अंत्योदयाचे आचरण करणारे दांपत्य प्रा. प्रीती आणि विजय गोयल

विवेक मराठी    28-Jul-2020
Total Views |
विजयजी म्हणतात – ‘मी कुठलीही गोष्ट सुरू करतो, पण प्रत्यक्षात सांभाळते मात्र प्रीती.’ आणि प्रीती प्रेमळ तक्रार करते की ‘विजयजी कोणतीही गोष्ट मनमोकळेपणाने बोलत नाहीत, मग राजकीय असो वा बिझिनेसची/आर्थिक, त्यामुळे त्यांना आणि पर्यायाने सर्वांनाच त्रास होतो.’ विजयजींना प्रीतीच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेसाठी राजकारण आणि समाजकारण हातात हात घालून चालवण्याचे तत्त्व जपणारे हे जोडपे. 


vijay goyal_1  
1९७५-७६मध्ये देशाच्या राजकीय अंतराळात प्रचंड उलथापालथ झाली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या 'संपूर्ण क्रांती' चळवळीने तरुण वर्ग पेटून उठला होता. भ्रष्टाचार, स्व. इंदिरा गांधींची एकाधिकारशाही आणि संजय गांधी यांची मनमानी यामुळे जनता वैतागली होती. सात क्रांतींची मिळून संपूर्ण क्रांती — राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्रांती आणि क्रांतिदूत होते देशातले तरुण. लोकनायकांच्या नेतृत्वाखाली सर्व राजकीय पक्ष, तसेच काही वृत्तपत्रे, सामाजिक संघटना, आध्यात्मिक आणि युवा संघटना एकवटल्या होत्या. रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी त्यात स्वतःला झोकून दिले होते. जनसंघाचे – संघ विचारधारेचे स्व. नानाजी देशमुख त्यातल्या त्यात लोकनायकांच्या जवळचे.

या कालखंडात, आपणही परिवर्तन घडवू शकतो या विचाराने पेटलेले जे तरुण राजकीय आसमंतात चमकू लागले होते, त्यातील दिल्लीतील एक तरुण म्हणजे विजय गोयल. मी मुंबईतील, तर ते दिल्लीतील विद्यार्थी नेता. नंतर जनता पार्टी स्थापन झाली, तेव्हा जनता युवा मोर्चातील सह कार्यकर्ता या नात्याने एकमेकांना ओळखू लागलो.

विजयजी दिल्लीचे. त्यांचे वडील चरतीलाल गोयल जनसंघातर्फे निवडून आलेले आणि दिल्ली विधानसभेचे माजी सभापती होते. आई बसंतीदेवी गृहिणी होत्या. बालपणापासूनच संघसंस्कारात वाढलेल्या विजयजींनी श्रीराम महाविद्यालयातून M.Com. झाल्यानंतर दिल्ली विश्वविद्यालयातून वकिलीची पदवी प्राप्त केली. त्याच काळात ते संपूर्ण क्रांतीच्या आणीबाणीविरोधी लढ्यात पकडले जाऊन तिहार तुरुंगात काही काळ बंदी होते. त्यानंतर १९७७मध्ये दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास जोरात सुरू झाला. ते तीन वेळा लोकसभेत आणि एकदा राज्यसभेत प्रतिनिधी होते. दिल्ली प्रदेशाचे अध्यक्षपद तसेच तीन वेळा मंत्रिपदही त्यांनी भूषवले. १९९६च्या अटलजी यांच्या मंत्रीमंडळात ते पंतप्रधान कार्यालयाचा भार सांभाळत होते. त्वरित निर्णय आणि अंमलबजावणी ही त्यांची कार्यालयीन वैशिष्ट्ये मानली जातात.

लोक अभियान चळवळीअंतर्गत त्यांनी सरकार पुरस्कृत लॉटरीचा विरोध केला आणि तत्कालीन सरकारला लॉटरी बंद करण्यास भाग पाडले. लोकांची कामे करणारा आणि समस्या सोडवणारा खासदार आणि मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द संस्मरणीय ठरली आहे. ह्या सर्व प्रवासात त्यांना साथ लाभली ती त्यांची सुविद्य पत्नी प्रा. प्रीती गोयल यांची.

प्रीती मूळची दिल्लीची. वडील ज्ञानचंद जैन हे अभियंता होते. अत्यंत तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक आणि स्पष्टवक्ता होते. निर्भीड आणि स्वतंत्र्यवादी विचारसरणी त्यांनी कुटुंबातही पाळली. प्रीतीची आई प्रेमलता स्वतः स्वतंत्र विचार असलेल्या, उच्चभ्रू समाजात वावर असलेल्या होत्या. घरात चर्चा, वादविवाद होत असत. मुलींनाही सन्मान होता. स्वतःचे मत मांडायचे स्वातंत्र्य होते. प्रीती १९८१ साली Nutrition या विषयात M.Sc. झाली. ती इतकी हुशार होती की B.Sc.नंतर केवळ बारा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी निवडण्यात आले, त्यात तिची निवड झाली होती. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच तिला सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर ती दौलतराम महाविद्यालयात आणि पुढे लेडी आयर्विन महाविद्यालयात प्राध्यापिका झाली.

