आंतरराष्ट्रीय दहशत चिनी धरणांची?

10 Jul 2020 17:33:09
@अरविंद व्यं. गोखले

चीनमधील थ्री गाॅर्जेस धरणातून मोठ्या प्रमाणात सोडले जात असलेले पाणी आज संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अमेरिकेसह अन्य देशही याबाबत संशय व्यक्त करत आहेत. शिवाय या धरणाची एकंदर अवस्था पाहता ते फुटण्याचा धोकाही व्यक्त केला जात आहे.


International Panic Chine

चीनमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने जो धुमाकूळ घातला, तो चिनी राज्यकर्त्यांच्या पथ्यावर पडतो आहे. यांगत्झे नदीवर असलेल्या ‘थ्री गॉर्जेस’ धरणातले पाणी त्यांनी मुक्त सोडून दिले. म्हणजे त्याचे असे आहे की, वुहानमध्ये असणाऱ्या जैविक प्रयोगशाळेतून निसटलेला विषाणू आजही सर्व जगाला छळतो आहे. हा विषाणू वुहानमधून कसा बाहेर पडला, त्याचा शोध घ्यायच्या हेतूlने उशिरा जाग्या झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा चीनमध्ये जाऊन चौकशी करायचे निश्चिात केले आहे. अमेरिकेला हे सगळे नाटकच वाटते आहे. तिने जागतिक आरोग्य संघटना चीनला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आणि त्या संघटनेतून अंग काढून घेतले. अमेरिकेने जसा आरोग्य संघटनेवर आरोप केला, तसा इतरांनी केला नसला तरी त्यांच्या मनात तीच खदखद आहे. या आरोग्य संघटनेकडे सव्वाशेवर देशांनी विषाणू प्रकरणाची जाहीर चौकशी करण्याची मागणी केली, त्यानुसार ही चौकशी होत आहे. संशयाचे सर्व विषाणू ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’भोवतीच पिंगा घालत आहेत. या संस्थेने एकतर आतापर्यंत सर्व पुरावे नष्ट केले आहेत आणि उरलेले नष्ट करण्यासाठी त्यांनी धरणातल्या पाण्याचा वापर केला गेला असण्याची शक्यता आहे. ‘थ्री गॉर्जेस’ धरणातून पाणी सोडले की आपोआपच त्या परिसरातले सर्व पुरावे नष्ट होतील, असे वाटून चीनने हेतुत: पाणी सोडले आणि पुरावे नष्ट करायला मदत केली, असा दावा केला जात आहे. वुहानच्या प्रयोगशाळेभोवती जसा संशयाचा भोवरा फिरत राहिला आहे, तसाच थ्री गॉर्जेस धरणाभोवतीही फिरतो आहे.


थ्री गॉर्जेस धरण निर्मिती
जलतज्ज्ञ वांग विल्युओ यांनी कोणत्याही सरकारी खुलाशावर आपला विश्वास नसल्याचे सांगून हे धरण कोसळू शकते हेच ठासून सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २००९मध्ये हे धरण जसे होते तसे राहिलेले नाही, असे त्या धरणाचे उपग्रहावरून काढलेले छायाचित्र दाखवून ते वाकडेतिकडे झाल्याचे स्पष्ट केले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते अतिशय धोकादायक असल्याचे म्हटले आहे. कदाचित त्यामुळेच असेल की, धरणातून पाणी सोडले नसते तर धरणाला धोका निर्माण झाला असता, असे सरकारच्या वतीने सांगितले जात आहे. आता बोला, हे धरण एवढे लेचेपेचे आहे का? जर तसे ते असेल तर त्या धरणाच्या बांधकामाची आणि सिमेंटमधल्या भेसळीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली जाऊ शकते, पण तशी हिंमत करणार कोण?
थ्री गॉर्जेस हे धरण हुबेई प्रांतात आहे. कुतांग, वुशिया आणि शिलिंग या २०० किलोमीटरच्या परिसरातल्या तीन खिंडी ओलांडून येणाऱ्या यांगत्झे नदीवर सँदौपिंगजवळ हे महाकाय धरण उभे आहे. १९१९मध्ये सन् यत सेन यांनी त्याचे स्वप्न पाहिले, पुढे ते १९३२मध्ये चँग कैशेक यांनी पाहिले आणि त्यानंतर साक्षात माओ झेडाँग यांनी या धरणाला १९४९मध्ये झालेल्या कम्युनिस्ट क्रांतीनंतर उचलून धरले. ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ किंवा 'शंभर फुले उमलू द्या’ मोहिमेनंतर नवे आर्थिक संकट उभे राहिले, तेव्हा या धरणाचा आराखडा बासनात गुंडाळून ठेवण्यात आला. १९५४मध्ये जेव्हा यांगत्झे नदीला महापूर आला, तेव्हा पुन्हा एकदा या धरणाची जुळवाजुळव करण्यात आली. त्याच सुमारास माओंची पोहण्यावरची एक कविता प्रसिद्ध झाली. त्यातही यांगत्झे नदीसंबंधीचे त्यांचे आकर्षण दिसले असे म्हणतात. १९५८मध्ये काही अभियंत्यांनी या धरणाच्या उपयुक्ततेविषयी जेव्हा शंका उपस्थित केल्या, तेव्हा त्यांना थेट तुरुंगाचा रस्ता दाखवण्यात आला. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या बैठकीत १९९२मध्ये या धरणाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आला. त्या वेळी हजर असलेल्या २६३३ प्रतिनिधींपैकी (सध्या प्रतिनिधींची ही संख्या २९८० आहे) १७६७ जणांनी या धरणाला पाठिंबा दिला. १७७ जणांनी विरोधात मतदान केले. ६६४ जण तटस्थ राहिले आणि २५ जणांनी मतदानावर बहिष्कार घातला. (होय, तिथे असेही घडते असे म्हणतात.)


