कोरोना नावाचा काळ

29 Mar 2020 11:49:13
साधारण शंभर वर्षांनंतर या प्रकारचं कुठलंही महायुद्ध किंवा जगाला कवेत घेणारा कुठलाही विस्थापनाचा काळ नसतानादेखील कोरोना फक्त तीन महिन्यांच्या काळात जगभर पसरला, याचं कारण मात्र वेगळं होतं, ते म्हणजे ग्लोबलायझेशन अर्थात जागतिकीकरण आणि एकविसाव्या शतकातले नवीन सिल्क रूट्स.


virus and india_1 &n 

जानेवारी १९१८ची गोष्ट आहे. पहिलं महायुद्ध संपायला अजून साधारणपणे नऊ-दहा महिन्यांचा काळ होता. जगभर आणि विशेषतः युरोपमध्ये युद्धामुळे सैन्यांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मानवी हालचाल सुरू होती. याच दरम्यान जानेवारीच्या सुरुवातीला स्पेनच्या वृत्तपत्रांमध्ये एकापाठोपाठ एक तापाने फणफणून लोक मरत असल्याच्या बातम्या प्रकाशित होऊ लागल्या आणि युरोपमध्ये लोकांचं धाबं दणाणलं. तोपर्यंत तरी युरोपमध्ये दुसऱ्या कुठल्याही देशात या प्रकारच्या वार्ता नव्हत्या त्यामुळे साहजिक लोकांचा ग्रह झाला की हा आजार स्पेनध्ये सुरू झाला आहे. हळूहळू अमेरिकेतून आणि आशियातल्या देशांमधूनसुद्धा या आजाराच्या बातम्या येऊ लागल्या आणि सर्वसामान्यांमध्ये पसरलं की हा रोग स्पेनमार्गे जगभर पसरलेला आहे. साहजिकच रोगाचं नामकरण झालं 'स्पॅनिश इन्फ्लुएंझा' किंवा 'स्पॅनिश फ्लू'. पण यात एक गोम होती, ती अशी की स्पेन हा युरोपमधल्या काही तटस्थ देशांपैकी एक होता. पहिल्या महायुद्धात स्पेनचा सहभाग नव्हता. त्यामुळे स्पेनमध्ये वर्तमानपत्रांवर आणि माध्यमांवर सरकारकडून बंधनं लादलेली नव्हती. युरोपच्या बाकी देशांमध्ये मात्र ही परिस्थिती नव्हती. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या सगळ्याच देशांमध्ये युद्धामुळे माध्यमांवर बंधनं होती आणि त्यामुळे जनमानसामध्ये भीती पसरेल अशा प्रकारच्या कुठलीही बातमी हे देश प्रसिद्ध होऊ देत नव्हते. असं असलं तरी घडायचं ते घडत होतंच. महायुद्ध संपलं, इन्फ्लुएंझाचा ओस उतरला आणि जशी जशी माहिती समोर येऊ लागली, तसं तसं जगाच्या लक्षात येऊ लागलं की फक्त स्पेनमध्येचं नाही, तर संपूर्ण युरोपभर ही साथ आधीच पसरलेली होती. फक्त माध्यमांवर असलेल्या बंधनांमुळे बाकीच्या देशांनी ही बातमी लपवली. त्यातच युद्धामुळे होत असलेल्या भरमसाठ मृत्यूंमुळे साथीच्या रोगावर फारशी चर्चा सुरुवातीच्या काळात झाली नाही. पुढे साठच्या दशकात काही अभ्यासकांनी असं मत मांडलं की हा विषाणू मुळात १९१५च्याच सुमारास चीनमधून बाकी जगात प्रसारित व्हायला सुरुवात झाली होती. अर्थात या साथीची सुरुवात कुठे झाली याबद्दल सगळ्याच अभ्यासकांमध्ये मतभेद असले, तरी एका गोष्टीबद्दल मात्र एकवाक्यता आहे, ती म्हणजे याने झालेलं नुकसान भयंकर आणि कित्येकांसाठी भरून न येणारं होतं. स्पॅनिश फ्लूची ही साथ ओसरायला जगाला जवळजवळ तीन वर्षं लागली. या तीन वर्षांत इन्फ्लुएंझाने सर्वसामान्य अंदाजानुसार पाच ते दहा कोटी लोकांचा बळी घेतला. फक्त भारतातच लोकसंख्येच्या पाच टक्के लोक या इन्फ्लुएंझाला बळी पडले, असा अंदाज आहे. पहिलं महायुद्ध, त्यापाठोपाठ स्पॅनिश इन्फ्लुएंझाची साथ आणि त्यामागून आलेली १९२०-२१ची भयंकर मंदी हा पाच-सहा वर्षांचा काळ विसाव्या शतकातल्या अतिशय कठीण काळांपैकी होता.
 

