समरसता आणि तथागत

07 May 2020 10:49:31
आपण समरसता ही मानसिक अवस्था आहे हे समजून घेतले आहे. जेव्हा तुम्ही मानसिक पातळीवर समरस होता, तेव्हा आपोआपच तुमचा व्यवहारही तसाच होतो. मनाची मशागत करून आपण मनाची समरस अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो. मनावर ताबा मिळवण्याची कला ही एक प्रकारची साधना आहे. अशा प्रकारची साधना करणारे अनेक महापुरुष आपल्या देशात निर्माण झाले. त्यापैकी एक नाव म्हणजे तथागत गौतम बुद्ध हे होय.


bhagvan buddha_1 &nb 
आपण सर्व जण तथागतांचे जीवन चरित्र अभ्यासले आहे. दु:खाचे मूळ शोधून मानवाला सद्धर्माची शिकवण देण्याचे काम तथागतांनी केले आहे. तथागतांनी आपल्या साधनेतून जे ज्ञान प्राप्त केले, ते ज्ञान त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यांना सांगितले.
तथागतांनी सांगितलेले ज्ञान हे आपण आपले जीवन जगण्यासाठी कशा प्रकारे व्यवहार करावा आणि कोणत्या स्वरूपाचा व्यवहार त्याग करावा यांचे दिशादर्शन करणारे आहे. तथागत गौतम बुद्ध म्हणतात, "मी मोक्षदाता नाही, मार्गदाता आहे." तथागतांनी सांगितलेले ज्ञान हे प्रेम, करुणा, शील, अहिंसा यांचा अंगीकार करणारे आहे, तर द्वेष, वैरभाव, अहंकार, ईर्षा यांना नाकारणारे आहे. त्यांनी जातिभेद नाकारला. विशेषाधिकार नाकारले. स्वामी विवेकानंद तथागतांचे वर्णन करताना म्हणतात, "बुद्धदेवांना लावलेल्या अनेक विशेषणांपैकी मला आवडणारी सगळ्यात उत्कृष्ट विशेषणे म्हणजे 'जातिभेदभंजक', 'विशेषाधिकारनाशक' आणि 'सर्व प्राण्यांच्या समानतेचा उपदेशक' ही होय. बुद्धांनी समतेच्या कल्पनेचा प्रचार केला होता." तथागत बुद्धांनी बहुजनहिताय बहुजन सुखाय या तत्त्वाला आधार मानून आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केले. तथागतांनी सांगितलेले ज्ञान किंवा उपदेश व्यक्तिगत जीवनातील व्यवहाराशी जोडलेले आहे. एका अर्थाने तथागतांनी आपल्या उपदेशातून व्यक्तिनिर्माणाचे कार्य केले आहे. दु:खमुक्त जीवनासाठी त्यांनी पंचशील आणि अष्टांगिक मार्ग सांगितला. पंचशील म्हणजे काय? तर आपला जीवनव्यवहार कसा असावा याचे दिशादर्शन करणारे मार्गदर्शन सूत्र होय. तथागतांनी सांगितलेले पंचशील पुढीलप्रमाणे आहे -

१) मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.

२) मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.
 
३) मी कामवासनेच्या दुराचारापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.

४) मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.

५) मी मद्य तसेच मादक पदार्थांच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.

या पंचशीलाच्या जोडीला तथागतांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग पुढीलप्रमाणे आहे -

१) सम्यक दृष्टी, २) सम्यक संकल्प, ३)सम्यक वाचा, ४) सम्यक कर्म, ५) सम्यक जीवन, ६) सम्यक व्यायाम,

७) सम्यक स्मृती, ८)सम्यक समाधी.

पंचशील व अष्टांगिक मार्ग या दोन्ही गोष्टी मानवी जीवनात दैनंदिन व्यवहार कसा असावा यांचे मार्गदर्शन करणाऱ्या आहेत.