एकदा या धरणाला संमती मिळताच, म्हणजे १४ डिसेंबर १९९४ रोजी धरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. २००९मध्ये हे धरण पूर्णत: कार्यान्वित होईल, असे सांगण्यात आले. तथापि ते २०१२मध्ये पूर्णत: मार्गी लागले. हे धरण काँक्रीट आणि सिमेंट यांच्या मिश्रणातून निर्माण झाले आहे. यासाठी ४ लाख ६३ हजार टन पोलाद लागले, म्हणजेच सुमारे ६३ आयफेल टॉवर होतील इतके. हे धरण समुद्रसपाटीपासून ५७४ फूट उंच आणि ३,६७५ फूट रुंद आहे. या धरणात ३९.३ घन किलोमीटर (३ कोटी १९ लाख एकर फूट) एवढे पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणाला सरकारी अंदाजानुसार १८० अब्ज युआन, म्हणजेच साडेबावीस अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढा खर्च आला आहे. विशेष म्हणजे हे जलविद्युत निर्मितीसाठी वापरण्यात येणारे धरण दर वर्षी २५० अब्ज युआन मिळवून देते. त्यातून होणारी वीजनिर्मिती किती होते हे आकडे पाहण्यासारखे आहेत. यातून एक हजार टेरॅवॅट तास एवढी वीजनिर्मिती होते, असे सांगण्यात येते. एक टेरॅवॅट म्हणजे एक हजार गिगॅवॅट आणि एक गिगॅवॅट म्हणजे १ हजार मेगॅवॅट. म्हणजेच दहा लाख मेगॅवॅट निर्मितीचा हा महाकाय प्रकल्प आहे. मी हे आकडे मुद्दाम अशासाठी दिले आहेत की, आपल्याकडे धरणांच्या निर्मितीपासूनच धरणाबद्दल बऱ्याच शंकाकुशंका कशा घेतल्या जात असतात हे कळावे यासाठी. हे धरण खरोखरच इथे हवे का, इथपासून त्याचा प्रारंभ होतो. धरणाची उंची थोडी जरी वाढवायची म्हटले, तर जलसमाधी घेण्यास अनेक जण पुढे येतात आणि धरणाचे काम खोळंबून ठेवायला त्यांची मदत होते. मी त्यांच्यावर टीका करायची म्हणून हे लिहितोय असे नाही, कारण त्यांचे धरणग्रस्त समाजाविषयीचे मुद्देही तितकेच महत्त्वाचे असतात. (एक उदाहरण म्हणून सांगतो की, आपल्याकडे दूधगंगा नदीवर काळम्मावाडी धरण १९८३मध्ये बांधले गेले, पण त्या धरणाच्या पाण्याखाली ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना आजही पर्यायी काळ्या जमिनी मिळालेल्या नाहीत. कोयना धरण १९६४मध्ये कार्यान्वित झाले, त्या धरणग्रस्तांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत तरी त्यांचे प्रश्न संपलेले नाहीत. मात्र दुसरीकडे स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे आपल्याला मंत्रिपद कधी मिळेल याचीच वाट पाहात बसलेले असतात.) असो, महत्त्वाचे हे की, धरण आधी की पुनर्वसन, हा प्रश्न चीनमध्ये कोणी विचारात घेत नाहीत आणि कोणी तसा प्रश्न उपस्थित केलाच, तर त्याचे पुढे काय होते ते सांगता येणे अशक्य आहे.