virus and india_1 &n 
 
१९२०च्या स्पॅनिश इन्फ्लुएंझामध्ये ज्या विषाणूने धुमाकूळ घातला होता, त्या विषाणूच्याच स्ट्रेनने २००९मध्ये पुन्हा धुमाकूळ घातला. हा विषाणू म्हणजे HN१ अर्थात २००९मधला स्वाइन फ्लू
योगायोगाने या स्पॅनिश फ्लूची साथ संपून शंभर वर्षं होत असतानाच, डिसेंबर २०१९मध्ये चीनमध्ये आणखी एका विषाणूच्या साथीची सुरुवात झाली आणि तो विषाणू म्हणजे आपल्याला आज आपल्याच घरात बंदिस्त करणारा कोरोना अर्थात COVID-१९ विषाणू. स्पॅनिश फ्लू जगभर पसरण्यामागे मोठं कारण होतं, ते म्हणजे पहिल्या महायुद्धामुळे सैन्याची जगभर होणारी हालचाल. या हालचालीमुळे दळणवळणाची साधनं प्राथमिक अवस्थेत असूनही हा विषाणू जगभर पसरला. कारण युद्ध जरी मुख्यतः युरोपमध्ये सुरू असलं, तरी वसाहतवादामुळे या युद्धात भाग घेणारं सैन्य हे जगभरातल्या सगळ्याच देशांचं होतं. त्यामुळे त्या त्या देशातलं सैन्य, परतीच्या मार्गावर हा रोग आपल्या देशात घेऊन गेलं. भारतातही स्पॅनिश इन्फ्लुएंझाचा प्रादुर्भाव याच प्रकारे झाला होता

 
साधारण शंभर वर्षांनंतर या प्रकारचं कुठलंही महायुद्ध किंवा जगाला कवेत घेणारा कुठलाही विस्थापनाचा काळ नसतानादेखील कोरोना फक्त तीन महिन्यांच्या काळात जगभर पसरला, याचं कारण मात्र वेगळं होतं, ते म्हणजे ग्लोबलायझेशन अर्थात जागतिकीकरण आणि एकविसाव्या शतकातले नवीन सिल्क रूट्स.