तथागत म्हणतात, "केवळ ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका, कोणतेही सिद्धांत पिढ्यान्पिढ्या चालत आले आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. बहुसंख्य लोक डोळे मिटून काही गोष्टींचे अनुसरण करतात, म्हणून तुम्हीही त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. एखाद्या प्राचीन ऋषीने म्हटले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. वडील माणसे आणि गुरुजन सांगतात एवढ्यावरून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. विचार करा, विश्लेषण करा आणि तुमचे निष्कर्ष तर्कसंगत असल्यास व सर्व जगासाठी हितकारक असल्यास ते स्वीकारा आणि त्याप्रमाणे वागा." तथागतांनी स्वत:चा विकास स्वत: करण्याचा 'अत् दीप भव'चा मार्ग सांगितला आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सूत्र तथागतांच्या उपदेशातून मिळते. या उपदेशाला समता, बंधुता यांचे अधिष्ठान आहे. मानवी जीवनात आपण कसे जगावे आणि आपला व्यवहार कसा असावा याचे दिशादर्शन तथागत करतात. त्याचे उदाहरण म्हणून धम्मपदे समजून घेतली पाहिजेत. तथागतांची काही निवडक धम्मपदे पुढीलप्रमाणे आहेत -

१) न हि वेरेन वेरानि सम्मन्तीध कुदाचनं।
अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनातन।
- या जगात वैराने वैर शमत नाही. अवैराने वैर शमते. हा सनातन धर्म आहे.

२) जयं वेरं पसवति दुक्खं सेति पराजितो।
उपसंन्तो सुखं सेति हित्वा जयपराजयं।
- जय वैराला जन्म देतो. पराजित दुःखाने झोपतो. उपशांत पुरुष जयपराजय सोडून सुखाने झोपतो.

३) सच्चं भणे न कुज्झेय्य दज्जाप्पस्मिं पि याचितो
एतेहि तीहि ठानेहि गच्छे देवान संतिके।
- खरे बोलावे, क्रोध करू नये. मागणाऱ्यास थोडे तरी द्यावे. या तीन ठिकाणांहून मनुष्य देवांच्या जवळ जातो.

४) न तेन अरियो होति येन पाणानि हिंसती।
अहिंसा सब्बपाणानं अरियो ति पवुच्चति।
- ते आर्य असत नाहीत जे प्राण्यांची हिंसा करतात. जो सर्व प्राण्यांशी अहिंसेने वागतो, तो आर्य म्हणविला जातो.

५) यो च वस्ससतं जीवे अपस्सं धम्मामुत्तमं।
एकाहं जीवितं सेय्यो पस्सतो धम्ममुत्तमं।
- उत्तम धर्माकडे लक्ष न देता शंभर वर्षे जगण्यापेक्षा उत्तम धर्माकडे लक्ष लावून जगणाऱ्याचे एक दिवसाचे जगणे बरे.

६) सब्बदानं धम्मदानं जिनाति सब्ब रसं धम्मरसो जिनति
सब्बं रति धम्मरति जिनाति तण्हक्खयो सब्बदुक्खं जिनाति
- सर्व दानांना धर्मदान जिंकते. सर्व रसांना धर्मरस जिंकतो. धर्मावरील प्रेम सर्व प्रेमांना जिंकते. तृष्णाक्षय सर्व दुःखांना जिंकतो.

७) सद्धो सीलेन संपन्नो यसोभोगसमप्पितो।
यं यं पदेसं भजति तत्थ तत्थेव पूजितो।
- श्रद्धा-शीलसंपन्न, कीर्ति-ऐश्वर्ययुक्त ज्या ज्या प्रदेशात राहतो, तेथे पूज्य होतो.

८) धम्मं चरे सुचरितं न नं दुच्चरितं चरे।
धम्मचारी सुखं सेति अस्मिं लोके परम्हि च।
- धर्माचे उत्तम आचरण करावे. धर्माचे वाईट आचरण करू नये. धर्माचे आचरण करणारा इह व परलोकी सुखाने झोपतो.