International Panic Chine 
 
तैवानची भीती
यांगत्झे नदीच्या महापुराला वेळीच आवर घालता यावा हाही या धरणाचा मुख्य उद्देश आहे. चीनने असे अनेक महापूर पाहिलेले आहेत, म्हणूनच जीवित- आणि वित्तहानी टाळण्याच्या हेतूने हे धरण बांधले गेले आहे. गेल्या शंभर वर्षांमध्ये दर दहा वर्षांमागे एकदा चीनमध्ये महापुराने प्रचंड हानी करून ठेवलेली आहे. या धरणात २०१०मध्ये २५ लाख घनफूट एवढा पाणीसाठा होता. एवढी मोठी निर्मिती केल्यावर त्याला होणारा धोका विचारात घ्यावाच लागतो. तैवानमधून क्षेपणास्त्र डागून या धरणाला धोका निर्माण केला जाईल अशी भीती चिनी राज्यकर्त्यांना सतत वाटत असते. तैवान ते थ्री गॉर्जेस हे हवाई मार्गे अंतर सर्वसाधारणपणे हजार-बाराशे किलोमीटर आहे आणि तैवानकडे तेवढ्या ताकदीची क्षेपणास्त्रे आहेत. ती अमेरिकेनेच पुरवलेली आहेत. पण तैवानने आपल्या क्षेपणास्त्रांचे ज्ञान इराण आणि उत्तर कोरियालाही दिले आहे. अमेरिकेने तेव्हा तैवानला अडवलेले नाही हे विशेष. आता अमेरिका तैवानला ६२ कोटी डॉलरची पॅट्रिएट क्षेपणास्त्रे देणार आहेत. ती फार लांबचा मारा करणारी नसली तरी १२०० ते २००० किलोमीटरपर्यंत मारा करू शकतील अशी युन फेंग क्षेपणास्त्रे तैवानजवळ आहेत. चीनमधल्या सर्व घटनांकडे तैवानचे सातत्याने लक्ष असते. तैवाननेच थ्री गॉर्जेस धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याविषयीची बातमी सर्वात आधी दिलेली आहे. वुहानच्या अतिसूक्ष्म विषाणू संशोधन संस्थेतून कोरोनाचा हा विषाणू कसा बाहेर पडला, त्याविषयीचा संशय तैवाननेच आधी बोलून दाखवला, इतकेच नाही, तर त्या देशाने चीनविषयीचे खबरदारीचे सर्व उपाय आधी योजले आणि आपल्या जनतेचे कमीत कमी नुकसान होऊ दिले. या देशात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अवघी सात आहे. आता तिथे एकही कोरोना रुग्ण नाही.
हे पाणी का सोडण्यात आले, तर धरणात पाण्याचा साठा प्रचंड वाढल्याने धरणाला धोका निर्माण झाला असता, असा युक्तिवाद चिनी राज्यकर्त्यांनी केला आहे. याचा अर्थ असाही होतो की हे धरण अभियांत्रिकी नियमांना धरून बांधलेले नाही. हे जगातले सर्वात मोठे धरण आहे. यांगत्झे नदी आशियातली सर्वाधिक लांबीची मानली जाते. ६३०० किलोमीटर प्रवास करून ती शांघायजवळून पूर्व चीनच्या समुद्राला मिळते. या नदीसाठी दोन शब्द नियमित वापरले जातात - तिला 'चँग जियांग' असे म्हणतात. चिनी भाषेत चँग जियांगचा अर्थ सर्वाधिक लांबीची नदी असा होतो. तसेच या नदीला ज्या यांगत्झे नावावरून ओळखले जाते, त्या नावाचा अर्थ 'समुद्राचे मूल' असा होतो. म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचे तर ती आहे सागरकन्या. पण ही सागरकन्या सागराइतकीच रौद्र रूप कधीकधी धारण करू शकते.
यांगत्झे नदीच्या एकूण ७०० उपनद्या आहेत आणि ८ महत्त्वाच्या नद्या येऊन मिळत असतात. या नदीवर बांधलेले थ्री गॉर्जेस धरण हे आधीच्या काळापासून चँग कैशेकचे स्वप्न होते. तेव्हा जे धरण त्याच्या मनात होते ते आजच्या इतके मोठे नसेलही. पण या ठिकाणी धरण बांधावे आणि त्यातून चीनची मोठी जमीन भिजू द्यावी, हे तेव्हापासूनच्या राज्यकर्त्यांचे स्वप्न होते. 
चीनमधील नद्या आणि महापूर