वुहान हे चीनमधल्या हुबेई राज्याची राजधानी असलेलं
, देशातल्या १० मोठ्या शहरांपैकी एक शहर आहे. या शहराची लोकसंख्या आहे साधारणपणे एक कोटी दहा लाख. ऐंशीच्या दशकापर्यंत कृषक व्यवसायांवर अवलंबून असलेली या शहराची अर्थव्यवस्था गेल्या चाळीस वर्षात आमूलाग्र बदलली आहे. वुहान हे आजच्या घडीला चीनमधल्या मोठ्या औद्योगिक शहरांपैकी एक शहर आहे. इतकं की फ्रान्सच्या चीनमधल्या एकूण गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक फक्त वुहान या शहरात आहे. मराठी माणसासाठी या शहराची आणखी एक ओळख म्हणजे १९३९मध्ये चीनला वैद्यकीय साहाय्यासाठी गेलेले डॉ. कोटणीससुद्धा सगळ्यात आधी वुहानला उतरले होते. जगातल्या अतिशय दाटीवाटीने वसलेल्या शहरांपैकी वुहान हे एक शहर आहे. वुहानचं रेल्वे स्टेशन हे चीनमधल्या चार मोठ्या रेल्वे हब्सपैकी एक आहे. याशिवाय वुहानचं यांगझे नदीवर बांधलेलं बंदर हे चीनमधल्या महतवाच्या बंदरांपैकी एक असून इथून मोठ्या प्रमाणावर सागरी व्यापार होतो. याशिवाय वुहानला आंतरराष्ट्रीय विमानतळ असून हे चीनमधलं चौथं सगळ्यात व्यग्र विमानतळ आहे. इथून लंडन, न्यू यॉर्क, मॉस्को, सॅन फ्रान्सिस्को, इस्तंबूल, पॅरिस, रोम या सगळ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांशी थेट कनेक्टिव्हिटी आहे. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे वुहान हे शहर चीनच्या बाकी शहरांशी आणि मुख्यतः संपूर्ण जगाशी कशा प्रकारे 'हायली कनेक्टेड' आहे, हे अधोरेखित करणं कोरोनाच्या प्रसाराचं मूळ समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.
नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी या वुहानमध्ये एकाएकी न्यूमोनियाच्या केसेस हॉस्पिटलमध्ये येऊ लागल्या होत्या. डॉक्टर्सना याबद्दल फक्त एवढंच माहीत होतं की न्यूमोनियाच्या नेहमीच्या उपाययोजनेला हा विषाणू काही भीक घालत नव्हता. डिसेंबरया सुरुवातीच्या आठवड्यात चिनी समाजमाध्यमांवर या नवीन विषाणूसबद्दल कुजबुज सुरू झाली. बऱ्याच चिनी वर्तमानपत्रांनुसार, (उदा. कायशीन मीडिया) आठ डिसेंबरच्या सुमारास वुहानमध्ये पहिला अधिकृत रोगी निदान झाला. अगदी काहीच दिवसात हा आकडा सत्तावीसपर्यंत गेला. ख्रिसमसपर्यंत ही कुजबुज रेडिटसारख्या जागतिक पण काहीशा ऑफस्ट्रीम समाजमाध्यमांवरही पसरू लागली. पण चीन अजूनही यावर अधिकृतपणे कुठलंही भाष्य करायला तयार नव्हता. ३१ डिसेंबरला चीनने अधिकृतपणे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला अशा प्रकारच्या साथीबद्दल माहिती दिली. ही माहिती देत असतानाच त्यांनी WHOला हेही आश्वस्त केलं की ही रोगाची साथ नियंत्रणात असून घाबरून जायचं कुठलंही कारण नाहीये. पण या आश्वासनातला फोलपणा दोनच महिन्यांत सगळ्या जगाच्या लक्षात येणार होता.
