***कृष्णकुमार***
कोरोनाच्या संकटाला एकीकडे तोंड दिले जात असतानाच मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या संभाजीनगरला कोरानाबरोबरच ‘सारी’च्या आजाराशी सामना करावा लागत आहे. ‘सारी’मुळे (सिव्हिअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेसमुळे) आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून, १३२ जणांना लागण झाली आहे. आरोग्य यंत्रणा एकीकडे कोरोनाला परतवून लावण्यासाठी लढा देत असताना दुसर्या बाजूने सारीचे आव्हान उभे राहिले आहे. कोरोनाप्रमाणेच लक्षणे असणार्या या आजाराचा विळखा वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहेे. कारण राज्यात दुसरीकडे अन्यत्र कुठेही सारीचे फारसे रुग्ण नसताना, 'सारी'ने संभाजीनगरात बस्तान ठोकल्याचे आकडेवारीवरून तरी स्पष्टपणे दिसते.
सारीच्या रुग्णाला सर्दी, ताप, खोकला याबरोबरच श्वास घेताना त्रास होतो. यामुळे ही लक्षणे दिसू लागल्यानंतर कोरोनाची लागण झाली तर नाही ना, याचीही खात्री केली जात आहे. यामुळे कोरोनाच्या तपासणीप्रमाणे सारीच्या रुग्णांच्या घशातील द्रव तपासणीसाठी घेतला जात आहे. शहरात असणार्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सारीच्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. वास्तविक पाहता अनेकांनी ‘सारी’चे नाव पहिल्यांदाच ऐकले. हा आजार काय आहे याची वैद्यक तज्ज्ञांशिवाय कुणालाही माहिती नव्हती. तसेच शहरासाठी सारीची यापूर्वी कोणतीही नोंद नाही. साधारण दोन आठवड्यांपूर्वी खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू ‘सारी’ने झाल्याचा अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागही हादरला. तेव्हापासून या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दुसरा भाग म्हणजे ‘सारी’ आणि कोरोना दोघांची लक्षणे जवळपास सारखीच असल्यामुळे आरोग्य विभागाचाही गोंधळ वाढत होता. त्यातच ‘सारी’ची प्राथमिक लक्षणे असणार्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील ज्येष्ठ डॉ. मोहन डोईबळे यांच्या मते ‘सारी’ हा काही साथीचा आजार नाही. हा श्वसनासंबंधी असलेला तीव्र आजार असून त्यास वैद्यकीय भाषेत 'सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस' असे म्हटले जाते. यात रुग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो. त्याला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतो. हे एका प्रकारचे इन्फेक्शन असू शकते. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनाच्या काळातच ‘सारी’ उद्भवल्यामुळे हा आजार नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे आहे, एवढे मात्र नक्की.
संभाजीनगरपुरताच मर्यादित असणार्या या आजाराचा एक रुग्य हिंगोलीतही सापडला. त्या ठिकाणी १९ वर्षीय मुलीचा मृत्यू ‘सारी’ने झाल्याचे निदान करण्यात आले. या घटनेनंतर या युवतीच्या घरातील आठ जणांना हिंगोलीच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही ‘सारी’चे रुग्ण असल्याची माहिती काळजी वाढविणारीच ठरत आहे. कोरोनाप्रमाणेच ‘सारी’चाही पहिला रुग्ण चीनमध्येच नोव्हेंबर २००२मध्ये आढळला. पूर्वी ‘सारी’चे विषाणू फारसे धोकादायक नव्हते, पण कोरोनामुळे या विषाणूंचा प्रभाव वाढला, असा मतप्रवाह आहे.
‘सारी’ हा श्वसनाशी संबंधित आजार असल्याने शिंकांमधून, सर्दी-खोकल्यातून ‘सारी’चे विषाणू पसरतात. हाताचा स्पर्श जेथे होतो, अशा ठिकाणाहून हे विषाणू पसरू शकतात. लिफ्ट, दरवाजाचे हँडल, फोन, मोबाइल ही ‘सारी’च्या उगमाला बळ देतात. त्यामुळे सध्याचा काळ पाहता सर्दी, खोकला झालेल्यांनी स्वत:ला जास्तीत जास्त अलग करून घेणेच हितावह ठरते. कारण त्यातून सारीच्या, कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार वाढण्याची भीती आहे. सातत्याने हात धुणे, मास्क वापरणे, हँडग्लोव्ह्ज, गरम पाण्याने कपडे धुणे, इतरांशी बोलताना तीन ते चार फुटाचे अंतर ठेवणे हे ‘सारी’ नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय आहेत.
वास्तविक गेल्या पाच-सहा वर्षांपासून संभाजीनगरात कचर्याची मोठी समस्या उद्भवली आहे. संभाजीनगरसारख्या ऐतिहासिक आणि उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणार्या शहरात कचरा कुठे टाकावा हा प्रश्नच होता. कारण नारेगाव येथे असणार्या कचरा डेपोत न्यायालयाच्या आदेशामुळे कचरा टाकण्यास प्रतिबंध सुरू झाल्यानंतर कचरा टाकण्यासाठी महापालिकेला जागाच मिळू शकली नाही. दुर्दैवाने महापालिकेला खमक्या आयुक्त मिळाला नाही. परिणामी या समस्येकडे पाहिजे तसे गांभीर्याने कोणी पाहिलेच नाही. आता कोरोनामुळे किमान स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असून, नवीन आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्याठी प्रयत्न चालविले आहेत. पण हे प्रयत्न सुरू असताना कोरोनाचा अडथळा आला आहे. त्यातच पुन्हा सारीचेही संकट उभे आहेच.
या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने केलेल्या अध्ययनामुळे संकट आणखी वाढते की काय असेच सामान्यांना वाटू शकते. सारीचा त्रास असणार्या ५,९११पैकी १०४ जणांना कोरोना झाल्याचे निदान आहे. हे प्रमाण १.८ टक्के आहे. महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधील ५५३ संशयित सारी रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मुंबई-पुण्यानंतर औरंगाबाद हे कोरोनाचे केंद्र बनताना दिसत आहे. त्यातच सारीचे आव्हान उभे आहे. आरोग्य खाते हे आव्हान कसे परतवणार हा प्रश्नच आहे.
पूर्णवेळ अधिकारी नाही
महापालिकेत डॉ. जयश्री कुलकर्णी या मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी असताना महापालिकेचे दवाखाने अद्ययावत ठेवण्यावर त्यांचा भर असे. कोणतेही साथीचे आजार उद्भवले तर त्यास तोंड देणारी यंत्रणा त्यात तातडीने कार्यरत करीत असत. आता डॉ. कुलकर्णी सेवानिवृत्त झाल्या असून, पालिकेला पूर्णवेळ अधिकारी मिळू शकला नाही. परिणामी जी कामे महापालिकेने करावयाची असतात, ती कामे सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण खात्याला करावी लागत आहेत. साथीच्या आजाराशी कसा मुकाबला करावा याचे ज्ञान असणारा पालिकेत कोणताही तज्ज्ञ डॉक्टर नाही. त्यामुळे घाटी, मिनी घाटी या दोन शासकीय रुग्णालयावर कोरोनाप्रमाणेच सारीचाही ताण येत आहे.
| | |