तबलिघींची मानसिकता

09 Apr 2020 23:37:11


गेल्या काही दिवसांत विलग ठेवलेल्या तबलिघींनी जे घृणास्पद वर्तन केले, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच. काही ठिकाणी बाटल्यांमध्ये मूत्र भरून त्या सुरक्षाकर्मींवर फेकण्याचे घृणास्पद कृत्य त्यांनी केले. जे डॉक्टर आणि नर्स त्यांची सेवा करण्यासाठी आले, त्यांच्यावर थुंकून, खोल्यांच्या दारांसमोर प्रातर्विधी करून तबलिघींनी त्यांच्या मनात एक प्रकारे गैर-मुस्लिमांबाबत असलेल्या घृणेचे प्रदर्शन केले. असे करण्याची मनोभूमिका कशी तयार झाली असेल, याचा मागोवा काही हदीस कथनांतून उलगडता येतो. सहीह अल-बुखारी संग्रहित हदीस कथनांतील दोन कथने पाहिल्यास ते समजू शकते.

Delhi Police issues secon

पैगंबरांचे समकालीन उसामा बीन झैद यांची ही हदीस आहे. त्या काळात अनेक देशांत प्लेगने थैमान घातले होते. ज्यूंच्या वस्त्यांमध्ये त्याचा प्रभाव जास्त होता. त्याला उद्देशून पैगंबर म्हणाले, “प्लेग हा यहुदी लोकांवर (किंवा इतर गैरमुस्लिमांवर) अल्लाचा प्रकोप आहे. म्हणून जर तुम्ही एखाद्या ठिकाणची प्लेग प्रसाराची बातमी ऐकली, तर तिकडे जाऊ नका. आणि जर तुम्ही राहता त्या भागात प्लेग पसरला, तर तिथून पळून जाऊ नका.”

या हदीसच्या पाठोपाठ दुसरे कथन आले आहे. ते ह. आयेशांचे आहे. त्या पै. महंमदांच्या अत्यंत आवडत्या पत्नी होत्या. एकदा त्यांनी पै. महंमदांना प्लेगच्या साथीसंदर्भात विचारले. तेव्हा ते म्हणाले की "प्लेग हा अल्लाला ज्यांच्यावर प्रकोप व्हावा असे वाटले, त्यांचावर झालेला प्रकोप आहे. (त्याच वेळी) इमान राखणाऱ्यांवर अल्लाने दाखविलेली दया आहे. जेव्हा प्लेग पसरला असेल, त्या वेळी इमान राखणाऱ्यांनी एकाच ठिकाणी स्थिर राहून अल्लाची कृपायाचना करावी. अल्लाच्या कृपेमुळे त्यांना काही होणार नाही याची खात्री बाळगावी. जर काही घडलेच तर अल्लानेच त्यांच्या नशिबात तसे लिहले होते हे समजून त्यांच्या सहनशीलतेचे फळ त्यांना हौतात्म्य म्हणून मिळेल."

वरील दोन्ही कथनांमधून असे दिसते की अशा पसरणाऱ्या साथीं या गैरमुस्लिमांवरील अल्लाचा प्रकोप आहेत, अशी खुद्द पैगंबरांची शिकवण होती. दुसरे म्हणजे जर प्लेगचा अथवा साथीचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी झाला आहे तेथे थांबल्याने लागण होऊन मृत्यू झाला, तर हौतात्म्य मिळण्याची हमी दिली गेली. याचा अर्थ असे मरणारे स्वर्गातच जातील. यावरून असे वाटते की त्या हदीसला धरूनच मौलवी सादने आवाहन केले होते की या साथीच्या काळात मरण्यासाठी मशिदीसारखे दुसरे ठिकाण नाही. म्हणून जेव्हा तबलिघींना मरकझमधून आणि ठिकठिकाणच्या मशिदींमधून हटविले गेले, तेव्हा सुखासुखी स्वर्ग मिळण्याची त्यांची संधी हुकली. त्यामुळे त्यांनी संतापून ज्या व्यवस्थेने त्याना बाहेर काढले, त्यांच्यावर एक प्रकारे घृणास्पदरीत्या सूड उगविण्याचे धोरण अवलंबिले आहे की काय, असे वाटते. या सगळ्या घटना पाहता, ज्या मशिदींमध्ये ते दडून बसले होते किंवा त्यांना दडून राहण्यास मदत झाली होती, त्यांना तिथेच विलगीकरणात ठेवणे अधिक श्रेयस्कर ठरले नसते काय? आज त्यांना बळजबरीने बाहेर काढल्याने उलट परिणाम झाला आहे. ते आता खुले आम करोना पसरविण्याचे काम करत आहेत. जे मशिदींमध्ये मेले असते, त्यांचा उपसर्ग बाहेर पसरला नसता.