चिनी समाज हा आधुनिक जागतिक समाजांमधला एक फार 'ऑफ द ट्रॅक' आणि अतिशय वेगळ्या प्रकारे हाताळला गेलेला समाज आहे. चिनी जनमानसावर त्यांच्या सरकारची पकड अतिशय कठोर आणि बरेचदा अमानुष असते. पाश्चात्त्य मोकळ्या जगात जी सामाजिक दुःस्वप्न (उदाहरणार्थ ब्रीच ऑफ प्रायव्हसी - अभिव्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली) समजली जातात, त्या गोष्टी चिनी सरकारसाठी आणि समाजासाठी बरेचदा अतिशय सामान्य असतात. आणि म्हणूनच समाजमाध्यमांवर घारीसारखं लक्ष ठेवणं असो किंवा सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याच्या मोबाइल फोन्सद्वारा केलेला हस्तक्षेप, चीन यातली कुठलीही गोष्ट निषिद्ध मानत नाही. म्हणूनच आठ डिसेंबरनंतर जेव्हा चिनी यंत्रणांना चिनी समाजमाध्यमांवर सार्ससारख्या कुठल्यातरी विषाणूची कुणकुण लागायला सुरुवात झाली, तसं चीनने दोन गोष्टी प्रकर्षाने केल्या. पहिली - ही नवीन साथ जोपर्यंत गोपनीय ठेवता येईल तोपर्यंत याला गोपनीय ठेवायचं. दुसरी - वाऱ्याच्या वेगाने पसरत असलेल्या भीतीला आणि अफवांना आवरण्यासाठी प्रशासकीय स्थिरता आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणं. कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची अधिकृत नोंदणी झाल्याच्या किमान वीस दिवसांपर्यंत चीनने बाकीच्या देशांना याची जितकी कमी माहिती देता येईल तितकी कमी माहिती लागू देण्याचा प्रयत्न केला. अगदी ३१ डिसेंबरला WHOला अधिकृतरीत्या याबद्दल माहिती दिल्यानंतरही, एका माणसापासून दुसऱ्याला ह्या रोगाची लागण होते, हे तथ्य चिनी प्रशासन लपवत होतं.
८ डिसेंबर ते २३ डिसेंबर या तेवीस दिवसांमध्ये चिनी यंत्रणा दोन पातळ्यांवर वेगाने काम करत होत्या, पहिली - अफवा आणि भीती रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर माहितीवर नियंत्रण ठेवणं आणि शक्य झाल्यास माहिती सरळ लपवणं. दुसरी - वैद्यकीय पातळीवर रात्रीचा दिवस करून या विषाणूचा स्ट्रेन शोधणं, रोगनिदानासाठी रिएजंट्स तयार करणं, संपूर्ण चीनभर हे रिएजंट्स पोहोचवणं आणि वुहानमध्ये किमान शंभरएक लोकांवर या चाचण्या करून अधिकाधिक माहिती गोळा करणं. हे काम अक्षरशः वेळेशी शर्यत लावल्यासारखं होतं. पहिल्या पातळीवर जिथे प्रशासन माहिती दाबून, साथ पसरण्याचा धोका कैकपटींनी वाढवत होतं, तिथेच दुसऱ्या पातळीवर चिनी वैद्यकीय व्यवस्था जिवाचं रान करून या रोगावर नियंत्रण मिळवण्याचा आणि या साथीचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत होती. एकाच समाजात एकाच व्यवस्थेत या अतिशय विरुद्ध टोकांचे दोन दृष्टीकोन दिसणं हे फार रोचक आहे.
 
