आधुनिक भूमिकन्येची गोष्ट

12 Apr 2020 19:13:57

सध्या सुरू असलेल्या 'लॉकडाऊन'मुळे मोजके अपवाद वगळता सर्वचजण घरात आहेत. त्यामुळे अनेकांना कंटाळा येतोय, काही घरांमध्ये त्यातून तणाव वाढतोय तर त्याचवेळीकाही जण या लॉकडाऊनचा सदुपयोग करताना दिसताहेत. दौंड तालुक्यातील मलठण गावात अशीच एक ऊर्जा देणारी गोष्ट घडलीय... एका उच्चशिक्षित महिलेने स्वतः ट्रॅक्टरने शेत नांगरून शेतीमातीचे कामे सुरू केली आहेत. जयश्री दादासाहेब मारकड असे या भूमिकन्येचे नाव आहे.

bhumi kanya_1  

सद्यस्थितीत शेतीत रोज एक नवे आव्हान,एक नवे संकट येतंच असते. त्या संकटाने डगमगून जाता जे ठामपणे पाय रोवून उभे राहतात त्यांचाच शेतीत निभाव लागतो.

महिला पूर्वीपासूनच घराबरोबर शेतीतही राबत होत्या. मुळात पहिली शेती कसली ती महिलाच होती म्हणूनच तिला भूमिकन्या निरूती म्हटले जाते. आज आपण दौंड तालुक्यातील मलठण गावातल्या एका भूमिकन्येची गोष्ट जाणून घेणार आहोत..लॉकडाऊनच्या काळ सुरू व्हायच्या थोडं आधी शहरातून आपल्या मूळ गावाकडे आलेल्या एका महिलेची गोष्ट आहे. सध्या ही भूमिकन्या विरगुंळा म्हणून शेतीकाम करताना दिसत आहे. त्यांच्या शेतीकामाचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

या संदर्भात सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ही महिला केवळ सोशल मिडियावर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी शेतीमातीचे काम करत नसून तिचं या मातीशी जिवाभावाचं नातं आहे हे लक्षात आलं. लवकर विवाह झाल्यानंतरही 'चूल आणि मूल' या चौकटीत स्वतःला अडकवून घेता तिने उच्चशिक्षण घेतले. आणि त्याचवेळी मातीविषयी वाटणारी ओढ व्यक्त करण्यासाठी तिने लेखणी जवळ केली.


जयश्री
दादासाहेब मारकड या मलठण गावातील नानासाहेब मल्हारी देवकाते यांची ज्येष्ठ कन्या. लहानपणापासून जिद्दी आणि चाणाक्ष असलेल्या जयश्री यांनी कधीही कोणत्याही गोष्टींना नकार दिला नाही. रानावनात, काट्याकुटात वाढलेल्या भूमिकन्येला निसर्ग फार जवळचा वाटतो. माहेरघर रानातच असल्याने त्यांना ह्या सर्व गोष्टींचा आनंद घेता आला. अवघ्या बारा तेरा वर्षांच्या असल्यापासून जयश्री आपल्या आईवडिलांना शेतात मदत करत असत. अभ्यासही तितकाच आवडीचा असल्याने शाळा सुटल्यावर मिरच्या तोडणे, खुरपणी करणे, सऱ्या तोडणे, कांदा लावणे आदी शेतीकामासह आयाबायाबरोबर शेतात राबून त्या शेतीकामात तरबेज झाल्या.

जयश्री यांनी ग्रामीण जीवनाशी निगडीत अनेक कथा लिहिल्या आहेत. शेती करताना आलेला अनुभव त्यांनी 'गारपीट आणि सपान' कथेत चितारला आहे. वैविध्यपूर्ण अनुभवांनी व्यक्तिमत्त्व संपन्न झालेल्या जयश्री यांचे लेखन अधिकाधिक कसदार होऊ लागले आहे.


जयश्री सांगतात, "देवकाते यांच्या घरातली मी मोठी मुलगी. माझ्याहून लहान दोन भाऊही आहेत. घरची दहा एकर बागायती जमीन. आई-वडील अल्पशिक्षित असले तरी व्यवहारिक शहाणपण असलेले, सूज्ञ होते. त्यांचे सगळे आयुष्य शेतावर काबाडकष्टात गेले आहे. तरी वडील सामाजिक बांधिलकी जपणारे होते. वस्तीवर रहात असल्याने मजूर मिळत नसत त्यामुळे शेतात काम करणे अपरिहार्य होते. पिकांना पाणी देणे, मिरच्या तोडणे, कापूस वेचणे, कांदे काटणे, शेरडं गुरं चरायला नेणे, चुलीसाठी लाकूड तोडणे त्यासाठी झाडावर चढणे, जनावरांसाठी गवत कापणे, कडबा टाकणे, गोठा साफ करणे, आईला घरकामात मदत अशी सर्व कामे मी लहानपणीच शिकले या गोष्टींचा मला अभिमान आहे.

