अशा सर्व गोष्टींवर परिणाम करायला सुरुवात केली. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. सोशल डिस्टन्सिंग हा मुख्य प्रतिबंधात्मक नियम पाळायचा असल्याने भव्य स्वरूपात साजरा होणाऱ्या या उत्सवावर बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच हा उत्सव साध्या पण मंगलमय वातावरणात पार पाडावा लागणार आहे. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने तो संकटाचे निवारण करील, या भावनेने त्याची आराधना करून यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे.
मुंबई-ठाणे शहरांत अंदाजे बारा हजाराहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन आणि राष्ट्रीय ऐक्य साध्य करण्यासाठी घरातील गणेश उपासनेला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप दिले. परंतु गेली काही वर्षे हा मूळ हेतू बाजूला सारून भव्यता (कसली?), चंदेरी दुनियेच्या प्रभावाखाली जाऊन अंगप्रदर्शन करणारे विक्षिप्त नाच, मोठमोठा आवाज करून ध्वनिप्रदूषण, मंडळांची आपपासात स्पर्धात्मक चढाओढ (नवसाला पावणारा?) असे उलट परिणाम गणेशोत्सवात दिसू लागले. सर्वत्र याच प्रकारे वातावरण असताना मुंबईनजीक असलेल्या ठाणे शहरातील काही मंडळे मात्र टिळकांनी सांगितलेल्या उद्देशानुसार, त्याचप्रमाणे परंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात.
ठाणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. हिंदू संस्कृतीतील सर्वच सण-उत्सव येथे जल्लोशात साजरे होतात. ठाणे शहर मुंबईनजीक असल्याकारणाने मराठी आणि इतर बहुभाषिक वस्तीही आता मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्वच सण-उत्सवांमध्ये या सर्व जणांचा आनंदाने सहभाग असतो. ठाण्यातील शतकपूर्ती झालेले एकमेव मंडळ म्हणजे 'श्री गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य आळी' होय. १९२० साली लोकमान्य टिळक शेणवे आळीत व्याख्यानासाठी आले होते. 'ठाणे हे हिंदुबहुल आहे, लोकही सुसंस्कारित आहेत, सर्वांनी एकत्र येऊन सुनियोजित व शिस्तबद्ध गणेशोत्सव मंडळाची स्थापना करावी. प्रतिवर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशहितकारक असे सामाजिक प्रबोधन करावे.' अशी इच्छा तेव्हा लोकमान्यांनी व्यक्त केली. त्यांची ही इच्छा आद्य कर्तव्य मानून त्याच वर्षी गणेशोत्सवाची मूहुर्तमेढ रोवली गेली. लोकमान्य टिळकांची आरती म्हणून त्यांची स्मृती जपणारे हे महाराष्ट्रातील एकमेव मंडळ आहे. या मंडळाची आगमन आणि विसर्जन मिरवणूक भव्य असून त्यात आबालवृद्ध एकत्रितपणे टाळ-मृदुगांच्या तालावर नाचतात.
काळाची गरज ओळखून विविध समाजोपयोगी कामे मंडळाच्या वतीने केली जातात. रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी शिबिर, गरजूंना उपयोगी पडतील अशा वापरण्यासारख्या कपड्यांचे संकलन, तसेच कुष्ठरोग निवारण समिती, शांतीबन नेरे (पनवेल) या संस्थेच्या उत्पादनांचे 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर वितरण असे उपक्रम राबविले जातात. कोरोनोच्या वाढत्या प्रभावामुळे यंदा मंडळाच्या वतीने कुठलेही उपक्रम होणार नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी गणेशाची मूर्ती दीड दिवसच विराजमान करणार आहोत, अशी माहिती मंडळाचे मुख्य सचिव महेश जोशी यांनी दिली.
"कोरोना काळात मंडळातर्फे प्रत्यक्ष काम झाले नसले, तरी बहुतांश सदस्य संघस्वयंसेवक आहेत. संघाच्या माध्यमातून बरीच सेवा कार्ये चालू आहेत, त्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. जनकल्याण समितीच्या वतीने काढा-गोळ्या मोहीम चालूच आहे. मंडळाची गणेशोत्सवाची फार मोठी परंपरा आहे. परंपरेत खंड पडू न देता, राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे," असेही महेश जोशी पुढे म्हणाले.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने 'हिंदू जागृती न्यास' म्हणून नौपाडा येथे एक ट्रस्ट स्थापन झाला. त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे 'हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळ' होय. 'काळाची गरज हिंदू जागृती, भक्तीतून करू या शक्तीची निर्मिती' हे या मंडळाचे ब्रीदवाक्य आहे. न्यासाच्या विविध कार्यक्रमांतून सतत हिंदू संस्कृती संवर्धन केले जाते. गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यंदा कोरोनोच्या होणाऱ्या संसर्गामुळे मंडपात होणारे कार्यक्रम रद्द करून ते ऑनलाइन पद्धतीने घेणार आहोत, त्यासाठी स्पर्धकांना http://www.hjthane.com या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करता येईल, असे मंडळाचे कार्याध्यक्ष मकरंद अभ्यंकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हा उत्सव 'आरोग्योत्सव' व्हावा, या दृष्टीने प्रयत्न राहणार आहेत. दर वर्षी मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून दोन पुरस्कार प्रदान केले जातात - १. नंदाजी रानडे स्मृती उतराई पुरस्कार व २. नितीन कुलकर्णी शौर्य पुरस्कार, हा पुरस्कार सामान्य व्यक्तीच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल दिला जातो. मानखुर्द येथे राहणाऱ्या, मशिदीवरील अनधिकृतरित्या लावलेल्या भोंग्याचा आवाज कमी करण्यासाठी आवाज उठविणाऱ्या करिश्मा भोसले हिला यंदाचा हा पुरस्कार दिला जाणार आहे.