चीनच्या वैद्यकीय व्यवस्थेच्या परिश्रमाचं आणि तत्परतेचं एकच उदाहरण देतो. शांघायच्या सार्वजनिक आरोग्य केंद्राला वुहानहून २६ डिसेंबर रोजी चाचणीसाठी काही रुग्णांचे रक्ताचे नमुने मिळाले. दहा दिवसांच्या आत त्यांनी या नमुन्यांवरून विषाणूचा स्ट्रेन वेगळा करण्यात यश मिळवलं. चीनच्या डॉक्टर्सच्या या अथक परिश्रमांचा जसा बाकीच्या जगाला पुढच्या दोन महिन्यात बराच फायदा होणार होता, तसंच चिनी प्रशासकीय व्यवस्थेच्या माहिती सेन्सॉर करण्यामुळे अपरिमित नुकसानसुद्धा होणार होतं.

वुहान हे चीनमधलं एक मोठं औद्योगिक आणि दळणवळण केंद्र आहे, हे तर आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे इथून दर दिवशी लाखोंनी लोक प्रवास करत होते. न्यू यॉर्क टाइम्सच्या एका बातमीनुसार, १ जानेवारीला - अर्थात चीनने WHOला अधिकृतपणे कोरोनाबद्दल माहिती दिल्याच्या दुसऱ्या दिवशी, वुहानमधून साधारणपणे या एकाच दिवशी एक लाख पंचाहत्तर हजार लोक बाहेर पडले. भरीस भर म्हणून २५ जानेवारीला चिनी नवीन वर्षाचा उत्सव होता. हा उत्सव चीनमधला सगळ्यात मोठा सण असतो. दर वर्षी काही कोटी लोक चीनमध्ये या सणाच्या आसपास प्रवास करून आपल्या गावी किंवा शहरी जातात. वुहान ठप्प - लॉकडाउन झालं २३ जानेवारीला. २५ जानेवारीला चिनी नववर्ष साजरं करण्यात आलं. त्यामुळे २३ जानेवारीच्या लॉकडाउनच्या आधीच बरेच लोक आपल्या गावी निघून गेले होते. १ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीध्ये वुहानमधून साधारणपणे सत्तर लाख लोक चीनमध्ये आणि जगाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून गेले. यातली कितीतरी हजार लोक कोरोना विषाणूचे वाहक होते, असं तज्ज्ञांचं मत आहे. ८ डिसेंबर ते २३ जानेवारी या जवळजवळ चाळीस दिवसांमध्ये हा विषाणू संपूर्ण चीनमध्ये तर पसरला होताच, त्याचबरोबर हजारो प्रवाशांनी जगाचाही कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला होता. याला बऱ्याच प्रमाणात जबाबदार होती चीनची लाल फीत नोकरशाही. चीनबद्दलची नकारात्मक प्रसिद्धी थांबवण्यात प्रशासन एवढं गुंतलेलं होतं की माहितीचा प्रसार थांबवून आपण एक फार मोठ्या धोक्याला आमंत्रण देतोय, हे त्यांच्या लक्षात आलं नाही, किंवा लक्षात आलं असलं तरी त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. डॉक्टर्सनी आणि तज्ज्ञांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना धुडकावून चिनी प्रशासनाने वुहानमध्ये होणारे मोठे कार्यक्रम आणि प्रदर्शनं अगदी २० जानेवारीपर्यंत थांबवले नाहीत. चिनी प्रशासन हे एवढ्या डिनायल मोडमध्ये होतं की १८ जानेवारीपर्यंत ते हे मान्यही करायला तयार नव्हते की ही साथ एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत संक्रमित होते (अर्थात ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन). डॉक्टर्सना मात्र याबद्दल पुरेसा विश्वास होता. पण हळूहळू जनतेलासुद्धा आपल्याच सरकारवर संशय येऊ लागला होता. समाजमाध्यमांतून येणाऱ्या आणि एकूणच आजूबाजूला आजारी पडणाऱ्या लोकांच्या एवढ्या बातम्या कानावर येत होत्या की प्रकरण सरकारच्या नियंत्रणात आहे ह्याबद्दल जनता हळूहळू साशंक होऊ लागली होती. परिस्थिती जेव्हा या वळणावर पोहोचली, तेव्हा प्रशासनाच्या लक्षात आलं की आपल्याला आता अशा कुठल्यातरी व्यक्तीला किंवा संस्थेला या प्रकरणात ओढावं लागणार, ज्यांची विश्वासार्हता आपल्यापेक्षा जास्त असेल. आणि म्हणून प्रवेश झाला झोन्ग ननशांग यांचा


झोन्ग ननशांग यांना चीनच्या वैद्यकीय क्षेत्रात सेलेब्रिटीचं स्थान प्राप्त आहे. २००३च्या सार्सच्या (SARSच्या) विषाणूचा शोध त्यांनीच लावला होता. २००३ची सार्सची साथ थांबवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, त्यामुळे विज्ञानाच्या आणि वैद्यकीय जगतात त्यांच्या बोलण्याला एक वजन होतं. पण चिनी प्रशासनाला कुठल्याही प्रकारच्या वैद्यकीय मदतीसाठी झोन्ग ननशांग यांची गरज नव्हती. वुहानच्या आणि शांघायच्या वैद्यकीय टीमने आधीच - म्हणजे ५ जानेवारीच्याच सुमारास विषाणूचा स्ट्रेन वेगळा केला होता. खरं तर संशोधनाच्या आघाडीवर चिनी डॉक्टर्स आणि संशोधक अतुलनीय काम करत होते. प्रॉब्लम होता तो पर्सेप्शनच्या फ्रंटवर. तिथे गरज होती एका विश्वासार्ह आवाजाची. एखाद्या अशा आवाजाची, जो परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगू शकेल आणि जनता त्याच्यावर विश्वास ठेवेल. झोन्ग ननशांग हे एकदा व्यवस्थापनाचा चेहरा झाल्यानंतर वुहानमध्ये गोष्टी वेगाने हलल्या. पण तोपर्यंत अर्थात फार उशीर झाला होता. या ४० दिवसांच्या काळात कोरोना संपूर्ण चीनभर तर पसरला होताच, त्याशिवाय जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पहिली आंतरराष्ट्रीय केससुद्धा जगासमोर आली होती. वुहान पूर्णपणे लॉकडाउन केल्याच्या तिसऱ्या दिवशी अमेरिकेत पहिला कोरोना रुग्ण सापडला. ही तर फक्त सुरुवात होती. मी हा लेख लिहीत असताना एकीकडे जेव्हा चीनने विलगीकरण आणि शास्त्रशुद्ध पद्धतशीर रोगनिदान पद्धत वापरून जिथे विषाणूचा प्रभाव बऱ्यापैकी कमी केलाय, तिथे जगभरात मात्र हा कोरोना विषाणू थैमान घालतोय. एकट्या न्यू यॉर्क प्रांतात आजच्या घडीला पन्नास हजारापेक्षा जास्त रुग्ण आहेत. इटली, जर्मनी, इराण या देशांबद्दल तर बोलायलाही नको. भारत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकवीस दिवसांच्या लॉकडाउनमध्ये आहे. चीनमध्ये मात्र परिस्थिती जवळजवळ सामान्य होण्याच्या दिशेने प्रवास करते आहे.
 
