नव्वदीच्या दशकात छोटा पडदा गाजवणाऱ्या रामायण आणि महाभारत या दोन मालिकांनी त्यावेळच्या प्रेक्षकांचे भावविश्व आणि सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. त्यामुळेच आज लाॅकडाऊनच्या काळात दूरदर्शन या मालिकांचे पुनर्प्रसारण करत असताना त्याच उत्सुकतेने प्रेक्षक त्यांना प्रतिसाद देत आहेत. श्रीकृष्ण हा महाभारतचा महानायक. ही भूमिका अजरामर करणारे कलाकार श्री. नितीश भारद्वाज यांना या भूमिकेने वेगळी ओळखच दिली नाही, तर आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोनही दिला. महाभारतच्या पुनर्प्रसारणाच्या निमित्ताने नितीश भारद्वाज यांनी विवेकला दिलेली खास मुलाखत.
लाॅकडाऊनच्या काळात दूरदर्शन वाहिन्यांवर रामायण आणि महाभारत या जुन्या मालिका दाखवल्या जात आहेत. इतक्या प्रदीर्घ काळानंतरही या मालिकांना तितकाच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकांच्या पुन:प्रसारणानंतर तुम्हाला तुमच्या चाहत्यांच्या कशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या?
नितीश भारद्वाज - या मालिकांच्या पुनर्प्रसारणामुळे जुनी पिढी पहिल्या प्रसारणाच्या आठवणी नव्याने अनुभवू लागली आहे. आणि नव्या सहस्रकातील पिढीला त्यांचे आई-वडील या मालिकांचं इतकं कौतुक का करतात?
याचं आजवर आश्चर्य वाटत होतं. मला वाटतं त्यांची ही जिज्ञासाच त्यांना टीव्ही स्क्रीनसमोर घेऊन येत आहे. नवी पिढीसुद्धा 'महाभारत'साठी डाॅ. रही मसूम रझा यांनी लिहिलेल्या संवादाचे आणि सर्व कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करत आहे. अशा प्रतिक्रिया मिळत असल्याने मला खूप आनंद होत आहे.
महाभारतात तुम्ही साकारलेला श्रीकृष्ण ज्यांनी पाहिला ते अन्य कोणाची कल्पना त्या रूपात करू शकत नाहीत. पण तुम्ही कृष्णाच्या भूमिकेसाठी आॅडिशन द्यायला गेला नव्हता असे ऐकले आहे. तर ही भूमिका तुम्हाला कशी मिळाली?
नितीश भारद्वाज - याबाबत खरं सांगायचं तर मी सुरुवातीला कृष्णाच्या भूमिकेसाठी आॅडिशन देण्याचे टाळले होते. कारण बी.आर. फिल्म्सला या भूमिकेसाठी अनुभवी अभिनेता हवा असावा असं मला वाटत होतं. पण रवी चोप्रा यांनी या भूमिकेसाठी आॅडिशन देण्यासाठी तयार केले. नंतर पं. नरेंद्र शर्मा, रही मसूम रझा आणि माझी आई - प्रा. साधना उपाध्ये जी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात मराठी साहित्य विभागाची प्रमुख होती, तिनेही मला ही भूमिका करण्यासाठी तयार केले.
ही भूमिका साकारणे नक्कीच सोपे नव्हते. त्यासाठीचा अभ्यास कशाप्रकारे करावा लागला? तुमच्या पूर्वपिठिकेचा त्यासाठी काही उपयोग झाला का?
नितीश भारद्वाज - माझ्या आईमुळे मी महाभारताविषयी दर्जेदार आणि विश्लेषणात्मक साहित्याचे भरपूर वाचन केले होते. त्यात इरावती बाईंचे 'युगांत' आणि बाळशास्त्री हरदासजी यांचे 'श्रीकृष्ण चरित्र' यांचाही समावेश होता. यातून निर्माण झालेली कृष्णाविषयीची समज, संस्कृत भाषेचे ज्ञान आणि मराठी रंगभूमीवरील प्रशिक्षण यातून माझ्या कौशल्यगुणांचा पाया रचला गेला. त्यामुळे मला महाभारताचा महानायक साकारण्यासाठी आत्मविश्वास मिळाला.
ही भूमिका साकारण्यापूर्वीचे नितीश भारद्वाज आणि साकारल्यानंतरचे नितीश भारद्वाज या व्यक्तिमत्वांमध्ये काही फरक होता का? असल्यास कोणता?