९) सो करोहि दीपमत्तनो
खिप्पं वायम पंडितो भव
निद्धतमलो अनंगणो
न पुन जातिजरं उपेहिसि
- तू स्वतःला द्वीप बनव. त्वरेने प्रयत्न कर. ज्ञानी हो. निर्धूत मल, निर्दोष हो. मग तू जन्म व जरा यांच्या जवळसुद्धा जाणार नाहीस.

१०) उट्ठानवतो सतिमतो
सुचिकम्मस्स निसम्मकरिनो
संयतस्स च धम्मजीविनो
अप्पमत्तस्स यसोभिवड् ढति

- जो उद्योगी, स्मृतिमान, पवित्र कर्म करणारा, विचारशील, संयमी, धर्मजीवी आणि अप्रमादी असतो, त्याचे यश वाढते.

११) नत्थि झानं अपञ्ञस्स पञ्ञा नत्थि अझायतो
यम्हि झानं च पञ्ञा च स वे निब्बानसन्तिके।
- प्रज्ञारहित पुरुषाला *धर्मानं* नाही. ध्यान न करणाऱ्याला प्रज्ञा नाही. ज्याच्यापाशी *धर्मानं* आणि प्रज्ञा आहे, तो निर्वाणाच्या जवळ आहे.

१२) न तेन पंडितो होति यावता बहु भासति।
खेमी अंधेरी असतो पंडितो ति पवुच्चति।
- पुष्कळ बोलतो म्हणून माणूस पंडित होत नाही. क्षमावान, निर्वैर, निर्भय असतो तोच पंडित म्हटला जातो.

१३) असाहसेन धम्मेन समेन नयती परे।
धम्मस्स गुत्तो मेधावी धम्मट्ठो ति पवुच्चति।
- शांतपणे, धर्माने व समतेने दुसऱ्यांना मार्ग दाखवितो, तो धर्मरक्षित बुद्धिमान पुरुष धर्मस्थ म्हटला जातो.

१४) हत्थसंयतो पादसंयतो
वाचाय संयतो संयतुत्तमो
अज्झत्तरतो समहितो
एको संतुसितो तमाहु भिक्खुं
- हातात संयम, पायात संयम, वाणीत संयम, तसेच संयमी माणसांत उत्तम, अध्यात्मात रंगलेला, समाधानी एकांतवासी आणि संतुष्ट असा जो मनुष्य त्याला भिक्षु म्हणतात.

१५) धम्मारामो धम्मरतो धम्मं अनुविचिन्तयं।
धम्म अनुस्सरं भिक्खु सद्धम्मा न परिहायती।
- धर्मात रंगलेला, धर्मात रमलेल्या, धर्मचिंतन करीत राहणारा धरल्याचे नित्यस्मरण करणारा भिक्षू सद्धर्मापासून ढळत नाही.

१६) यस्स कायेन वाचाय मनसा नत्थि दुक्कतं।
संवुतं तीहि ठानेहि तमहं ब्रूमि ब्राह्मणं।
- ज्याच्या कायेने, वाचेने, मनाने दुष्कृत्य होत नाही, या तिन्ही ठिकाणी जो संयमी आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

१७) न जटाहि न गोत्तेन न जच्चा होति ब्राह्मणो।
यम्हि सच्चं धम्मो च सो सुची हो च ब्राह्मणो।
-ब्राह्मण जटांनी, गोत्राने, जन्माने ठरत नाही. ज्याच्या ठायी सत्य आणि धर्म आहे, तो पवित्र आहे आणि तो ब्राह्मण आहे.

