महाराष्ट्रात संत, पंत आणि तंत या तिन्ही कविपरंपरांचे प्रवाह जोरकस आहेत. संतांच्या रचना तर भक्तिरसानेच अोतप्रोत भरलेल्या आहेत. पंत काव्यातही भक्तीचा प्रभाव आहेच, पण विशेष म्हणजे तंत काव्यात व त्यातही अगदी चक्क लावणीतसुद्धा विठ्ठलभक्ती रेखाटलेली आहे. डॉ. रामचंद्र देखणे यांनी विठ्ठलाची लावणी लिहिणार्या शाहीर परशराम यांची माहिती दिली आहे -
साक्षात पंढरी देव दिगंबरमूर्ती
जनमूढा तारिते विठ्ठल तूर्तातूर्ती
अशी त्याची सुरुवात होती. लोकवाणीतल्या विठ्ठलाला हा लावण्यालंकार घालणारा बहुधा तो एकमेवच.
'जनमूढा तारिते' हे ब्रीद असलेला श्रीविठ्ठलाच्या भक्तिरंगात न्हायला सर्वांनाच आवडलेलं आहे. पोटाकरता अंगातली कला विकणार्या कलावंतिणींच्या आतदेखील मायेचा झरा असतो, भक्तीची ज्योत असते. पण या स्त्रियांना समाज कधीच सामावून घेत नाही, प्रतिष्ठा देणं तर दूरच. जातीपेक्षाही पेशाचं हीनत्व त्यांना देवापासूनही दूर ठेवतं. कान्होपात्रेसारखी कलावंतीण विठ्ठलाच्या भक्तीत इतकी रंगली की त्याच्याकरता तिने मृत्यूही कवटाळला, पण त्याच्या भक्तीत भिजलेल्या देहाला तिने बादशहाच्या वासनेची शिकार बनू दिलं नाही. कान्होपात्रा, महानंदा अशा अनेक कलावंतिणी संतपदाला पोहोचल्या. पण तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे अक्षरशः निखार्यांवर चालणंच आहे.
भांगेतल्या तुळशींच्या या मंजुळांची परंपरा आजही कलावंतांनी जपली आहे. पुणे जिल्ह्यातलं केडगाव चौफुला हे संगीतबारीत रमलेलं ठिकाण. देहूकडून यवतमार्गे पंढरपूरला जाणारी तुकाराम महाराजांची पालखी इथून जाते. त्यामुळे आषाढ लागला की या बारीला वारीचे वेध लागतात. तिथल्या कलावंत असं मानतात की आपण स्वतः जाऊ शकत नाही, तर विठ्ठलच वारकर्यांच्या रूपात आपल्याला भेटायला येतो. त्याची सेवा हीच पांडुरंगाची सेवा असं मानून त्या येणार्या वारकर्यांची सेवा करतात. जवळपास तीस वर्षं तिथलं अंबिका कलाकेंद्र वारकर्यांच्या जेवणाची व्यवस्था करतं. आठ-दहा हजार लोक या कान्होपात्रांचा प्रसाद घेऊन जातात. या कलावंतिणी जेव्हा स्वतः पंगती वाढतात, तेव्हा त्यांना देवालाच जेवू घातल्याचं समाधान मिळतं.
या कलावंत स्त्रियांचीही नाळ थेट विठ्ठल-रखुमाईच्या कथेशी जोडलेली आहे. असं म्हणतात की रुक्मिणी जेव्हा श्रीकृष्णावर चिडली, तेव्हा तिने त्याच्या हातातली मुरली हिसकावून घेतली व फेकली. ती पडली जेजुरीत. तिचीच झाली मुरळी - म्हणजे देवाकरता नाचणारी कलावंत. त्यामुळं टाळाचं नातं विठ्ठलाशी, तसं चाळाचं श्रीकृष्णाशी असं त्या मानतात आणि मग वारकर्यांची जेवणं आटोपल्यावर त्यांच्याकरता खास हातात भगव्या पताका घेऊन या कला सादर करतात. चाळांच्या साथीला टाळ वाजतात. पोवाडे, अभंग यांची जुगलबंदी रंगते. विठ्ठलगीतांवरची नृत्यं रंगतात. देवाच्या दारी सारे समान या न्यायाला तिथे मूर्त रूप येतं. वारकरी स्त्री-पुरुष खास त्यांच्याकरता सादर होणार्या कार्यक्रमात दंग होतात नि त्यांच्या चेहर्यावरच्या आनंदाने या बहिणींचं काळीज फुलून येतं! त्यांच्या दृष्टीने ही दसरा-दिवाळीसारखी पर्वणी असते. भक्त नि कलावंत, वैराग्य नि शृंगार याचं अद्वैत तिथे उभं राहातं नि मधुराभक्तीच्या रसात चौफुल्याची माती भिजून जाते!