इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड आणि शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांवर व त्यांच्या माणसांवर इंग्रजांची एकूणच बारीक नजर असे. त्यांचे उत्तम नमुने म्हणजे या लेखात दिलेली काही पत्रे. महाराजांची धोरणे, पद्धती, त्यांची माणसे, त्यांचे यशापयश अशा अनेक गोष्टींची नोंद इंग्रज व्यापारी, वखारीवरील माणसे व त्यांचे वरिष्ठ ठेवत असत.
अफझलखानवधानंतर शिवाजी महाराज हे यापुढे दख्खनमध्ये महत्त्वाचे सत्ताधारी ठरणार, याचा अंदाज इंग्रजांना येऊ लागला होता. त्यानंतर शाहिस्तेखान प्रकरण, सुरतेची लूट यामुळे ते अधिकच सजग झाले. लढाऊ ताकद आणि रचनात्मक बुद्धी ही दोन्ही ह्या माणसाकडे आहेत, हे त्यांना जाणवले होते. वरकरणी त्यांनी महाराजांना फार महत्त्व जरी दिले नाही, तरी आतून त्यांनी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या कार्यालयीन पत्रव्यवहारातून त्याचा प्रत्यय येतो. मागील लेखातील पत्रामधून आणि ह्या लेखामधील इतर पत्रांमधून आपल्याला त्याची कल्पना येते.इंग्रजांना महाराजांचा व त्यांच्या आरमाराचा किती धाक निर्माण झाला होता, ते मागील पत्रातून कळते. त्याचप्रमाणे एखाद्या मुलखावर कब्जा मिळवल्यावर तिथे अल्पकाळात सुव्यवस्था निर्माण करण्याच्या महाराजांच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास होता, असे दिसते. या सुव्यवस्थेत व्यापारही असणार, हेसुद्धा ते जाणून होते. ह्याचा अर्थ इंग्रजांसारख्या, मोठे जग पाहिलेल्या माणसांनासुद्धा युद्ध आणि व्यापार ह्या दोन्ही विषयांतील महाराजांच्या नैपुण्याबद्दल विश्वास आणि खात्रीसुद्धा वाटत होती.शिवाजी महाराजांवर व त्यांच्या माणसांवर इंग्रजांची एकूणच बारीक नजर असे. त्यांचे उत्तम नमुने म्हणजे खाली दिलेली काही पत्रे. महाराजांची धोरणे, पद्धती, त्यांची माणसे, त्यांचे यशापयश अशा अनेक गोष्टींची नोंद इंग्रज व्यापारी, वखारीवरील माणसे व त्यांचे वरिष्ठ ठेवत असत.मुंबईहून सुरतेस / शके १५९२, वैशाख शुद्ध ४ / एप्रिल १२, १६७० -वसईच्या किल्लेदाराला १०१ खंडी आणि शिवाजीच्या कल्याण व आसपासच्या मुलखाच्या सुभेदाराला तितकाच काथ्या देऊन खूश करणे भाग पडले. कारंजा, चौल येथील किल्लेदार आणि माहिम बंदरात येणारी गलबते यांना दोरखंडाकरता मिळून पुष्कळ काथ्या द्यावा लागला.शिवाजीच्या मिठाच्या गलबतांचा तांडा ह्या बंदरात आला आहे. त्याच्या रक्षणाकरता २५० टन वजनाचे जहाज आणि काही मचवे बरोबर आहेत. डेप्युटी गव्हर्नरने पूर्वी त्यांना एकदा सवलतीने वागवून खुद्द शिवाजीच्या मालकीची गलबते होती त्यांच्यावर आणि रक्षणाकरता आलेल्या जहाजांवर बंदरी कर घेतला नव्हता. आजप्रर्यंत ते करंजाहून मीठ आणत, त्याऐवजी ट्रॅाम्बेहून मीठ नेण्याबाबत त्यांस सांगितले होते. त्यामुळे शिवाजीच्या आरमारी सेनापतीने या खेपेला ट्रॅाम्बेहून मीठ नेण्याचे ठरवले. ४० खंडी मीठ पूर्वी १०० रूपयाला विकले, तेच आता ४६ रु.ना विकले - इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड (भाग ६, पृ. १४ व १५.)वरील पत्रावरून खालील गोष्टी स्पष्ट होतात -* महाराजांनी मिठाच्या व्यापारासाठी स्वतंत्र जहाजे बांधून आयात पर्यायी (Import Substitute) व्यवस्था केली. कारण त्याआधी इंग्रजांनी जहाजे पुरवायला नकार दिला होता. जहाजे खराब होतात असे कारण त्यांनी साळसूदपणे पुढे केले असले, तरी महाराजांना सोयीचे अगर फायद्याचे काही करायचे नाही, हे छुपे धोरण त्यामागे होते.* व्यापाराला संरक्षण म्हणून लढाऊ जहाजेही महाराज तैनात करत होते.* एकुणात स्वतःच्या धाकाने व दराऱ्याने काथ्यासारख्या वस्तू ते मोठ्या प्रमाणात इंग्रजांसारख्या हुशार व प्रबळ शत्रूकडून फुकट मिळवत होते.* मिठाचा (४० खंडी) दर रु. १००ऐवजी रु. ४६ला, म्हणजे ५०%हून कमी दराने मिळवत होते.