@आबा मुळे
श्रीक्षेत्र मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड हे समाजाला दिलासा देणारे आणि सुसंस्कार करणारे असे हे क्षेत्र जीवनमूल्यांवर श्रद्धा कायम ठेवण्याचे कार्य अविरत करीत आहे. कोरोनाच्या संकटकाळातही संस्थानाच्या मार्फत जात, धर्म, मानव, प्राणी, असा कुठलाच भेद न मानता सेवाकार्य चालू आहे. किसनगिरीबाबांच्या निर्वाणानंतर पूजनीय भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचा कारभार सुरू आहे.
धर्म जागो गुरुमहिमा देही दाविला देवl निवारिणी भवर जाळी अवघा निरसला भेवll ए.म. ll
गुरुमाहात्म्याची प्रचिती देणारे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध ठिकाण म्हणजे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड. मांगल्य, दिव्यता आणि रमणीयता यांचा त्रिवेणी संगम असलेले हे तीर्थक्षेत्र गोदामाई व प्रवरामाई यांच्या पवित्र संगमाजवळ सद्गुरू किसनगिरी महाराज यांनी उभारलेले आहे.
पवित्र ते कुळ पावन तो देशl
जेथे हरीचे दास जन्म घेतीll
तुकाराम महाराजांच्या या वाक्याप्रमाणे शबरी कुळात जन्माला आलेला किसन नावाचा मुलगा भावांबरोबर मासे पकडायला जायचा. पण भावाने पकडलेले मासे तो पुन्हा पाण्यात सोडून द्यायचा. प्रवरा तिरावर वाळलेल्या औदुंबराला डोक्यावरून पाणी आणून घालायचा. त्याच्या या तऱ्हेवाईकपणामुळे सगळे चेष्टा करायचे. पण काय आश्चर्य, एक दिवस या वठलेल्या औदुंबराला पालवी फुटली आणि किसनमधील संतत्व लोकांना जाणवू लागले. किसनचे किसन महाराज, किसनगिरीबाबा बनले. याच वृक्षापाशी बाबांनी गुरू दत्तात्रेयांची स्थापना केली. १९५७मध्ये भव्य मंदिराचे बांधकाम सुरू झाले. परिसरातील समाजाला दिलासा देणारे आणि सुसंस्कार करणारे असे हे क्षेत्र जीवनमूल्यांवर श्रद्धा कायम ठेवण्याचे कार्य गेल्या ७० वर्षांपासून करीत आहे. वै. धुंडामहाराज देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या शुभहस्ते येथील निसर्गरम्य परिसरात मंदिराची उभारणी झाली आहे. १९८३पासून हरिकथा, कीर्तन, प्रवचन या माध्यमांतून नियमितपणे समाजप्रबोधन केले जाते. सुमारे ५० विद्यार्थी येथे शालेय शिक्षणाबरोबरच गीता, हरिपाठ, मृदंगवादन, ज्ञानेश्वरी, गाथा यांचे अध्ययन करीत आहेत. किसनगिरी बाबांनी दाखवलेल्या मार्गानुसार दर वर्षी माधुकरीच्या माध्यमातून संस्थानाचा आर्थिक कारभार चालतो. आता हजारो अनुयायी आहेत. दिंडीत दर वर्षी दोन हजारपेक्षा अधिक वारकरी असतात. बाबाजींनी सांगितले म्हणून शेकडो शेतकर्यांनी देशी गाईंचे पालन सुरू केले आहे.
