घरगुती हिंसाचारामागची मानसशास्त्रीय कारणे

18 Apr 2020 12:11:10

**आरती पेंडसे***


woman_1  H x W:

ज्या ज्या वेळी अशा पद्धतीने नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती आल्या आहेत
, त्या त्या प्रत्येक वेळी घरगुती हिंसाचारात वाढ झालेली असल्याचेच आढळते, याच्यामागे आर्थिक, सामाजिक, संस्कृतीने लादलेल्या पारंपरिक भूमिकांशी संबंधित आणि मानसिक अशी अनेक कारणे आहेत.


जगभर हैदोस घातलेल्या कोरोनाने सगळ्यांनाच वेठीला धरलेले आहे. त्यामुळे सगळ्यांना सतत घरातच बसणे अनिवार्य आहे. याचे अनेक फायदे-तोटे आहेत. अर्थात तोटे कितीही असले किंवा वाटले, तरी घरात बसण्यावाचून पर्याय नाही हेही तितकेच खरे आहे.


कोरोनामुळे आधी कधीही न अनुभवलेली एक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्याच वाट्याला आली आहे. त्याचे आर्थिक, सामाजिक, राजकीय अनेक परिणाम होणार आहेत, पण सगळ्यात जास्त परिणाम होतो आहे तो मानसिक. त्यासाठी अनेक समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ हेल्पलाइनच्या साहाय्याने मदत करतही आहेत. पण समाजातला एक मोठा गट असा आहे, त्यांना ही मदत मिळत नाही अथवा घेता येत नाहीये.


जगभर जसाजसा लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला, तसतशी सर्वत्र जाणवलेली एक गोष्ट म्हणजे घरगुती हिंसेत झालेली वाढ. चीनमधल्या वुहान प्रांतात सर्वप्रथम लॉकडाउन झाला व सर्वप्रथम तिथून उठलाही. चीनमधल्या एका कायदेविषयक आस्थापनेच्या (लॉ फर्मच्या) म्हणण्याप्रमाणे, लॉकडाउनच्या कालावधीनंतर त्यांच्याकडे येणाऱ्या घटस्फोटाच्या दाव्यांमध्ये जवळजवळ २५%नी वाढ झाली. (संदर्भ - ... TheHill). UNने जाहीर केलेल्या संख्याशास्त्रीय अहवालाप्रमाणे फ्रान्समध्ये १७ मार्चनंतर घरगुती हिंसेच्या प्रकरणामध्ये ३०%नी वाढ झाली. स्पेनमध्ये पहिल्या दोन आठवड्यांमध्ये इमर्जन्सी क्रमांकावर येणाऱ्या कॉलमध्ये १८%नी वाढ झाली, तर सिंगापूरमध्ये ३०%. एनबीसी न्यूजनुसार, अमेरिकेमध्ये घरगुती हिंसेच्या प्रकरणात ३५%नी वाढ झालेली आहे. (संदर्भ - ... theintercept.com/2020/04/13/coronavirus-lockdown-domestic violence/). भारतातले आकडे सध्या उपलब्ध नाहीत, पण याचा अर्थ भारतात घरगुती हिंसेमध्ये वाढ झालेली नसेल असा अजिबात होत नाही.


ज्या ज्या वेळी अशा पद्धतीने नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती आल्या आहेत
, त्या त्या प्रत्येक वेळी घरगुती हिंसाचारात वाढ झालेली असल्याचेच आढळते, याच्यामागे आर्थिक, सामाजिक, संस्कृतीने लादलेल्या पारंपरिक भूमिकांशी संबंधित आणि मानसिक अशी अनेक कारणे आहेत.


