@सुनील गायकवाड
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात सराला संस्थानने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे वाटप केले. यातून शेकडो नागरिकांच्या अन्नाची सोय झाली. बेट परिसरातील एका गावाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निधीत एक लाख रुपयांचा निधी जमा केला. महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते निधीसाठी धनादेश सुपुर्द करण्यात आला.
औरंगाबाद, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ख्याती असलेले सदगुरू योगिराज गंगागिरी महाराज संस्थान, सराला बेट हे क्षेत्र पवित्र गोदावरी नदीच्या दुभंगातून तयार झाले आहे. सराला बेट या नावाने ते पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हे धार्मिक क्षेत्र तब्बल ६५ एकर विस्तीर्ण भूप्रदेशावर वसले असून चोहोबाजूंनी नदीचा निसर्गरम्य परिसर व झाडी यामुळे येथे आल्यावर प्रत्येक भाविकाला परमार्थाबरोबरच निसर्गाशी साधर्म्य साधल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.
सदगुरू ब्रह्मलीन गंगागिरीजी महाराज यांच्या स्पर्शाने पुनित झालेल्या या क्षेत्राला तब्बल पावणेदोनशे वर्षांची अन्नछत्राची परंपरा आहे. गंगागिरी महाराजांनी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेचा श्रीगणेशा केला. 'लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डूबने को अभिमान' हे महाराजांचे ब्रीद होते. पारमार्थिक जीवन जगत असताना महाराजांनी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून रयतेला परमार्थाचा नेमका अर्थ समजावून सांगितला. सर्वसामान्य जनतेसाठी ऐहिक जीवनाबरोबरच परमार्थ कसा साधावा, याचा मार्ग दाखवला. पण हे करत असताना भ्रमंतीदरम्यान महाराजांना दु:खीकष्टी लोक दिसले. अन्नावाचून दैन्यावस्था आलेली पीडित जनता पाहून महाराजांचेही मन हेलावून जात असे. जनतेचे दु:ख, दारिद्र्य दूर करण्यासाठी काय करता येईल, याचा महाराज नेहमी विचार करत असत. यातूनच सप्ताहाचे आयोजन करून अन्नछत्र सुरू करण्याचा मार्ग पुढे आला. पण त्याकाळी सप्ताहाचे आयोजन म्हणजे आजच्यासारखा डामडौल अजिबात नव्हता. सप्ताहभर अतिशय साध्या पद्धतीने कीर्तन-प्रवचनातून भाविकांसाठी सत्संगाचे आयोजन व अन्नदान हा त्यामागचा प्रमुख हेतू होता. श्रावण शुद्ध पंचमी ते द्वादशी या तिथींना धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने घेतला जाऊ लागला. योगिराज गंगागिरी महाराजांनी १७३ वर्षांपूर्वी सप्ताह व अन्नछत्राची परंपरा सुरू केली. ती आजतागयत सुरू असून सराला बेटाचे सर्वदूर पसरलेले भाविक हा सप्ताह आपल्याच गावात घेण्यासाठी उत्सुक असतात.
सदगुरू गंगागिरीजी महाराजांनंतर सदगुरू दत्तगिरी महाराज, सदगुरू नाथगिरी महाराज, सदगुरू सोमेश्वरगिरी महाराज व सदगुरू नारायणगिरी महाराज यांनी सराला बेटाची धुरा सांभाळली. त्यांनी सप्ताहाची परंपराही अव्याहतपणे सुरू ठेवली. १९५३मध्ये महंत सोमेश्वरगिरीजी महाराज यांनी नारायणगिरी महाराजांना निमंत्रित करून पंचदशनाम जुन्या आखाड्याचे महंत निलगिरीजी महाराज यांच्या हस्ते सराला बेटाची दिक्षा दिली. तेव्हापासून महंत नारायणगिरी महाराजांनी सराला बेटाची गादी सांभाळली. त्यांच्या काळातही अखंड हरिनाम सप्ताहांनी, हरिकीर्तनाच्या कार्यक्रमांनी बेटाचा परिसर गजबजत होता. १९ मार्च २००९ रोजी महंत नारायणगिरी महाराजांचे महानिर्वाण झाले. त्यांच्यानंतर बाजाठाण आश्रमाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी सराला बेटाची गादी सांभाळली व आजतागायत ते या गादीवर विराजमान आहेत. बेटामध्ये गुरुकुल पद्धतीने ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे होत असून शेकडो वर्षांची गुरु-शिष्य परंपरा जोपासली जात आहे. मार्गशीर्ष अमावस्येला ब्रह्मलीन गंगागिरीजी महाराज यांची पुण्यतिथी, गुरुपोर्णिमा उत्सव, महंत नारायणगिरी महाराज पुण्यतिथी, नवरात्रात दुर्गाष्टमी होमयज्ञ या काळात बेटावर उत्सव भरतात. याशिवाय इतर वेळीही बेटावर यात्रा-उत्सवानिमित्त हजारो भाविकांची दर्शनासाठी रेलचेल असते.
सराला बेटावरील सदगुरू गंगागिरी महाराज संस्थानचा विस्तार करण्यात आला असून पंढरपूर, आळंदी, पुणतांबा व त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री सदगुरू गंगागिरी महाराज मठाची स्थापना करण्यात आली आहे. दर्शनयात्रेनिमित्त भाविकांना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहण्याची सोय उपलब्ध होते. महंत रामगिरीजी महाराज औरंगाबाद, अहमनगर व नाशिक जिल्ह्यांत भ्रमण करून कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करतात. बेटात गुरुकुल पद्धतीने ज्ञानदानाचे काम सुरू असून भव्य गोशाळाही उभारण्यात आली आहे. त्यातून गोसेवाही घडते. संस्थानामार्फत बेटात अन्नदान केले जाते. याशिवाय संस्थानचे ग्रंथालय असून परिसरात वृक्षारोपणाचे व वृक्षसंवर्धनाचे कामही सुरू असते. त्यामुळे हा परिसर अतिशय रमणीय झाला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात सराला संस्थानने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे वाटप केले. यातून शेकडो नागरिकांच्या अन्नाची सोय झाली. बेट परिसरातील एका गावाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निधीत एक लाख रुपयांचा निधी जमा केला. महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते तत्कालीन तहसीलदार (प्रभारी) महेंद्र गिरगे यांच्याकडे मुख्यमंत्री निधीसाठी धनादेश सुपुर्द करण्यात आला. कोरोनाकाळात सराला बेटाने गरजूंना अन्नधान्य पुरवून मोलाची भूमिका निभावली.