मुंबईहून सुरतेस पत्र / शके १५९०, कार्तिक शु. ५ / २ नोव्हेंबर १६६७ -वरच्या चौलचा सुभेदार शहाकरता जी जकात वसूल करतो, तिचा एकदशांश घेण्यासाठी शिवाजीचा एक अंमलदार तिथे असतो. त्याने (गर्धर) गिरीधरला चांगल्या रीतीने वागवून, सोरा, मिरी इ. योग्य दरात मिळवून देण्याची व्यवस्था केली, आणि तिथून १२ मैलांवर अष्टमी येथे शिवाजी होता, त्याला भेटून जाण्यासाठी सांगितले. परंतु तसा हुकूम नसल्यामुळे गिरीधर परत आला. - इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड (१३, पृ. ७३-७४.) वरील पत्रातून महराजांना सरदेशमुखीचा (१० टक्क्यांचा) अधिकार असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे महाराजांच्या प्रतिनिधींचे व्यापारी अनुसंधान व कामकाज पद्धती चांगली असल्याचे दिसते. राजापूरला फ्रेंचांनी एक दलाल पाठवला होता. परंतु महाराजांनी त्याला इंग्रजांचे घर देण्याचे नाकारले. पश्चिम किनाऱ्यावर इंग्रज, पोर्तुगीज, डच व फ्रेंच ह्यांच्यात व्यापार आणि इतर बाबतीत चुरस असे. पन्हाळा प्रकरणावरून इंग्रजांचे व महाराजांचे संबंध बिघडले होते. त्यातूनच महाराजांनी राजापूरची वखार खणूनही काढली होती. नंतर अनेक वर्षे वाटाघाटी चालल्या होत्या, पण समझोता होत नव्हता. त्याचा फायदा घेण्यासाठी फ्रेंचांनी राजापूरला इंग्रजांचे जे घर रिकामे झाले होते, ते मिळवण्याचा प्रयत्न चालवला होता. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने ते बरोबरही होते. पण महाराज अत्यंत दूरदर्शी होते. आज आणि भविष्यातसुध्दा फ्रेंचांपेक्षा इंग्रजांची साथ स्वराज्याच्या व्यापारासाठी जास्त उपयोगी आहे, हे जाणून त्यांनी फ्रेंचांना खूश करण्याकरता इंग्रजांना दुखावले नाही. व्यापारवाढीसाठी अशीच दूरदृष्टी लागते.कारवारहून सुरतेस पत्र / श. १५९१ चैत्र व. १४ / १९ एप्रिल १६६९ -नुकतेच एक मोठे वादळ होऊन त्यात तांदळाची वगैरे शिवाजीची पुष्कळ गलबते गमावली. - इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड (भाग १५, पृ. १२१-२२.)श. १५९१, भाद्र. व. ८ / ७ सप्टेंबर १६६९ -काल शिवाजीचे एक गलबत आदनहून बहुतेक रिकामेच ह्या बंदरात आले आहे. - इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड (भाग १०५, पृ. १३६.)मुंबईहून सुरतेस पत्र / श. १५९१, कार्तिक व. ८ / ६ नोव्हेंबर १६६९ -'शिवाजी राजाने पोर्तुगीजांची काही गलबते धरून ठेवली. त्यांनीही त्यांचे इराणहून आलेले एक गलबत पकडले. येथून जवळच पेण येथे शिवाजीचा पेशवा आला असून शिवाजी तिथेच आसपास आहे. सिद्दी अजूनही अडचणीत आहे.' – इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड (१३, पृ. २४५.)केवळ १०-१२ वर्षाच्या कालावधीत महाराजांनी पश्चिम किनाऱ्यावर केवढी खळबळ माजवली होती, त्याचे हे पुरावेच आहेत. व्यापारी व लढाऊ नौदलाच्या साह्याने व्यापार व त्याचे संरंक्षण यामुळे महाराजांनी त्यांच्या सागरी शत्रूंना चांगला धाक बसवलेला दिसतो. त्यांच्या बहुतेक सर्व हालचालींवर त्यांच्या शत्रूंपैकी कोणाची तरी नजर असणे ह्यातच त्यांचा मोठेपणा व जरब व्यक्त होते. माहिती मिळवण्याची व ती एकमेकांना देण्याची इंग्रजांची पद्धतही नजरेत भरते.महाराजांनी आपला स्वराज्याचा व्याप वाढवताना सर्व प्रकारची माणसे जोडली आणि त्यांचा स्वराज्याच्या कामासाठी योग्य उपयोग केला. कोकणात नौदलासाठी लढाऊ वृत्तीची आणि व्यापारासाठी बहुश्रुत आणि चलाख अशी माणसे गोळा केली. या माणसांचा सर्व परकीय व्यापाऱ्यांशी आणि इतर लोकांशी संबंध आला. त्यातील अनेक लोकांबद्दल या परकीयांनी लिहून ठेवले आहे. त्यातील काही पत्रे मजकुराने काहीशी मोठी असल्याने पुढील अंकात.अधिक / अवांतर वाचनासाठी प्रस्तुत लेखकाची खालील पुस्तके वाचावीत.श्री शिवराय - M.B.A. Finance?श्री शिवराय – I. A.S.?श्री शिवराय – V.P. H.R.D.?प्रकाशक – राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे.