आयुष्यभर जातीच्या हीनत्वामुळे होरपळ सोसाव्या लागलेल्या चोखामेळांनी दैन्य, दारिद्र्य, हेटाळणी, अवहेलना याची तक्रार विठूच्या दरबारी मांडली, पण ती दुरून. त्या सुखनिधानाला उराउरी भेटावं अशी तळमळ असूनही ते पदस्पर्शाला सोडाच, मंदिरप्रवेशालाही पारखे ठरले. अकाली अपघाती मरण आल्यानंतर त्यांच्या अस्थींना तरी विठ्ठलाच्या पायाशी स्थान द्यावं, असं नामदेवादी संत मंडळींनी ठरवलं. त्या दगडविटांच्या राशीखाली चेंबलेला त्यांचा देह अोळखावा कसा? असा प्रश्न पडल्यावर ज्यातून "विठ्ठल विठ्ठल" नाद ऐकू येईल, त्या अस्थी चोखोबांच्या असं म्हणून लोकांनी चोखोबांच्या अस्थी शोधल्या व टाळ-मृदंगांच्या नादात त्या मंदिरात आणल्या. असं म्हणतात की नामदेवांनी त्या विठ्ठलाच्या पायाशी धरल्यावर विठ्ठलाने आपल्या शेल्यात त्या घेतल्या व हृदयाशी धरून त्या परत नामदेवांच्या स्वाधीन केल्या. चोखोबा जिथे महाद्वाराच्या पायरीशी उभे राहून दर्शन घेत, तिथे त्यांना कायमचं स्थान मिळालं. पण ते तर विठ्ठलाने त्यांना आपल्या मनात कधीच दिलं होतं.
चोखोबारायांना भोगाव्या लागलेल्या दुःखामुळे त्यांच्या रचना करुण, आर्त असतील तर त्यात नवल नाही, पण चोखोबांच्या अभंगात वेदनेइतकाच चोख आध्यात्मिक आशयही आहे.
सार्या गावाची घाण निस्तरण्यासाठी ढोरमेहनत करता करता शिणलेला चोखोबांचा देह, पण विठ्ठलनामाचा छंद लागला अन चोखामेळा आतून उजळलाच! गावाने अस्पर्श ठरवलं, तरी त्या विश्वजनकाच्या सोयर्याधायर्यांनी चोख्याला आपलंसं केलं. नामदेव, ज्ञानेश्वर, सोपान, निवृत्ती या जिवलगांनी त्याला कवेत घेतलं. मुक्ताईसारखी गोजिरवाणी बहीण मिळाली. समजूत काढणारी जनी भेटली. हातात एकतारी घेतली नि काळजात विठूनामाची तार छेडली गेली की कसे मोत्याच्या दाण्यागत राजस शब्द मुखातून अोघळत! त्या मोत्यांच्या पोटात वेदनेचा कण होता, पण भवती विठूकृपेचं लखलखीत अावरण!
त्याच्या अंतर्दृष्टीला दिसत होतं की सारी माणसं देवाचीच लेकरं आहेत. बाहेरून रूपरंग निराळं असलं, तरी सार्यांची मुळं आतून एकच आहेत. परमेश्वराच्या विशाल वटवृक्षाच्या या निरनिराळ्या फांद्या. अातून सारे एकच तर आहोत! सारी विठ्ठलाची लेकरं. त्यात कसला अालाय भेदभाव! त्याच्या भक्तीच्या प्रांगणात सारे मिळून एकभावानं नांदू या.. पाहा, मला या जगाच्या पसार्याचं मूळच गवसलंय. त्यामुळे या अनंताचा जो पसारा, तोच माझाही संसार झाला आहे. आता कुणी परका वाटतच नाही अन् आता मरणाचं भयही वाटत नाही. या सार्या संतमंडळींनी मला आपलंसं केलं, माझ्यासारख्या दीनालाही संत म्हटलं.. आणखी काय हवं!
देहाने भेटता आलं नाही, तरी मनाने त्या ब्रह्मरूपात विलीन झालेल्या चोखोबांच्या एका सार्थक क्षणाचं हे शब्दरूप!
माझा वाढला संसार
जेथे पाहो तेथे
एका वडाचा विस्तार
माझा वाढला संसार ॥
आम्ही विठ्ठलाची बाळे
खेळ खेळतो लडिवाळे
एका भावे नांदू
उंच नीच सान थोर
माझा वाढला संसार ॥
नाही काळाचीही भीती
मूळ गावले अनंती
संतासंगे संत झाला
हीनदीन म्हार
माझा वाढला संसार ॥
१९५० साली आलेल्या 'जोहार मायबाप' या संत चोखामेळा यांच्या चरित्रावरच्या चित्रपटातलं हे गीत. यात गदिमा-बाबूजी यांच्या जोडीने पुलंही आहेत, हा आणखी एक छान योग. हाच चित्रपट नंतर २० वर्षांनी, म्हणजे १९७३ साली पुन्हा रसिकांसाठी 'ही वाट पंढरीची' या नावाने प्रकाशित झाला होता, तर गेल्या वर्षी या तिन्ही दिग्गजांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने या चित्रपटाचं डिजिटायझेशन व रीस्टोरेशन केलं आहे. यातला पुलंचा साधाभोळा चोखामेळा फार लोभस आहे! बाबूजींचं संगीत व त्यांचा आवाज यामुळे 'माझा वाढला संसार' ही संत चोखोबारायांची रचना श्रवणीय तर आहेच, तशीच पुलंच्या भूमिकेमुळे प्रेक्षणीयदेखील आहे!