एक महिना होऊन गेला, आपण घरीच आहोत. हा एक प्रकारचा तुरुंगवासच आहे, तो आपण मनापासून स्वीकारलेला आहे. हे मनोबल, हीच आपल्या देशाची प्रचंड शक्ती आहे. हे मनोबल जेव्हा विधायक रूपात प्रकट होते, तेव्हा ते दैवी असते. एका अर्थाने आज सगळा भारत दैवी गुणांचे प्रकटीकरण करतो आहे. हीच आपली आध्यात्मिक शक्ती आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपली लोकसंख्या १३० कोटी आहे. हे १३० कोटी लोक आज कोरोनाशी लढत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या शब्दात सांगायचे तर, प्रत्येक नागरिक सैनिक आहे. आपल्या सर्वांचे मोठे भाग्य असे की, या युद्धाचे नेतृत्व करणारा नरेंद्र मोदींसारखा कुशल सेनापती आपल्याला लाभला आहे. या संकटकाळी मोदींच्या विरोधात जे घाणेरडे राजकारण करतात, त्यांची दखल न घेतलेली बरी. ते उपेक्षेने मारण्याच्या लायकीचे आहेत. आज सगळा देश नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा आहे.
प्रत्येक देशाची लोकशाही वेगळी असते. प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी असते, इतिहास वेगळा असतो, धर्म वेगळा असतो. राजकीय लोकशाहीच्या सर्व देशांत काही समान गोष्टी असतात. ठरावीक काळात होणाऱ्या निवडणुका, मौलिक अधिकार, कायद्याचे राज्य, स्वतंत्र न्यायपालिका, सार्वभौम जनता इत्यादी गोष्टी समान असतात. यावरून जर कुणी असे म्हणू लागला की, इंग्लंड, अमेरिका आणि भारत यांची लोकशाही समान आहे, तर ते चुकीचे ठरेल.
प्रत्येक देशाच्या पाठीमागे - म्हणजे लोकशाहीच्या बुडाशी त्या देशाची मूल्यप्रणाली असते. राज्यघटना निर्माण होण्यापूर्वी ही मूल्यप्रणाली अस्तित्वात आलेली असते. अमेरिकेची मूल्यप्रणाली जीवन, स्वातंत्र्य आणि सुखाचा शोध (life, liberty and pursuit of happiness) या तीन शब्दांतून व्यक्त होते. ही तीन मूल्ये राजकीय जीवनात आणण्यासाठी त्यांनी संविधान निर्माण केले. या तीन मूल्यांसाठी अमेरिकेतील लोकांनी इतिहासकाळात जबरदस्त किंमत दिलेली आहे. लाखो लोकांनी त्याच्यासाठी आपले प्राण वेचले आहेत.
इंग्लंडची लोकशाही कायद्याचे पालन, राजनिष्ठा, व्यक्तिहितापेक्षा सार्वजनिक हित मोठे, व्यक्तीचे अधिकार या मूल्यांवर उभी आहे. इंग्लंडच्या कायद्यांना परंपरागत कायदे म्हणतात. या कायद्यांचे सार्वभौमत्व इंग्रज माणूस स्वीकारतो. कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला असतो. यातून कायद्याचे राज्य ही संकल्पना पुढे आली. कायद्याने निष्ठेने पालन ही संकल्पना निर्माण झाली. इंग्रज माणूस राजनिष्ठ असतो. इंग्रज माणसाची राजनिष्ठा व्यक्तिनिष्ठा नसते, राजा किंवा राणी राज्याचे प्रतीक असतो, म्हणून राजनिष्ठा म्हणजे देशनिष्ठा, असा याचा अर्थ होतो. राजा कायद्याने बांधलेला असतो. तो जेव्हा कायदा मानत नाही, तेव्हा त्याचा वध होतो (पहिला चार्ल्स), देशातून हाकलला जातो (दुसरा जेम्स) किंवा त्याला देशातून बाहेर पाठवले जाते (आठवा एडवर्ड).
