॥ विठ्ठलाच्या पायी थरारली वीट ॥

27 Jun 2020 18:11:49


pandharpur ashadhi ekadas
आपल्याच निर्मिलेल्या जगात आनंदाने जगायला पाठवलेली आपलीच लेकरं एकमेकांत भेदभाव करत अाहेत, कुठल्यातरी खुळचट समजुतींना श्रद्धा समजून कवटाळत आहेत, नवनवे भेद निर्माण करत आहेत हे पाहून ते जगत्पालकही हताश झाले असतील. अाणि मग आपल्याच रचनेत निर्माण झालेले दोष नाहीसे करण्याकरता त्यांनी दैवी प्रतिभा आणि मातृहृदय देऊन संतमंडळींना पाठवायला सुरुवात केली असेल...
ज्ञानदेवांचा पाया ते तुकोबारायांचा कळस अशी संतकृपेची इमारतच महाराष्ट्रात उभी राहिली. ती परंपरा खंडित झाली असं वाटलं, पण ती आधुनिक काळात समाजसुधारकांच्या रूपाने सुरू राहिली. तुकडोजी महाराज व गाडगेमहाराज हे संत या सांध्यावरचे.
गाडगेबाबा लोकांच्यात राहून, त्यांच्या भाषेत बोलून, त्यांनाच प्रश्न विचारून, त्यांच्याच तोंडून सत्य वदवून घ्यायचे. समाजात बोकाळलेल्या अंधश्रद्धांवर त्यांनी जोरदार प्रहार केले. कीर्तनाचं माध्यम समाजसुधारणेकरता किती प्रभावीपणे वापरता येतं, हे प्रथम त्यांनी दाखवलं. "देव कोनाले दिसत नाही - जेजे मनी दिसते ते सपनी दिसते - देव ही दिसायची वस्तू नाही. देव तीर्थात नाही. देवाची भक्ती कर्मकांडात नाही. तेला भजन पुरते. म्हना - गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला!" असं म्हणत, बोलत, विचारत, गात गात प्रबोधन सुरू राही. चोरी करू नका, व्यसनाच्या नादी लागू नका, देव काही तुमच्याकडे बोकडाचा बळी मागत नाही, त्यापरीस लेकराले शिक्षण द्या असं सांगत. जातपात पाळू नका, स्वच्छता पाळा, देव तर मुलामाणसात आहे - मूर्तीच्या नादी लागून त्याच्यावर कष्टाचा पैसा उडवू नका, असं परखडपणे अन कळकळीने मांडणार्‍या या राष्ट्रसंताच्या रूपाने 'शिवभावे जीवसेवा' हा रामकृष्णांनी दिलेला मंत्र सदेह साकार झाला होता. हा मूर्तिमंत पुण्यात्मा जेव्हा देह सोडून गेला, तेव्हा विठ्ठलाच्या पायात असलेली समतेची वीटदेखील थरथरली असेल..

राऊळीची घांट निनादली
उठला हुंदका देहूच्या वार्‍यात
तुका समाधीत चाळवला
अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव
निघाला वैष्णव वैकुंठासी
संतमाळेतील मणी शेवटला
आज अोघळला एकाएकी!
'देवकीनंदन गोपाला' हा अतिशय सुंदर चित्रपट १९७८ साली प्रदर्शित झाला. गाडगेमहाराजांच्या निधनप्रसंगी येणारं हे भावस्पर्शी गीत. भैरवीत बांधलेली राम कदमांची करुणगंभीर चाल आणि पंडित भीमसेनजींचा भारदस्त आवाज यामुळे हे गीत ऐकताना मन भरून येतं.. त्या विटेप्रमाणे थरारतं. आपल्या खांद्यावर हे संतपुरुष कोणती जबाबदारी देऊन गेले आहेत, याची जाणीव होते! विठ्ठलाचं स्मरण करणं म्हणजे हे भान जागं ठेवणं. नाही का?


Powered By Sangraha 9.0