शिकवण कोरोनाची - 10 (उद्योग)

14 May 2020 12:22:46
या उद्योगाचा विकास हा पर्यावरणाचा नाश करत होता. एक उद्योग दुसऱ्या उद्योगाची गरज निर्माण करत होता आणि या चक्रात विज्ञानवादी माणूस अडकत जात होता. तो ह्या चक्रव्यूहात अडकला आणि फसत गेला. आता पुन्हा पर्यावरणपूरक घरे (green building) अशी कल्पना येत आहे. सात्त्विक आहार, वेगन फूड अशा संकल्पना येत आहेत. आपल्याला उद्योगाची दिशा पकडताना या गोष्टींचा विचार करावा लागेल.

green building_1 &nb

अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांतून उद्योग, व्यवसाय निर्माण झाले, ही वस्तुस्थिती आहे. यातली मूलभूत गरज भागल्यानंतर त्यात गुणात्मक वाढीच्या दृष्टीने जे प्रयत्न झाले, त्यातून ज्याला 'उद्योगाची भरभराट' म्हणतात ती निर्माण झाली. म्हणजे माणसाला पोट भरणे हे मूलभूत होते, पण मग जिभेला कशाची चव चांगली लागेल? हवामानातील बदल जसे, तसे शरीराला योग्य पदार्थ कुठले? याचा माणूस विचार करू लागला. हळूहळू पोटाची भूक हे प्राधान्य संपले आणि जिभेची चव हा हेतू मुख्य बनला. लज्जारक्षणासाठी त्याला वस्त्राची गरज निर्माण झाली. झाडाच्या पानांपासून बनवलेल्या वल्कलांपासून सुरुवात होऊन अत्यंत तलंम आणि आकर्षक कपड्यांपर्यंत प्रगती झाली. थंडीत उबदार कपडे, उन्हाळ्यात सैल कपडे आणि पावसाळ्यात पावसापासून संरक्षण देणारे कपडे असा विचार माणूस करायला लागला आणि कापड उद्योग भरभराटीला आला.

ऊन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षणासाठी निवारा हवा होता. मग पर्णकुटीसारख्या निवाऱ्यापासून ते अत्याधुनिक इमारतीपर्यंतचा प्रवास आम्हाला निवारा या मूलभूत गरजेमुळे करावा लागला. हा सगळा तथाकथित मूलभूत गरजांचा प्रवास म्हणजे आमची प्रगती आणि विकास. त्यातून निर्माण झालेले उद्योग व्यवसाय हीच एक समस्या बनली की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली.

या उद्योगाचा विकास हा पर्यावरणाचा नाश करत होता. एक उद्योग दुसऱ्या उद्योगाची गरज निर्माण करत होता आणि या चक्रात विज्ञानवादी माणूस अडकत जात होता. तो ह्या चक्रव्यूहात अडकला आणि फसत गेला. आता पुन्हा पर्यावरणपूरक घरे (green building) अशी कल्पना येत आहे. सात्त्विक आहार, वेगन फूड अशा संकल्पना येत आहेत. आपल्याला उद्योगाची दिशा पकडताना या गोष्टींचा विचार करावा लागेल.

जगाची उत्पादन करण्याची दिशा कशी राहील? चीनने साऱ्या जगाची जी फसवणूक केली आहे, त्याचा सकारात्मक परिणाम भारतात कसा होऊ शकतो? येत्या काळात अनेक मोठे उद्योग भारतात येणार आहेत. या उद्योगांना मुबलक वीजपुरवठा, चांगली वाहतूक व्यवस्था आणि कुशल कामगार वर्ग ही आवश्यकता असणार आहे. अर्थात त्यामुळे ऊर्जा क्षेत्र आणि रस्तेबांधणी ही दोन क्षेत्रे मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाची आणि मनुष्यशक्तीची मागणी करतील. पण वर म्हटले तसे पर्यावरणाचा समतोल राखत आम्हाला या सगळ्या गोष्टीकडे बघावे लागणार आहे.