देवगड फाट्यावरील कमानीतून आत प्रवेश केला की ठायी ठायी संस्थानाच्या भव्यतेचा आणि पावित्र्याचा प्रत्यय आपल्याला येतो. गाईंसाठी स्वच्छ व नीटनेटका, सुंदर मुक्त गोठा आहे. कीर्तन-प्रवचनासाठी १५,००० भक्त बसू शकतील एवढी मोठी 'ज्ञानसागर' वास्तू आहे. प्रवरा तिरावर भव्य घाट बांधलेला असून तेथे माफक दरात नौकाविहाराचा आनंदही घेता येतो. एकाच वेळेस हजारो भाविक भोजनाला बसू शकतील एवढे मोठे प्रांगण व तेवढीच मोठी पाकशाळा आहे. यात्रेकरूंना राहण्यासाठी दोन मोठे यात्री निवास आहेत. एक हजार भाविक राहू शकतील असे स्वतंत्र, भव्य ७५ खोल्यांचे भक्तनिवास आहे. व्यापारी संकुल आहे, दवाखाना आहे, शुद्ध पेयजल व्यवस्था आहे. शौचालय, बस स्थानक आहे. मंदिराच्या भव्यतेची महती सांगणाऱ्या तीन भव्य कमानी आपले स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. नेवासा येथील गुरू विश्वनाथबाबा यांचे शिष्य किसनगिरीबाबा आणि किसनगिरीबाबांचे शिष्य भास्करगिरी महाराज. या गुरुदत्त संस्थानची गेल्या ४७ वर्षांपासून नियमितपणे पंढरपूरला आषाढी दिंडी जाते. सर्वात शिस्तबद्ध आणि आकर्षक दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे. पांढराशुभ्र वेष आणि खांद्याला केशरी रंगाच्या पिशव्या अडकवलेले वारकरी "राम कृष्ण हरी'चा घोष करीत चालताना पाहिले की अंत:करणात भक्तीचे तरंग उठतात. दिंडीच्या पुढे कोणी जाणार नाही की मागे कोणी राहणार नाही. प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहायलाच पाहिजे हा दंडक. चालत्या दिंडीतून कोणी लघुशंकेला गेला, तरी पाय धुतल्याशिवाय तो परत येणार नाही. रात्री कीर्तनाला उशीर झाला, तरी सर्व बसूनच कीर्तन ऐकणार! कोणीही आडवे होणार नाही. याला कारण बाबाजी स्वतः सर्वांच्या आधी उठतात आणि सर्वांच्या नंतर झोपतात, आणि पूर्ण दिंडी पायी चालतात. असे हे सर्वांचे श्रद्धास्थान असलेले पूजनीय भास्करगिरी महाराज हे सर्व समाजाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ आहेत.
विदर्भातील शेगावजवळील पिंपराळा हे छोटेसे खेडेगाव हे पूजनीय भास्करगिरी महाराजांचे मूळ गाव. आई सरूबाई आणि वडील ज्ञानदेव पाटील पिसोडी यांनी आध्यात्मिक शिक्षणासाठी मुक्ताईनगरजवळील मेहूण येथे महंत श्रीराम महाराज यांच्याकडे ठेवले होते. हिऱ्याची पारख फक्त जवाहिऱ्यालाच कळते. पूजनीय किसनगिरीबाबांनी हा हिरा १९७५च्या दरम्यान देवगडच्या कोंदणात बसवला. १९८३मध्ये किसनगिरीबाबांच्या निर्वाणानंतर पूजनीय भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचा कारभार सुरू झाला.
महाराज सध्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानाचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. अयोध्या राम मंदिर आंदोलनात महाराजांचा मोलाचा वाटा होता. रामशिला पूजन समितीचे ते महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष होते. विश्वमंगल गोग्राम यात्रेचे ते प्रांताचे संयोजक होते. डाॅक्टर हेडगेवार जन्मशताब्दी समारोह समितीचे, गोळवलकर गुरुजी जन्मशताब्दी समारोह समितीचे ते सदस्य होते.
८ नोव्हेंबर २०१७ला राष्ट्रीय संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी देवगड येथे मुक्कामी भेट दिली होती. समाजसेवा आणि राष्ट्रभक्ती हा स्थायिभाव असल्यामुळे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना या आपत्तीच्या काळात आपापल्या घरी पायी जाणाऱ्या परप्रांतीयांच्या भोजनाची व्यवस्था वडाळा व प्रवरा संगम या दोन ठिकाणी सुमारे महिनाभर करण्यात आली. गंगापूर येथील तहसीलदार यांच्या विनंतीनुसार तेथील क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींसाठी संस्थानच्या वतीने कोरडा शिधा पाठवण्यात आला. परिसरातील पाच गावातील ४५० गरजू कुटुंबांना तांदूळ, तेल, साबण गहू अशा जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्यात आल्या. तालुक्यातील गोशाळांना चारा रूपाने मदत केली. मुख्यमंत्री साहाय्यता निधीलाही भरीव निधी देण्यात आला.
'नित्य नूतन' हे ब्रीद असलेल्या या संस्थानामध्ये आपण केव्हाही गेलात, (अगदी आठ दिवसांनी गेलात) तरीसुद्धा आपल्याला काहीतरी नवीन पाहावयास मिळेल. येथील हार-प्रसाद दुकानदार ठरलेल्या दरानेच विक्री करतात. येथे लूट चालत नाही, अन्यथा त्याचा परवाना रद्द होतो. पण येथील वातावरणामुळे आणि पूजनीय बाबांच्या पुण्याईने अशी लूट करण्याची भावनाच निर्माण होत नाही. रोज संध्याकाळी सर्व विद्यार्थी भास्करगिरी महाराजांबरोबर गीता, हनुमान चालिसाचे पाठ म्हणतात. गुरू दत्तात्रेयांच्या मूर्तीची औदुंबराखाली स्थापना करून या परिसराला किसनगिरी बाबांनी 'देवगड' असे सार्थ नाव दिलेले आहे. खरोखरीच येथे आल्यावर 'देवाच्या अस्तित्वाची' जाणीव होते. परिसरातील अंनिसचे कार्यकर्तेदेखील बाबांच्या दर्शनाला येतात.