family depression_1 
ज्या वेळी अशी आपत्ती येते
, तेव्हा सर्वांच्या मनात अनेक नकारात्मक भावना निर्माण होतात. आत्ताची ही परिस्थिती अशाच आपत्तींपैकी एक आहे. सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती आहे. अनिश्चितता, आजची आणि उद्याचीही काळजी. ह्या कोरोनाच्या आपत्तीनंतरच्या जगात आपल्या कामधंद्याची अवस्था कशी असेल? नोकरी टिकेल की नाही? आताची जीवनशैली आपण टिकवू शकू का? किंवा कांही ठिकाणी आपण जगूच का? नातेवाईक - विशेषत: आपले कुटुंबीय जर आपल्यापासून दूर असतील, तर ते कसे असतील? त्यांना खायला-प्यायला मिळत असेल ना? ते सुरक्षित असतील ना? अशासारख्या अनेक, उत्तरे माहीत नसलेल्या प्रश्नांनी आत्ता सगळे ग्रस्त आहेत. अशा वेळी नैराश्य, भीती, राग, भूक आणि गरिबी अशा अत्यंत नकारात्मक भावना सर्वांच्या मनात आहेत. आपणहोऊन घराबाहेर न जाणे वेगळे आणि कोणीतरी सक्तीने घरात बसायला लावणे वेगळे. या सक्तीमुळे एक प्रकारची चीडही निर्माण होते. त्यातही सध्याच्या काळात, पाश्चिमात्य विचारसरणीमुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आज, आत्ता, इथे अशी हवी आहे. त्यामुळे सहनशक्ती आणि वाट बघण्याची क्षमता अतिशय कमी झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घरगुती हिंसेमध्ये वाढ होणे हे अपेक्षित नसले, तरी नेहमीचेच आहे.


साधारणपणे माणसाला राग आला की तो कुठेतरी काढला जातो किंवा मन स्वस्थ नसेल तर प्रत्येकच गोष्ट बोचायला लागते
. प्रत्येक गोष्टीची चीड यायला लागते. हा राग किंवा आपले आलेले नैराश्य हे ओरडून, भांडून, तोडफोड करून किंवा मारामारी करून व्यक्त होते. लहान मुले जशी वागतात तसेच. त्यातही पारंपरिक विचारसरणीप्रमाणे पुरुषाने हिंसात्मक मार्गाने व्यक्त होणे हे त्याच्या पौरुषत्वाचे लक्षण समजले जाते. मग राग काढायला सर्वात सोपी व्यक्ती म्हणजे मुले अथवा पत्नी. त्यातही मुले जर वयाने मोठी असतील तर हक्काची बायकोच. आलेला राग व्यक्त करायला किंवा आपले नैराश्य लपवायला हात अगदी सहज उचलला जातो. शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीबाबत ही आक्रमकता नैसर्गिकरीत्या घडते. म्हणूनच वयाने मोठ्या मुलांवर किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र मुलांवर शारीरिक किंवा शाब्दिक अत्याचार कमी होतात. पण पत्नी किंवा वृद्ध व्यक्ती हे सोपे लक्ष्य ठरते. हिंसा करणे किंवा सहन करणे यामध्ये शारीरिक ताकदीपेक्षाही मानसिक ताकद जास्त महत्त्वाची ठरते. आपल्याला ठाऊक आहे की मनाची ताकद फार जास्त असते. ह्याच पारंपरिकतेने 'मला सहन करणेच भाग आहे' अशी स्त्रीची किंवा कुटुंबात जे निम्न स्तरावर आहेत त्यांची मानसिकता बनवल्यामुळे त्यांची प्रतिकारक्षमताच नष्ट झालेली असते. पत्नी ही आपल्या अधिकारातली वस्तू आहे ही स्त्री-पुरुष दोघांची एक पारंपरिक समजूत आहे. त्यामुळे ह्या हिंसेला स्त्रियांनाच जास्त सामोरे जावे लागते. आजही स्त्रीला नमवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणून लैंगिक अत्याचार केले जातात. पत्नीबाबत तर जणू सामाजिक परवानाच मिळालेला आहे. आणि जरी हे प्रकार घडले, तरी स्त्रीसुलभ लज्जेमुळे किंवा पुन्हा इथेही सामाजिक मानसिकतेमुळे ती तक्रार करत नाही. अर्थात अत्याचारीला जास्त मोकळीक मिळते.

घरगुती हिंसा म्हणजे फक्त शारीरिक मारहाण नव्हे. सतत अपशब्द बोलणे, अपमान करणे, सतत कामाला लावणे, दुर्लक्ष करणे, पैशाच्या बाबतीमध्ये अडवणूक करणे, शरीरसुखाची गैरवाजवी मागणी करणे हेही घरगुती हिंसेचे प्रकार आहेत. थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की घराच्या चार भिंतीआड जे काही अपप्रकार घडतात, ते सर्व घरगुती हिंसेचे प्रकार. यामध्ये पुरुषाने स्त्रीवर केलेले अत्याचार तर आलेच. अनेकदा स्त्रियाही आपला राग मुलांवर काढतात. नवऱ्याने बोललेले असले तर मुलाला धपाटा बसतो. हीसुद्धा घरगुती हिंसाच. थोडक्यात हिंसक आणि पीडित ही व्यक्ती नसून वृत्ती आहे.