green building_1 &nb

रेडी टू ईट शाकाहारी पदार्थांची मागणी जगभर वाढणार आहे. त्यासाठी फूड इंडस्ट्री आणि त्याला जोडून अनेक उद्योग व्यवसाय विकसित होणार आहेत. यात शेती आणि उद्योग यांचा परस्पर समन्वय आवश्यक आहे. उद्योग व्यवसाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना योग्य प्रकारचे शेतीतून उत्पादन घ्यायला सांगतील, ती उत्पादने खात्रीपूर्वक खरेदी करतील आणि शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल. शेतीशी जोडलेला दुसरा उद्योग होऊ शकतो तो प्रक्रिया उद्योग. मटार बाजारात नेणे आणि विकणे याऐवजी त्याची पॅकिंग इंडस्ट्री विकसित करणे. मक्याचे दाणे पॅकिंग करणे हा एक उद्योग आहे. टोमॅटो केचप, वेगवेगळी लोणचे प्रक्रिया, सेंद्रिय गूळ किंवा गूळ पावडर हे उद्योग शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाला भाव मिळवून देतील, स्थानिक हातांना यातून रोजगार प्राप्त होईल.

याला जोडून एक महत्त्वाचा उद्योग आहे, तो म्हणजे शीतगृहांची उभारणी. आज देशात एखाद्या मोसमात जेव्हा एखादे उत्पादन - विशेषतः फळफळावळ बाजारात अधिक होते आणि भाव कोसळतो, तेव्हा शेतकरी नाइलाजास्तव विकतो आणि भाव वधारतो तेव्हा शेतकऱ्याकडे विकायला माल नसतो. याचा फायदा शेतकऱ्याला मिळण्यासाठी शीतगृहे खूप उपयोगी पडणार आहेत.

जगभर गो-विज्ञान या विषयात उत्सुकता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत देशी गाय आणि तिची उपयुक्तता हे दिवास्वप्न नाही. पाळेकर यांनी यासाठी अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. गोशाळा आणि तेथील उत्पादन याचे ब्रॅण्डिंग करण्याची वेळ आली आहे. आज जगभरात संसर्गाचे जे प्रश्न आहेत, त्याला गो-उत्पादने काही प्रमाणात अटकाव करू शकत असतील तर प्रयोगशाळेतून त्याचे जागतिक पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट हा एक महत्त्वाचा, अन्न या मूलभूत गरजेचा उद्योग आहे. चहा आणि वडापाव, पाणीपुरी (स्ट्रीट फूड) ते पंचतारांकित हॉटेल्स असे ह्या व्यवसायाचे पैलू आहेत. पुढील अनेक दिवस छोट्या गाड्यांवर सामान्य ग्राहक जाण्याची शक्यता कमी आहे. अशा छोट्या गाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांचा मुख्य आधार मजूर, पण तोच रोजगरापासून वंचित असेल, तर हा व्यवसाय करणारे मोठ्या अडचणीत येऊ शकतात. पुढील काळात हॉटेल्स हे चवीसाठी कमी आणि स्वछतेसाठी जास्त ओळखले जातील. तेथेही बसण्याची रचना सामाजिक अंतर सांभाळणारी असावी लागेल, ह्या दृष्टीने फूड आणि ड्रग यांचे नियम बदलू शकतात. घरपोच सेवा हा प्रकार वाढू शकतो. केटरिंग व्यवसायही येणाऱ्या दोन वर्षांत मर्यादेतच काम करू शकेल अशी स्थिती आहे. मोठे कार्यक्रम होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. छोटे कार्यक्रम अधिक होणार आहेत, त्यामुळे व्यवसाय तसा बदलावा लागेल. पर्यटन हा या व्यवसायाचा मूलभूत पाया आहे. ह्याबद्दल सविस्तर बोलायचे असल्याने येथे त्याच्या तपशिलात जात नाही.

रस्ते बांधणी जर मोठ्या प्रमाणावर सुरू झाली, तर ग्रामीण भागात मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. बऱ्याच वेळा कॉन्ट्रॅक्टर स्थानिक
मजूर वापरत नाहीत. त्यामुळे स्थानिक रोजगार निर्माण होत नाही. जर त्या बाबतीत काही बंधन घातले, तर रस्ते बांधणी क्षेत्र gdp वाढवण्यात उपयोगी पडेल.