 
vijay goyal_1  
 
१९८५ साली व्यवस्थित पाहून-दाखवून विजयजींशी लग्न झाले. त्या वेळेस ती नोकरी करत होती. विजयजींना ओळखत नव्हती. तेव्हा त्यांचा पेपर रिमचा व्यवसाय होता. प्रीतीला राजकीय कुटुंबातील ताणतणावाचा अनुभव नव्हता. त्यामुळे सुरुवातीला ती गांगरून गेली. पण नंतर परिस्थितीचे आकलन झाल्यावर तिने विजयजींची राजकीय व्यग्रता, असुरक्षित भवितव्य आणि व्यवसायातील चढउतार लक्षात घेऊन कायमस्वरूपी नोकरी करायचे नक्की केले. सासरच्या परिवाराचे नीतिनियम थोडे परंपरागत होते. पण विजयजींनी तिला साथ दिली. प्रीतीने नोकरी सांभाळून घर-संसाराला वाहून घेतले. सिद्धान्तचा आणि पाठोपाठ विद्युतचा जन्म झाला. संसाराबरोबरच विजयजींचे राजकीय आयुष्यही बहरू लागले.

आपल्या राहत्या चांदणी चौक विभागातील संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी त्यांनी उत्सव साजरे केले. विभागातील जुन्या दिल्लीतील घरांचा प्रश्न ऐरणीवर असताना त्यांनी भर बाजारातील धरमपुरा हवेलीचा जीर्णोद्धार केला. पुनर्विकासाचे एक उत्तम उदाहरण लोकांपुढे ठेवले. त्याचे ऐतिहासिक स्वरूप तसेच ठेवून त्याचे सर्वांगसुंदर पंचतारांकित हॉटेलात रूपांतर केले. चांदणी चौकांच्या भंगार भरलेल्या रस्त्यावरून हवेलीत शिरल्यानंतर समोर मुघलकालीन मयसभाच अवतरते. हवेली धरमपुराला २०१७ सालचा UNESCO - ASIA PACIFICचा सांस्कृतिक ठेवा जतन केल्याचा (Cultural Heritage Conservation) पुरस्कार मिळाला. भारतात असा पुरस्कार मिळालेले हे एकमेव उदाहरण आहे.

ह्या हवेलीचा कारभार प्रीती स्वतः उत्तम प्रकारे सांभाळते. मुलगा सिद्धान्त आपले उच्च शिक्षण आणि सिनेउद्योगात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. तो दिल्लीत असला की प्रीतीला बरीच मदत होते. आजही तीन तीन महिने आगाऊ बुकिंग करावे लागते आणि एकेका खोलीचे दर कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाहीत. येथील ‘लाखोरी’ या प्रसिद्ध रेस्तराँमध्ये आधी बुकिंग केल्याशिवाय प्रवेश मिळणे अवघड आहे. हे एवढे विस्ताराने लिहिण्याचे कारण म्हणजे विजयजी म्हणतात – ‘मी कुठलीही गोष्ट सुरू करतो, पण प्रत्यक्षात सांभाळते मात्र प्रीती.’ आणि प्रीती प्रेमळ तक्रार करते की ‘विजयजी कोणतीही गोष्ट मनमोकळेपणाने बोलत नाहीत, मग राजकीय असो वा बिझिनेसची/आर्थिक, त्यामुळे त्यांना आणि पर्यायाने सर्वांनाच त्रास होतो.’ विजयजींना प्रीतीच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान आहे. ते म्हणतात, ‘तिच्यामुळे माझे करियर उत्तमरित्या सुरू आहे. माझ्या अनेक भावना, गोष्टी तिला न सांगताच कळतात.’

राजकारणात असूनही मूळ संवेदनशील स्वभावातील सामाजिक जाणीव विजयजींना स्वस्थ बसू देत नाही. त्यांनी २००५मध्ये गरीब मुलांसाठी ‘Toy bank’ची स्थापना केली. त्यांची ‘Toy bank’ ही फार नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. विविध शाळांतून विद्यार्थ्यांकडून त्यांना उपयोगी नसलेली खेळणी दान म्हणून मागितली जातात. जमा झालेली खेळणी दुरुस्त करून त्यांना रंगरंगोटी केली जाते. त्यानंतर ती वयोगटाप्रमाणे वर्गातील विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार, बौद्धिक क्षमतेनुसार पेटीबंद करून खेड्या-वस्त्यातील शाळांमध्ये देणगीदाखल दिली जातात. गेल्या १५ वर्षांत २५ राज्यांतील आणि ३ केंद्रशासित प्रदेशातील ५ लाखांहून अधिक मुलांना त्यांच्या वयोगटानुसार १५ लाखांहून अधिक खेळणी पोहोचवली आहेत. त्यांच्याबरोबर नियमित संपर्क आहे. बिघडलेली खेळणी पुन्हा दुरुस्त करण्याचे कामसुद्धा होते. उपक्रम विजयजींनी सुरू केला, पण आता संचालक म्हणून विद्युत काम सांभाळते आहे. ती MBA होऊन मोठ्या कंपनीत उच्चपदावर होती, पण आता तिने नोकरी सोडून याच कामासाठी वाहून घेतले आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदय ही संकल्पना मांडताना सांगितले आहे - 'समाजाच्या अंतिम घटकाची किंवा व्यक्तीची उन्नती हेच परिवर्तन. त्यासाठी समाजसेवा व राजकारण हातात हात घालून चालले पाहिजेत.' हे तत्त्व अंमलात आणणारी जी काही मंडळी आहेत, त्यांचे प्रतिनिधित्व करणारे हे चौकोनी कुटुंब.