पुन्हा रामायण, महाभारत

31 Mar 2020 13:40:10

 रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही ग्रंथांना महाकाव्य किंवा epic म्हणून ओळखले जाते. यांचा विस्तार किती मोठा आहे ते पाहू. वाल्मिकी रामायण २४ हजार श्लोकांचे आहे, तर महाभारत एक लाख श्लोकांचे आहे. जगातील इतर महाकाव्यांच्या तुलनेत ही महाकाव्ये किती मोठी आहेत...

 

ramayan_1  H x
 
रामायण आणि महाभारत! या ग्रंथांविषयी किती बोलावे! किती लिहावे! किती सांगावे!... तरीही कमीच आहे! भारताची ही अद्भुत साहित्यनिर्मिती आहे. हे ग्रंथ अचाट आहेत, अफाट आहेत, अमित आहेत, अमोल आहेत आणि अतुल्य आहेत!

 


आता हे दोन्ही ग्रंथ इतिहास सांगतात का? ह्या गोष्टी खऱ्याच घडल्या होत्या का? घडल्या असतील तर कोणत्या काळात घडल्या होत्या? ह्याचा काही पुरातत्त्वीय पुरावा मिळतो का? या ग्रंथांत कुठल्या गोष्टी घुसडल्या आहेत? वगैरे सगळे प्रश्न बाजूला ठेवून आपण ह्या दोन्ही ग्रंथांकडे 'साहित्य' म्हणून पाहू, निदान या लेखापुरते तरी.
 

ह्या दोन्ही ग्रंथांना महाकाव्य किंवा epic म्हणून ओळखले जाते. यांचा विस्तार किती मोठा आहे ते पाहू. वाल्मिकी रामायण २४ हजार श्लोकांचे आहे, तर महाभारत एक लाख श्लोकांचे आहे. जगातील इतर महाकाव्यांच्या तुलनेत ही महाकाव्ये किती मोठी आहेत ते पाहू. ग्रीक कवी होमरचे इलियड आणि ओडेसी ही पाश्चिमात्य महाकाव्ये. यामध्ये १५,६९३ व १२,११० श्लोक आहेत. पर्शियन महाकाव्य रुस्तम सोहराबमध्ये जवळपास ५०,००० श्लोक आहेत. ओर्लान्डो फ़ुरोसिओ या इटालियन महाकाव्यात १९,३६८ श्लोक (दोन दोन ओळींचे व्हर्स) आहेत. डिव्हाइन कॉमेडीमध्ये ७,११७ (दोन ओळींचे व्हर्स) आहेत. ब्यूवुल्फ या स्कॅन्डिनेव्हियन महाकाव्यात १,५०० श्लोक आहेत. आणि पॅरडाइज लॉस्ट या जॉन मिल्टनच्या महाकाव्यात १०,००० ओळी आहेत. तराजूच्या एका पारड्यात रामायण आणि महाभारत आणि दुसऱ्या पारड्यात जर या सगळ्या साहित्यकृती टाकल्या, तरीसुद्धा रामायण-महाभारताचे पारडे आधीच जड आहे.

रामायण व महाभारत आजही माहीत आहेत, सांगितली जातात, गायली जातात आणि पाहिलीसुद्धा जातात. हे भाग्य इतर जागतिक महाकाव्यांना लाभले नाहीये.

 
रामायण उत्तर भारत ते दक्षिण भारत या पट्टयात घडते, तर महाभारत पूर्व भारत ते पश्चिम भारत या पट्टयात घडते. या प्रकारे केवळ सांस्कृतिक दृष्टीनेच नाही, तर भौगोलिक दृष्टीनेसुद्धा हे ग्रंथ संपूर्ण भारताला एकत्र बांधतात.


महाकाव्याचे एक उद्दिष्ट असते - एका महान व्यक्तीचे चरित्र सांगायचे. त्याच्या आयुष्यात कुठली संकटे आली, त्याने त्या संकटांना कसे धैर्याने तोंड दिले, संकटावर कशी मात केली, कोणते उपाय केले, ही त्यातली अत्यंत महत्त्वाची शिकवण असते. तसेच त्यामधून व्यासांनी आणि वाल्मिकींनी नीतीचे, धर्माचे शिक्षण (ethics and morals) अगदी हसत खेळत रंगतदार करून गोष्टींमधून सांगितले आहे. ज्या ग्रंथाच्या कोंदणात भगवद्गीतेचा हिरा जडवला आहे, त्या काव्यराज महाभारताचे वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात
जो सर्वांच्या कौतुकाचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये विवेकाच्या कथा सांगितल्या आहेत, जो नवरसांच्या अमृताचा समुद्र आहे, जो विद्येचे मूळ पीठ आहे, सर्व धर्मांचे माहेर आहे, सज्जनांच्या काळजाचा तुकडा आहे आणि शारदेच्या लावण्याचे अर्थात शब्दसौंदर्याचे रत्नभांडार आहे, त्या ग्रंथाने चातुर्याला शहाणपण आणले, माधुर्याला गोडवा प्राप्त झाला, कलांना कुशलता आली, शृंगाराला सुरेखता आली, सुखाला सौभाग्य मिळाले आणि पुण्याला तेज चढले! ज्याप्रमाणे नगरात राहणारा माणूस आपोआप सुसंस्कृत होतो, तसे हा ग्रंथ वाचणारा आपोआप शहाणा होतो.
एथ चातुर्य शहाणे झाले | प्रमेय रुचीस आले |
आणि सौभाग्य पोखले | सुखाचे एथ || .३५ ||
माधुर्यी मधुरता | शृंगारी सुरेखता |
रूढपणा उचिता | दिसे भले || .३६ || 
 

ramayan_1  H x  

अमर होण्याच्या इच्छेने अनेक प्राचीन कथासुद्धा या ग्रंथात येऊन बसल्या. या ग्रंथात जे नाही ते त्रैलोक्यात कुठेच नाही. म्हणून हे जग व्यासोच्छिष्ट आहे. जसे सूर्याच्या प्रकाशाने सर्व काही दृष्टीस पडते, तसे व्यासांच्या बुद्धीच्या तेजाने या ग्रंथात विश्व प्रकट होते.
 


या ग्रंथांनी जशी ज्ञानेश्वरांना भुरळ घातली, तशीच भास, कालिदास, माघ, श्रीहर्ष यासारख्या थोर कवींनादेखील भुरळ घातली. नीलकंठ चतुर्धर, लोकमान्य टिळक यांसारख्या विद्वानांना भुरळ घातली. बी.बी. लाल व सी.आर. राव यांच्यासारख्या आर्किऑलॉजिस्ट्सना भुरळ घातली. महात्मा गांधींमधल्या समाजसेवकाला भुरळ घातली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनासुद्धा या ग्रंथांनी भुरळ घातली. तसेच कलाकारांना, शिल्पकारांना, नटांना, गायकांना, वादकांना, नृत्यांगनांना रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांनी मोहिनी घातली. मंदिरातील शिल्पांमध्ये रामायणातील, महाभारतातील व पुराणातील प्रसंगांची शिल्प-चित्रे दिसतात. फक्त भारतातच नाही, तर आग्नेय आशियाई देशातील मंदिरांवरसुद्धा या ग्रंथातील प्रसंगांवर आधारित चित्रे-शिल्पे दिसतात.

भारतीय लोककला पाहिल्या असता मधुबनी, पट्टचित्र, चित्रकथी, राजस्थानी, पहाडी, कांगडा, तंजावर ह्या सगळ्या शैलींचे विषय रामायण, महाभारत व पुराण याभोवती फिरतात. रागदारी संगीतातील चिजांमधून कृष्ण काढला तर त्यातील रस संपून फक्त चोथा तेवढा उरेल. कुठलेही क्षेत्र घ्या - गोपालन असो, कृषी असो, राजनीती असो, राजकारण असो, समाजकारण असो, अध्यात्म असो, बलोपासना असो, कौटुंबिक मूल्ये असोत, धर्म असो, राजधर्म असो - सगळ्या क्षेत्रांवर राम-सीता, हनुमान, भरत, कृष्ण, बलराम, भीष्म, पांडव यांचीच छाप आहे. फक्त नागरी लोकात नाही, तर आदिवासी लोकातसुद्धा.

नृत्यामध्ये केरळचे कथकली असो, तामिळनाडूचे भरतनाट्यम असो, ओडिसाचे मोहिनीअट्टम असो, मणिपूरचे मणिपुरी असो किंवा उत्तरेचे कथ्थक नृत्य असो, ह्या सर्व अभिजात कलांमध्ये रामायण-महाभारतातील व पुराणातील कथा सादर केल्या जातात. लोककलांमध्येसुद्धा ओडिसाचे चाहू नृत्य असो, महाराष्ट्राचे दशावतारी असो, उत्तर प्रदेशची रामलीला असो, हरियाणाचे रमन असो किंवा बंगालची जत्रा असो, ह्या सर्वांमध्ये रामायण-महाभारत सादर केले जाते. त्यामधील काही निवडक प्रसंग किंवा संपूर्ण रामायण सादर केले जाते. चित्रपटांचे विषयसुद्धा या दोन साहित्यांभोवती फिरले आहेत. चित्रपटाची सुरुवातच राजा हरिश्चंद्र, लंकादहन यासारख्या रामायण-महाभारतावर आधारित असलेल्या विषयांपासून झाली. मागच्या शंभर वर्षांत भारतातील शेकडो चित्रपट यावर तयार झाले आहेत आणि अजूनही या माध्यमाची रामायण-महाभारत सांगायची तहान भागली नाही.