तथागतांची वरील धम्मपदे पाहिली की आपल्या लक्षात येते की तथागतांनी व्यक्तिगत पातळीवर उपदेश केला आहे. माणूस हा जरी सामाजिक प्राणी असला, तरी त्यांच्या वैयक्तिक व्यवहाराचे प्रतिबिंब सामाजिक जीवनात प्रकट होत असते. म्हणून वैयक्तिक व्यवहारात समता आणि बंधुता यांना धरून व्यवहार झाला पाहिजे, अशा प्रकारचा उपदेश तथागत करतात. मात्र तो त्यांचा आग्रह नाही. समर्थक विचार करूनच जीवन जगले पाहिजे. त्यामुळे आपल्या वैयक्तिक व्यवहारातून सामाजिक जीवनावर काय परिणाम होईल आणि आपला वैयक्तिक व्यवहार हा केवळ स्वहिताचा आहे की समाजहिताचा आहे यांचाही विचार केला पाहिजे, असे तथागत सुचवतात.

समरसता म्हणजे काय, हे आपण याआधी समजून घेतले आहे, तथागत आणि समरसता या विषयाचा विचार करताना समर्थक हा शब्द महत्त्वाचा आहे. आपण वैयक्तिक व्यवहारात समता आणि स्वातंत्र्य व बंधुता यांना स्थान देतो, तेव्हा एका बाजूला आपण तथागतांनी सांगितलेले तत्त्वज्ञान अंगीकारतो आणि दुसरीकडे भारतीय राज्यघटना ही आपल्या जगण्याचा भाग बनवतो. तथागतांनी केलेला उपदेश आपण आपल्या जीवनाचा भाग बनवतो, तेव्हा हिंसा, द्वेष, भेदभाव, ईर्षा यांच्यापासून आपण दूर जातो, तर प्रेम, प्रज्ञा, करुणा, शील या मूल्यांना आपण अग्रक्रम देण्याचा प्रयत्न करतो. सारासार विचार करून समत्वदृष्टीने जगाकडे बघणे म्हणजेच समरस होणे आणि तथागतांनी सांगितलेले ज्ञान व्यवहारात आणणे होय.

आपले समरसतायुक्त जीवन कसे असावे? तथागतांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. एकदा सोय नावाचा एक तरुण तथागतांकडे गेला आणि म्हणाला, "मी सुदृढ राहण्यासाठी काय करावे?"
तथागतांनी उत्तर दिले, समर्थक व्यायाम आणि आहार तुला सदृढ राहण्यासाठी मदत करतील."
तो तरुण दिवसरात्र मेहनत करून लागला. त्याचे आहाराकडे दुर्लक्ष झाले. परिणाम म्हणून तो आजारी पडला. पुन्हा तो तथागतांकडे आला आणि म्हणाला, "तुमच्या उपदेशातून मला काही ही फायदा झाला नाही"
तेव्हा तथागत त्याला म्हणाले, "हे सोमा, वीणेचा मंजुळ स्वर येण्यासाठी काय आवश्यक असते?"

"वीणेच्या तारा योग्य प्रमाणात ताणलेल्या असाव्या लागतात." सोमाने उत्तर दिले.

"जर वीणेच्या तारा प्रमाणाबाहेर ढिल्या सोडल्यातर काय होईल?" तथागतांनी प्रश्र्न विचारला.

"तर वीणेचा मंजुळ स्वर येणार नाही" सोमाने उत्तर दिले.

"जर वीणेच्या प्रमाणापेक्षा जास्त ताणल्या तर काय होईल?" तथागतांनी प्रश्र्न विचारला.

"तर तारा तुटून जातील आणि वीणेचा मंजुळ स्वर येणार नाही " सोमाने उत्तर दिले.

या प्रसंगातून सम्यक म्हणजे काय हे आपण समजून घेऊ शकतो. मानवी जीवनात आपल्या वैयक्तिक व्यवहारातून अशा सम्यक समरसतेची प्रचिती येऊ लागली की समजा, वीणेचे मंजुळ स्वर आपोआपच प्रकट होतील.

रवींद्र गोळे
९५९४९६१८६०
Powered By Sangraha 9.0