चीनमध्ये १९३१मध्ये सर्वात मोठा पूर आला होता, त्यात किमान २० लाख लोक मृत्युमुखी पडले होते. जवळपास इंग्लंडएवढ्या आकाराचा प्रदेश पाण्याखाली गेला होता. त्यानंतरच वुहानकडे जाणाऱ्या पाण्याला काहीशी उंची देऊन पाणी अन्यत्र वळवण्यात आले. वुहान हे शहर ‘चीनचे शिकागो’ म्हणूनही ओळखले जाते. यांगत्झे आणि हान या नद्यांमध्ये एक वाहतूक मार्ग आहे. वुहान हे दक्षिण चीनचे त्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक, व्यापारी, वाहतूक आणि शैक्षणिक केंद्र बनले. या शहरावर एकेकाळी जपानचे राज्य होते. चीनची ती युद्धकालीन राजधानी असल्याने ती १९३८मध्ये जपानने जिंकून घेतलेली होती. १८ डिसेंबर १९४४ रोजी अमेरिकेने वुहानवर हवाई बाँबफेक केली होती आणि त्यात हजारो चिनी मारले गेले होते. त्याचा सूड म्हणून वुहानमधून निघालेल्या विषाणूने अमेरिकनांना मारल्याचा दावा आता कोणी नंतरच्या काळात केला, तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. वुहानला यांगत्झे नदीचा विळखा कसा पडतो एवढ्यापुरताच हा इतिहास मर्यादित ठेवला, तरी वुहानचे विधिलिखित यांगत्झे नदीच्याच हाती कसे आहे ते लक्षात येते. सांगायचा मुद्दा असा की, वुहान हे शहर अखेरीस सप्टेंबर १९४५मध्ये पुन्हा एकदा चीनच्या ताब्यात आले. त्यानंतर वुहान चर्चेत आले आणि आता तर सर्व जगाच्या तोंडात वुहानचेच नाव आहे.
यांगत्झे या नदीइतकीच दुसरी मोठी आणि महत्त्वाची नदी म्हणजे यारलुंग त्सांगपो किंवा यारलुंग झांगबो म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदी हीदेखील एक मोठी नदी. ही पश्चिम तिबेटमध्ये उगम पावते. कैलास मानसरोवराच्या आग्नेयेस तिचा उगम होतो आणि ती चीनमधून अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मग बांगला देशमार्गे ती समुद्राला जाऊन मिळते. या ब्रह्मपुत्रेच्या पाण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात समझोता झाला असला, तरी तो करार नाही आणि समझोता असो वा करार, चीनला कोणतीच गोष्ट कधी पाळता येत नाही हे आपण आतापर्यंत पाहिलेले आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी वळवण्यासाठी चीन एक हजार किलोमीटरचे भुयार निर्माण करतो आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे, तिच्याबाबत जरा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट या हाँगकाँगमधल्या दैनिकाने युनान प्रांतात ६०० किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करायचे कामही सुरू झाल्याची बातमी दिली आहे. हा तिबेटच्या भुयारी मार्गाला मार्गदर्शक प्रकल्प असल्याचे मानले जात आहे. आणखी आठ-दहा वर्षांनी चीनला त्याची गरज असेल असे सांगितले जात आहे. म्हणजे तसे आणखी मार्ग निर्माण केले गेले तर काय होईल, ते सांगता येणे अशक्य आहे. चीन हा असा दुष्टपणा करू शकतो, हे गेल्या काही दशकांमध्ये आपण पाहिले आहे. चीनने शिंजियांग आणि युनान प्रांतांमध्ये बांधण्यात आलेली धरणे सध्या कझाकस्तान, लाओस आणि थायलंड या देशांना सतावत आहेत. त्यांच्याबरोबरच चीनने कंबोडिया, व्हिएतनाम यांनाही पाणीयुद्धाच्या दहशतीखाली ठेवलेले आहे. म्हणूनच चीनला आवर घालणारी महाशक्ती निर्माण झाली, तरच जगाचा निभाव लागायची शक्यता आहे.
९८२२५५३०७६
Powered By Sangraha 9.0