पूर्ण लाॅकडाउन (एप्रिल-मे) असलेल्या काळात मंडळाच्या वतीने रोज २० ते २५ जणांना जेवणाचे डबे घरपोच देत होतो. ज्येष्ठांना भाजीपाला, औषधे, जीवनावश्यक वस्तू इत्यादी घरपोच दिल्या. त्याचप्रमाणे 'कम्युनिटी किचन'द्वारे ३०० ते ४०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. जेवणाच्या व्यवस्थेबरोबर गरजूंना पैशाचीही सोय केली. संघाच्या माध्यमातून ८ ते १० जण मंडळातील सदस्य कोरोना योद्धा म्हणून कार्यरत आहेत. लाॅकडाउनच्या सुरुवातीला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होता, तेव्हा थेट शेतकऱ्यांकडून भाजी घेऊन सोसाट्यांमध्ये भाजीचा पुरवठा करण्यात आला.
'हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळ' गेली तीस वर्षे मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करते. कोरोना संकटामुळे राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच दहा दिवस मनोभावे गणेशाचे पूजन करणार आहोत. कोरोना काळात आणि गणेशोत्सवात नौपाडा प्रभागात निर्जंतुकीकरण केले व करणार आहोत. गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर आणि गणेश विसर्जन झाल्यानंतर प्रसाद देण्याची प्रथा आहे. या वेळी प्रसाद म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्या आणि तीर्थ म्हणून आयुष काढा (आयुर्वेदिक) देणार आहोत. कारण काळाची तीच गरज आहे, असेही मंडळाचे कार्याध्यक्ष मकरंद अभ्यंकर यांनी सांगितले.
कोरोना महामारी संकटकाळात ठाण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी अभिनव निर्णय घेतले आहेत. यंदा दानपेटीत आर्थिक दानाऐवजी मास्क व सॅनिटायझर दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पेटीत जमा होणाऱ्या या वस्तू रस्त्यावर राहणाऱ्या गोरगरिबांना वाटप करण्यात येणार आहेत. तसेच यंदा रक्तदान शिबिर, आरोग्यतपासणी आणि अवयवदान इत्यादी उपक्रम घेऊन वागळे इस्टेट येथील विघ्नहर्ता मंडळ आरोग्योत्सव साजरा करणार आहे. तसेच सर्व मंडळांसाठी थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सिमीटर बंधनकारक करण्यात आले आहे.
गणेशाच्या आगमनापेक्षा विसर्जन मिरवणुकीस प्रचंड गर्दी होत असते, याचा अंदाज असल्यामुळेच ठाणे महापालिकेने आगमन-विसर्जनास येणाऱ्या भाविकांची संख्या मर्यादितच ठेवली आहे. शाडूची अथवा प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती स्थापन करण्याऐवजी धातूच्या मूर्तींचे पूजन करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून विसर्जनाचा प्रश्नच उरणार नाही आणि पर्यावरणाची हानी होणार नाही. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता ठाणे महापालिकेने गणेश विसर्जनाकरिता 'ऑनलाइन टाइम स्लाॅट' योजना केली आहे. डीजी ठाणे कोविड-१९ डॅशबोर्डवर जाऊन ही नोंदणी करता येऊ शकते. नोंदणीसाठी www.covidthane.org हे संकेतस्थळ तयार केले आहे. मोठ्या गृहसंकुलातील नागरिकांनी आपल्याच येथे गणेशाचे विसर्जन व निर्माल्य महापालिकेकडे सुपुर्द करण्याचे आवाहनही केले आहे. ठाणे महापालिकेतर्फे श्रींच्या विसर्जनाकरिता १३ कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच २० ठिकाणी मूर्ती 'स्वीकृती केंद्र' उभारण्यात येणार आहेत आणि ७ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था केली आहे.
असे म्हणतात की, संकटात संधी दडलेली असते. नाण्याला दोन बाजू असतात, एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. आपली संस्कृती वैश्विक कल्याणाची आहे. हिंदू धर्म हा केवळ धर्म नसून ती जीवनपद्धती आहे. कोरोनाच्या संकटकाळात याच संस्कृतीचा आग्रह करण्यात आला. उदा., नमस्कार करणे, फास्ट फूड सोडून घरी बनविलेल्या पौष्टिक आहाराचे सेवन करणे, बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे, इत्यादी. अशा आपल्या मानवी कल्याणाच्या संस्कृतीचा आग्रह व अंगीकार आज जगभर होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ उद्देश बाजूला ठेवलेल्या बहुतांश गणेश मंडळांनी आज साध्या आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. गणपती बुद्धिदाता, विघ्नहर्ता आहे. कोरोनाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आलेली ही जागरूकता कायम राहो आणि कोरोनाचे संकट दूर होऊन विश्वाची घडी पुन्हा एकदा व्यवस्थित होऊन भक्तिमय, मंगलमय आणि सामाजिक बांधिलकी जागृत ठेवून गणेशाचे आनंदात स्वागत होवो, हेच श्रीचरणी मागणे राहील.