पडीक शेती नीट करताना त्यातून निघणारे मोठाले दगड बैलाच्या काढवणावर पहारीने चढवायचे. .कधी कधी पायावर यायची भीती वाटायची ..तरीही .. दगडं गोळा करताना , घमेल्याचे चटके हाताला बसायचे , अजूनही ते लाल तळहात आठवतात....

त्यावेळी आमचं रोजचं जगणं शेतीमातीशी जोडलेलं होतं. त्यामुळे हे सगळं सहजपणे करत गेले. म्हणूनच आजही गाव गेल्यानंतर मी शेतातली सगळी कामं करते. मग ती माहेर असो की सासर. ही दोन्ही घरं माझ्यासाठी सारख्याच प्रेमाची आहेत."

शेतीकामातला एक प्रसंग सांगताना त्या पुढे म्हणाल्या..."मी दहावीत असेन.

आमच्याकडं पाण्याचा स्रोत म्हणजे शेताच्याजवळून वाहणारी भीमा नदी. त्यामुळे पाणी मुबलक पण ते शेतापर्यंत आणणं मोठं कष्टाचं काम असे. उन्हाळ्यात तर पिकांना पाणी सारखं द्यावं लागतं वीजही खूप कमी वेळ असते...त्यामुळं रात्रीच्या वेळी मोटारीत पाणी भरण्यासाठी भावासोबत मी ही जायचे. एकदा अशीच रात्रपाळी चालू असताना मोटार चालू करून आम्ही भावंडं आलो. पण शेतात गेलो तर पाणीच नव्हते आले. पुन्हा रात्रीच्या बाराला माझा भाऊ आणि मी नदीवर गेलो. बॅटरीच्या उजेडात मोटार शोधली. पाहतो तर काय पाईप फुटलेला. आता काय करायचं. मोटार बंद ठेवून तर चालणार नव्हतं, कारण पिकांना पाणी देणं आवश्यक होतं. त्या काळ्याकभिन्न रात्री घरी जाऊन टेंभ्यासाठी चिंध्या, काडेपेटी, राॅकेल, दाभण असं सगळं घेऊन आम्ही दोघं आलो. एक्सपानाने फुटलेला पाईप कापून त्याजागी चांगला तुकडा टेंभ्याने गरम करून साॅकेट बनबून बसवले.... मोटार चालू केली...पाणी ओढलं गेलं तसं तितक्या रातचंही समाधानाचं हसू चेह-यावर पसरलं."

करमाळा तालुक्यातल्या विहाळ इथलं जयश्री यांचं सासर. सासरची मंडळी शेतकरी-वारकरी संप्रदायातली आहेत. पती दादासाहेब हे राजगुरूनगर मधील एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. जयश्री या सासरीही मोठ्या कष्टाची शेतीची कामं करतात.. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "आमची २२ एकर जिरायत शेती आहे.. विहिरीला आठमाही पाणी असतं... माहेरी जसं मी शेतात काम करत होते तसं इथंही शेतीतली सगळी कामं करते. जेव्हा जेव्हा मी सासरी येते तेव्हा तेव्हा मला शेतात काम करायला आवडतं...इथली माती आणि माणसं मला प्रिय आहेत.


माझं
लग्न झालं तेव्हा विहाळ सदैव दुष्काळाच्या सावटीत असलेलं गाव होतं. पिण्याच्या पाण्यासाठी कोस दोन कोस भटकावं लागे तेव्हा हंडाभर पाणी मिळत असे.


तेव्हा
यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी आमच्या घरातली सगळी मंडळी पुढे सरसावली. खोदकाम सुरू केलं आणि अनेक महिन्यांच्या अखंड प्रयत्नांनंतर आमच्या कष्टाला फळ आलं. विहिरीला पाणी लागलं.


त्यावेळी
मी ही रोज सहा तास खोदकाम करीत असे. प्रसंगी दगड फोडत असे. यारीत बसून दगड वर नेणे, चर खांदणे, बांधणे अशी कामे केली. विहिर खोदकाम हे तसं जिकिरीचं आणि मेहनतीनचं काम आहे. हे सगळं करत असताना शिक्षणाकडंही दुर्लक्ष केलं नाही. अठराव्या वर्षी बारावीनंतर माझं लग्न झालं. त्यानंतर मी जिद्दीनं एम.. बी.एड.केलं. आता राजगुरूनगर इथं एल.एलबी.चा अभ्यास करत आहे."


लॉकडाऊनच्या
काळातला माहेरचा अनुभव शेअर करताना त्या म्हणाल्या,"


कोरोनासारख्या
आजारापासून आमचं गाव मुक्त आहे. या गावमातीचा गंध श्वासात भरून घेण्यासाठी आम्ही गावाकडं आलोय. आमची वस्ती रानातली आहे. इथं आम्ही पूर्वीपासूनच गावापासून-शहरापासून दूर आहोत. त्यामुळे इथं कसलीही भीती..धोका नाही. लॉकडाऊनमुळं सगळ्याचं जगणंच बदललंय. प्रत्येकजण विरगुंळा म्हणून काही तरी करताना दिसतोय. कुणी चित्र काढतोय कुणी गाणं, कुणी संगीत...तर मी माझं आवडीचं शेतीकाम करते आहे.