गृहबांधणी व्यवसाय हा नोटबंदी, रेरा आणि आता कोरोना यामुळे मोठ्या अडचणीत येणार आहे. जोपर्यंत सदनिका पडून राहत आहेत आणि तरी वास्तुनिर्मिती थांबत नाही अशी स्थिती आहे, तोपर्यंत हे दुष्टचक्र थांबण्याची चिन्हे नाहीत. सामाजिक अंतर पाळण्यासाठी आवश्यक अशी घरे निर्माण करायची म्हटले, तर आजच्या गृहनिर्माण प्रक्रियेचा फेरविचार करावा लागेल. भविष्यातील संसर्ग थांबवायचा असेल तर आणि घरबांधणी तशी करावी लागणार असेल, तर आज बांधत असलेल्या घरांच्या पद्धतीत मूलभूत बदल करावे लागतील. प्रचंड नफ्याचे स्वप्न घेऊन येथून पुढे जे या व्यवसायात येतील, त्यांना निराश होणे अपरिहार्य आहे. क्रेडाईसारख्या संघटनेने आणि सरकारने संयुक्तपणें जर प्रमुख शहरात मोकळ्या सदनिका विकण्याची काही योजना राबवली आणि बिल्डरला कमीत कमी पायाभूत किंमत नक्की करून दिली, तर कुठेतरी आगामी दोन वर्षांनी या व्यवसायाला चांगले दिवस येतील. परवडणारी घरे ही संकल्पना सरकारने देशात राबवायचा प्रयत्न केला आहे, पण शहरी भागात लोकसंख्येची घनता अधिक असेल, तर कोरोनासारखे भविष्यात येणारे संकट अधिक गहिरे होऊ शकते. धारावी हे उदाहरण आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसाय एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. देशात रोजगार उपलब्ध करून देण्यात या व्यवसायाचा मोठा वाटा आहे. पण बांधकाम व्यवसायिक, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंते, वास्तुविशारद आणि सरकारी यंत्रणा तसेच या क्षेत्राशी जोडलेले पूरक व्यवसायिक (सिमेंट, टाइल्स, वीट, लाकूड प्लायवूड उद्योग), वित्तीय संस्था यांनी एकत्र बसून या व्यवसायाचा नीट विचार केला नाही, तर आताच दिशाहीन होत चाललेला हा व्यवसाय पूर्णपणे भरकटण्याची शक्यता आहे. यातील तथाकथित 'ग्लॅमर' विसरून व्यवसायिकांनी वस्तुस्थिती स्वीकारणे ही आज या व्यवसायासाठी काळाची गरज आहे.

देशात घर घेण्यासाठी पुढील काही वर्षे ग्राहकाची क्षमता कमी होणार असेल, तर वित्तीय संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांचाही व्याजातला नफा कमी करण्याची गरज आहे, कारण npa प्रमाण वाढणार आहे. अशा वेळेस मुद्दल वसूल करणे हेसुद्धा जिकिरीचे होऊ शकते. त्याला (ग्राहकाला) वित्तीय साहाय्य उपलब्ध करणे, त्याची पात्रता वाढवणे यावर गृहनिर्माण व्यवसायाचे भविष्य अवलंबून आहे. रेरातील तरतुदी विशिष्ट परिस्थितीत निर्माण केल्या आहेत, पण मूळ गाभा न बदलता काही सवलती देता येतील का, विचार करावा लागेल. जर उद्योग व्यवसायाची केंद्रे विकेंद्रित केली, तर स्वाभाविकपणे गृहनिर्माण व्यवसाय शहरी भागातून थोडा ग्रामीण भागात हलेल. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येऊ शकेल. शहरी भागात गगनाला पोहोचणारे जमिनीचे भाव आवाक्यात येऊ शकतील. ग्रामीण भागातील नापीक जमिनी काही प्रमाणात गृहनिर्माण करण्यासाठी उपयोगात आणल्या आणि वाहतूक व्यवस्था आणि दळणवळण योग्य प्रकारे नियोजित करू शकलो, तर या व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतील. केवळ बिल्डरना स्वस्तात फ्लॅट विकण्यास सांगून हे प्रश्न सुटणार नाहीत. या व्यवसायाचा सर्व बाजूंनी विचार करावा लागेल.

आपण अन्न, वस्त्र आणि निवारा यातील अन्न आणि निवारा या गरजांचा व त्यावर आधारित व्यवसायाचा विचार केला. वाचकांना आजच्या मांडणीत कदाचित नकारात्मकता वाटेल, पण ही नकारात्मक मांडणी नाही. जर आपण परिस्थितीचा अंदाज नीट घेतला नाही, तर १९४७ साली झालेली चूक पुन्हा होऊ शकते. ती होऊ द्यायची नसेल, तर सगळेच व्यवसाय योग्य दिशेने आणि आंतरराष्ट्रीय गरजा गृहीत धरून उभे करावे लागतील .उद्याच्या लेखात उद्योगाच्या आणखी काही पैलूंवर विचार करू.
नीरक्षीरविवेक
Powered By Sangraha 9.0