Delhi Police issues secon
इस्लामी आणि त्यातल्या त्यात तबलिघी जमातीच्या मनोभूमिकेबाबत आपल्या देशात सार्वत्रिक अज्ञान असल्याने शासनाची एक प्रकारे फसगत झाली. मशिदींमध्ये राहिल्यास सध्या त्यांच्यावर होणारा अनाठाय़ी खर्च वाचला असता. घडलेल्या या सर्व प्रकारांतून तबलिघींच्या आणि त्याच्या पाठीराख्यांच्या मनोवृत्तीतील काफिरद्वेषाची कावीळ उघडी पडली. अरुण शौरींनी लिहिल्याप्रमाणे, या तबलिघींच्या वागणुकीचे मूळ त्यांच्यावर झालेल्या मतरोपणात (inculcation of thoughts) म्हणजेच मनात भरलेल्या काही गोष्टींत आहे. त्याची मुळे चेचेन्या किंवा काश्मीर यामध्ये नसून ती कुराण, हदीसमधून निवडलेल्या ओळींमध्ये आहेत, (इस्लामी) सरकारी शाळा आणि मदरसे यामधील पाल्यांच्या मनात जे ठासून भरविण्यात आले आहे, त्यात आहे. ('वाळवीग्रस्त वृक्षाला पोलादी कुंपण वाचवेल का?' - प्रकाशन वर्ष २०१०, पृ.१००). पुढे जाऊन शौरी लिहितात, 'त्यांच्याशी लढा देण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची सखोल माहिती मिळविणे आवश्यक आहे'. (पृ १०२). आपण पाहतोच की हिंदू तर या संदर्भात अत्यंत अनभिज्ञ आहेत.

पूर्वीचे धागेदोरे

तबलिघी जमातीचे लोक शस्त्र उचलत नसले, तरी त्यांची उपद्रवक्षमता इतर देशांमध्ये ओळखली गेली होती. आपण या बाबतीत ढिसाळ होतो यात शंका नाही. जॉन इस्पोसिटो यांच्या The Islamic Threat (1992) या पुस्तकात तबलिघी जमातीचा आणि इतर जिहादी संघटनांचा उल्लेख आहे. फक्त तबलिघी जमातीने स्वत:ला सक्रिय राजकारणापासून वेगळे ठेवल्याने तिच्यावर लक्ष गेले नाही, असे ते नोंदवितात. कारण पाश्चात्त्य देशांत ज्यूडो-ख्रिश्चन विचारधारेप्रमाणे जोवर राजकारणात धर्माची सांगड घातली जात नाही, तोवर त्यावर मूलतत्त्ववादी असल्याचे मानले जात नाही (पृ.२३५). जेव्हा फ्रान्समधील अतिरेक्यांची पाळेमुळे तबलिघींच्या मेळाव्यांपर्यंत आणि स्थानिक मशिदींपर्यत पोहोचली, तेव्हा तेथे लोक जागे झाले.