अर्थातच मी मघाशी म्हटल्याप्रमाणे या सर्व गोष्टींना मुले आणि स्त्रिया जास्त बळी पडतात. आजपर्यंत प्रत्येक वेळेला हेच आढळून आले आहे की दुर्बल व्यक्तींबाबत अधिक हिंसा घडते. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरुष हा सर्वशक्तिमान बनलेला आहे, तर मुले, स्त्रिया व वृद्ध हे दुर्बल घटकांमध्ये मोडतात. त्यामुळे बाहेरच्या परिस्थितीने निर्माण झालेला राग, चीड, स्वतःची हतबलता ही घरातल्या व्यक्तींशी हिंसात्मक अपव्यवहार करून व्यक्त केली जाते.

आत्ता आपण बाहेर कुठेच काही कर्तृत्व गाजवू शकत नाही आहोत हे बोचत असते. मग यातून आत्मविश्वासाला धक्का पोहोचत असतो. आपल्याच पौरुषत्वाबद्दल शंका निर्माण होत असते. पुरुषाला सतत स्वत:ला सिद्ध करण्याची गरज भासत असते. त्यांच्या स्वत:साठीच. हा स्वतःचा डळमळीत झालेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी, स्वतःची ताकद स्वतःलाच दाखवण्यासाठीसुद्धा घरातल्या व्यक्तींशी हिंसात्मक पद्धतीने वागले जाते.

विशेषतः ह्या लॉकडाउन काळामध्ये घराबाहेर पडणे कोणाला शक्य होत नसल्याने अनेकांना दारू, तंबाखू, सिगरेट यांच्यासारखी व्यसनेही भागवता येत नाहीयेत. आपल्याला माहीत आहे की व्यसनांमधून बाहेर पडत असताना विड्रॉवल सिम्प्टम्स येत असतात. त्या वेळेला माणसाला अतिशय त्रास होत असतो. चिडचिड होणे, भावना अनावर होणे, रागावून झटके येणे हे त्यातलेच काही प्रकार. प्रसंगी व्यक्ती हिंस्रसुद्धा बनतात. व्यसनाधीनतेमुळे घरगुती हिंसाचारामध्ये वाढ होते, हे अनेक अभ्यासांतून ह्यापूर्वीच सिद्ध झालेले आहे. सध्याच्या काळात व्यसनपूर्ती न झाल्यामुळे आलेले विड्रॉवल सिम्प्टम्स कसे हाताळायचे, हे न कळल्यामुळेही जास्त हिंस्रता निर्माण होते आहे. त्याचेही रूपांतर घरगुती हिंसाचारात होतेच.

सर्वसाधारणपणे घराची जबाबदारी स्त्रीची, हेच प्रत्येक संस्कृतीत वेगवेगळ्या प्रकारे तिच्या मनावर बिंबवलेले आहे. घराचे सुखसमाधान टिकवण्याची मुख्य जबाबदारी तिचीच. मग त्यासाठी तिने जरा गप्प बसावे, थोडे पडते घ्यावे, सहन करावे असे लहानपणापासून शिकवले गेलेले असते.