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रशासकीय अराजकाचं उदाहरण असणारा चीन, २३ जानेवारीनंतर मात्र १८० अंशाने बदलला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे १८ जानेवारीनंतर चीनच्या केंद्रीय प्रशासन व्यवस्थेने यात घातलेलं लक्ष. चीनने वुहान संपूर्णपणे लॉकडाउन केलं आणि बऱ्याच पाश्चिमात्य देशांच्या माध्यमांच्या भुवया उंचावल्या. याचं कारण होतं गेल्या शंभर वर्षांत अशा प्रकारच्या महामारीचा सामना करायची गरजच आपल्या समाजाला पडली नव्हती. नाही म्हणायला स्वाइन फ्लू, सार्स यासारख्या रोगांच्या साथी वेळोवेळी आल्या होत्या, पण त्यांचा प्रभाव आणि पसरायची गती सध्याच्या कोरोना विषाणूएवढी तीव्र नव्हती. त्यामुळे अशा साथीशी कसं लढायचं, हेच समाजाच्या विस्मरणात गेलं होतं. तसं नसतं, तर लॉकडाउनवरून सुरुवातीला पाश्चात्त्य माध्यमांमध्ये चीनवर ज्या प्रकारे टीका झाली, तशी टीका व्हायला नको होती. कारण चीन जे करत होता, तेच सगळे उपाय बऱ्याच युरोपीय देशांनी आणि अगदी अमेरिकेनेसुद्धा १९२०च्या स्पॅनिश फ्लूच्या वेळेस वापरलेले होते. उदाहरणार्थ, समुद्री बंदरं पूर्णपणे बंद करणं, शहरांचे लॉकडाउन, प्रवासावर बंदी इत्यादी

चौदाव्या शतकातला ब्लॅक डेथ म्हणून कुप्रसिद्ध असलेला ब्युबॉनिक प्लेग, ज्याने युरोपच्या पन्नास टक्के जनसंख्येचा तीन वर्षांत बळी घेतला, ती साथ युरोपमध्ये पोहोचायला साधारण दहा वर्षांचा काळ लागला. विसाव्या शतकातला स्पॅनिश फ्लूसुद्धा जगभर पसरायला साधारणपणे चार वर्ष लागली. कोरोना आजच्या घडीला मार्च २०२०मध्ये जगातल्या जवळजवळ प्रत्येक देशात पोहोचलेला आहे. आणि हे साध्य करायला ह्या विषाणूला फक्त तीन महिन्यांचा कालावधी लागला आहे. कोरोनाचा मृत्युदर बाकीच्या साथीच्या रोगांपेक्षा कमी असला, तरी त्याच्या पसरण्याचा दर बराच वेगवान आहे. त्याला जोड आहे जागतिकीकरणाची आणि दळणवळणाच्या जलद साधनांची. ही साथ आणखी किती दिवस चालेल किंवा अर्थव्यवस्थेवर, मानवी समाजावर याचा काय दूरगामी परिणाम होईल हे सांगणं या क्षणीतरी कोणालाही शक्य नाहीये; पण एक मात्र नक्की आहे की जर ह्या विषाणूला आपण गंभीरपणे घेतलं नाही, तर याने होणारं नुकसान बहुधा न भरून निघणारं असेल.

- इंद्रनील पोळ

 

Powered By Sangraha 9.0