 
tab_1  H x W: 0

तबलिघींच्या बाबतीत समाजातील काही लोकांचे मत चांगले असण्याचे कारण त्यांचे वर्षभर चालणारे निरनिराळे सामाजिक उपक्रम असतात. व्यक्तिगत स्तरावर ते साधी राहणी अनुसरतात, जमिनीवर झोपतात इ. आपण पूर्वी पाहिले आहे. त्याचबरोबर ते नमाजाच्या वेळेची आठवण करून देण्यासाठी घरोघरी जातात, मुलांना धार्मिक शिक्षण देण्याचे वर्ग चालवितात, धर्मशिक्षणासाठी वर्षातून चाळीस दिवस पूर्ण वेळ काढतात. त्याला चिल्ला म्हणतात. ते वैद्यकीय शिबिरे घेतात, धर्मदाय संस्था स्थापन करतात, त्याचबरोबर दहशतवादाचे पायाभूत शस्त्र जे जिहादी तत्त्वज्ञान ठरते, ते प्रसारित करण्यासाठी अनेक देशांमधून विस्तीर्ण पसरलेली संस्थात्मक रचना निर्माण करण्यात ते य़शस्वी ठरले आहेत. दिल्लीच्या इज्तेमासाठी आलेल्या सदस्यांच्या देशांची यादी त्यांची संघटनात्मक शक्ती दाखविते. जगभरात मदरशांच्या आणि धार्मिक संस्थांच्या माध्यमातून ती कार्यांन्वित होते आहे. त्याच वेळी त्यांचा दुसरा सुप्त हेतू आता लपून राहिलेला नाही, तो म्हणजे इस्लामअंतर्गत स्थानिक गैरइस्लामी परंपरांशी जुळवून घेणारा जो सूफी मतप्रवाह आहे, त्याला नामशेष करण्याचे धोरण तबलिघी अमलात आणत आहेत. भारतात जरी तबलिघींकडून दुसऱ्या पंथीयांच्या मशिदी, दर्गे इ. नष्ट करण्याचे अजून घडलेले नसले, तरी पाकिस्तानपासूल तो थेट अल्जिरियापर्यंत अशा घटना घडलेल्या आहेत. त्यात भरीस भर पडली ती वहाबी शिकवणीने भारलेल्या अतिरेकी संघटनांची. अशा संघटना उभारण्यात तबलिघींच्या सदस्यांचे सहकार्य दुर्लक्षित करता येत नाही. पाकिस्तानमध्ये मशिदींवर कब्जा करण्यासाठी, देवबंदी आणि बरेलवी संघटनांमध्ये तबलिघींच्या माध्यमातून चालणाऱ्या स्थानिक संघर्षाचे वर्णन नविदा खान या लेखिकेच्या Muslim Becoming (2012) या पुस्तकात आले आहे. देवबंदी तबलिघींवर कुरघोडी करण्यासाठी बरेलवी संस्थांनी दावत-इस्लामी ही संघटना स्थापन केली. त्यांचे एकमेकात संघर्ष चालतात.

वैचारिक संघर्ष

काफिरद्वेषावर (Kafirophobiaवर) मात करायची असेल, तर ज्या तत्त्वज्ञानाने अशा अतिरेकी संघटनांचे सभासद भारले जातात, त्या तत्त्वज्ञानाचे खंडन करण्याची आवश्यकता आहे. ते करण्यासाठी इस्लामअंतर्गत येणाऱ्या ज्या परस्परविरोधी संस्था आहेत किंवा परदेशांमधील अशा ज्या संस्था आहेत, त्यांच्या कामाकडे लक्ष देणे फायद्याचे ठरावे. काही वर्षांपूर्वी प्रथम अतिरेकी असलेल्या आणि नंतर अतिरेकींच्या विरोधात काम करणाऱ्या एका तरुणाची मुलाखत वाचनात आली होती. आदम दीन त्याच्या विशीत अतिरेकी कारवायांत सक्रिय होता. त्याचे मतपरिवर्तन होऊन, तो तिशीत आला तेव्हा इंग्लंडमधील एका थिंक टॅंकशी संलग्न झाला. त्याने माहिती दिल्याप्रमाणे, The counter narrative to Islamists is a challenge. We are trying to debunk their world view and counter their theological discourse (Interview, Times of India Nov. 22, 2015). इस्लामी धर्मशास्त्रातील (Theology) स्वर्ग आणि नरक या संकल्पना तशाच्या तशा स्वीकारून स्वर्गप्राप्तीसाठी स्वत:ला आत्मघातकी हल्लेखोर बनविणाऱ्या लोकांची कमतरता नाही. त्या संकल्पना आजच्या वैज्ञानिक शोधांमुळे कशा मोडीत निघाल्या आहेत, याचा परामर्श मी 'इस्लामी धर्मग्रंथांची ओळख' (२०१७, पृ ७३-११६), या पुस्तकात घेतला आहे. त्याही पुढे जाऊन, अतिरेकी तयार करणाऱ्या पण प्रत्यक्षात कधीही सशस्त्र नसणाऱ्या संघटनेच्या संदर्भात त्यांच्या धर्मशास्त्राचे खंडन करण्याची आज आवश्यकता आहे. तबलिघींच्या विरोधात कोरोनासंदर्भात सध्या जे रान उठविले गेले आहे, ते काही काळाने शमेल. तबलिघींचे भूत पुरते शमेल असे धरून चालता कामा नये. त्याची वाढ होऊ नये, यासाठी वैचारिक संघर्ष उभा करायला पाहिजे. त्यातून तबलिघींची मानसिकता बदलण्याची प्रक्रिया कशी सुरू करता येईल याची आखणी करायला पाहिजे. देशादेशांमधून पसरलेल्या तबलिघी जमातीच्या विस्तारामुळे हे एक प्रकारे सर्व मानवतेसमोर मोठे आव्हान आहे.

  
Powered By Sangraha 9.0