या
शेतीमातीच्या सान्निध्यात मी लहानाची मोठी झाले. माझ्या मुलांना शेतीचा अनुभव मिळावा म्हणून सध्या त्यांना धडे देत असते. शेतातली दगडं गोळा करणं, बांध दुरूस्ती करणं, पालव्या तोडणं, कडब्याच्या गंजीवर पेंडी देणं असली कामं करते. शिवाय शेरडीची (शेळी) धार काढणं, करडू पाजणं, गायीचा घोरा आखडणे, म्हशीचं रेडकू भादरू लागणं असं सगळं शिक्षण मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात देण्याचा प्रयत्न करते आहे.

मला दुचाकी आणि चारचाकी गाडी उत्तम चालवता येते. पुण्याहून गावाकडं येताना आमची कार मीच चालवली. 'तुझ्या बापाच्या घरी रेल्वे आणि विमान असतं तर तू तेही मी चालवायला शिकली असतीस..असं माझ्या मैत्रिणी चेष्टेने म्हणत असतात... ट्रॅक्टर हे माझं सगळ्यात आवडीचं वाहन. आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर हे गरजेचं साधन आहे. गावाकडं आल्यावर मी स्वतः ट्रॅक्टरने दोन तीन एकर शेत नांगरलं. दरवर्षी सुट्टीत आले की एका तरी शेताची नांगरट करतेच. शेतीची मशागत करून नांगरलेल्या शेतात ऊस लावणी केली आहे. बेणं तोडणं, सवाळणं, तुकडे करून सरीत अंथरणं, बोथ कांड्या (बोथ-म्हणजे दोघांच्या मधली ) काढून टाकणं... वाढे गोळा करून भेळा बांधणं.. पाणी सोडून बेणं दाबणं, त्यानंतर दोन दिवसात आंबवणी चिंबवणी वगैरे.... अगोदरच्या ऊसात आम्ही स्वतः सरीत उतरून ऊसाच्या तुटाळ्या लावल्या आहेत. ऊसाची लावणी करताना तुटाळ्यामध्ये किती अंतर ठेवायचं.. हे मला लहानपणापासून माहित होतं त्यामुळं हे काम अवघड गेलं नाही. उलट चिखलात घोट्यापर्यंत कंबरेत वाकून-लहान हिरवे, कोवळे अंकुर भरीत डोळे जमिनीत पुरताना मला खूप आनंद मिळाला. चिखलाच्या रपरपीत आणि उन्हाच्या तडाख्यात माझ्याबरोबर असलेल्या आयाबाया तालबद्धतेने ऊसाची लागवड करत करत पुढे जात होत्या. पाठ सरळ करावी म्हणून एकदा ताठ उभी राहिले तेव्हा बाकीच्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचं कौतुकभावना दिसलं. ते पाहून खूप बरं वाटलं जिवाला.


शिवाय
हे काम करत असताना जनावारांना पाणी देणं, कडबा टाकणं, निंदण करणं ही कामंही आम्ही करतोच आहोत. एकूणच लॉकडाऊनच्या या काळात माझं जगणं आणखीन समृद्ध झालंय. एक शिकलीसवरलेली बाई नांगर चालवत असल्याचे माझे व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत. त्यामुळं अनेकजण फोन करून माझं अभिनंदन करताहेत. मला मात्र याबद्दल काही वेगळं वाटत नाही.. कारण तो माझ्या जगण्याचा एक भाग आहे.. माझ्या माहेरी आणि सासरी मला हे काम करायला प्रोत्साहन मिळालं म्हणूनच हे घडू शकलं. प्रत्येक महिलेनं बाऊ करता असं काम करत राहावं असं मला वाटतं."

आजच्या शेतीविषयी बोलताना जयश्री म्हणाल्या, "कष्ट केले तर शेती कधीच धोका देत नाही.. उलट शेतीमाय ही स्वतःच्या कुटुंबाबरोबरच आणखी चार लोकांना जगवते. प्रत्येक शेतकऱ्यांनी जीवामृताचा वापर शेतात केलाच पाहिजे, आम्ही केलीय अशी शेती...आमची खते विकत घेण्याची परिस्थिती नव्हती तेव्हा आणि आता देखील आम्ही जीवामृताचा वापर करत असतो. जमिनीची सुपीकता राखण्यासाठी अशी शेती करणं आवश्यक आहे. सध्याचा काळ लक्षात घेता शेतकऱ्यांच्या मुलांनी कष्टाबरोबरच थोडं प्रॅक्टिकल व्हायला हवं, नवं तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या शेतीचा, आपल्या कुटुंबाचा विकास घडवून आणायला हवा."


मलठण
गावच्या आधुनिक भूमिकन्येची जयश्रीची कहाणी सर्वांसाठी प्रेरक ठरत आहे.

९९७०४५२७६७

जयश्री मारकड ( 99217 48942)

Powered By Sangraha 9.0