प्रत्येक सादरीकरण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. त्या सादरीकरणाच्या strengths वेगवेगळ्या असतात - उदा., चाहूमध्ये रामायण सादर करताना अतिशय चपळ आणि वेगवान हालचाली असतात, अगदी कोलांट्याउड्यासुद्धा असतात. तेच इंडोनेशियाच्या रामायण बॅलेमध्ये अतिशय संथ लयीत नृत्य करत रामायण सादर केले जाते. रामलीलामध्ये रामायण अतिशय नाट्यपूर्णतेने सादर केले जाते. तेच एखादी आर्ट फिल्म रामायण सादर करताना downplay अधिक वापरेल. कोणी रामायणावर शून्य नाट्यअसलेली एखादी डॉक्युमेंटरी करेल, तर कोणी एखादी ऐतिहासिक पाषाणयुगीन कथा म्हणून सादर करेल. एखाद्या संतांनी सांगितलेले रामायण नीतीवर भर देणारे असेल, तर एखादा चित्रपट रामायणातील फक्त कौटुंबिक कथा सांगेल. हॉलीवूडमधील कोणी त्यावर एक युद्धपट - War Movieसुद्धा करेल.
 

ramayan_1  H x  

'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीनुसार, व्यक्ती तितके कलाविष्कार! रामलीलामध्ये सादर करण्यात येणाऱ्या रामायणामधील सेट, अभिनय, तंत्रज्ञान यांची तुलना हॉलीवूडमधील सादरीकरणाशी किंवा तंत्रज्ञानाशी करणे अगदीच योग्य नाही. किंवा मधुबनी शैलीत काढलेल्या रामायणाची गोडी वेगळी आणि वासुदेव कामत यांनी काढलेल्या रामायणाच्या चित्रांची खोली वेगळी. मधुबनी चित्रे अगदीच साधी आहेत किंवा ती चित्रशैली अगदी खेडवळ आहे किंवा त्यामध्ये रामायणातील तत्त्वज्ञान दिसत नाही असे म्हणणे... हा मधुबनी चित्राचा दोष किंवा कमतरता नाही, तर पाहणारा untrained आहे असेच म्हणावे लागेल.

आज आपण जेव्हा तीस वर्षांपूर्वीची मालिका बघतो, तेव्हा अर्थातच ते तंत्रज्ञान, त्यातील अभिनय जुना आहे. That is a part and parcel of that creation. पण तरीसुद्धा रामायण, महाभारत या जुन्या मालिका most viewed होतात. अगदी शाळा-कॉलेजातील मुलेसुद्धा न चुकता सकाळ-संध्याकाळ या मालिका आवडीने बघत आहेत. लहानपणी रामायण पाहताना जे कळले नव्हते, ते आज कळतेय असे प्रौढांमध्ये बोलले जात आहे. एकूण आबालवृद्ध आवडीने या मालिका पाहत आहेत. हे कशामुळे? ह्याचा विचार करायला हवा. माझ्या मते, याचे महत्त्वाचे कारण आहे त्या मालिकांमध्ये असलेला कन्टेन्ट. त्यामधून मिळणारी प्रेरणा. रामाच्या शब्दातून किंवा कृष्णाच्या शब्दातून मिळणारी मानसिक शक्ती. त्यामधून होणारे मार्गदर्शन. त्यामधील तत्त्वज्ञान. त्याच्यातील रंजकता. त्याची रसपूर्णता आणि हे सगळे असतानासुद्धा गोष्टीरूपामध्ये त्याचे झालेले सादरीकरण!

शेवटी काय आहे... रामायणाच्या सादरीकरणातले दोष पाहण्यापेक्षा, रामायण पाहून स्वत:मधले दोष दिसणे आणि ते सुधारण्याचा निश्चय करणे हेच रामायण किंवा महाभारत पाहिल्याचे फळ आहे.

 

 
Powered By Sangraha 9.0