मुख्य दत मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, किसनगिरी बाबांचे समाधी मंदिर, शनी, मारुती, नवनाथ अशी सुंदर, सुबक, स्वच्छ मंदिरे परिसरामध्ये आहेत. कोरोनाच्या काळात थोडी उसंत मिळाल्यामुळे सौर ऊर्जेवर आधारित अशी विद्युत रोशणाई या परिसरात केली आहे. त्यामुळे सायंकाळी हे दिवे लागले की पृथ्वीवर स्वर्गच उतरला आहे असा भास होतो. हे सर्व भव्य-दिव्य दर्शन घडले की अश्रद्धाचेही नकळत हात जोडले जातात. एवढे वैभवशाली संस्थान, पण येथे प्रत्येकाची भाषा सौजन्याची, प्रत्येकाच्या नजरेतील भाव भक्तीचा आणि प्रत्येकाचे हात सेवेसाठी सिद्ध! कारण ही सगळी शिकवण आहे शांतिब्रह्म भास्करगिरी महाराजांची!"आणि मला प्रसाद मिळाला!"
श्रीदत्त देवस्थान, देवगड येथे मोठी गोशाळा आहे. तेथील गोसेवक बाबासाहेब चव्हाण सांगत होते, "लाॅकडाउनमुळे आमच्या संस्थानातील बहुतेक सेवकांना बाबांनी घरी पाठवलं होतं, पण माझ्याकडे गाई सांभाळण्याचं काम असल्यामुळे मला सुट्टी मिळाली नव्हती. मी नेहमीप्रमाणे कामावर यायचो आणि गाईंना चारापाणी करून संध्याकाळी उशिरा घरी जायचो. एके दिवशी घरी पोहोचलो, तर समोरच एक मोठी भरलेली गोणी दिसली. मी पत्नीला विचारणार, तेवढ्यात तीच म्हणाली, "अहो आज दुपारी संस्थानची गाडी आली होती आणि अजयभाऊ हे किराणा सामान ठेवून गेले."
मी विचार करीत होतो, बाबाजींनी कशाला पाठवलं असेल सामान? पत्नी म्हणाली, "बाबाजींचा निरोप आहे की, सध्या सगळं बंद आहे. संस्थानचा एकाही सेवक उपाशी राहता कामा नये."
मी मनापासून हात जोडले. ओठातून शब्द आले, "गुरुदेव दत्त।"
------------------------------तो देव आम्हाला देतो!
पंचक्रोशीत राहणारे बापू माळी आणि दत्तू आहिरे सांगत होते, "आखिती (अक्षय तृतीया) जवळ आली होती. आमच्या वस्तीवरच्या बऱ्याच घरांमधील दाणापाणी संपत आलं होतं. आखिती कशी करायची? बाप्पाला निवेद काय दाखवायचा याची चिंता होतीच, पण खायला तरी घरात काय होतं? पण अचानक वस्तीत देवगडचा टेंपो येऊन उभा राहिला. बाळूमहाराज, अजयभाऊ, संदीपभाऊ खाली उतरले. आम्हाला सगळ्यांना बोलावलं. पाच पाच फुटांवर उभं केलं आणि आमच्या हातात गहू, तांदूळ, साखर, तेल, तूप अशा वस्तूंनी भरलेल्या थैल्या दिल्या. वस्तीतल्या म्हाताऱ्या आनंदाने रडत होत्या आणि म्हणत होत्या, "कलियुगातसुद्धा देव मदतीला धावतो रे पोरांनो. भास्करगिरी बाबाच्या रूपानं देवच आपली काळजी घेतोय."
-------------------------------------------
वैष्णवांचे ठायी नाही भेद अमंगळ
देवगडजवळ बकुपिंपळगाव नावाचं छोटं गाव आहे. एके दिवशी तेथील मुस्लीम बांधव करीमभाई यांच्या घरासमोर टेंपो उभा राहिला. करीमभाई सांगत होते, "टेंपो का थांबला म्हणून मी बाहेर डोकावले, तेवढ्यात आवाज आला - करीमभाई, या. देवस्थानने तुम्हाला किराणा पाठवलाय. ईद जवळ आली आहे ना?"