भारतीय लोकशाहीची मूल्यप्रणाली आध्यात्मिक आहे. आपल्या देशात अतिशहाणे डावे विचारवंत आहेत. त्यांना आध्यात्मिकतेचा अर्थच समजत नाही. आध्यात्मिकतेला ते धर्माशी जोडतात. धर्माचा त्यांचा अर्थ होतो 'रिलिजन', म्हणजे उपासना पद्धती. त्यांना जो काही विचार करायचा आहे, तो करू द्या, पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्या लोकशाहीची मूल्यप्रणाली राजकीय नाही, ती आध्यात्मिक आहे.
घटना समितीत उद्देशिकेवर (प्रिएंबलवर) चर्चा झाली. उद्देशिका ही घटनेचा आरसा असते. ही उद्देशिका तत्त्वज्ञान ज्याप्रमाणे सांगते, त्याप्रमाणे राज्यघटना कोणत्या मूल्यांवर उभी आहे, हेदेखील सांगते. आपल्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय असे शब्द आलेले आहेत. यांच्याविषयी घटना समितीत बोलताना जे.बी. कृपालानी म्हणाले, "उद्देशिका केवळ कायद्याची कलमे किंवा राजकीय सिद्धांत यांचा दस्तऐवज नव्हे, तर नैतिक आणि आध्यात्मिक दिशादर्शन करणारी तत्त्वे आहेत." ते पुढे असे म्हणाले की, जर काही मौलिक मूल्ये केवळ संवैधानिक किंवा कायदेशीर अर्थानेच आपण घेतली, तर ती जीवनात प्रत्यक्ष प्राप्त करणे शक्य होणार नाही. ही मूल्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले की, बंधुतेशिवाय प्रजासत्ताकाला काही अर्थ राहत नाही. बंधुतेची व्याख्या करताना ते म्हणाले, "बंधुतेचा अर्थ होतो एकाच परमेश्वराची आपण संतान आहोत, असे रिलिजन सांगतो. तर तत्त्वज्ञ म्हणतो की, एक जीवनप्रवाह आपल्या सर्वांमधून वाहत असतो किंवा बायबलच्या भाषेत सांगायचे तर आम्ही एक- दुसऱ्याच्या प्रतिकृती असतो. यासाठी खाजगी जीवनात, सार्वजनिक जीवनात, व्यापार-उद्योग जीवनात आणि राजकीय जीवनातही बंधुतेचे तत्त्व जगले पाहिजे. राज्यघटनेचे यश यावरच अवलंबून आहे.
पूज्य बाबासाहेबांनी बंधुतेचे तत्त्व आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केले. त्यांचे हे योगदान फारच मोठे आहे. बंधुता म्हणजे एकमेकांविषयी आत्मीय भावना.
लोकशाहीला आध्यात्मिकतेची पायाभरणी करण्याचे महात्मा गांधी यांचे योगदान खूप मोठे आहे. ते म्हणतात, "ढाचा बदलणे ही तांत्रिक गोष्ट झाली. लोकशाहीचा तो आत्मा नव्हे. मनातील बदल हा लोकशाहीचा आधार आहे. यामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करणे अभिप्रेत आहे." आणखी एका ठिकाणी ते म्हणतात, "सर्वांच्या सामायिक हितासाठी समाजातील विविध वर्गांचे शारीरिक, आर्थिक आणि आध्यात्मिक साधनसंपत्ती यांचे सुसूत्रीकरण करण्याची कला म्हणजे लोकशाही होय. लोकशाही यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त, जबाबदार नागरिक यांची अत्यंत आवश्यकता असते. जनतेचा आवाज हा देवाचा आवाज असतो." महात्मा गांधींची अशी वचने भरपूर आहेत.