कोणत्याही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तींच्या काळात घरातल्या व्यक्ती अस्थिर होणार आहेत आणि त्यांना सांभाळून घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असेच घरातली स्त्री समजत असते. अर्थातच त्यामुळे या कालावधीमध्ये जणू काही स्त्रीने स्वतःलाच आपण या घराची पंचिंग बॅगआहोत अशी मनातल्या मनात मान्यता दिलेली असते. ज्या वेळेला या स्त्रीने स्वतःच आपण रिसीव्हिंग एंड'ला आहोत हे मान्य केलेले असते, त्या वेळेचा तिच्याबाबत बळाचा प्रयोग करणे हे करणाऱ्यालाही सोपे जाते.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये, विशेषत: शहरांमध्ये अनेक जोडीदारांना इतका वेळ एकमेकांबरोबर घालवण्याचीही सवय राहिलेली नाहीये. सतत ऑफिसच्या कामात असणे किंवा त्याच विचारात असणे हीच दिनचर्या. जेवढा जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवला जाईल, तेवढे एकमेकांचे गुणदोष बारकाईने पाहिले जातात, समजतात. आधीच म्हटल्याप्रमाणे एक चिडचिडेपणा आलेला असल्यामुळे आत्ता गुणाऐवजी दोषच जास्त दिसतात. बोचतातही. सहज बोललेले वाक्यसुद्धा आपल्याला मुद्दामहोऊन टाकून किंवा टोचून बोललेले आहे असे गृहीत धरले जाते. मग त्याला प्रत्युत्तर. त्याच्यावर समोरच्याचे उत्तर. पुन्हा आपले उत्तर. आणि याच्यातून परस्परांबद्दल अपशब्द वापरणे, एकमेकांना कमी लेखून बोलणे आणि शेवटी शारीरिक हिंसा हे टप्प्याटप्प्याने घडत जाते. ‘तू गप्प बसलेच पाहिजेआणि मी का गप्प बसू?’ या प्रवृत्तींमधला हा झगडा आहे. तिने पंचिग बॅगहोणे अमान्य केले, तरी झगडा संपत नाहीच. मानव जरी शिकला, तरी तो नेमका किती सुसंस्कृत झालेला आहे हेही अशा वेळी कळते. मानवाची फाइट ऑर फ्लाइट' हीच आदिम प्रवृत्ती आहे, ती अशा वेळी स्पष्टपणे समोर येते. जणू त्याने हिंसा करणे ही फाइट आणि तोच आत्ता जरा तणावात आहे, नेहमी कुठे असा वागतो? अशी तिने स्वत:चीच समजूत घालणे ही तिची फ्लाइट.

त्यातही सध्या घराबाहेर पडण्याची सोय नाही. जो तुमच्यावर अत्याचार करतो आहे, तो सतत घरातच असल्यामुळे त्याच्यादेखत मदतही मागता येत नाही, म्हणून विशेषतः स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या जास्त वाढते आहे. अत्याचारी व्यक्तीलाही हे माहीत आहे की आत्ता याक्षणी तिला मदत मागणे कठीण आहे. मिळणेही तर त्याहून दुरापास्त. त्यामुळेही अत्याचारी व्यक्तीला जास्त जोर येतो. अनेक स्त्रियांसाठी काम करणाऱ्या हेल्पलाइननी त्यांच्या अहवालात सांगितले आहे की सध्या त्यांना येणारे मदतीचे फोन कमी झाले आहेत, पण याचा अर्थ त्रास कमी झाला आहे असा नाही, तर त्या स्त्रिया फोनसुद्धा करू शकत नाहीयेत असा होतो आहे. याचा अर्थ मदत मागतासुद्धा न येणे हा घरगुती हिंसेतला पुढचा टप्पा गाठला गेला आहे.

अशा आपत्तींच्या काळात घरगुती हिंसाचारामध्ये होणाऱ्या वाढीमध्ये दोन्ही बाजूंची - म्हणजे अत्याचार करणारा आणि अत्याचार सहन करणारा या दोघांचीही मानसिक जडणघडण आणि एकूण समाजाची मानसिकता ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते.

आपला राग किंवा नैराश्य कसे व्यक्त करायचे, याचे योग्य शिक्षण समाजाच्या एका गटाला न देणे आणि घराच्या पुरुषाने (विशेषतः) किंवा घराच्या कर्त्या व्यक्तीने (यात क्वचित प्रसंगी स्त्रियाही येतात) हिंसक पद्धतीने आपले नैराश्य किंवा राग व्यक्त केला तरी ते नैसर्गिकच आहे असे समजणे व सहन करणे हे योग्य आहे असे शिक्षण दुसऱ्या गटाला देणे, यामुळे ही हिंसा घडते आहे.

अर्थात असे प्रकार घडू नयेत म्हणून सर्वच लोकांना भावनिक व्यवस्थापन शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर समाजातली भूमिकांची साचेबद्धता नष्ट आवश्यक आहे. हे फक्त आत्ता करण्यासारखे काम नाही, तर ते सतत करत राहिले पाहिजे. या निमित्ताने पुन्हा एकदा विषय चर्चिला गेला, हे महत्त्वाचे.

आरती पेंडसे
मानसतज्ज्ञ व समुपदेशक
भ्रमणध्वनी: 9511629117

Powered By Sangraha 9.0