नितीश भारद्वाज - असं म्हणतात की जीवन हीच सर्वोत्तम शाळा आहे. ते अनेक चढउतारांनी भरलेले असते. वाईट काळ आणि वैयक्तिक अपयश यांतून शहाणपणाचे धडे शिकण्याची संधी मिळते. मी याबाबतीत भाग्यवान होतो की ज्यावेळी माझ्या आयुष्यात वाईट काळ आला त्या त्या वेळी मी उत्तर शोधण्यासाठी गीता किंवा ज्ञानेश्वरीकडे धाव घेऊ शकलो. यातूनच मी अधिक चांगला माणूस बनण्यास शिकलो. संवाद नुसते अभिनयापुरते बोलायचे नसतात, त्यातला आशय आत्मसात करायचा असतो. आज मी पहिल्यापेक्षा अधिक शहाणा आणि संयमी माणूस बनलो आहे., याचं श्रेय श्रीकृष्णाच्या भूमिकेलाही आहे.
आयुष्यात माझ्या हातून चुकाही झाल्या. पण त्या चुकांमधून शिकत गेलो. अजूनही शिकत आहे. आयुष्य आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असते. अध्यात्माच्या दृष्टीकोनातून हे धडे शिकण्यासाठीच आपल्याला मानवाचा जन्म मिळाला आहे. जरी आपल्याला वेदनादायक धडा मिळाला तरी शांती आणि क्षमा यांच्यासह आयुष्यात पुढे मार्गक्रमण करणे हेच महत्त्वाचे आहे.
Nitish Bharadwaj
महाभारत मालिकेतील बहुतेकांचे आवडते पात्र श्रीकृष्ण होते. तुमचे आवडते पात्र कोणते होते?
नितीश भारद्वाज - धृतराष्ट्र. मला वाटतं या कथेतील तो सर्वाधिक खलपुरुष होता, जो त्याच्या अंधत्वाचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करत होता आणि स्वत:ला राजसिंहासनावर कायम बसता यावं या अनुषंगाने प्रत्येकाला वागण्यास भाग पाडत होता.
ही मालिका पुन्हा सुरू झाल्यानंतर तुमच्याही त्यावेळच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. त्यातील एखादा स्मरणीय किंवा गमतीशीर किस्सा सांगू शकाल का?
नितीश भारद्वाज - माझ्या अभिनयासाठी मिळालेले दोन सर्वोत्तम प्रशंसोद्गार मी कधीच विसरू शकत नाही.
मालिका लोकप्रिय होऊ लागल्यानंतर बी. आर. अंकल म्हणाले, "मी तुझा फॅन झालो आहे." ही खूप मोठी कौतुकाची थाप होती. एखाद्या नवोदित अभिनेत्याचं असं कौतुक करण्यासाठी मोठं मन लागतं.
दुसरं उदाहरण माझ्या आईचं. ती मला म्हणाली होती, "मी जेव्हा कृष्णाची प्रार्थना करते तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर तुझा चेहरा का येतो? मला माहितेय की तू माझा मुलगा आहेस. पण तरीही मला कृष्णाचं स्मरण करताना तूच दिसतोस."
मराठी रंगभूमीत अभिनेता, दिग्दर्शक अशी आपल्या करिअरची सुरुवात झाली. काही चित्रपट, मालिकाही केल्या आणि या मालिकेने आपल्या करिअरला वेगळेच वळण लागले. जर श्रीकृष्णाची भूमिका नसती मिळाली तर आपण कशात अधिक रमला असता?
नितीश भारद्वाज - फोटोग्राफी आणि पोर्ट्रेट. मला निसर्गाचे फोटो काढायला खूप आवडतं.
महाभारत हे कालातीत आहे असे म्हटले जाते. आजच्या काळात त्याचा संबंध कशाप्रकारे लावता येईल?
नितीश भारद्वाज - समजावण्यासाठी हा खूप मोठा विषय आहे. पण सर्वसाधारणपणे मी सांगू शकतो की तेव्हापासूनची माणसाची हाव आणि चारित्र्य अजूनही बदललेले नाही. हीच गोष्ट महाभारताला कोणत्याही काळाशी सुसंगत बनवते. महाभारत जीवनातील नकारात्मकतेचा सामना करण्यासाठी मार्ग दाखवते.
मुलाखत - शब्दांकन : सपना कदम-आचरेकर