ज्येष्ठ संघकार्यकर्ते हरिभाऊ तेली (रहाटे) यांना २१ जून २०२० रोजी देवाज्ञा झाली. मृत्युसमयी ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली आणि पत्नी (विजया) असा परिवार आहे. त्यांचे वर्णन करायचे तर ते 'परीसगुण असलेले संघकार्यकर्ते' होते. परीसस्पर्श झाला की लोखंडाचे सोने होते, तसेच सामान्य आर्थिक स्थितीत जगणाऱ्या स्वयंसेवकांत त्यांनी असामान्य क्षमता निर्माण केली.
हरिभाऊ गेल्याची बातमी सुधाकर बारसोडे याने फोनवरून दिली. क्षणभर डोके सुन्न झाले आणि मी एकदम भूतकाळात गेलो. १९६४-६५ साली मी गुंदवलीतील नेताजी सायंशाखेचा कार्यवाह झालो होतो. तेव्हा माझे वय १६-१७ असावे. मी मिसरूडही न फुटलेला तरुण होतो. एके दिवशी भास्करराव मुंडले माझ्याकडे आले आणि म्हणाले, "हरिभाऊ तेली (रहाटे) यांच्याकडे जायचे आहे, तू चल." हरिभाऊ तेव्हा मालपा डोंगरी येथे राहायला आले होते. पायवाट तुडवत तुडवत म्हशींच्या गोठ्यातून आम्ही मालपा डोंगरीला पोहोचलो. आता परिसर पूर्ण बदलेला आहे.
हरिभाऊंशी परिचय झाला. ते प्राथमिक शाळेत चित्रकलेचे शिक्षक होते. ते परळ भागातून नुकतेच तेथे राहायला आले होते. भास्करराव अशा कार्यकर्त्यांची नोंद ठेवत असत. संघ म्हणजे एक एक माणसाचा विचार. हरिभाऊंचा संसार सुखाचा होता. पण संसार म्हणजेच सर्व काही असे त्यांनी मानले नाही. त्यांनी मालपा डोंगरीत पहिली ते पाचवी अशी शाळा सुरू केली. आज ती शाळा महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे.
माझी शाखा त्यांच्या घराच्या पायवाटेवरच होती. अनेक वेळा ते शाखेवर येत असत. मुलांना गोष्टी सांगणे हा माझा आवडता छंद होता. हरिभाऊ आणि माझ्या वयात अंतर खूप, पण ते तन्मयतेने गोष्ट ऐकत बसत. माझा एकेरी उल्लेख करीत नसत. बालांच्या हिवाळी शिबिरात मी कथाकथन करावे, असा भास्कररावांचा आदेश आला. खरे सांगायचे तर मी खूप घाबरलो. संघ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बालांपुढे कसे बोलायचे? हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. मी गोष्टी फार छान सांगतो हे हरिभाऊंनी भास्कररावांना सांगितले होते. आज मी देशभर भाषणे करीत फिरत असतो आणि श्रोते असतात, विद्यापीठाचे उपकुलगुरू, प्राध्यापक, हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती, वकील इत्यादी. माझा हा प्रवास हरिभाऊंनी घडविला, हे मी या जन्मात विसरू शकत नाही.
नंतर हरिभाऊंनी मालपा डोंगरी येथे शाखा सुरू केली. शंभरच्या आसपास बालांची उपस्थिती राहत असे. हरिभाऊ हे नाव मागे पडले आणि गुरुजी हे नाव त्यांना लागले. त्यांच्याच शाखेतून गणपत रहाटे, अशोक तेंडुलकर, दशरथ शिवलकर, मंगेश लांजेकर, श्रीकृष्ण गोसावी अशा अनेक कार्यकर्त्यांची पलटण उभी राहिली. १९७२-७३पर्यंत माझे संघकार्यक्षेत्र अंधेरी (पूर्व) राहिले. या काळात मी त्यांच्या घरी किती वेळा गेलो असेन हे सांगता येणार नाही. माझ्याप्रमाणे तेदेखील झोपडपट्टीतच राहत होते. आर्थिक स्थिती संपन्नतेची तर मुळीच नव्हती. लग्न झाले, संसार वाढू लागला, जबाबदाऱ्या वाढू लागल्या. हरिभाऊंनी आपल्या घराच्याच भागात एक छोटेसे दुकान घातले.
प्रसन्नपणे हसणाऱ्या हरिभाऊंचा चेहरा माझ्या मनावर कोरला गेलेला आहे. ते मोठ्या उत्साहाने बालांबरोबर महाकाली मंदिर आणि त्याला लागून असलेली लेणी येथे सहलीसाठी येत असत. तेव्हा तो सगळा परिसर आंब्याच्या झाडांचा आणि काजूच्या झाडांचा होता, रस्ता वगैरे काही नव्हता. पायवाट तुडवत, संघगीते गात आमची वानरसेना निघे. हरिभाऊंचा उत्साह खूप दांडगा असे. मुलांमध्ये रममाण होताना ते लहान मुलांसारखेच होत.
शाखा आणि शाळा यामुळे हरिभाऊ मालपा डोंगरीतील सर्व घरी पोहोचले. त्यांच्या शब्दाला खूप मान असे. या समाजसेवेचे राजकीय भांडवल करावे, असे त्यांच्या मनात कधी आले नाही. त्यांची संघकार्यकर्त्याची भूमिका कधी बदलली नाही. चित्रकलेचा त्यांचा छंद त्यांनी सोडला नाही. छोटासा स्टुडिओ तयार करुन ते शेवटपर्यंत चित्रे काढीत होते. कोकणातील उंबरडे हे त्यांचे गाव. या गावातही शाखा चालतात. गावात शाळा आणि आरोग्य केंद्रे सुरू करण्यास त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
आज ते आपल्यात नाहीत. त्यांचे वर्णन करायचे तर ते 'परीसगुण असलेले संघकार्यकर्ते' होते. परीसस्पर्श झाला की लोखंडाचे सोने होते. सामान्य आर्थिक स्थितीत जगणाऱ्या स्वयंसेवकांत त्यांनी असामान्य क्षमता निर्माण केली. ते सगळे कार्यकर्ते आजच्या पुरोगामी भाषेत सांगायचे तर ओबीसी प्रवर्गातील आहेत. पण संघ त्या अर्थाने पुरोगामी नसल्यामुळे आम्ही सर्व हिंदूच आहोत, अशी कार्यकार्त्यांची एक पिढी घडवून हरिभाऊ अनंताच्या प्रवासाला गेले आहेत. त्यांच्या स्मृतीस लाख लाख प्रणाम!