या सर्वाचा अर्थ असा होतो की आमची लोकशाही ही मतदारांची लोकशाही नाही, ती केवळ राजकीय लोकशाही नाही. आपल्या लोकशाहीचा पाया आध्यात्मिकतेचा आहे. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, योगी अरविंद, श्रीगुरुजी आदी थोर पुरुषांनी स्वच्छ शब्दात सांगितले की, भारत त्याच्या आध्यात्मिक सामर्थ्याने उभा राहील. भौतिकता ही भारताची शक्ती नाही. आध्यात्मिकता हीच भारताची शक्ती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा विषय थोड्या वेगळ्या भाषेत मांडला. भारताला गौतम बुद्धांच्या मार्गाने जावे लागेल, असे ते सांगून गेले. गौतम बुद्धांचा मार्ग भोगाचा नाही, त्यागाचा आहे.
ही आध्यात्मिकता काय आहे? आध्यात्मिकता म्हणजे ध्यान, धारणा, समाधी, यम-नियम, संन्यास असा त्याचा अर्थ करायचा का? लोकशाहीच्या संदर्भात असा त्याचा अर्थ करता येत नाही. आध्यात्मिकता म्हणजे सर्वांविषयी प्रेम, आत्मीय भाव, साधी रहाणी, मर्यादित गरजा, भोगलालसेचा अभाव, निसर्गाशी एकरूपता, सर्व काही ईश्वरनिर्मित आहे त्याचा त्यागमय भोग घेणे, शरीराची आणि मनाची शुद्धता, कुटुंबप्रधान समाजव्यवस्था, श्रमसाधना अशी सर्व मूल्ये येतात. अशी कोणतीही मूल्ये कायद्याने देता येत नाहीत. कायद्याचे काम मूल्यरक्षणाचे आहे. ही जीवनमूल्ये हजारो वर्षांच्या वाटचालीत निर्माण झाली आहेत. या जीवनमूल्यांमुळे आपण टिकून आहोत, उद्याही टिकून राहणार आहोत.
कोरोना विषाणूचा लढा या जीवनमूल्यांशी आहे. ज्या समाजरचनेत ही जीवनमूल्ये नाहीत, त्या समाजव्यवस्था टिकतील की राहतील, हे येणारा काळ सांगेल. आपण मात्र टिकून राहणार आहोत. कोरोना विषाणूशी लढाई शासकीय पातळीवर चालू आहे, तशी ती लोकपातळीवरदेखील चालू आहे. कोणीही उपाशी राहणार नाही, हा समाजाचा संकल्प आहे. अडचण निर्माण झाली की व्यापारी साठेबाजी करू लागतात, दामदुपटीत माल विकू लागतात, असे अजून झालेले नाही. काही ठिकाणी झाले असेल, तर त्यांना रावणकुळातील राक्षस समजले पाहिजे. ही मंडळी भारतमातेची संतान नव्हेत. या संकटसमयी देशातील प्रत्येक नागरिक उभा राहिलेला आहे.
एक महिना होऊन गेला, आपण घरीच आहोत. हा एक प्रकारचा तुरुंगवासच आहे, तो आपण मनापासून स्वीकारलेला आहे. हे मनोबल, हीच आपल्या देशाची प्रचंड शक्ती आहे. हे मनोबल जेव्हा विधायक रूपात प्रकट होते, तेव्हा ते दैवी असते. एका अर्थाने आज सगळा भारत दैवी गुणांचे प्रकटीकरण करतो आहे. हीच आपली आध्यात्मिक शक्ती आहे.
इतका काळ ती सुप्त होती, आता संकट आल्यामुळे ती जागी होत आहे. पण ही जागरूकता तात्कालिक नसावी. यापुढील जीवन जगण्याचा ती भाग बनावी. या दैवी शक्तीतच सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, दुर्बळांवरील अन्याय-अत्याचार रोखण्याचे सामर्थ्य आहे. ज्या विषाणूशी आपण लढत आहोत, त्यावर आपल्याला पूर्ण विजय मिळवायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 'मन की बात'मध्ये म्हणतात, ते लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणाले, "अग्नि: शेषम् ऋण: शेषम्, व्याधि: शेषम् तथैवच, पुन: पुन: प्रवर्धेत, तस्मात् शेषम् न कारयेत|"