करीमभाई म्हणाले, "मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. बाबाजी हिंदू धर्माचं काम करतात आणि काळजी रमजान ईदची करतात! अल्ला आणि ईश्वर एकही है, इसके वासते दत्त मंदिरसे हमे शिधा भेजा थाl" असं म्हणत त्याने आकाशाकडे बघत हात जोडले आणि मी म्हटलं, रामकृष्णहरी!
---------------------------
गोधन हेच खरे धन
श्रीदत्त देवस्थान, देवगडचे व्यवस्थापक महेंद्र फलटणे यांनी सांगितले की, "वृंदावन येथील ....... महाराजांचा निरोप आला की, त्यांच्या गोशाळेतील दहा हजार गायींसाठी चारा शिल्लक नाही. लाॅकडाउनमुळे आर्थिक आवकही बंद झाली आहे. भास्करगिरी महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता मला सांगितले, ताबडतोब अडीच लाख रुपये पाठवून द्या. गोधन वाचले पाहिजे. पैशाची काळजी करू नका. गोसेवेचे पुण्य मोठे आहे. असे सर्वांचे जात, धर्म, मानव, प्राणी भेद न करणारे आमचे बाबाजी आहेत. पाथर्डी येथील एका गोशाळेला संस्थानने २५,००० रुपये पाठविले. कडबाकुट्टीचे मशीन नसल्यामुळे खूप चारा वाया जातो, हे लक्षात आल्यावर महाराजांनी दहिगाव व गंगापूर येथील गोशाळांना कडबाकुट्टी मशीन पाठवून दिले."
महेंद्र फलटणे पुढे सांगतात, "लाॅकडाउनच्या काळात सुमारे ९०% सेवकांना सुट्टी दिली होती. पण या काळातील अडचणी ओळखून संस्थानच्या वतीने सर्वांच्या घरी त्यांचे पगार आणि किराणा किट्स पाठवण्यात आले. सर्व सेवकांना ही अनपेक्षित भेट मिळाल्यामुळे ते आनंदित झालेच आणि बाबाजींच्या मायेमुळे गहिवरून गेले."
__________________________Type text hereहे उलटं होतंय का?
पूजनीय भास्करगिरी महाराजांचे साहाय्यक बाळूमहाराज कानडे यांनी सांगितले, "माळेवाडी येथील जनजाती (भिल्ल) वस्तीवर देण्यासाठी आम्ही किराणा सामान घेऊन गेलो. खरं तर ही माणसंही लाॅकडाउनमुळे अडचणीत होती, पण दत्त देवस्थानने पाठवलेली मदत पाहून सुरेश सोनवणे व इतर माणसं म्हणत होती, "बाळूमहाराज, आम्ही देवाला द्यायचं असतं, पण आज देवानेच आम्हाला मदत पाठवलीय. सुदाम्याला देवाने मदत केली होती असं बाबाजी कीर्तनात सांगतात, ते खरंच असेल, नाही!"
_____________________
भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम
नेवासा शहरात काही कोरोना रुग्ण सापडले. शासकीय यंत्रणा हादरली. नेवासा आणि परिसर 'हाॅटस्पाॅट' म्हणून जाहीर झाला. बंदोबस्तासाठी राखीव पोलीस दलाचे १२५ जवान आले. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था कोण करणार? देवगडच्या दत्त देवस्थानने ही जबाबदारी उचलली. रोज स्वयंपाक करून या जवानांसाठी जेवणाची पाकिटे बनवून प्रत्येकाला जागेवर पोहोचती केली जायची, त्याबरोबर पाण्याची बाटलीसुद्धा आठवणीने दिली जायची. ही जबाबदारी पंधरा दिवस पार पाडणारे मुरम्याचे सरपंच अजय साबळे पाटील यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले की, "रोज गरम पोळ्या, भाजी, शिरा, बुंदी, मसालेभात वगैरे पदार्थ पाहून हे जवान हर्षभरित होऊन म्हणायचे, "गोदावरी-प्रवरा नद्यांच्या संगमावर आम्हाला भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. या संगमातील आस्थेच्या, मायेच्या प्रवाहात आम्ही चिंब न्हाऊन निघालो आहोत. देव बाबाजींना आणि तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य व आरोग्य देवो, हीच गुरू दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना!"
श्री गुरुदेव दत्त!
आबा मुळे, नेवासा.